संजयाला पाहुणचार
संजय धृतराष्ट्राला सांगतो — कृष्णांनी अर्जुनासाठी ब्रह्मरसाचे पारणे केले आणि त्याच वेळी आम्हीही पाहुणे म्हणून पोहोचलो. तहानेने पाणी प्यावे आणि चव पाहता ते अमृत निघावे, तसे झाले. तेवढ्यात धृतराष्ट्र म्हणतो — हे मी तुला विचारत नाही.
मग रायातें म्हणे संजयो । तोचि अभिप्रावो अवधारिजो । कृष्ण सांगती आतां जो । योगरूप ॥६-१॥
सहजें ब्रह्मरसाचें पारणें । केलें अर्जुनालागीं नारायणें । कीं तेचि अवसरीं पाहुणे । पातलों आम्ही ॥६-२॥
कैसी दैवाची आगळिक नेणिजे । जैसें तान्हेलिया तोय सेविजे । कीं तेंचि चवी करूनि पाहिजे । तंव अमृत आहे ॥६-३॥
तैसें आम्हां तुम्हां जाहलें । जे आडमुठीं तत्त्व फावलें । तंव धृतराष्ट्रें म्हणितलें । हें न पुसों तूतें ॥६-४॥
तया संजया येणें बोलें । रायाचें हृदय चोजवलें । जें अवसरीं आहे घेतलें । कुमारांचिया ॥६-५॥
म्हातारा मोहाने नासला
संजय मनात हसतो — ‘म्हातारा मोहें नाशिला’; जात्यंध तो पाहणार कसा, आणि रागावेल म्हणून बोलायचीही भीती. पण स्वतःच्या मनात तो संतुष्ट, कारण कृष्णार्जुनांचा संवाद त्याला ऐकायला मिळतो आहे. क्षीरसागरात अमृताचा निवाडा व्हावा तसा सहावा अध्याय.
हें जाणोनि मनीं हांसिला । म्हणे म्हातारा मोहें नाशिला । एऱ्हवीं बोलु तरी भला जाहला । अवसरीं इये ॥६-६॥
परि तें तैसें कैसेनि होईल । जात्यंधु कैसें पाहेल । तेवींचि ये रुसें घेईल । म्हणौनि बिहे ॥६-७॥
परि आपण चित्तीं आपुला । निकियापरी संतोषला । जे तो संवादु फावला । कृष्णार्जुनांचा ॥६-८॥
तेणें आनंदाचेनि धालेपणें । साभिप्राय अंतःकरणें । आतां आदरेंसीं बोलणें । घडेल तया ॥६-९॥
तो गीतेमाजी षष्ठींचा । प्रसंगु असे आयणीचा । जैसा क्षीरार्णवीं अमृताचा । निवाडु जाहला ॥६-१०॥
‘अमृतातेंही पैजां जिंके’
गीतार्थाचे सार, विवेकसिंधूचा पैलतीर, योगविभवाचे उघडलेले भांडार. आणि इथे ग्रंथातली सर्वात प्रसिद्ध ओळ — ‘माझा मराठाचि बोलु कौतुकें, परि अमृतातेंही पैजां जिंके, ऐसीं अक्षरें रसिकें मेळवीन.’ मराठीविषयीचा हा दावा ज्ञानेश्वर कुठेही मागे घेत नाहीत.
तैसें गीतार्थाचें सार । जें विवेकसिंधूचें पार । नाना योगविभवभांडार । उघडलें कां ॥६-११॥
जें आदिप्रकृतीचें विसवणें । जें शब्दब्रह्मासि न बोलणें । जेथूनि गीतावल्लीचें ठाणें । प्ररोहो पावे ॥६-१२॥
तो अध्यावो सहावा । वरि साहित्याचिया बरवा । सांगिजैल म्हणौनि परिसावा । चित्त देउनी ॥६-१३॥
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके । ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ॥६-१४॥
जिये कोंवळिकेचेनि पाडें । दिसती नादींचें रंग थोडे । वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ॥६-१५॥
कानांना जिभा फुटतात
रसाळपणाच्या लोभाने श्रवणालाच जिभा फुटतात; शब्द हा कानाचा विषय, पण रसना म्हणते हा रस आमचा, आणि घ्राणाला तोच परिमळ वाटतो. बोलताना डोळ्यांची धणी पुरते आणि मन बाहेर धावते — एकटा सहस्रकर जग जागवतो तसा.
ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा । बोले इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ॥६-१६॥
सहजें शब्दु तरी विषो श्रवणाचा । परि रसना म्हणे हा रसु आमुचा । घ्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल ॥६-१७॥
नवल बोलतीये रेखेची वाहणी । देखतां डोळयांही पुरों लागे धणी । ते म्हणती उघडली खाणी । रूपाची हे ॥६-१८॥
जेथ संपूर्ण पद उभारे । तेथ मनचि धांवे बाहिरें । बोलु भुजाही आविष्करें । आलिंगावया ॥६-१९॥
ऐशीं इंद्रियें आपुलालिया भावीं । झोंबती परि तो सरिसेपणेंचि बुझावी । जैसा एकला जग चेववी । सहस्त्रकरु ॥६-२०॥
कैवल्यरसाने वाढलेली ताटे
शब्दाचे हे असाधारण व्यापकपण. या बोलांची ताटे कैवल्यरसाने वाढली आहेत आणि ही मांडणी मी निष्कामांसाठी केली. आत्मप्रभेची ठाणदिवी करून जो इंद्रियांना चोरून जेवतो त्यालाच हे मिळते — श्रवणाच्या पांगाविना, मनाच्या निजांगाने भोगायचे.
तैसें शब्दाचें व्यापकपण । देखिजे असाधारण । पाहातयां भावज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ॥६-२१॥
हें असोतु या बोलांचीं ताटें भलीं । वरी कैवल्यरसें वोगरिलीं । ही प्रतिपत्ति मियां केली । निष्कामासी ॥६-२२॥
आतां आत्मप्रभा नीच नवी । तेचि करूनि ठाणदिवी । जो इंद्रियांतें चोरूनि जेवी । तयासीचि फावे ॥६-२३॥
येथ श्रवणाचेनि पांगें- । वीण श्रोतयां होआवें लागे । हे मनाचेनि निजांगें । भोगिजे गा ॥६-२४॥
आहाच बोलाची वालीफ फेडिजे । आणि ब्रह्माचियाचि आंगा घडिजे । मग सुखेंसी सुरवाडिजे । सुखाचि माजीं ॥६-२५॥
कावळ्याला चंद्र ओळखत नाही
एवढे हळुवारपण आले तरच हे उपयोगी; नाहीतर सगळी गोष्ट मुक्याबहिऱ्यांची. कावळ्याला चंद्र ओळखत नाही तसा प्राकृतांना हा ग्रंथ कळत नाही; तोच चंद्र चकोराचे खाद्य. सज्ञानाला हा ठाव आणि अज्ञानाला वेगळाच गाव.
ऐसें हळुवारपण जरी येईल । तरीच हें उपेगा जाईल । एऱ्हवीं आघवी गोठी होईल । मुकिया बहिरयाची ॥६-२६॥
परी तें असो आतां आघवें । नलगे श्रोतयांतें कडसावें । जे अधिकारिये एथ स्वभावें । निष्कामकामु ॥६-२७॥
जिहीं आत्मबोधाचिया आवडी । केली स्वर्गसंसाराची कुरोंडी । तेवांचूनि एथींची गोडी । नेणती आणिक ॥६-२८॥
जैसा वायसीं चंद्र नोळखिजे । तैसा प्राकृतीं हा ग्रंथु नेणिजे । आणि तो हिमांशुचि जेविं खाजें । चकोराचें ॥६-२९॥
तैसा सज्ञानासी तरी हा ठावो । आणि अज्ञानासी आन गांवो । म्हणौनि बोलावया विषय पहा हो । विशेषु नाहीं ॥६-३०॥
निवृत्तिकृपेचा दीप
जे बुद्धीलाही आकळायला अवघड ते बोलात क्वचित सापडेल, पण श्रीनिवृत्तिकृपेच्या दिव्याच्या उजेडात मी पाहीन. दृष्टीला न मिळणारे दृष्टीवाचून दिसते, धातुवादाला न जमणारे परीस हाती आला की लोखंडातच सापडते — तशी गुरुकृपा झाली की काय आपले होत नाही?
