तो मत्स्येंद्र सप्तशृंगीं ।भग्नावयवा चौरंगी ।भेटला कीं तो सर्वांगीं ।संपूर्ण जाला ॥ १७५३ ॥
मग समाधि अव्युत्थया ।भोगावी वासना यया ।ते मुद्रा श्रीगोरक्षराया ।दिधली मीनीं ॥ १७५४ ॥
तेणें योगाब्जिनीसरोवरु ।विषयविध्वंसैकवीरु ।तिये पदीं कां सर्वेश्वरु ।अभिषेकिला ॥ १७५५ ॥
मग तिहीं तें शांभव ।अद्वयानंदवैभव ।संपादिलें सप्रभव ।श्रीगहिनीनाथा ॥ १७५६ ॥
तेणें कळिकळितु भूतां ।आला देखोनि निरुता ।ते आज्ञा श्रीनिवृत्तिनाथा ।दिधली ऐसी ॥ १७५७ ॥
ना आदिगुरु शंकरा- ।लागोनि शिष्यपरंपरा ।बोधाचा हा संसरा ।जाला जो आमुतें ॥ १७५८ ॥
तो हा तूं घेऊनि आघवा ।कळीं गिळितयां जीवां ।सर्व प्रकारीं धांवा ।करीं पां वेगीं ॥ १७५९ ॥
आधींच तंव तो कृपाळु ।वरी गुरुआज्ञेचा बोलू ।जाला जैसा वर्षाकाळू ।खवळणें मेघां ॥ १७६० ॥
मग आर्ताचेनि वोरसें ।गीतार्थग्रंथनमिसें ।वर्षला शांतरसें ।तो हा ग्रंथु ॥ १७६१ ॥
तेथ पुढां मी बापिया ।मांडला आर्ती आपुलिया ।कीं यासाठीं येवढिया ।आणिलों यशा ॥ १७६२ ॥
एवं गुरुक्रमें लाधलें ।समाधिधन जें आपुलें ।तें ग्रंथें बोधौनि दिधलें ।गोसावी मज ॥ १७६३ ॥
वांचूनि पढे ना वाची ।ना सेवाही जाणें स्वामीची ।ऐशिया मज ग्रंथाची ।योग्यता कें असे ? ॥ १७६४ ॥
परी साचचि गुरुनाथें ।निमित्त करूनि मातें ।प्रबंधव्याजें जगातें ।रक्षिलें जाणा ॥ १७६५ ॥
तर्ही पुरोहितगुणें ।मी बोलिलों पुरें उणें ।तें तुम्हीं माउलीपणें ।उपसाहिजो जी ॥ १७६६ ॥
शब्द कैसा घडिजे ।प्रमेयीं कैसें पां चढिजें ।अळंकारु म्हणिजे ।काय तें नेणें ॥ १७६७ ॥
सायिखडेयाचें बाहुलें ।चालवित्या सूत्राचेनि चाले ।तैसा मातें दावीत बोले ।स्वामी तो माझा ॥ १७६८ ॥
यालागीं मी गुणदोष- ।विषीं क्षमाविना विशेष ।जे मी संजात ग्रंथलों देख ।आचार्यें कीं ॥ १७६९ ॥
आणि तुम्हां संतांचिये सभे ।जें उणीवेंसी ठाके उभें ।तें पूर्ण नोहे तरी तैं लोभें ।तुम्हांसीचि कोपें ॥ १७७० ॥
सिवतलियाही परीसें ।लोहत्वाचिये अवदसे ।न मुकिजे आयसें ।तैं कवणा बोलु ।॥ १७७१ ॥
वोहळें हेंचि करावें ।जे गंगेचें आंग ठाकावें ।मगही गंगा जरी नोहावें ।तैं तो काय करी ? ॥ १७७२ ॥
म्हणौनि भाग्ययोगें बहुवें ।तुम्हां संतांचें मी पाये ।पातलों आतां कें लाहे ।उणें जगीं ।॥ १७७३ ॥
अहो जी माझेनि स्वामी ।मज संत जोडुनि तुम्हीं ।दिधलेति तेणें सर्वकामीं ।परीपूर्ण जालों ॥ १७७४ ॥
पाहा पां मातें तुम्हां सांगडें ।माहेर तेणें सुरवाडें ।ग्रंथाचें आळियाडें ।सिद्धी गेलें ॥ १७७५ ॥
जी कनकाचें निखळ ।वोतूं येईल भूमंडळ ।चिंतारत्नीं कुळाचळ ।निर्मूं येती ॥ १७७६ ॥
सातांही हो सागरांतें ।सोपें भरितां अमृतें ।दुवाड नोहे तारांतें ।चंद्र करितां ॥ १७७७ ॥
कल्पतरूचे आराम ।लावितां नाहीं विषम ।परी गीतार्थाचें वर्म ।निवडूं न ये ॥ १७७८ ॥
तो मी येकु सर्व मुका ।बोलोनि मर्हाठिया भाखा ।करी डोळेवरी लोकां ।घेवों ये ऐसें जें ॥ १७७९ ॥
हा ग्रंथसागरु येव्हढा ।उतरोनि पैलीकडा ।कीर्तिविजयाचा धेंडा ।नाचे जो कां ॥ १७८० ॥
गीतार्थाचा आवारु ।कलशेंसीं महामेरु ।रचूनि माजीं श्रीगुरु- ।लिंग जें पूजीं ॥ १७८१ ॥
गीता निष्कपट माय ।चुकोनि तान्हें हिंडे जें वाय ।तें मायपूता भेटी होय ।हा धर्म तुमचा ॥ १७८२ ॥
