सोनयाचें सुंदर ।निर्वाळिलें होय घर ।परी सर्पांगना द्वार ।रुंधलें आहे ॥ १५०२ ॥
निपजे दिव्यान्न चोखट ।परी माजीं काळकूट ।असो मैत्री कपट- ।गर्भिणी जैसी ॥ १५०३ ॥
तैसी तपभक्तिमेधा ।तयाची जाण प्रबुद्धा ।जो माझयांची कां निंदा ।माझीचि करी ॥ १५०४ ॥
याकारणें धनंजया ।तो भक्तु मेधावीं तपिया ।तरी नको बापा इया ।शास्त्रा आतळों देवों ॥ १५०५ ॥
काय बहु बोलों निंदका ।योग्य स्रष्टयाहीसारिखा ।गीता हे कवतिका- ।लागींही नेदीं ॥ १५०६ ॥
म्हणौनि तपाचा धनुर्धरा ।तळीं दाटोनि गाडोरा ।वरी गुरुभक्तीचा पुरा ।प्रासादु जो जाला ॥ १५०७ ॥
आणि श्रवणेच्छेचा पुढां ।दारवंटा सदा उघडा ।वरी कलशु चोखडा ।अनिंदारत्नांचा ॥ १५०८ ॥
ऐशा भक्तालयीं चोखटीं ।गीतारत्नेश्वरु हा प्रतिष्ठीं ।मग माझिया संवसाटी ।तुकसी जगीं ॥ १५०९ ॥
कां जे एकाक्षरपणेंसीं ।त्रिमात्रकेचिये कुशीं ।प्रणवु होतां गर्भवासीं ।सांकडला ॥ १५१० ॥
तो गीतेचिया बाहाळीं ।वेदबीज गेलें पाहाळी.ण् ।कीं गायत्री फुलींफळीं ।श्लोकांच्या आली ॥ १५११ ॥
ते हे मंत्ररहय गीता ।मेळवी जो माझिया भक्ता ।अनन्यजीवना माता ।बाळका जैसी ॥ १५१२ ॥
तैसी भक्तां गीतेसीं ।भेटी करी जो आदरेंसीं ।तो देहापाठीं मजसीं ।येकचि होय ॥ १५१३ ॥
आणि देहाचेंही लेणें ।लेऊनि वेगळेपणें ।असे तंव जीवेंप्राणें ।तोचि पढिये ॥ १५१४ ॥
ज्ञानियां कर्मठां तापसां ।यया खुणेचिया माणुसां- ।माजीं तो येकु गा जैसा ।पढिये मज ॥ १५१५ ॥
तैसा भूतळीं आघवा ।आन न देखे पांडवा ।जो गीता सांगें मेळावा ।भक्तजनांचा ॥ १५१६ ॥
मज ईश्वराचेनि लोभें ।हे गीता पढतां अक्षोभें ।जो मंडन होय सभे ।संतांचिये ॥ १५१७ ॥
नेत्रपल्लवीं रोमांचितु ।मंदानिळें कांपवितु ।आमोदजळें वोलवितु ।फुलांचे डोळें ॥ १५१८ ॥
कोकिळा कलरवाचेनि मिषें ।सद्गद बोलवीत जैसें ।वसंत का प्रवेशे ।मद्भक्त आरामीं ॥ १५१९ ॥
कां जन्माचें फळ चकोरां ।होत जैं चंद्र ये अंबरा ।नाना नवघन मयूरां ।वो देत पावे ॥ १५२० ॥
तैसा सज्जनांच्या मेळापीं ।गीतापद्यरत्नीं उमपीं ।वर्षे जो माझ्या रूपीं ।हेतु ठेऊनि ॥ १५२१ ॥
मग तयाचेनि पाडें ।पढियंतें मज फुडें ।नाहींचि गा मागेंपुढें ।न्याहाळितां ॥ १५२२ ॥
अर्जुना हा ठायवरी ।मी तयातें सूयें जिव्हारीं ।जो गीतार्थाचें करी ।परगुणें संतां ॥ १५२३ ॥
पैं माझिया तुझिया मिळणीं ।वाढिनली जे हे कहाणी ।मोक्षधर्म का जिणीं ।आलासे जेथें ॥ १५२४ ॥
तो हा सकळार्थप्रबोधु ।आम्हां दोघांचा संवादु ।न करितां पदभेदु ।पाठेंचि जो पढे ॥ १५२५ ॥
तेणें ज्ञानानळीं प्रदीप्तीं ।मूळ अविद्येचिया आहुती ।तोषविला होय सुमती ।परमात्मा मी ॥ १५२६ ॥
घेऊनि गीतार्थ उगाणा ।ज्ञानिये जें विचक्षणा ।ठाकती तें गाणावाणा ।गीतेचा तो लाहे ॥ १५२७ ॥
गीता पाठकासि असे ।फळ अर्थज्ञाचि सरिसें ।गीता माउलियेसि नसे ।जाणें तान्हें ॥ १५२८ ॥
आणि सर्वमार्गीं निंदा ।सांडूनि आस्था पैं शुद्धा ।गीताश्रवणीं श्रद्धा ।उभारी जो ॥ १५२९ ॥
तयाच्या श्रवणपुटीं ।गीतेचीं अक्षरें जंव पैठीं ।होतीना तंव उठाउठीं ।पळेचि पाप ॥ १५३० ॥
अटवियेमाजीं जैसा ।वन्हि रिघतां सहसा ।लंघिती का दिशा ।वनौकें तियें ॥ १५३१ ॥
कां उदयाचळकुळीं ।झळकतां अंशुमाळी ।तिमिरें अंतराळीं ।हारपती ॥ १५३२ ॥
तैसा कानाच्या महाद्वारीं ।गीता गजर जेथ करी ।तेथ सृष्टीचिये आदिवरी ।जायचि पाप ॥ १५३३ ॥