परी अनुवादलों मी प्रसंगें । तें सज्जनीं उपसाहावें लागे । आतां सांगेन काय श्रीरंगें । निरोपिलें जें ॥६-३१॥
तें बुद्धीही आकळितां सांकडें । म्हणौनि बोलीं विपायें सांपडे । परी श्रीनिवृत्तिकृपादीप उजियेडें । देखैन मी ॥६-३२॥
जें दिठीही न पविजे । तें दिठीविण देखिजे । जरी अतींद्रिय लाहिजे । ज्ञानबळ ॥६-३३॥
ना तरी जें धातुवादाही न जोडे । तें लोहींचि पंधरें सांपडे । जरी दैवयोगें चढे । परिसु हातां ॥६-३४॥
तैसी गुरुकृपा होये । तरी करितां काय आपु नोहे । म्हणौनि तें अपार मातें आहे । ज्ञानदेवो म्हणे ॥६-३५॥
योगी आणि संन्यासी एकच
‘बोलीं अरूपाचें रूप दावीन, अतींद्रिय परी भोगवीन इंद्रियांकरवीं.’ मग कृष्ण म्हणतात — योगी आणि संन्यासी वेगळे मानू नकोस; दुसऱ्या नावाचा आभास सोडला तर योग तोच संन्यास.
तेणें कारणें मी बोलेन । बोलीं अरूपाचें रूप दावीन । अतींद्रिय परी भोगवीन । इंद्रियांकरवीं ॥६-३६॥
आइका यश श्री औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । हे साही गुणवर्य । वसती जेथ ॥६-३७॥
म्हणौनि तो भगवंतु । जो निःसंगाचा सांगातु । तो म्हणे पार्था दत्तचित्तु । होईं आतां ॥६-३८॥
आइकें योगी आणि संन्यासी जनीं । हे एकचि सिनानें झणीं मानीं । एऱ्हवीं विचारिजती जंव दोन्ही । तंव एकचि ते ॥६-३९॥
सांडिजे दुजया नामाचा आभासु । तरी योगु तोचि संन्यासु । पाहतां ब्रह्मीं नाहीं अवकाशु । दोहींमाजीं ॥६-४०॥
एकाच पाण्याचे वेगळे घडे
एकाच पुरुषाला दोन नावांनी हाक मारावी, दोन मार्गांनी एकाच ठिकाणी जावे, एकच पाणी वेगवेगळ्या घड्यांत भरावे — तसे योग आणि संन्यास यांचे भिन्नत्व. जो कर्मे करून फळात रंगत नाही तोच योगी; पृथ्वी अहंबुद्धीवाचून उद्भिजे वाढवते आणि त्या बियांची अपेक्षा करत नाही तसा.
जैसें नामाचेनि अनारिसेपणें । एका पुरुषातें बोलावणें । कां दोहींमार्गीं जाणें । एकाचि ठाया ॥६-४१॥
नातरी एकचि उदक सहजें । परि सिनाना घटीं भरिजे । तैसें भिन्नत्व जाणिजे । योगसंन्यासांचें ॥६-४२॥
आइकें सकळ संमतें जगीं । अर्जुना गा तोचि योगी । जो कर्में करूनि रागी । नोहेचि फळीं ॥६-४३॥
जैसी मही हे उद्भिजें । जनी अहंबुद्धीवीण सहजें । आणि तेथिंचीं तियें बीजें । अपेक्षीना ॥६-४४॥
तैसा अन्वयाचेनि आधारें । जातीचेनि अनुकारें । जें जेणें अवसरें । करणें पावे ॥६-४५॥
धुतलेला लेप पुन्हा लावणे
वेळेनुसार आलेले उचित तो तसेच करतो, पण शरीरात साटोप नाही आणि बुद्धी फळापर्यंत जात नाही — तोच संन्यासी आणि तोच योगीश्वर. प्रासंगिक उचित कर्म ‘हे बंधक’ म्हणून सोडणारा लगेच दुसरेच मांडतो — एक लेप धुऊन लगेच दुसरा लावावा तसा आग्रहाचा नोकर वाया विचंबतो.
तें तैसेंचि उचित करी । परी साटोपु नोहे शरीरीं । आणि बुद्धीही करोनि फळवेरी । जायेचिना ॥६-४६॥
ऐसा तोचि संन्यासी । पार्था गा परियेसीं । तोचि भरंवसेनिसीं । योगीश्वरु ॥६-४७॥
वांचूनि उचित कर्म प्रासंगिक । तयातें म्हणे हे सांडावें बद्धक । तरी टांकोटांकीं आणिक । मांडीचि तो ॥६-४८॥
जैसा क्षाळूनियां लेपु एकु । सवेंचि लाविजे आणिकु । तैसेनि आग्रहाचा पाइकु । विचंबे वायां ॥६-४९॥
गृहस्थाश्रमाचें वोझें । कपाळीं आधींचि आहे सहजें । कीं तेंचि संन्याससवा ठेविजे । सरिसें पुढती ॥६-५०॥
कर्मपथ ही सोपान
गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीच आहे, त्यावर संन्यासही ठेवायचा? म्हणून अग्निसेवा न सोडता आणि कर्माची रेषा न ओलांडता योगसुख स्वतःतच आहे. ‘संन्यासी तोचि योगी’ ही एकवाक्यतेची गुढी अनेक शास्त्रांनी उभारली. योगाचळाचे शिखर गाठायचे तर कर्मपथाची ही सोपान चुकवू नकोस.
म्हणौनि अग्निसेवा न सांडितां । कर्माची रेखा नोलांडितां । आहे योगसुख स्वभावता । आपणपांचि ॥६-५१॥
ऐकें संन्यासी तोचि योगी । ऐसी एकवाक्यतेची जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरीं ॥६-५२॥
जेथ संन्यासिला संकल्पु तुटे । तेथचि योगाचें सार भेटे । ऐसें हें अनुभवाचेनि धटें । साचें जया ॥६-५३॥
आतां योगाचळाचा निमथा । जरी ठाकावा आथि पार्था । तरी सोपाना या कर्मपथा । चुका झणी ॥६-५४॥
येणें यमनियमांचेनि तळवटें । रिगे आसनाचिये पाउलवाटें । येई प्राणायामाचेनि आडकंठें । वरौता गा ॥६-५५॥
योगाची शिडी
यमनियमांच्या तळाने शिरून आसनाच्या पाउलवाटेने जावे, प्राणायामाच्या अडकंठ्याने वर यावे; मग प्रत्याहाराचा कडा, जिथे बुद्धीचेही पाय निसरतात. अभ्यासाच्या बळाने वैराग्याची नखे लागतात; धारणेच्या पसाऱ्याने ध्यानाचे शिखर. जिथे साध्य आणि साधन समरसाने भेटतात.
मग प्रत्याहाराचा अधाडा । जो बुद्धीचियाही पायां निसरडा । जेथ हटिये सांडिती होडा । कडेलग ॥६-५६॥
तरी अभ्यासाचेनि बळें । प्रत्याहारीं निराळें । नखीं लागेल ढाळें ढाळें । वैराग्याची ॥६-५७॥
ऐसा पवनाचेनि पाठारें । येतां धारणेचेनि पैसारें । क्रमी ध्यानाचें चवरें । सांपडे तंव ॥६-५८॥
मग तया मार्गाची धांव । पुरेल प्रवृत्तीची हांव । जेथ साध्यसाधना खेंव । समरसें होय ॥६-५९॥
जेथ पुढील पैसु पारुखे । मागील स्मरावें तें ठाके । ऐसिये सरिसीये भूमिके । समाधि राहे ॥६-६०॥
योगारूढाची चिन्हे
पुढचा पैस सरतो आणि मागचे स्मरण थांबते — त्या सपाटीवर समाधी राहते. योगारूढाची चिन्हे: ज्याच्या इंद्रियांच्या घरी विषयांच्या येरझारा नाहीत, जो आत्मबोधाच्या खोलीत पहुडला आहे; इंद्रिये कर्मांत वाढली तरी अंतःकरणात फळाची चाड नाही. देह असूनही जो जागेपणीच निजलेला दिसतो तोच योगारूढ.