तुम्हां सज्जनांचें केलें ।आकळुनी जी मी बोलें ।ज्ञानदेव म्हणे थेंकुलें ।तैसें नोहें ॥ १७८३ ॥
काय बहु बोलों सकळां ।मेळविलों जन्मफळा ।ग्रंथसिद्धीचा सोहळा ।दाविला जो हा ॥ १७८४ ॥
मियां जैसजैसिया आशा ।केला तुमचा भरंवसा ।ते पुरवूनि जी बहुवसा ।आणिलों सुखा ॥ १७८५ ॥
मजलागीं ग्रंथाची स्वामी ।दुजीं सृष्टी जे हे केली तुम्ही ।तें पाहोनि हांसों आम्हीं ।विश्वामित्रातेंही ॥ १७८६ ॥
जे असोनि त्रिशंकुदोषें ।धातयाही आणावें वोसें ।तें नासतें कीजे कीं ऐसें ।निर्मावें नाहीं ॥ १७८७ ॥
शंभू उपमन्युचेनि मोहें ।क्षीरसागरूही केला आहे ।येथ तोही उपमे सरी नोहे ।जे विषगर्भ कीं ॥ १७८८ ॥
अंधकारु निशाचरां ।गिळितां सूर्यें चराचरां ।धांवा केला तरी खरा ।ताउनी कीं तो ॥ १७८९ ॥
तातलियाही जगाकारणें ।चंद्रें वेंचिलें चांदणें ।तया सदोषा केवीं म्हणे ।सारिखें हें ॥ १७९० ॥
म्हणौनि तुम्हीं मज संतीं ।ग्रंथरूप जो हा त्रिजगतीं ।उपयोग केला तो पुढती ।निरुपम जी ॥ १७९१ ॥
किंबहुना तुमचें केलें ।धर्मकीर्तन हें सिद्धी नेलें ।येथ माझें जी उरलें ।पाईकपण ॥ १७९२ ॥
आतां विश्वात्मकें देवें ।येणें वाग्यज्ञें तोषावें ।तोषोनि मज द्यावें ।पसायदान हें ॥ १७९३ ॥
जे खळांची व्यंकटी सांडो ।तयां सत्कर्मीं रती वाढो ।भूतां परस्परें पडो ।मैत्र जीवाचें ॥ १७९४ ॥
दुरिताचें तिमिर जावो ।विश्व स्वधर्मसूर्यें पाहो ।जो जें वांछील तो तें लाहो ।प्राणिजात ॥ १७९५ ॥
वर्षत सकळमंगळीं ।ईश्वर निष्ठांची मांदियाळी ।अनवरत भूमंडळीं ।भेटतु या भूतां ॥ १७९६ ॥
चलां कल्पतरूंचे अरव ।चेतना चिंतामणीचें गांव ।बोलते जे अर्णव ।पीयूषाचे ॥ १७९७ ॥
चंद्रमे जे अलांछन ।मार्तंड जे तापहीन ।ते सर्वांही सदा सज्जन ।सोयरे होतु ॥ १७९७ ॥
किंबहुना सर्वसुखीं ।पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।भजिजो आदिपुरुखीं ।अखंडित ॥ १८९९ ॥
आणि ग्रंथोपजीविये ।विशेषीं लोकीं इयें ।दृष्टादृष्ट विजयें ।होआवें जी ॥ १८०० ॥
तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो ।हा होईल दानपसावो ।येणें वरें ज्ञानदेवो ।सुखिया झाला ॥ १८०१ ॥
ऐसें युगीं परी कळीं ।आणि महाराष्ट्रमंडळीं ।श्रीगोदावरीच्या कूलीं ।दक्षिणलिंगीं ॥ १८०२ ॥
त्रिभुवनैकपवित्र ।अनादि पंचक्रोश क्षेत्र ।जेथ जगाचें जीवनसूत्र ।श्रीमहालया असे ॥ १८०३ ॥
तेथ यदुवंशविलासु ।जो सकळकळानिवासु ।न्यायातें पोषी क्षितीशु ।श्रीरामचंद्रु ॥ १८०४ ॥
तेथ महेशान्वयसंभूतें ।श्रीनिवृत्तिनाथसुतें ।केलें ज्ञानदेवें गीते ।देशीकार लेणें ॥ १८०५ ॥
एवं भारताच्या गांवीं ।भीष्मनाम प्रसिद्ध पर्वीं ।श्रीकृष्णार्जुनीं बरवी ।गोठी जे केली ॥ १८०६ ॥
जें उपनिषदांचें सार ।सर्व शास्त्रांचें माहेर ।परमहंसीं सरोवर ।सेविजे जें ॥ १८०७ ॥
तियें गीतेचा कलशु ।संपूर्ण हा अष्टादशु ।म्हणे निवृत्तिदासु ।ज्ञानदेवो ॥ १८०८ ॥
पुढती पुढती पुढती ।इया ग्रंथपुण्यसंपत्ती ।सर्वसुखीं सर्वभूतीं ।संपूर्ण होईजे ॥ १८०९ ॥
शके बाराशतें बारोत्तरें ।तैं टीका केली ज्ञानेश्वरें ।सच्चिदानंदबाबा आदरें ।लेखकु जाहला ॥ १८१० ॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.