ऐसी जन्मवेली धुवट ।होय पुण्यरूप चोखट ।याहीवरी अचाट ।लाहे फळ ॥ १५३४ ॥
जें इये गीतेचीं अक्षरें ।जेतुलीं कां कर्णद्वारें ।रिघती तेतुले होती पुरे ।अश्वमेध कीं ॥ १५३५ ॥
म्हणौनि श्रवणें पापें जाती ।आणि धर्म धरी उन्नती ।तेणें स्वर्गराज संपत्ती ।लाहेचि शेखीं ॥ १५३६ ॥
तो पैं मज यावयालागीं ।पहिलें पेणें करी स्वर्गीं ।मग आवडे तंव भोगी ।पाठीं मजचि मिळे ॥ १५३७ ॥
ऐसी गीता धनंजया ।ऐकतया आणि पढतया ।फळे महानंदें मियां ।बहु काय बोलों ॥ १५३८ ॥
याकारणें हें असो ।परी जयालागीं शास्त्रातिसो ।केला तें तंव तुज पुसों ।काज तुझें ॥ १५३९ ॥
तरी सांग पां पांडवा ।हा शास्त्रसिद्धांतु आघवा ।तुज एकचित्तें फावा ।गेला आहे ? ॥ १५४० ॥
आम्हीं जैसें जया रीतीं ।उगाणिलें कानांच्या हातीं ।येरीं तैसेंचि तुझ्या चित्तीं ।पेठें केलें कीं ? ॥ १५४१ ॥
अथवा माझारीं ।गेलें सांडीविखुरी ।किंवा उपेक्षेवरी ।वाळूनि सांडिलें ।॥ १५४२ ॥
जैसें आम्हीं सांगितलें ।तैसेंचि हृदयीं फावलें ।तरी सांग पां वहिलें ।पुसेन तें मी ॥ १५४३ ॥
तरी स्वाज्ञानजनितें ।मागिलें मोहें तूतें ।भुलविलें तो येथें ।असे कीं नाहीं ? ॥ १५४४ ॥
हें बहु पुसों काई ।सांगें तूं आपल्या ठायीं ।कर्माकर्म कांहीं ।देखतासी ? ॥ १५४५ ॥
पार्थु स्वानंदैकरसें ।विरेल ऐसा भेददशे ।आणिला येणें मिषें ।प्रश्नाचेनि ॥ १५४६ ॥
पूर्णब्रह्म जाला पार्थु ।तरी पुढील साधावया कार्यार्थु ।मर्यादा श्रीकृष्णनाथु ।उल्लंघों नेदी ॥ १५४७ ॥
येर्हवीं आपुलें करणें ।सर्वज्ञ काय तो नेणें ? ।परी केलें पुसणें ।याचि लागीं ॥ १५४८ ॥
एवं करोनियां प्रश्न ।नसतेंचि अर्जुनपण ।आणूनियां जालें पूर्णपण ।तें बोलवी स्वयें ॥ १५४९ ॥
मग क्षीराब्धीतें सांडितु ।गगनीं पुंजु मंडितु ।निवडे जैसा न निवडितु ।पूर्णचंद्रु ॥ १५५० ॥
तैसा ब्रह्म मी हें विसरे ।तेथ जगचि ब्रह्मत्वें भरे ।हेंही सांडी तरी विरे ।ब्रह्मपणही ॥ १५५१ ॥
ऐसा मोडतु मांडतु ब्रह्में ।तो दुःखें देहाचिये सीमे ।मी अर्जुन येणें नामें ।उभा ठेला ॥ १५५२ ॥
मग कांपतां करतळीं ।दडपूनि रोमावळी ।पुलिका स्वेदजळीं ।जिरऊनियां ॥ १५५३ ॥
प्राणक्षोभें डोलतया ।आंगा आंगचि टेंकया ।सूनि स्तंभु चाळया ।भुलौनियां ॥ १५५४ ॥
नेत्रयुगुळाचेनि वोतें ।आनंदामृताचें भरितें ।वोसंडत तें मागुतें ।काढूनियां ॥ १५५५ ॥
विविधा औत्सुक्यांची दाटी ।चीप दाटत होती कंठीं ।ते करूनियां पैठी ।हृदयामाजीं ॥ १५५६ ॥
वाचेचें वितुळणें ।सांवरूनि प्राणें ।अक्रमाचें श्वसणें ।ठेऊनि ठायीं ॥ १५५७ ॥
मग अर्जुन म्हणे काय देवो ।पुसताति आवडे मोहो ।तरी तो सकुटुंब गेला जी ठावो ।घेऊनि आपला ॥ १५५८ ॥
पासीं येऊनि दिनकरें ।डोळ्यातें अंधारें ।पुसिजे हें कायि सरे ।कोणे गांवीं ? ॥ १५५९ ॥
तैसा तूं श्रीकृष्णराया ।आमुचिया डोळयां ।गोचर हेंचि कायिसया ।न पुरे तंव ॥ १५६० ॥
वरी लोभें मायेपासूनी ।तें सांगसी तोंड भरूनी ।जें कायिसेनिही करूनी ।जाणूं नये ॥ १५६१ ॥
आतां मोह असे कीं नाहीं ।हें ऐसें जी पुससी काई ।कृतकृत्य जाहलों पाहीं ।तुझेपणें ॥ १५६२ ॥
गुंतलों होतों अर्जुनगुणें ।तो मुक्त जालों तुझेपणें ।आतां पुसणें सांगणें ।दोन्ही नाहीं ॥ १५६३ ॥
मी तुझेनि प्रसादें ।लाधलेनि आत्मबोधें ।मोहाचे तया कांदे ।नेदीच उरों ॥ १५६४ ॥