येणें उपायें योगारूढु । जो निरवधि जाहला प्रौढु । तयाचिया चिन्हांचा निवाडु । सांगैन आइकें ॥६-६१॥
तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा । नाहीं विषयांचिया येरझारा जो आत्मबोधाचिया वोवरां । पहुडला असे ॥६-६२॥
जयाचें सुखदुःखाचेनि आंगें । झगटलें मानस चेवो नेघे । विषय पासींही आलियां से न रिगे । हें काय म्हणौनि ॥६-६३॥
इंद्रियें कर्माच्या ठायीं । वाढीनलीं परि कहीं । फळहेतूची चाड नाहीं । अंतःकरणीं ॥६-६४॥
असतेनि देहें एतुला । जो चेतुचि दिसे निदेला । तोचि योगारूढु भला । वोळखें तूं ॥६-६५॥
ही योग्यता कोण देणार?
अर्जुन विचारतो — ही योग्यता कोण कोणाला देणार? कृष्ण हसून म्हणतात — अद्वैतात कोणी कोणाला काय द्यायचे? व्यामोहाच्या शय्येवर बलवान अविद्येने निजले की जन्ममृत्यूचे दुःस्वप्न भोगले जाते; अवचित जाग आली की ते सगळे वावदूक. तो नित्य सद्भाव आपणच आपल्याला.
तेथ अर्जुन म्हणे अनंता । हें मज विस्मो बहु आइकतां । सांगे तया ऐसी योग्यता । कवणें दीजे ॥६-६६॥
तंव हांसोनि श्रीकृष्ण म्हणे । तुझें नवल ना हें बोलणें । कवणासि काय दिजेल कवणें । अद्वैतीं इये ॥६-६७॥
पैं व्यामोहाचिये शेजे । बळिया अविद्या निद्रितु होइजे । ते वेळी दुःस्वप्न हा भोगिजे । जन्ममृत्यूंचा ॥६-६८॥
पाठीं अवसांत ये चेवो । तैं तें अवघेंचि होय वावो । ऐसा उपजे नित्य सद्भावो । तोहि आपणपांचि ॥६-६९॥
म्हणौनि आपणचि आपणयां । घातु कीजतु असे धनंजया । चित्त देऊनि नाथिलिया । देहाभिमाना ॥६-७०॥
कोशकिड्यासारखा स्वतःचा वैरी
अहंकार सोडला की असतीच वस्तू होतो — स्वतःची स्वस्ति स्वतःच केली. एरवी कोशकिड्यासारखा तो स्वतःचाच वैरी. प्राप्तीच्या वेळी निर्दैवाला आंधळेपणाचे डोहाळे लागतात आणि तो असलेले डोळे स्वतःच झाकतो. ‘मी तो नव्हे, मला चोरले’ असे भ्रमलेला म्हणतो.
हा विचारूनि अहंकारु सांडिजे । मग असतीचि वस्तु होईजे । तरी आपली स्वस्ति सहजें । आपण केली ॥६-७१॥
एऱ्हवीं कोशकीटकाचिया परी । तो आपणया आपण वैरी । जो आत्मबुद्धि शरीरीं । चारुस्थळीं ॥६-७२॥
कैसे प्राप्तीचिये वेळे । निदैवा अंधळेपणाचे डोहळे । कीं असते आपुले डोळे । आपण झांकी ॥६-७३॥
कां कवण एकु भ्रमलेपणें । मी तो नव्हे गा चोरलों म्हणे । ऐसा नाथिला छंदु अंतःकरणें । घेऊनि ठाके ॥६-७४॥
एऱ्हवीं होय तें तोचि आहे । परि काई कीजे बुद्धि तैशी नोहे । देखा स्वप्नींचेनि घायें । कीं मरे साचें ॥६-७५॥
नळकांड्यावरचा पोपट
पोपट नळकांडीवर बसतो, ती फिरते आणि तो उलटा लटकतो; उडता येत असूनही ‘मी बांधलो’ या समजुतीने तो मान पिळत नळी धरून राहतो आणि मोकळ्या पायांचा पंजा अधिकच गुंतवतो. विनाकारण अडकलेल्याला दुसऱ्याने बांधायची गरज काय — अर्धा तोडून नेला तरी तो सोडत नाही.
जैशी ते शुकाचेनि आंगभारें । नळिका भोविन्नली एरी मोहरें । तेणें उडावें परी न पुरे । मनशंका ॥६-७६॥
वायांचि मान पिळी । अटुवें हियें आंवळी । टिटांतु नळी । धरूनि ठाके ॥६-७७॥
म्हणे बांधला मी फुडा । ऐसिया भावनेचिया पडे खोडां । कीं मोकळिया पायांचा चवडा । गोंवी अधिकें ॥६-७८॥
ऐसा काजेंवीण आंतुडला । तो सांग पां काय आणिकें बांधिला । मग न सोडीच जऱ्ही नेला । तोडूनि अर्धा ॥६-७९॥
म्हणौनि आपणयां आपणचि रिपु । जेणें वाढविला हा संकल्पु । येर स्वयंबुद्धी म्हणे बापु । जो नाथिलें नेघे ॥६-८०॥
किडाळाचा दोष गेला की पंधरे
म्हणून संकल्प वाढवणारा स्वतःच स्वतःचा रिपू. किडाळाचा दोष गेला की तेच पंधरे सोने होते; तसे संकल्प लोपला की जिवाला ब्रह्मत्व. घटाकार निमाला की त्या अवकाशाला आकाशात मिळायला कुठे जावे लागते? तसा देहाहंकार समूळ नाशला की तो परमात्माच — आधीपासूनच.
तया स्वांतःकरणजिता । सकळकामोपशांता । परमात्मा परौता । दुरी नाहीं ॥६-८१॥
जैसा किडाळाचा दोषु जाये । तरी पंधरें तेंचि होये । तैसें जीवा ब्रह्मत्व आहे । संकल्पलोपीं ॥६-८२॥
हा घटाकारु जैसा । निमालिया तया अवकाशा । नलगे मिळों जाणें आकाशा । आना ठाया ॥६-८३॥
तैसा देहाहंकारु नाथिला । हा समूळ जयाचा नाशिला । तोचि परमात्मा संचला । आधींचि आहे ॥६-८४॥
आतां शीतोष्णाचिया वाहणी । तेथ सुखदुःखाची कडसणीं । इयें न समाती कांहीं बोलणीं । मानापमानांचीं ॥६-८५॥
समुद्रावर पडलेल्या धारा
सूर्य जिकडे जातो तिकडे तेजाचेच विश्व; तसे त्याला जे मिळते ते तोच. मेघाच्या धारा समुद्रावर पडल्या तरी रुततात का — तशी योगीश्वराला शुभाशुभे वेगळी नाहीत. विज्ञानात्मक भाव विवरताना वावदूक ठरतो आणि मग पाहू लागले तर ज्ञान तोच.
जे जिये वाटा सूर्यु जाये । तेउतें तेजाचें विश्व होये । तैसें तया पावे तें आहे । तोचि म्हणौनी ॥६-८६॥
देखैं मेघौनि सुटती धारा । तिया न रुपती जैसिया सागरा । तैशीं शुभाशुभें योगीश्वरा । नव्हती आनें ॥६-८७॥
जो हा विज्ञानात्मकु भावो । तया विवरितां जाहला वावो । मग लागला जंव पाहों । तंव ज्ञान तें तोचि ॥६-८८॥
आतां व्यापकु कीं एकदेशी । हे ऊहापोही जे ऐसी । ते करावी ठेली आपैशी । दुजेनवीण ॥६-८९॥
ऐसा शरीरीचि परी कौतुकें । परब्रह्माचेनि पाडें तुकें । जेणें जिंतलीं एकें । इंद्रियें गा ॥६-९०॥
सोन्याचे ढेकूळ आणि मातीचे
तोच जितेंद्रिय आणि तोच योगयुक्त, ज्याला कधी लहानमोठे कळत नाही. मेरूएवढे निखळ सोन्याचे ढिसाळ आणि मातीचे ढेकूळ त्याला सारखेच; पृथ्वीचे मोल थिटे पडेल असे रत्न त्याला दगडासारखे. तिथे सुहृद-शत्रू, उदास-मित्र हा भेद कल्पायचा कुठून?