आतां करणें कां न करणें ।हें जेणें उठी दुजेपणें ।तें तूं वांचूनि नेणें ।सर्वत्र गा ॥ १५६५ ॥
ये विषयीं माझ्या ठायीं ।संदेहाचे नुरेचि कांहीं ।त्रिशुद्धि कर्म जेथ नाहीं ।तें मी जालों ॥ १५६६ ॥
तुझेनि मज मी पावोनी ।कर्तव्य गेलें निपटूनी ।परी आज्ञा तुझी वांचोनि ।आन नाहीं प्रभो ॥ १५६७ ॥
कां जें दृश्य दृश्यातें नाशी ।जें दुजें द्वैतातें ग्रासी ।जें एक परी सर्वदेशीं ।वसवी सदा ॥ १५६८ ॥
जयाचेनि संबंधें बंधु फिटे ।जयाचिया आशा आस तुटे ।जें भेटलया सर्व भेटे ।आपणपांचि ॥ १५६९ ॥
तें तूं गुरुलिंग जी माझें ।जें येकलेपणींचें विरजें ।जयालागीं वोलांडिजे ।अद्वैतबोधु ॥ १५७० ॥
आपणचि होऊनि ब्रह्म ।सारिजे कृत्याकृत्यांचें काम ।मग कीजे का निःसीम ।सेवा जयाची ॥ १५७१ ॥
गंगा सिंधू सेवूं गेली ।पावतांचि समुद्र जाली ।तेवीं भक्तां सेल दिधली ।निजपदाची ॥ १५७२ ॥
तो तूं माझा जी निरुपचारु ।श्रीकृष्णा सेव्य सद्गुरु ।मा ब्रह्मतेचा उपकारु ।हाचि मानीं ॥ १५७३ ॥
जें मज तुम्हां आड ।होतें भेदाचें कवाड ।तें फेडोनि केलें गोड ।सेवासुख ॥ १५७४ ॥
तरी आतां तुझी आज्ञा ।सकळ देवाधिदेवराज्ञा ।करीन देईं अनुज्ञा ।भलतियेविषयीं ॥ १५७५ ॥
यया अर्जुनाचिया बोला ।देवो नाचे सुखें भुलला ।म्हणे विश्वफळा जाला ।फळ हा मज ॥ १५७६ ॥
उणेनि उमचला सुधाकरु ।देखुनी आपला कुमरु ।मर्यादा क्षीरसागरु ।विसरेचिना ? ॥ १५७७ ॥
ऐसे संवादाचिया बहुलां ।लग्न दोघांचियां आंतुला ।लागलें देखोनि जाला ।निर्भरु संजयो ॥ १५७८ ॥
तेणें उचंबळलेपणें ।संजय धृतराष्ट्रातें म्हणे ।जी कैसे बादरायणें ।रक्षिलों दोघे ? ॥ १५७९ ॥
आणि रथींचिये राहाटी ।घेई जो घोडेयासाठीं ।तया आम्हां या गोष्टी ।गोचरा होती ॥ १५८१ ॥
वरी जुंझाचें निर्वाण ।मांडलें असे दारुण ।दोहीं हारीं आपण ।हारपिजे जैसें ॥ १५८२ ॥
येवढा जिये सांकडां ।कैसा अनुग्रहो पैं गाढा ।जे ब्रह्मानंदु उघडा ।भोगवीतसे ॥ १५८३ ॥
ऐसें संजय बोलिला ।परी न द्रवे येरु उगला ।चंद्रकिरणीं शिवतला ।पाषाणु जैसा ॥ १५८४ ॥
हे देखोनि तयाची दशा ।मग करीचिना सरिसा ।परी सुखें जाला पिसा ।बोलतसे ॥ १५८५ ॥
भुलविला हर्षवेगें ।म्हणौनि धृतराष्ट्रा सांगे ।येर्हवीं नव्हे तयाजोगें ।हें कीर जाणें ॥ १५८६ ॥
मग म्हणे पैं कुरुराजा ।ऐसा बंधुपुत्र तो तुझा ।बोलिला तें अधोक्षजा ।गोड जालें ॥ १५८७ ॥
अगा पूर्वापर सागर ।ययां नामसीचि सिनार ।येर आघवें तें नीर ।एक जैसें ॥ १५८८ ॥
तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसें ।हें आंगाचिपासीं दिसे ।मग संवादीं जी नसे ।कांहींचि भेदु ॥ १५८९ ॥
पैं दर्पणाहूनि चोखें ।दोन्ही होती सन्मुखें ।तेथ येरी येर देखे ।आपणपें जैसें ॥ १५९० ॥
तैसा देवेसीं पंडुसुतु ।आपणपें देवीं देखतु ।पांडवेंसीं देखे अनंतु ।आपणपें पार्थीं ॥ १५९१ ॥
देव देवो भक्तालागीं ।जिये विवरूनि देखे आंगीं ।येरु तियेचेही भागीं ।दोन्ही देखे ॥ १५९२ ॥
आणिक कांहींच नाहीं ।म्हणौनि करिती काई ।दोघे येकपणें पाहीं ।नांदताती ॥ १५९३ ॥
आतां भेदु जरी मोडे ।तरी प्रश्नोत्तर कां घडे ? ।ना भेदुचि तरी जोडे ।संवादसुख कां ? ॥ १५९४ ॥
ऐसें बोलतां दुजेपणें ।संवादीं द्वैत गिळणें ।तें ऐकिलें बोलणें ।दोघांचें मियां ॥ १५९५ ॥
उटूनि दोन्ही आरिसे ।वोडविलीया सरिसे ।कोण कोणा पाहातसे ।कल्पावें पां ? ॥ १५९६ ॥
कां दीपासन्मुखु ।ठेविलया दीपकु ।कोण कोणा अर्थिकु ।कोण जाणें ॥ १५९७ ॥
नाना अर्कापुढें अर्कु ।उदयलिया आणिकु ।कोण म्हणे प्रकाशकु ।प्रकाश्य कवण ? ॥ १५९८ ॥
हें निर्धारूं जातां फुडें ।निर्धारासि ठक पडे ।ते दोघे जाले एवढे ।संवादें सरिसे ॥ १५९९ ॥
जी मिळतां दोन्ही उदकें ।माजी लवण वारूं ठाके ।कीं तयासींही निमिखें ।तेंचि होय ॥ १६०० ॥
तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही ।संवादले तें मनीं ।धरितां मजही वानी ।तेंचि होतसे ॥ १६०१ ॥
ऐसें म्हणे ना मोटकें ।तंव हिरोनि सात्विकें ।आठव नेला नेणों कें ।संजयपणाचा ॥ १६०२ ॥
रोमांच जंव फरके ।तंव तंव आंग सुरके ।स्तंभ स्वेदांतें जिंके ।एकला कंपु ॥ १६०३ ॥
अद्वयानंदस्पर्शें ।दिठी रसमय जाली असे ।ते अश्रु नव्हती जैसें ।द्रवत्वचि ॥ १६०४ ॥
नेणों काय न माय पोटीं ।नेणों काय गुंफे कंठीं ।वागर्था पडत मिठी ।उससांचिया ॥ १६०५ ॥
किंबहुना सात्विकां आठां ।चाचरु मांडतां उमेठा ।संजयो जालासे चोहटां ।संवादसुखाचा ॥ १६०६ ॥
तया सुखाची ऐसी जाती ।जे आपणचि धरी शांती ।मग पुढती देहस्मृती ।लाधली तेणें ॥ १६०७ ॥
तेव्हां बैसतेनि आनंदें ।म्हणे जी जें उपनिषदें ।नेणती तें व्यासप्रसादें ।ऐकिलें मियां ॥ १६०८ ॥
ऐकतांचि ते गोठी ।ब्रह्मत्वाची पडिली मिठी ।मीतूंपणेंसीं दृष्टी ।विरोनि गेली ॥ १६०९ ॥
हे आघवेचि का योग ।जया ठाया येती मार्ग ।तयाचें वाक्य सवंग ।केलें मज व्यासें ॥ १६१० ॥
अहो अर्जुनाचेनि मिषें ।आपणपेंचि दुजें ऐसें ।नटोनि आपणया उद्देशें ।बोलिलें जें देव ॥ १६११ ॥
तेथ कीं माझें श्रोत्र ।पाटाचें जालें जी पात्र ।काय वानूं स्वतंत्र ।सामर्थ्य श्रीगुरुचें ॥ १६१२ ॥
राया हें बोलतां विस्मित होये ।तेणेंचि मोडावला ठाये ।रत्नीं कीं रत्नकिळा ये ।झांकोळित जैसी ॥ १६१३ ॥
हिमवंतींचीं सरोवरें ।चंद्रोदयीं होती काश्मीरें ।मग सूर्यागमीं माघारें ।द्रवत्व ये ॥ १६१४ ॥
तैसा शरीराचिया स्मृती ।तो संवादु संजय चित्तीं ।धरी आणि पुढती ।तेंचि होय ॥ १६१५ ॥
मग उठोनि म्हणे नृपा ।श्रीहरीचिया विश्वरूपा ।देखिलया उगा कां पां ।असों लाहसी ? ॥ १६१६ ॥
न देखणेनि जें दिसे ।नाहींपणेंचि जें असे ।विसरें आठवे तें कैसें ।चुकऊं आतां ।॥ १६१७ ॥
देखोनि चमत्कारु ।कीजे तो नाहीं पैसारु ।मजहीसकट महापूरु ।नेत आहे ॥ १६१८ ॥
ऐसा श्रीकृष्णार्जुन- ।संवाद संगमीं स्नान ।करूनि देतसे तिळदान ।अहंतेचें ॥ १६१९ ॥
तेथ असंवरें आनंदें ।अलौकिकही कांहीं स्फुंदे ।श्रीकृष्ण म्हणे सद्गदें ।वेळोवेळां ॥ १६२० ॥
या अवस्थांची कांहीं ।कौरवांतें परी नाहीं ।म्हणौनि रायें तें कांहीं ।कल्पावें जंव ॥ १६२१ ॥
तंव जाला सुखलाभु ।आपणया करूनि स्वयंभु ।बुझाविला अवष्टंभु ।संजयें तेणें ॥ १६२२ ॥
तेथ कोणी येकी अवसरी ।होआवी ते करूनि दुरी ।रावो म्हणे संजया परी ।कैसी तुझी गा ? ॥ १६२३ ॥
तेणें तूंतें येथें व्यासें ।बैसविलें कासया उद्देशें ।अप्रसंगामाजीं ऐसें ।बोलसी काई ? ॥ १६२४ ॥
रानींचें राउळा नेलिया ।दाही दिशा मानी सुनिया ।कां रात्री होय पाहलया ।निशाचरां ॥ १६२५ ॥
जो जेथिंचें गौरव नेणें ।तयासि तें भिंगुळवाणें ।म्हणौनि अप्रसंगु तेणें ।म्हणावा कीं तो ॥ १६२६ ॥
मग म्हणे सांगें प्रस्तुत ।उदयलेंसे जें उत्कळित ।तें कोणासि बा रे जैत ।देईल शेखीं ? ॥ १६२७ ॥