तो जितेंद्रियु सहजें । तोचि योगयुक्तु म्हणिजे । जेणे सानें थोर नेणिजे । कवणें काळीं ॥६-९१॥
देखैं सोनयाचें निखळ । मेरुयेसणें ढिसाळ । आणि मातियेचें डिखळ । सरिसेंचि मानी ॥६-९२॥
पाहतां पृथ्वीचें मोल थोडें । ऐसें अनर्घ्य रत्न चोखडें । देखें दगडाचेनि पाडें । निचाडु ऐसा ॥६-९३॥
तेथ सुहृद आणि शत्रु । कां उदासु आणि मित्रु । हा भावभेदु विचित्रु । कल्पूं कैंचा ॥६-९४॥
तया बंधु कोण काह्याचा । द्वेषिया कवणु तयाचा । मीचि विश्व ऐसा जयाचा । बोधु जाहला ॥६-९५॥
परिसाची कसवटी
परिसाच्या कसवटीवर वाण्याचे काम उरते का? जशी ती निर्वाण वर्णच करते तशी त्याची बुद्धी चराचरात साम्याची उजळी. विश्वाचे अलंकार आकाराने वेगवेगळे असले तरी घडले एकाच परब्रह्मरूपी भांगाराचे. वस्त्रात दृष्टी घातली तर धाग्यांची सृष्टी दिसते, पण एकावाचून दुसरी गोष्टच नाही.
मग तयाचिये दिठी । अधमोत्तम असे किरीटी ? । काय परिसाचिये कसवटी । वानिया कीजे ? ॥६-९६॥
ते जैशी निर्वाण वर्णुचि करी । तैशी जयाची बुद्धी चराचरीं । होय साम्याची उजरी । निरंतर ॥६-९७॥
जे ते विश्वालंकाराचें विसुरे । जरी आहाती आनानें आकारें । तरी घडले एकचि भांगारें । परब्रह्में ॥६-९८॥
ऐसें जाणणें जें बरवें । तें फावलें तया आघवें । म्हणौनि आहाचवाहाच न झकवे । येणें आकारचित्रें ॥६-९९॥
घापे पटामाजि दृष्टी । दिसे तंतूंची सैंघ सृष्टी । परी तो एकवांचूनि गोठी । दुजी नाहीं ॥६-१००॥
तो स्वतःच तीर्थराज
ज्याचे नाव तीर्थराज, ज्याच्या दर्शनाने प्रशस्ती आणि ज्याच्या संगतीने भ्रांतालाही ब्रह्मभाव. ज्याच्या बोलाने धर्म जगतो, ज्याची दृष्टी महासिद्धी प्रसवते, ज्याला स्वर्गसुख हा खेळ. चुकून चित्तात आठवला तरी तो आपली योग्यता देतो — त्याची स्तुती करण्यातही लाभ आहे.
ऐसेनि प्रतीती हें गवसे । ऐसा अनुभव जयातें असे । तोचि समबुद्धि हे अनारिसें । नव्हे जाणें ॥६-१०१॥
जयाचें नांव तीर्थरावो । दर्शनें प्रशस्तीसि ठावो । जयाचेनि संगें ब्रह्मभावो । भ्रांतासही ॥६-१०२॥
जयाचेनि बोलें धर्मु जिये । दिठी महासिद्धितें विये । देखैं स्वर्गसुखादि इयें । खेळु जयाचा ॥६-१०३॥
विपायें जरी आठवला चित्ता । तरी दे आपुली योग्यता । हें असो तयातें प्रशंसितां । लाभु आथि ॥६-१०४॥
पुढती अस्तवेना ऐसें । जया पाहलें अद्वैतदिवसें । मग आपणपांचि आपणु असे । अखंडित ॥६-१०५॥
ज्ञान्यांचा बाप
अद्वैताचा दिवस ज्याला उजाडला तो अखंड स्वतःतच. असा विवेकी तोच खरा एकाकी आणि तिन्ही लोकांत अपरिग्रही. मग कृष्णाचेच वर्णन — ज्ञान्यांचा बाप, देखणेपणाच्या दृष्टीचा दीप, ज्याच्या संकल्पाने विश्व रचले जाते; प्रणवाच्या पेठेत माजलेले शब्दब्रह्म त्याच्या यशाला वेढायलाही पुरत नाही.
ऐसिया दृष्टी जो विवेकी । पार्था तो एकाकी । सहजें अपरिग्रही जो तिहीं लोकीं । तोचि म्हणौनि ॥६-१०६॥
ऐसियें असाधारणें । निष्पन्नाचीं लक्षणें । आपुलेनि बहुवसपणें । श्रीकृष्ण बोले ॥६-१०७॥
जो ज्ञानियांचा बापु । देखणेयांचे दिठीचा दीपु । जया दादुलयाचा संकल्पु । विश्व रची ॥६-१०८॥
प्रणवाचिये पेठे । जाहलें शब्दब्रह्म माजिठे । तें जयाचिया यशा धाकुटें । वेढूं न पुरे ॥६-१०९॥
जयाचेनि आंगिकें तेजें । आवो रविशशीचिये वणिजे । म्हणौनि जग हें वेशजे- । वीण असे तया ॥६-११०॥
अर्जुनाचे प्रेम नासू नये
ज्याचे नुसते नाव घेताना गगनही टाचेएवढे दिसते, त्याचे गुण कोण आकळणार? आणि ही सगळी स्तुती कशासाठी — ‘द्वैताचा ठावच फेडणारी ब्रह्मविद्या उघड केली तर अर्जुनाला प्रिय असलेली ही गोडी नासेल.’ सोऽहंभावात अटकून तो मोक्षसुखाचा रंक होईल आणि त्याच्या दृष्टीचा कलंक तुझ्या प्रेमाला लागेल.
हां गा नामचि एक जयाचें । पाहतां गगनही दिसे टांचें । गुण एकैक काय तयाचे । आकळशील तूं ॥६-१११॥
म्हणौनि असो हें वानणें । सांगों नेणों कवणाचीं लक्षणें । दावावीं मिषें येणें । कां बोलिलों तें ॥६-११२॥
ऐकें द्वैताचा ठावोचि फेडी । ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी । तरी अर्जुना पढिये हे गोडी । नासेल हन ॥६-११३॥
म्हणौनि तें तैसे बोलणें । नव्हे सपातळ आड लावणें । केलें मनचि वेगळवाणें । भोगावया ॥६-११४॥
जया सोऽहंभाव अटकु । मोक्षसुखालागोनि रंकु । तयाचिये दिठीचा झणें कळंकु । लागेल तुझिया प्रेमा ॥६-११५॥
एकटेपणाचे काय करायचे?
‘याचा अहंभाव गेला आणि हा मीच झाला, तर मग एकट्याने काय करायचे? दृष्टीने पाहून निवावे, तोंड भरून बोलावे, दाटून आलिंगन द्यावे असे कोण उरेल?’ मनातली न मावणारी गोष्ट कोणाशी बोलायची, ऐक्य झाल्यावर? — या काकुळतीने जनार्दनाने उपदेशाच्या निमित्ताने मनाने मनाला आलिंगन दिले.
विपाये अहंभावो ययाचा जाईल । मी तेंचि हा जरी होईल । तरी मग काय कीजेल । एकलेया ॥६-११६॥
दिठीची पाहतां निविजें । कां तोंड भरोनि बोलिजे । नातरी दाटूनि खेंव दीजे । ऐसें कवण आहे ? ॥६-११७॥
आपुलिया मना बरवी । असमाई गोठी जीवीं । ते कवणेंसि चावळावी । जरी ऐक्य जाहलें ॥६-११८॥
इया काकुळती जनार्दनें । अन्योपदेशाचेनि हाताशनें । बोलामाजि मन मनें । आलिंगूं सरलें ॥६-११९॥
हें परिसतां जरी कानडें । तरी जाण पां पार्थ उघडें । कृष्णसुखाचेंचि रूपडें । वोतलें गा ॥६-१२०॥
वांझेला उशिरा झालेले मूल
वयाच्या शेवटी वांझेला एकच मूल व्हावे आणि मग मोहाची त्रिपुटी नाचू लागावी — तसे श्रीअनंताचे झाले. कुठे उपदेश आणि कुठे युद्ध, पण पुढे प्रेमाचे भोज नाचते आहे. ‘आवडी आणि लाजवी, व्यसन आणि शिणवी, पिसें आणि न भुलवी — तरी तेंचि काई?’ अर्जुन म्हणजे मैत्रीचे घर.