येर्हवीं विशेषें बहुतेक ।आमुचें ऐसें मानसिक ।जे दुर्योधनाचे अधिक ।प्रताप सदा ॥ १६२८ ॥
आणि येरांचेनि पाडें ।दळही याचें देव्हडें ।म्हणौनि जैत फुडें ।आणील ना तें ? ॥ १६२९ ॥
आम्हां तंव गमे ऐसें ।मा तुझें ज्योतिष कैसें ।तें नेणों संजया असे ।तैसें सांग पां ॥ १६३० ॥
यया बोला संजयो म्हणे ।जी येरयेरांचें मी नेणें ।परी आयुष्य तेथें जिणें ।हें फुडें कीं गा ॥ १६३१ ॥
चंद्रु तेथें चंद्रिका ।शंभु तेथें अंबिका ।संत तेथें विवेका ।असणें कीं जी ॥ १६३२ ॥
रावो तेथें कटक ।सौजन्य तेथें सोयरीक ।वन्हि तेथें दाहक ।सामर्थ्य कीं ॥ १६३३ ॥
दया तेथें धर्मु ।धर्मु तेथें सुखागमु ।सुखीं पुरुषोत्तमु ।असे जैसा ॥ १६३४ ॥
वसंत तेथें वनें ।वन तेथें सुमनें ।सुमनीं पालिंगनें ।सारंगांचीं ॥ १६३५ ॥
गुरु तेथ ज्ञान ।ज्ञानीं आत्मदर्शन ।दर्शनीं समाधान ।आथी जैसें ॥ १६३६ ॥
भाग्य तेथ विलासु ।सुख तेथ उल्लासु ।हें असो तेथ प्रकाशु ।सूर्य जेथें ॥ १६३७ ॥
तैसे सकल पुरुषार्थ ।जेणें स्वामी कां सनाथ ।तो श्रीकृष्ण रावो जेथ ।तेथ लक्ष्मी ॥ १६३८ ॥
आणि आपुलेनि कांतेंसीं ।ते जगदंबा जयापासीं ।अणिमादिकीं काय दासी ।नव्हती तयातें ? ॥ १६३९ ॥
कृष्ण विजयस्वरूप निजांगें ।तो राहिला असे जेणें भागें ।तैं जयो लागवेगें ।तेथेंचि आहे ॥ १६४० ॥
विजयो नामें अर्जुन विख्यातु ।विजयस्वरूप श्रीकृष्णनाथु ।श्रियेसीं विजय निश्चितु ।तेथेंचि असे ॥ १६४१ ॥
तयाचिये देशींच्या झाडीं ।कल्पतरूतें होडी ।न जिणावें कां येवढीं ।मायबापें असतां ? ॥ १६४२ ॥
ते पाषाणही आघवें ।चिंतारत्नें कां नोहावे ? ।तिये भूमिके कां न यावें ।सुवर्णत्व ? ॥ १६४३ ॥
तयाचिया गांवींचिया ।नदी अमृतें वाहाविया ।नवल कायि राया ।विचारीं पां ॥ १६४४ ॥
तयाचे बिसाट शब्द ।सुखें म्हणों येती वेद ।सदेह सच्चिदानंद ।कां न व्हावे ते ? ॥ १६४५ ॥
पैं स्वर्गापवर्ग दोन्ही ।इयें पदें जया अधीनीं ।तो श्रीकृष्ण बाप जननी ।कमळा जया ॥ १६४६ ॥
म्हणौनि जिया बाहीं उभा ।तो लक्ष्मीयेचा वल्लभा ।तेथें सर्वसिद्धी स्वयंभा ।येर मी नेणें ॥ १६४७ ॥
आणि समुद्राचा मेघु ।उपयोगें तयाहूनि चांगु ।तैसा पार्थीं आजि लागु ।आहे तये ॥ १६४८ ॥
कनकत्वदीक्षागुरू ।लोहा परिसु होय कीरू ।परी जगा पोसिता व्यवहारु ।तेंचि जाणें ॥ १६४९ ॥
येथ गुरुत्वा येतसे उणें ।ऐसें झणें कोण्ही म्हणे ।वन्हि प्रकाश दीपपणें ।प्रकाशी आपुला ॥ १६५० ॥
तैसा देवाचिया शक्ती ।पार्थु देवासीचि बहुती ।परी माने इये स्तुती ।गौरव असे ॥ १६५१ ॥
आणि पुत्रें मी सर्व गुणीं ।जिणावा हे बापा शिराणी ।तरी ते शारङ्गपाणी ।फळा आली ॥ १६५२ ॥
किंबहुना ऐसा नृपा ।पार्थु जालासे कृष्णकृपा ।तो जयाकडे साक्षेपा ।रीति आहे ॥ १६५३ ॥
तोचि गा विजयासि ठावो ।येथ तुज कोण संदेहो ? ।तेथ न ये तरी वावो ।विजयोचि होय ॥ १६५४ ॥
म्हणौनि जेथ श्री तेथें श्रीमंतु ।जेथ तो पंडूचा सुतु ।तेथ विजय समस्तु ।अभ्युदयो तेथ ॥ १६५५ ॥
जरी व्यासाचेनि साचें ।धिरे मन तुमचें ।तरी या बोलाचें ।ध्रुवचि माना ॥ १६५६ ॥
जेथ तो श्रीवल्लभु ।जेथ भक्तकदंबु ।तेथ सुख आणि लाभु ।मंगळाचा ॥ १६५७ ॥
या बोला आन होये ।तरी व्यासाचा अंकु न वाहे ।ऐसें गाजोनि बाहें ।उभिली तेणें ॥ १६५८ ॥
एवं भारताचा आवांका ।आणूनि श्लोका येका ।संजयें कुरुनायका ।दिधला हातीं ॥ १६५९ ॥