हें असो वयसेचिये शेवटीं । जैसें एकचि विये वांझोटी । मग ते मोहाची त्रिपुटी । नाचों लागे ॥६-१२१॥
तैसें जाहलें श्रीअनंता । ऐसें तरी मी न म्हणतां । जरी तयाचा न देखतां । अतिशयो एथ ॥६-१२२॥
पाहा पां नवल कैसें चोज । कें उपदेशु केउतें झुंज । परी पुढें वालभाचें भोज । नाचत असे ॥६-१२३॥
आवडी आणि लाजवी । व्यसन आणि शिणवी । पिसें आणि न भुलवी । तरी तेंचि काई ? ॥६-१२४॥
म्हणौनि भावार्थु तो ऐसा । अर्जुन मैत्रियेचा कुवासा । कीं सुखें श्रृंगारलिया मानसा । दर्पणु तो ॥६-१२५॥
पतिव्रतेची स्तुती पतीहून अधिक
आत्मनिवेदनाखालची सख्याची पीठिका आणि तिची अधिष्ठात्री मातृका म्हणजे पार्थ. जवळ गोसावी असताना त्याचे वर्णन न करता नोकराचे गुण घ्यावेत — पण अनुरागाने भजणारी पतिव्रता पतीहून अधिक वर्णिली जाते ना? म्हणून अर्जुनच विशेष स्तवावासा वाटतो.
यापरी बाप पुण्यपवित्र । जगीं भक्तिबीजासि सुक्षेत्र । तो श्रीकृष्णकृपे पात्र । याचिलागीं ॥६-१२६॥
हो कां आत्मनिवेदनातळींची । जे पीठिका होय सख्याची । पार्थु अधिष्ठात्री तेथिंची । मातृका गा ॥६-१२७॥
पासींचि गोसावी न वर्णिजे । मग पाइकाचा गुण घेईजे । ऐसा अर्जुनु तो सहजें । पढिये हरी ॥६-१२८॥
पाहां पां अनुरागें भजें । जे प्रियोत्तमें मानिजे । ते पतीहूनि काय न वानिजे । पतिव्रता ? ॥६-१२९॥
तैसा अर्जुनचि विशेषें स्तवावा । ऐसें आवडलें मज जीवा । जे तो त्रिभुवनींचिया दैवां । एकायतनु जाहला ॥६-१३०॥
श्रोत्यांचे कौतुक
ज्याच्या आवडीपायी अमूर्तही मूर्ती होतो आणि पूर्णालाही अवस्था लागते. इथे श्रोते म्हणतात — ‘देशी मराठी अशी बोलली जाते हे नवल नाही का? आकाशात साहित्याच्या रंगाचे वाण उमटते आहे; उन्मेषाचे चांदणे आणि भावार्थाचे गार, आणि श्लोकार्थ ही कुमुदिनी आपोआप फुलते आहे.’
जयाचिया आवडीचेनि पांगें । अमूर्तुही मूर्ती आवगें । पूर्णाहि परी लागे । अवस्था जयाची ॥६-१३१॥
तंव श्रोते म्हणती दैव । कैसी बोलाची हवाव । काय नादातें हन बरव । जिणोनि आली ॥६-१३२॥
हां हो नवल नोहे देशी । मऱ्हाटी बोलिजे तरी ऐशी । वाणें उमटताहे आकाशीं । साहित्य रंगाचे ॥६-१३३॥
कैसें उन्मेखचांदिणें तार । आणि भावार्थु पडे गार । हेचि श्लोकार्थ कुमुदिनी फार । साविया होती ॥६-१३४॥
चाडचि निचाडां करी । ऐसी मनोरथीं ये थोरी । तेणें विवळले अंतरीं । तेथ डोलु आला ॥६-१३५॥
‘ही संतचिन्हे माझ्या अंगी नाहीत’
निवृत्तिदासाने हे ओळखून ‘अवधान द्या’ म्हटले. कृष्णरूपी दिवसाने पांडवकुळात पहाट झाली; देवकीच्या उदरी वाहिलेला, यशोदेने कष्टाने पाळलेला, शेवटी पांडवांच्या उपयोगी आला. मग अर्जुन सलगीने म्हणतो — ‘देवा, ही संतचिन्हे माझ्या अंगी ठरत नाहीत.’
तें निवृत्तिदासें जाणितलें । मग अवधान द्या म्हणितलें । नवल पांडवकुळीं पाहलें । कृष्णदिवसें ॥६-१३६॥
देवकीया उदरीं वाहिला । यशोदा सायासें पाळिला । कीं शेखीं उपेगा गेला । पांडवांसी ॥६-१३७॥
म्हणौनि बहुदिवस वोळगावा । कां अवसरु पाहोनि विनवावा । हाही सोसु तया सदैवा । पडेचिना ॥६-१३८॥
हें असो कथा सांगें वेगीं । मग अर्जुन म्हणे सलगी । देवा इयें संतचिन्हें आंगीं । न ठकती माझ्या ॥६-१३९॥
एऱ्हवीं या लक्षणांचिया निजसारा । मी अपाडें कीर अपुरा । परि तुमचेनि बोलें अवधारा । थोरावें जरी ॥६-१४०॥
‘तुम्ही चित्त द्याल तर मी ब्रह्म होईन’
‘तुम्ही चित्त द्याल तर मी ब्रह्म होईन; सांगाल ते अभ्यासीन. कोणाची तरी कहाणी ऐकून अंतःकरणात श्लाघावे अशी उसनी मोठेपणाची शिरयाण कशाला? मी स्वतः तसा होईन एवढे आपलेपणाने करा.’ कृष्ण हसून ‘हो, करू’ म्हणतात. संतोष मिळेपर्यंतच सुखाची टंचाई.
जी तुम्ही चित्त देयाल । तरी ब्रह्म मियां होईजेल । काय जहालें अभ्यासिजेल । सांगाल जें ॥६-१४१॥
हां हो नेणों कवणाची काहाणी । आइकोनि श्लाघिजत असों अंतःकरणीं । ऐसी जहालेपणाची शिरयाणी । कायसी देवा ॥६-१४२॥
हें आंगें म्यां होईजो का । येतुलें गोसावी आपुलेपणें कीजो कां । तंव हांसोनि श्रीकृष्ण हो कां । करूं म्हणती ॥६-१४३॥
देखा संतोषु एक न जोडे । तंवचि सुखाचें सैंघ सांकडें । मग जोडलिया कवणीकडे । अपुरें असे ? ॥६-१४४॥
तैसा सर्वेश्वरु बळिया सेवकें । म्हणौनि ब्रह्मही होय तो कौतुकें । परि कैसा भारें आतला पिकें । दैवाचेनि ॥६-१४५॥
वैराग्याचा वसंत
हजारो जन्मांनीही इंद्रादिकांना महाग असलेली भेट याच्या आधीन — हे बोलताही येत नाही. कृष्णांनी ‘मी ब्रह्म व्हावे’ ही मागणी ऐकली आणि विचार केला — याला ब्रह्मत्वाचे डोहाळे लागले आहेत आणि बुद्धीच्या पोटी वैराग्य आले आहे; वैराग्याच्या वसंताने सोऽहंभाव मोहोरून आला आहे.
जो जन्मसहस्रांचियासाठीं । इंद्रादिकांही महागु भेटी । तो आधीनु केतुला किरीटी । जे बोलुही न साहे ॥६-१४६॥
मग ऐका जें पांडवें । म्हणितलें म्यां ब्रह्म होआवें । तें अशेषही देवें । अवधारिलें ॥६-१४७॥
तेथ ऐसेंचि एक विचारिलें । जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले । परि उदरा वैराग्य आहे आलें । बुद्धीचिया ॥६-१४८॥
एऱ्हवीं दिवस तरी अपुरे । परी वैराग्यवसंताचेनि भरें । जे सोऽहंभाव महुरे । मोडोनि आला ॥६-१४९॥
म्हणौनि प्राप्तिफळीं फळतां । यासि वेळु न लगेल आतां । होय विरक्तु ऐसा अनंता । भरंवसा जाहला ॥६-१५०॥
महेश अजूनही या वाटेचा वाटसरू
हा जे आरंभील ते आरंभीच फळेल, म्हणून सांगितलेला अभ्यास वाया जाणार नाही. ‘अर्जुना, हा पंथराज ऐक — जिथे प्रवृत्तिवृक्षाच्या बुडाशी निवृत्तिफळांच्या कोटी दिसतात, ज्या मार्गाचा कापडी महेश अजूनही आहे.’ योगवृंदे आकाशात निघाली आणि अनुभवाच्या पावलांनी धोरण पडले.