जैसा नेणों केवढा वन्ही ।परी गुणाग्रीं ठेऊनी ।आणिजे सूर्याची हानी ।निस्तरावया ॥ १६६० ॥
तैसें शब्दब्रह्म अनंत ।जालें सवालक्ष भारत ।भारताचें शतें सात ।सर्वस्व गीता ॥ १६६१ ॥
तयांही सातां शतांचा ।इत्यर्थु हा श्लोक शेषींचा ।व्यासशिष्य संजयाचा ।पूर्णोद्गारु जो ॥ १६६२ ॥
येणें येकेंचि श्लोकें ।राहे तेणें असकें ।अविद्याजाताचें निकें ।जिंतलें होय ॥ १६६३ ॥
ऐसें श्लोक शतें सात ।गीतेचीं पदें आंगें वाहत ।पदें म्हणों कीं परमामृत ।गीताकाशींचें ॥ १६६४ ॥
कीं आत्मराजाचिये सभे ।गीते वोडवले हे खांबे ।मज श्लोक प्रतिभे ।ऐसे येत ॥ १६६५ ॥
कीं गीता हे सप्तशती ।मंत्रप्रतिपाद्य भगवती ।मोहमहिषा मुक्ति ।आनंदली असे ॥ १६६६ ॥
म्हणौनि मनें कायें वाचा ।जो सेवकु होईल इयेचा ।तो स्वानंदासाम्राज्याचा ।चक्रवर्ती करी ॥ १६६७ ॥
कीं अविद्यातिमिररोंखें ।श्लोक सूर्यातें पैजा जिंकें ।ऐसे प्रकाशिले गीतामिषें ।रायें श्रीकृष्णें ॥ १६६८ ॥
कीं श्लोकाक्षरद्राक्षलता ।मांडव जाली आहे गीता ।संसारपथश्रांता ।विसंवावया ॥ १६६९ ॥
कीं सभाग्यसंतीं भ्रमरीं ।केले ते श्लोककल्हारीं ।श्रीकृष्णाख्यसरोवरीं ।सासिन्नली हे ॥ १६७० ॥
कीं श्लोक नव्हती आन ।गमे गीतेचें महिमान ।वाखाणिते बंदीजन ।उदंड जैसे ॥ १६७१ ॥
कीं श्लोकांचिया आवारा ।सात शतें करूनि सुंदरा ।सर्वागम गीतापुरा ।वसों आले ॥ १६७२ ॥
कीं निजकांता आत्मया ।आवडी गीता मिळावया ।श्लोक नव्हती बाह्या ।पसरु का जो ॥ १६७३ ॥
कीं गीताकमळींचे भृंग ।कीं हे गीतासागरतरंग ।कीं हरीचे हे तुरंग ।गीतारथींचे ॥ १६७४ ॥
कीं श्लोक सर्वतीर्थ संघातु ।आला श्रीगीतेगंगे आंतु ।जे अर्जुन नर सिंहस्थु ।जाला म्हणौनि ॥ १६७५ ॥
कीं नोहे हे श्लोकश्रेणी ।अचिंत्यचित्तचिंतामणी ।कीं निर्विकल्पां लावणी ।कल्पतरूंची ॥ १६७६ ॥
ऐसिया शतें सात श्लोकां ।परी आगळा येकयेका ।आतां कोण वेगळिका ।वानावां पां ।॥ १६७७ ॥
तान्ही आणि पारठी ।इया कामधेनूतें दिठी ।सूनि जैसिया गोठी ।कीजती ना ॥ १६७८ ॥
दीपा आगिलु मागिलु ।सूर्यु धाकुटा वडीलु ।अमृतसिंधु खोलु ।उथळु कायसा ।॥ १६७९ ॥
तैसे पहिले सरते ।श्लोक न म्हणावे गीते ।जुनीं नवीं पारिजातें ।आहाती काई ? ॥ १६८० ॥
आणि श्लोका पाडु नाहीं ।हें कीर समर्थु काई ।येथ वाच्य वाचकही ।भागु न धरी ॥ १६८१ ॥
जे इये शास्त्रीं येकु ।श्रीकृष्णचि वाच्य वाचकु ।हें प्रसिद्ध जाणे लोकु ।भलताही ॥ १६८२ ॥
येथें अर्थें तेंचि पाठें ।जोडे येवढेनि धटें ।वाच्यवाचक येकवटें ।साधितें शास्त्र ॥ १६८३ ॥
म्हणौनि मज कांहीं ।समर्थनीं आतां विषय नाहीं ।गीता जाणा हे वाङ्ग्मयी ।श्रीमूर्ति प्रभूचि ॥ १६८४ ॥
शास्त्र वाच्यें अर्थें फळे ।मग आपण मावळे ।तैसें नव्हें हें सगळें ।परब्रह्मचि ॥ १६८५ ॥
कैसा विश्वाचिया कृपा ।करूनि महानंद सोपा ।अर्जुनव्याजें रूपा ।आणिला देवें ॥ १६८६ ॥
चकोराचेनि निमित्तें ।तिन्ही भुवनें संतप्तें ।निवविलीं कळांवतें ।चंद्रें जेवीं ॥ १६८७ ॥
कां गौतमाचेनि मिषें ।कळिकाळज्वरीतोद्देशें ।पाणिढाळु गिरीशें ।गंगेंचा केला ॥ १६८८ ॥
तैसें गीतेचें हें दुभतें ।वत्स करूनि पार्थातें ।दुभिन्नली जगापुरतें ।श्रीकृष्ण गाय ॥ १६८९ ॥
येथे जीवें जरी नाहाल ।तरी हेंचि कीर होआल ।नातरी पाठमिषें तिंबाल ।जीभचि जरी ॥ १६९० ॥