म्हणे जें जें हा अधिष्ठील । तें आरंभींच यया फळेल । म्हणौनि सांगितला न वचेल । अभ्यासु वायां ॥६-१५१॥
ऐसें विवरोनियां श्रीहरी । म्हणितलें तिये अवसरीं । अर्जुना हा अवधारीं । पंथराजु ॥६-१५२॥
तेथ प्रवृत्तितरूच्या बुडीं । दिसती निवृत्तिफळाचिया कोडी । जिये मार्गींचा कापडी । महेशु अजुनी ॥६-१५३॥
पैल योगवृंदे वहिलीं । आडवीं आकाशीं निघालीं । कीं तेथ अनुभवाच्या पाउलीं । धोरणु पडिला ॥६-१५४॥
तिहीं आत्मबोधाचेनि उजुकारें । धांव घेतली एकसरें । कीं येर सकळ मार्ग निदसुरे । सांडूनियां ॥६-१५५॥
पाऊल पडेल तिथे अपवर्गाची खाण
याच पंथाने महर्षी आले, साधक सिद्ध झाले. हा मार्ग दिसला की तहानभूक विसरते आणि रात्रंदिवस कळत नाही. चालताना पाऊल जिथे पडते तिथे अपवर्गाची खाण उघडते; आडवाटेला गेले तरी स्वर्गसुख मिळते. इथले चालणे निश्चळपणाचे, आणि ज्या ठिकाणी जायचे तो गावच आपण होतो.
पाठीं महर्षी येणें आले । साधकांचे सिद्ध जाहाले । आत्मविद थोरावले । येणेंचि पंथें ॥६-१५६॥
हा मार्गु जैं देखिजे । तैं तहान भूक विसरिजे । रात्रिदिवसु नेणिजे । वाटे इये ॥६-१५७॥
चालतां पाऊल जेथ पडे । तेथ अपवर्गाची खाणी उघडे । आव्हांटलिया तरी जोडे । स्वर्गसुख ॥६-१५८॥
निगिजे पूर्वींलिया मोहरा । कीं येइजे पश्चिमेचिया घरा । निश्चळपणें धनुर्धरा । चालणें एथिंचें ॥६-१५९॥
येणें मार्गें जया ठाया जाइजे । तो गांवो आपणचि होईजे । हें सांगों काय सहजें । जाणसी तूं ॥६-१६०॥
जागा कशी हवी
अर्जुन म्हणतो — मग ते केव्हा, मला आर्तीच्या समुद्रातून काढा. कृष्ण म्हणतात — अनुभवानेच हे उपयोगी, म्हणून आधी जागा पाहावी लागेल. जिथे निवांतपणाच्या कोडाने बसल्यावर उठावेसे वाटत नाही, जे पाहिल्याने वैराग्य दुणावते; संतांनी वसवलेला ठाव.
तेथ पार्थें म्हणितलें देवा । तरी तेंचि मग केव्हां । कां आर्तिसमुद्रौनि न काढावा । बुडतु जी मी ॥६-१६१॥
तंव श्रीकृष्ण म्हणती ऐसें । हें उत्सृंखळ बोलणें कायसें । आम्हीं सांगतसों आपैसें । वरि पुशिलें तुवां ॥६-१६२॥
तरी विशेषें आतां बोलिजेल । परि तें अनुभवें उपेगा जाईल । म्हणौनि तैसें एक लागेल । स्थान पाहावें ॥६-१६३॥
जेथ अराणुकेचेनि कोडें । बैसलिया उठों नावडे । वैराग्यासी दुणीव चढे । देखिलिया जें ॥६-१६४॥
जो संतीं वसविला ठावो । संतोषासि सावावो । मना होय उत्सावो । धैर्याचा ॥६-१६५॥
शृंगारीसुद्धा तिथे थांबेल
जिथे अभ्यासच आपोआप होतो आणि हृदयाला अनुभव वरतो, अशी रम्यता अखंड. तिथून जाताना तपश्चर्येची आस पाखंड्यालाही लागते; सकाम माणूसही परतायचे विसरतो. न राहणाऱ्याला ती जागा राहवते, भ्रमणाऱ्याला बसवते आणि विरक्तीला थापटून जागवते — ‘राज्य सोडून इथेच राहावे’ असे शृंगारीलाही वाटते.
अभ्यासुचि आपणयातें करी । हृदयातें अनुभवु वरी । ऐसी रम्यपणाची थोरी । अखंड जेथ ॥६-१६६॥
जया आड जातां पार्था । तपश्चर्या मनोरथा । पाखांडियाही आस्था । समूळ होय ॥६-१६७॥
स्वभावें वाटे येतां । जरी वरपडा जाहला अवचितां । तरी सकामुही परि माघौता । निघों विसरे ॥६-१६८॥
ऐसेनि न राहतयातें राहावी । भ्रमतयातें बैसवी । थापटूनि चेववी । विरक्तीतें ॥६-१६९॥
हें राज्य वर सांडिजे । मग निवांता एथेंचि असिजे । ऐसें श्रृंगारियांहि उपजे । देखतखेंवो ॥६-१७०॥
जनांची वर्दळ नको
तेवढीच चोख आणि जिथे अधिष्ठान डोळ्यांना दिसेल अशी. साधक वसणारी, पण जनांच्या पायरवाने रुळलेली नको. जिथे मुळासकट गोड, दाट आणि सदा फळणारी झाडे; पावलोपावली पाणी आणि वर्षाकाळीही चोख झरे. ऊन असलेच तर कोवळे, वारा मंद आणि निश्चळ.
जें येणें मानें बरवंट । आणि तैसेंचि अतिचोखट । जेथ अधिष्ठान प्रगट । डोळां दिसे ॥६-१७१॥
आणिकही एक पहावें । जें साधकीं वसतें होआवें । आणि जनाचेनि पायरवें । रुळेचिना ॥६-१७२॥
जेथ अमृताचेनि पाडें । मुळाहीसकट गोडें । जोडती दाटें झाडें । सदा फळतीं ॥६-१७३॥
पाउला पाउला उदकें । वर्षाकाळेंही अतिचोखें । निर्झरें का विशेखें । सुलभें जेथ ॥६-१७४॥
हा आतपुही आळुमाळु । जाणिजे तरी शीतळु । पवनु अति निश्चळु । मंदु झुळके ॥६-१७५॥
दोन-चार सारसे चालतील
बहुतकरून निःशब्द, श्वापदांची दाटी नको; पोपट आणि भ्रमर तिकडे नाहीत. हंस किंवा दोनचार सारसे, कधी कोकिळही चालेल; सतत नको पण मोर आलेगेले तरी ‘आम्ही नाही म्हणत नाही’ — ही ज्ञानेश्वरांची खास सवलत. तिथे निगूढ मठ किंवा शिवालय असावे.
बहुत करूनि निःशब्द । दाट न रिगे श्वापद । शुक हन षट्पद । तेउतें नाहीं ॥६-१७६॥
पाणिलगें हंसें । दोनी चारी सारसें । कवणे एके वेळे बैसे । तरी कोकिळही हो ॥६-१७७॥
निरंतर नाहीं । तरी आलीं गेलीं कांहीं । होतु कां मयूरेंही । आम्ही ना न म्हणों ॥६-१७८॥
परि आवश्यक पांडवा । ऐसा ठावो जोडावा । तेथ निगूढ मठ होआवा । कां शिवालय ॥६-१७९॥
दोहींमाजीं आवडे तें । जें मानलें होय चित्तें । बहुतकरूनि एकांते । बैसिजे गा ॥६-१८०॥
आसनाची मांडणी
मन जिथे राहील तिथे आसन रचावे — वर चोख मृगाजिन, मधे धुतलेल्या वस्त्राची घडी, तळाशी न मोडलेले कुशांकुर; कोवळे, सारखे, आपोआप स्थिर राहणारे. फार उंच असेल तर अंग डोलेल, फार खाली असेल तर भूमिदोष — म्हणून समभाव धरावा.
म्हणौनि तैसें तें जाणावें । मन राहतें पाहावें । राहील तेथ रचावें । आसन ऐसें ॥६-१८१॥
वरी चोखट मृगसेवडी । माजीं धूतवस्त्राची घडी । तळवटीं अमोडी । कुशांकुर ॥६-१८२॥
सकोमळ सरिसे । सुबद्ध राहती आपैसे । एकपाडें तैसें । वोजा घालीं ॥६-१८३॥
परि सावियाचि उंच होईल । तरी आंग हन डोलेल । नीच तरी पावेल । भूमिदोषु ॥६-१८४॥
म्हणौनि तैसें न करावें । समभावें धरावें । हें बहु असो होआवें । आसन ऐसें ॥६-१८५॥
सद्गुरुस्मरण
मग तिथे एकाग्र अंतःकरणाने सद्गुरुस्मरण करून अनुभवावे. स्मरणाच्या आदराने सबाह्य सात्त्विक भरते आणि अहंभावाचे काठिण्य विरते; विषयांचा विसर पडतो, इंद्रियांची कसमस मोडते आणि मनाची घडी हृदयात बसते. या ऐक्यातच आसनावर बसावे.
मग तेथ आपण । एकाग्र अंतःकरण । करूनि सद्गुरुस्मरण । अनुभविजे ॥६-१८६॥
जेथ स्मरतेनि आदरें । सबाह्य सात्त्विकें भरे । जंव काठिण्य विरे । अहंभावाचें ॥६-१८७॥
विषयांचा विसरु पडे । इंद्रियांची कसमस मोडे । मनाची घडी घडे । हृदयामाजीं ॥६-१८८॥
ऐसें ऐक्य हें सहजें । फावें तंव राहिजे । मग तेणेंचि बोधें बैसिजे । आसनावरी ॥६-१८९॥
आतां आंगातें आंग वरी । पवनातें पवनु धरी । ऐसी अनुभवाची उजरी । होंचि लागे ॥६-१९०॥
वज्रासन
प्रवृत्ती मागे वळते, समाधी अलीकडे उतरते आणि बसताक्षणी अख्खा अभ्यास सरतो. मग मुद्रेची रचना — मांडी जघनाला जोडावी, पावलांचे तळवे आधारद्रुमाच्या बुडाशी; उजवे खाली आणि त्यावर डावे सहज बसते.
प्रवृत्ति माघौति मोहरे । समाधि ऐलाडी उतरे । आघवें अभ्यासु सरे । बैसतखेंवो ॥६-१९१॥
मुद्रेची प्रौढी ऐशी । तेचि सांगिजेल आतां परियेसीं । तरी उरु या जघनासी । जडोनि घालीं ॥६-१९२॥
चरणतळें देव्हडीं । आधारद्रुमाच्या बुडीं । सुघटितें गाढीं । संचरीं पां ॥६-१९३॥
सव्य तो तळीं ठेविजे । तेणें सिवणीमध्यें पीडिजे । वरी बैसे तो सहजें । वाम चरणु ॥६-१९४॥
गुद मेंढ्राआंतौतीं । चारी अंगुळें निगुतीं । तेथ सार्ध सार्ध प्रांतीं । सांडूनियां ॥६-१९५॥
मूलबंध
गुद आणि मेंढ्र यांच्या मधल्या चार अंगुळांतले एक अंगुळ सोडून टाचेच्या वरच्या भागाने दाबावे; पृष्ठांत उचलावा आणि घोटे त्याच मापाने धरावे. मग सगळ्या शरीराचा भार टाचेच्या माथ्यावर स्वयंभू होतो — हेच मूलबंधाचे लक्षण, ज्याचे गौण नाव वज्रासन.
माजी अंगुळ एक निगे । तेथ टांचेचेनि उत्तरभागें । नेहेटिजे वरि आंगें । पेललेनि ॥६-१९६॥
उचलिलें कां नेणिजे । तैसें पृष्ठांत उचलिजे । गुल्फद्वय धरिजे । तेणेंचि मानें ॥६-१९७॥
मग शरीर संचु पार्था । अशेषही सर्वथा । पार्ष्णीचा माथा । स्वयंभु होय ॥६-१९८॥
अर्जुना हें जाण । मूळबंधाचें लक्षण । वज्रासन गौण । नाम यासी ॥६-१९९॥
ऐसी आधारीं मुद्रा पडे । आणि आधींचा मार्गु मोडे । तेथ अपानु आंतुलेकडे । वोहोटों लागे ॥६-२००॥
अर्धोन्मीलित दृष्टी
आधारावर मुद्रा पडली की आधीचा मार्ग मोडतो आणि अपान आत ओहोटू लागतो. करसंपुट डाव्या चरणावर बसते, पाठीचा कणा ताठ होतो, शिरकमळ स्थिर होते आणि डोळ्यांची कवाडे मिटू पाहतात. वरची पापणी ढळते आणि खालची वर येते — ती अर्धोन्मीलित स्थिती; दृष्टी आत राहून बाहेर नासाग्रावर पाऊल ठेवते.
तंव करसंपुट आपैसें । वाम चरणीं बैसे । तंव बाहुमूळीं दिसे । थोरीव आली ॥६-२०१॥
माजीं उभारलेनि दंडें । शिरकमळ होय गाढें । नेत्रद्वारींचीं कवाडें । लागूं पाहती ॥६-२०२॥
वरचिलें पातीं ढळतीं । तळींचीं तळीं पुंजाळती । तेथ अर्धोन्मीलित स्थिती । उपजे तया ॥६-२०३॥
दिठी राहोनि आंतुलीकडे । बाहेर पाऊल घाली कोडें । ते ठायीं ठावो पडे । नासाग्रपीठीं ॥६-२०४॥
ऐसें आंतुच्या आंतुचि रचे । बाहेरी मागुतें न वचे । म्हणौनि राहणें आधिये दिठीचें । तेथेंचि होय ॥६-२०५॥
जालंधर आणि उड्डियाण
दिशा पाहायची किंवा रूप न्याहाळायची चाडच सरते. मग कंठनाळ आटतो, हनुवटी छातीवर दाटते आणि घंटिका लोपते — त्या बंधाला जालंधर म्हणतात. नाभीवर पोट आत ओढले जाते आणि हृदयकोश आत फाकतो; स्वाधिष्ठानावर आणि नाभीखाली पडणारा बंध तो उड्डियाण.
आतां दिशांची भेटी घ्यावी । कां रूपाची वास पहावी । हे चाड सरे आघवी । आपैसया ॥६-२०६॥
मग कंठनाळ आटे । हनुवटी हडौती दाटे । ते गाढी होऊनि नेहटे । वक्षःस्थळीं ॥६-२०७॥
माजीं घंटिका लोपे । वरी बंधु जो आरोपे । तो जालंधरु म्हणिपे । पंडुकुमरा ॥६-२०८॥
नाभीवरी पोखे । उदर हें थोके । अंतरीं फांके । हृदयकोशु ॥६-२०९॥
स्वाधिष्ठानावरिचिले कांठीं । नाभिस्थानातळवटीं । बंधु पडे किरीटी । वोढियाणा तो ॥६-२१०॥
अपान वर दाटतो
शरीराबाहेर अभ्यासाची पांघरूण पडते आणि आत मनोधर्माची ताकद मोडते; कल्पना निमते, प्रवृत्ती शमते. भूक कुठे गेली आणि झोप कुठे गेली याची आठवणही हरपते. मूलबंधाने कोंडलेला अपान मागे वळून वर दाटतो आणि मणिपूराशी झुंजतो.
ऐसी शरीराबाहेरलीकडे । अभ्यासाची पांखर पडे । तंव आंतु त्राय मोडे । मनोधर्माची ॥६-२११॥
कल्पना निमे । प्रवृत्ती शमे । आंग मन विरमे । सावियाचि ॥६-२१२॥
क्षुधा काय जाहाली । निद्रा केउती गेली । हे आठवणही हारपली । न दिसे वेगां ॥६-२१३॥
जो मूळबंधें कोंडला । अपानु माघौता मुरडला । तो सवेंचि वरी सांकडला । धरी फुगूं ॥६-२१४॥
क्षोभलेपणें माजे । उवाइला ठायीं गाजे । मणिपूरेंसीं झुंजे । राहोनियां ॥६-२१५॥
आतली झाडाझडती
मग त्या थांबलेल्या वावटळीने घर ढवळते — बालपणीची कुहीटुळी बाहेर काढते, कोठ्यात शिरून कफपित्ताचे थारे उरू देत नाही; धातूंचे समुद्र उलथते, मेदाचे पर्वत फोडते, अस्थींतली मज्जा काढते. नाड्या सोडवते, गात्रे विस्कटते आणि साधकाला भेडसावते — ‘परी बिहावें ना’.