तरी लोह एकें अंशें ।झगटलिया परीसें ।येरीकडे अपैसें ।सुवर्ण होय ॥ १६९१ ॥
तैसी पाठाची ते वाटी ।श्लोकपाद लावा ना जंव वोठीं ।तंव ब्रह्मतेची पुष्टी ।येईल आंगा ॥ १६९२ ॥
ना येणेसीं मुख वांकडें ।करूनि ठाकाल कानवडें ।तरी कानींही घेतां पडे ।तेचि लेख ॥ १६९३ ॥
जे हे श्रवणें पाठें अर्थें ।गीता नेदी मोक्षाआरौतें ।जैसा समर्थु दाता कोण्हातें ।नास्ति न म्हणे ॥ १६९४ ॥
म्हणौनि जाणतया सवा ।गीताचि येकी सेवा ।काय कराल आघवां ।शास्त्रीं येरीं ॥ १६९५ ॥
आणि कृष्णार्जुनीं मोकळी ।गोठी चावळिली जे निराळी ।ते श्रीव्यासें केली करतळीं ।घेवों ये ऐसी ॥ १६९६ ॥
बाळकातें वोरसें ।माय जैं जेवऊं बैसे ।तैं तया ठाकती तैसे ।घांस करी ॥ १६९७ ॥
कां अफाटा समीरणा ।आपैतेंपण शाहाणा ।केलें जैसें विंजणा ।निर्मूनियां ॥ १६९८ ॥
तैसें शब्दें जें न लभे ।तें घडूनिया अनुष्टुभें ।स्त्रीशूद्रादि प्रतिभे ।सामाविलें ॥ १७९९ ॥
स्वातीचेनि पाणियें ।न होती जरी मोतियें ।तरी अंगीं सुंदरांचिये ।कां शोभिती तियें ? ॥ १७०० ॥
नादु वाद्या न येतां ।तरी कां गोचरु होता ।फुलें न होतां घेपता ।आमोदु केवीं ? ॥ १७०१ ॥
गोडीं न होती पक्वान्नें ।तरी कां फावती रसनें ? ।दर्पणावीण नयनें ।नयनु कां दिसे ? ॥ १७०२ ॥
द्रष्टा श्रीगुरुमूर्ती ।न रिगता दृश्यपंथीं ।तरी कां ह्या उपास्ती ।आकळता तो ? ॥ १७०३ ॥
तैसें वस्तु जें असंख्यात ।तया संख्या शतें सात ।न होती तरी कोणा येथ ।फावों शकतें ? ॥ १७०४ ॥
मेघ सिंधूचें पाणी वाहे ।तरी जग तयातेंचि पाहे ।कां जे उमप ते नोहें ।ठाकतें कोण्हा ॥ १७०५ ॥
आणि वाचा जें न पवे ।तें हे श्लोक न होते बरवे ।तरी कानें मुखें फावे ।ऐसें कां होतें ? ॥ १७०६ ॥
म्हणौनि श्रीव्यासाचा हा थोरु ।विश्वा जाला उपकारु ।जे श्रीकृष्ण उक्ती आकारु ।ग्रंथाचा केला ॥ १७०७ ॥
आणि तोचि हा मी आतां ।श्रीव्यासाचीं पदें पाहतां पाहतां ।आणिला श्रवणपथा ।मर्हाठिया ॥ १७०८ ॥
व्यासादिकांचे उन्मेख ।राहाटती जेथ साशंक ।तेथ मीही रंक येक ।चावळी करीं ॥ १७०९ ॥
परी गीता ईश्वरु भोळा ।ले व्यासोक्तिकुसुममाळा ।तरी माझिया दुर्वादळा ।ना न म्हणे कीं ॥ १७१० ॥
आणि क्षीरसिंधूचिया तटा ।पाणिया येती गजघटा ।तेथ काय मुरकुटा ।वारिजत असे ? ॥ १७११ ॥
पांख फुटे पांखिरूं ।नुडे तरी नभींच स्थिरू ।गगन आक्रमी सत्वरू ।तो गरुडही तेथ ॥ १७१२ ॥
राजहंसाचें चालणें ।भूतळीं जालिया शाहाणें ।आणिकें काय कोणें ।चालावेचिना ? ॥ १७१३ ॥
जी आपुलेनि अवकाशें ।अगाध जळ घेपे कलशें ।चुळीं चूळपण ऐसें ।भरूनि न निघे ? ॥ १७१४ ॥
दिवटीच्या आंगीं थोरी ।तरी ते बहु तेज धरी ।वाती आपुलिया परी ।आणीच कीं ना ? ॥ १७१५ ॥
जी समुद्राचेनि पैसें ।समुद्रीं आकाश आभासे ।थिल्लरीं थिल्लराऐसें ।बिंबेचि पैं ॥ १७१६ ॥
तेवीं व्यासादिक महामती ।वावरों येती इये ग्रंथीं ।मा आम्ही ठाकों हे युक्ति ।न मिळे कीर ? ॥ १७१७ ॥
जिये सागरीं जळचरें ।संचरती मंदराकारें ।तेथ देखोनि शफरें येरें ।पोहों न लाहती ? ॥ १७१८ ॥
अरुण आंगाजवळिके ।म्हणौनि सूर्यातें देखें ।मा भूतळींची न देखे ।मुंगी काई ? ॥ १७१९ ॥
यालागीं आम्हां प्राकृतां ।देशिकारें बंधें गीता ।म्हणणें हें अनुचिता ।कारण नोहे ॥ १७२० ॥
आणि बापु पुढां जाये ।ते घेत पाउलाची सोये ।बाळ ये तरी न लाहे ।पावों कायी ? ॥ १७२१ ॥