मग थावलिये वाहटुळी । सैंघ घेऊनि घर डहुळी । बाळपणींची कुहीटुळी । बाहेर घाली ॥६-२१६॥
भीतरीं वळी न धरे । कोठ्यामाजीं संचरे । कफपित्तांचे थारे । उरों नेदी ॥६-२१७॥
धातूंचे समुद्र उलंडी । मेदाचे पर्वत फोडी । आंतली मज्जा काढी । अस्थिगत ॥६-२१८॥
नाडीतें सोडवी । गात्रांतें विघडवी । साधकातें भेडसावी । परी बिहावें ना ॥६-२१९॥
व्याधीतें दावी । सवेंचि हरवी । आप पृथ्वी कालवी । एकवाट ॥६-२२०॥
कुंडलिनी जागी होते
इकडे आसनाच्या उबेने शक्ती कुंडलिनीला जागवते. कुंकवात न्हालेले नागिणीचे पिलू वळण घेऊन शय्येवर बसावे तशी ती साडेतीन वेटोळ्यांची अधोमुख सर्पिणी निजलेली — विजेच्या वेलीची विडी, अग्निज्वाळांची घडी, पंधरा वाणी सोन्याची घोटीव काडी. वज्रासनाने चिमटली की ती सावध होते.
तंव येरीकडे धनुर्धरा । आसनाचा उबारा । शक्ति करी उजगरा । कुंडलिनीतें ॥६-२२१॥
नागिणीचें पिलें । कुंकुमें नाहलें । वळण घेऊनि आलें । सेजे जैसें ॥६-२२२॥
तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी । अधोमुख सर्पिणी । निदेली असे ॥६-२२३॥
विद्युल्लतेची विडी । वन्हिज्वाळांची घडी । पंधरेयाची चोखडी । घोंटीव जैशी ॥६-२२४॥
तैशी सुबद्ध आटली । पुटीं होती दाटली । तें वज्रासनें चिमुटली । सावधु होय ॥६-२२५॥
मुख पसरून वर
नक्षत्र उलथावे किंवा सूर्याचे आसन मोडावे तशी ती वेढे सोडून अंग मोडत कंदावर उठते. पुष्कळ दिवसांची भूक आणि वर जाग — म्हणून ती आवेशाने मुख वर पसरते आणि हृदयकोशाखालच्या पवनाला सगळ्यासकट मिठी मारते.
तेथ नक्षत्र जैसें उलंडलें । कीं सूर्याचें आसन मोडलें । तेजाचें बीज विरूढलें । अंकुरेंशीं ॥६-२२६॥
तैशी वेढियातें सोडिती । कवतिकें आंग मोडिती । कंदावरी शक्ती । उठली दिसे ॥६-२२७॥
सहजें बहुतां दिवसांची भूक । वरी चेवविली तें होय मिष । मग आवेशें पसरी मुख । ऊर्ध्वा उजू ॥६-२२८॥
तेथ हृदयकोशातळवटीं । जो पवनु भरे किरीटी । तया सगळेयाचि मिठी । देऊनि घाली ॥६-२२९॥
मुखींच्या ज्वाळीं । तळीं वरी कवळी । मांसाची वडवाळी । आरोगूं लागे ॥६-२३०॥
शरीराची झाडाझडती
ती मांसाची वडवाळ खाऊ लागते; जिथे जिथे मांस तिथे घास घेते, हृदयातही एकदोन. मग तळवे-तळहात शोधते, वरचे खंड भेदते, प्रत्यंगांच्या संधी तपासते; नखांतलेही सत्त्व काढते, त्वचा धुऊन पिंजऱ्याला जोडते, अस्थींचे नळे निरपते. मग सप्तधातूंच्या सागरांत घोट भरते आणि लगेच उन्हाळा करते.
जे जे ठाय समांस । तेथ आहाच जोडे घाउस । पाठी एकदोनी घांस । हियाही भरी ॥६-२३१॥
मग तळवे तळहात शोधी । उर्ध्वींचे खंड भेदी । झाडा घे संधी । प्रत्यंगाचा ॥६-२३२॥
अधोभाग तरी न संडी । परि नखींचेंही सत्त्व काढी । त्वचा धुवूनि जडी । पांजरेशीं ॥६-२३३॥
अस्थींचे नळे निरपे । शिरांचे हीर वोरपे । तंव बाहेरी विरूढी करपे । रोमबीजांची ॥६-२३४॥
मग सप्तधातूंच्या सागरीं । ताहानेली घोंट भरी । आणि सवेंचि उन्हाळा करी । खडखडीत ॥६-२३५॥
ती दोन भूते खाते
नाकातून बारा अंगुळे जाणारा वारा गच्च धरून परत आत घालते. अध वर आकुंचते आणि ऊर्ध्व खाली खचते; त्या मिठीत चक्रांचे पदर उरतात. ती दोन भूते खाऊन संपूर्ण धाते आणि मग सौम्य होऊन सुषुम्नेपाशी राहते; तृप्तीच्या संतोषाने मुखाने जे गरळ ओकते, त्याच पीयूषाने प्राण जगतो.
नासापुटौनि वारा । जो जातसे अंगुळें बारा । तो गच्च धरूनि माघारा । आंतु घाली ॥६-२३६॥
तेथ अध वरौतें आकुंचे । ऊर्ध्व तळौतें खांचे । तया खेंवामाजि चक्राचे । पदर उरती ॥६-२३७॥
एऱ्हवीं तरी दोन्ही तेव्हांचि मिळती । परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती । ते तयांतें म्हणे परौती । तुम्हीच कायसी येथे ॥६-२३९॥
ऐसी दोनी भूतें खाये । ते वेळीं संपूर्ण धाये । मग सौम्य होउनि राहे । सुषुम्नेपाशीं ॥६-२४०॥
तेथ तृप्तीचेनि संतोषें । गरळ जें वमी मुखें । तेणें तियेचेनि पीयूषें । प्राणु जिये ॥६-२४१॥
गाठी सुटतात
तो अग्नी आतून निघतो पण सबाह्य निववू लागतो; तेव्हा अंगाची कस सुटते. नाड्यांचे मार्ग मोडतात, वायूचे नवविधपण जाते आणि शरीराचे धर्मच उरत नाहीत. इडा आणि पिंगळा एकवटतात, तिन्ही गाठी सुटतात, चक्रांचे सहा पदर फुटतात. बुद्धीची पुळी विरते.
तो अग्नि आंतूनि निघे । परी सबाह्य निववूंचि लागे । ते वेळीं कसु बांधिती आंगें । सांडिला पुढती ॥६-२४२॥
मार्ग मोडिती नाडीचे । नवविधपण वायूचें । जाय म्हणौनि शरीराचे । धर्मु नाहीं ॥६-२४३॥
इडा पिंगळा एकवटती । गांठी तिन्ही सुटती । साही पदर फुटती । चक्रांचे हे ॥६-२४४॥
मग शशी आणि भानु । ऐसा कल्पिजे जो अनुमानु । तो वातीवरी पवनु । गिंवसितां न दिसे ॥६-२४५॥
बुद्धीची पुळिका विरे । परिमळु घ्राणीं उरे । तोही शक्तीसवें संचरे । मध्यमेमाजीं ॥६-२४६॥
चंद्रामृताचे तळे
वरून चंद्रामृताचे तळे कलंडून शक्तीच्या मुखात मिळते; त्या नाळक्यात रस भरतो आणि सर्वांगात संचरतो, आणि प्राणपवन जिथल्या तिथे मुरतो. तापलेल्या मुशीतून मेण निघून जावे आणि मग ती रसाने ओतली जावी — तसे पिंडाच्या आकारात तीच कळा अवतरते, वर त्वचेचा पदर पांघरून.
तंव वरिलेकडोनि ढाळें । चंद्रामृताचें तळें । कानवडोनी मिळे । शक्तिमुखीं ॥६-२४७॥
तेणें नाळकें रस भरे । तो सर्वांगामाजीं संचरे । जेथिंचा तेथ मुरे । प्राणपवनु ॥६-२४८॥
तातलिये मुसें । मेण निघोनि जाय जैसें । मग कोंदली राहे रसें । वोतलेनी ॥६-२४९॥
तैसें पिंडाचेनि आकारें । ते कळाचि कां अवतरे । वरी त्वचेचेनि पदरे । पांघुरली असे ॥६-२५०॥
जैशी आभाळाची बुंथी । करूनि राहे गभस्ती । मग फिटलिया दीप्ति । धरूनि ये ॥६-२५१॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.