तैसा व्यासाचा मागोवा घेतु ।भाष्यकारातें वाट पुसतु ।अयोग्यही मी न पवतु ।कें जाईन ? ॥ १७२२ ॥
आणि पृथ्वी जयाचिया क्षमा ।नुबगे स्थावर जंगमा ।जयाचेनि अमृतें चंद्रमा ।निववी जग ॥ १७२३ ॥
जयाचें आंगिक असिकें ।तेज लाहोनि अर्कें ।आंधाराचें सावाइकें ।लोटिजत आहे ॥ १७२४ ॥
समुद्रा जयाचें तोय ।तोया जयाचें माधुर्य ।माधुर्या सौंदर्य ।जयाचेनि ॥ १७२५ ॥
पवना जयाचें बळ ।आकाश जेणें पघळ ।ज्ञान जेणें उज्वळ ।चक्रवर्ती ॥ १७२६ ॥
वेद जेणें सुभाष ।सुख जेणें सोल्लास ।हें असो रूपस ।विश्व जेणें ॥ १७२७ ॥
तो सर्वोपकारी समर्थु ।सद्गुरु श्रीनिवृत्तिनाथु ।राहाटत असे मजही आंतु ।रिघोनियां ॥ १७२८ ॥
आतां आयती गीता जगीं ।मी सांगें मर्हाठिया भंगीं ।येथ कें विस्मयालागीं ।ठावो आहे ॥ १७२९ ॥
श्रीगुरुचेनि नांवें माती ।डोंगरीं जयापासीं होती ।तेणें कोळियें त्रिजगतीं ।येकवद केली ॥ १७३० ॥
चंदनें वेधलीं झाडें ।जालीं चंदनाचेनि पाडें ।वसिष्ठें मांनिली कीं भांडे ।भानूसीं शाटी ॥ १७३१ ॥
मा मी तव चित्ताथिला ।आणि श्रीगुरु ऐसा दादुला ।जो दिठीवेनि आपुला ।बैसवी पदीं ॥ १७३२ ॥
आधींचि देखणी दिठी ।वरी सूर्य पुरवी पाठी ।तैं न दिसे ऐसी गोठी ।केंही आहे ? ॥ १७३३ ॥
म्हणौनि माझें नित्य नवे ।श्वासोश्वासही प्रबंध होआवे ।श्रीगुरुकृपा काय नोहे ।ज्ञानदेवो म्हणे ॥ १७३४ ॥
याकारणें मियां ।श्रीगीतार्थु मर्हाठिया ।केला लोकां यया ।दिठीचा विषो ॥ १७३५ ॥
परी मर्हाठे बोलरंगें ।कवळितां पैं गीतांगें ।तैं गातयाचेनि पांगें ।येकाढतां नोहे ॥ १७३६ ॥
म्हणौनि गीता गावों म्हणे ।तें गाणिवें होती लेणें ।ना मोकळे तरी उणें ।गीताही आणित ॥ १७३७ ॥
सुंदर आंगीं लेणें न सूये ।तैं तो मोकळा शृंगारु होये ।ना लेइलें तरी आहे ।तैसें कें उचित ? ॥ १७३८ ॥
कां मोतियांची जैसी जाती ।सोनयाही मान देती ।नातरी मानविती ।अंगेंचि सडीं ॥ १७३९ ॥
नाना गुंफिलीं कां मोकळीं ।उणीं न होती परीमळीं ।वसंतागमींचीं वाटोळीं ।मोगरीं जैसीं ॥ १७४० ॥
तैसा गाणिवेतें मिरवी ।गीतेवीणही रंगु दावीं ।तो लाभाचा प्रबंधु ओंवी ।केला मियां ॥ १७४१ ॥
तेणें आबालसुबोधें ।ओवीयेचेनि प्रबंधें ।ब्रह्मरससुस्वादें ।अक्षरें गुंथिलीं ॥ १७४२ ॥
आतां चंदनाच्या तरुवरीं ।परीमळालागीं फुलवरीं ।पारुखणें जियापरी ।लागेना कीं ॥ १७४३ ॥
तैसा प्रबंधु हा श्रवणीं ।लागतखेंवो समाधि आणी ।ऐकिलियाही वाखाणी ।काय व्यसन न लवी ? ॥ १७४४ ॥
पाठ करितां व्याजें ।पांडित्यें येती वेषजे ।तैं अमृतातें नेणिजे ।फावलिया ॥ १७४५ ॥
तैसेंनि आइतेपणें ।कवित्व जालें हें उपेणें ।मनन निदिध्यास श्रवणें ।जिंतिलें आतां ॥ १७४६ ॥
हे स्वानंदभोगाची सेल ।भलतयसीचि देईल ।सर्वेंद्रियां पोषवील ।श्रवणाकरवीं ॥ १७४७ ॥
चंद्रातें आंगवणें ।भोगूनि चकोर शाहाणे ।परी फावे जैसें चांदिणें ।भलतयाही ॥ १७४८ ॥
तैसें अध्यात्मशास्त्रीं यिये ।अंतरंगचि अधिकारिये ।परी लोकु वाक्चातुर्यें ।होईल सुखिया ॥ १७४९ ॥
ऐसें श्रीनिवृत्तिनाथाचें ।गौरव आहे जी साचें ।ग्रंथु नोहे हें कृपेचें ।वैभव तिये ॥ १७५० ॥
क्षीरसिंधु परिसरीं ।शक्तीच्या कर्णकुहरीं ।नेणों कैं श्रीत्रिपुरारीं ।सांगितलें जें ॥ १७५१ ॥
तें क्षीरकल्लोळाआंतु ।मकरोदरीं गुप्तु ।होता तयाचा हातु ।पैठें जालें ॥ १७५२ ॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.