मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
ज्ञानेश्वरी — अध्याय आठवा

साहित्य

ज्ञानेश्वरी — अध्याय आठवा

ओव्या २५१–२९५

Dnyaneshwari — Adhyay 8, part 2

रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६

सारांश

मृत्यूचा अध्याय. अंतकाळी ज्याचे स्मरण, त्याचीच गती — त्यामुळे स्मरण शेवटच्या क्षणाचे नसून आयुष्यभराच्या सवयीचे काम आहे. ब्रह्म, अध्यात्म, कर्म या संज्ञा येथे स्पष्ट केल्या जातात, आणि प्रकाशाचा व अंधाराचा असे दोन मार्ग वर्णिले जातात.

जैसें चंद्राआड आभाळ ।सदट दाटे सजळ ।मग गडद ना उजाळ ।ऐसें झांवळें होय ॥ २२९ ॥
कां मरे ना सावध ।ऐसें जीवितासि पडे स्तब्ध ।आयुष्य मरणाची मर्याद ।वेळु ठाकी ॥ २३० ॥
ऐसी मनबुद्धिकरणीं ।सभोंवतीं धूमाकुळाची कोंडणी ।तेथ जन्में जोडलिये वाहणी ।युगचि बुडे ॥ २३१ ॥
हां गा हातींचें जे वेळीं जाये ।ते वेळीं आणिका लाभाची गोठी कें आहे ।म्हणौनि प्रयाणीं तंव होये ।येतुली दशा ॥ २३२ ॥
ऐशी देहाआंतु स्थिती ।बाहेरि कृष्णपक्षु वरि राती ।आणि सामासही वोडवती ।दक्षिणायन ॥ २३३ ॥
इये पुनरावृत्तीचीं घराणीं ।आघवीं एकवटती जयाचिया प्रयाणीं ।तो स्वरूपसिद्धीची काहाणी ।कैसेंनि आइके ? ॥ २३४ ॥
ऐसा जयाचा देह पडे ।तया योगी म्हणौनि चंद्रवरी जाणें घडे ।मग तेथूनि मागुता बहुडे ।संसारा ये ॥ २३५ ॥
आम्हीं अकाळु जो पांडवा ।म्हणितला तो हा जाणावा ।आणि हाचि धूम्रमार्गु गांवा ।पुनरावृत्तीचिया ॥ २३६ ॥
येर तो अर्चिरा मार्गु ।तो वसता आणि असलगु ।साविया स्वस्त चांगु ।निवृत्तीवरी ॥ २३७ ॥
शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते ।एकया यात्यनावृत्तिमन्ययावर्तते पुनः ॥ २६ ॥
ऐशिया अनादि या दोन्ही वाटा ।एकी उजू एकी अव्हांटा ।म्हणौनि बुद्धिपूर्वक सुभटा ।दाविलिया तुज ॥ २३८ ॥
कां जे मार्गामार्ग देखावे ।साच लटिकें वोळखावें ।हिताहित जाणावें ।हिताचिलागीं ॥ २३९ ॥
पाहें पां नाव देखतां बरवी ।कोणी आड घाली काय अथावीं ।कां सुपंथ जाणौनियां अडवीं ।रिगवत असे ॥ २४० ॥
जो विष अमृत वोळखे ।तो अमृत काय सांडूं शके ? ।तेविं जो उजू वाट देखे ।तो अव्हांटा न वचे ॥ २४१ ॥
म्हणौनि फुडें ।पारखावें खरें कुडें ।पारखिलें तरी न पडे ।अनवसरें कहीं ॥ २४२ ॥
एर्हवीं देहांतीं थोर विषम ।या मार्गाचें आहे संभ्रम ।जन्मे अभ्यासिलियाचें हन काम ।जाईल वायां ॥ २४३ ॥
जरी अर्चिरा मार्गु चुकलिया ।अवचटें धूम्रपंथें पडलिया ।तरी संसारपांथीं जुंतलिया ।भंवतचि असावें ॥ २४४ ॥
हे सायास देखोनि मोठे ।आतां कैसेनि पां एकवेळ फिटे ।म्हणौनि योगमार्गु गोमटे ।शोधिले दोन्ही ॥ २४५ ॥
तंव एकें ब्रह्मत्वा जाइजे ।आणि एकें पुनरावृत्ती येइजे ।परि दैवगत्या जो लाहिजे ।देहांतीं जेणें ॥ २४६ ॥
नैते सृती पार्थ जानन्योगी मुह्यति कश्चन ।तस्मात्सर्वेषु कालेषु योगयुक्तो भवार्जुन ॥ २७ ॥
ते वेळीं म्हणितलें हें नव्हे ।वांया अवचटें काय पावे ।देह त्यजूनि वस्तु होआवें ।मार्गेंचि कीं ? ॥ २४७ ॥
तरी आतां देह असो अथवा जावो ।आम्ही तों केवळ वस्तूचि आहों ।कां जे दोरीं सर्पत्व वावो ।दोराचिकडुनी ॥ २४८ ॥
मज तरंगपण असे कीं नसे ।ऐसें हें उदकासी कहीं प्रतिभासे ? ।तें भलतेव्हां जैसें तैसें ।उदकचि कीं ॥ २४९ ॥
तरंगाकारें न जन्मेचि ।ना तरंगलोपें न निमेचि ।तेविं देहीं जे देहेंचि ।वस्तु जाहले ॥ २५० ॥
आतां शरीराचें तयाचिया ठाई ।आडनांवही उरलें नाहीं ।तरी कोणें काळें काई ।निमे तें पाहें पां ॥ २५१ ॥
मग मार्गातें कासया शोधावें ? ।कोणें कोठूनि कें जावें ? ।जरी देशकालादि आघवें ।आपणचि असे ॥ २५२ ॥
आणि हां गा घटु जे वेळीं फुटे ।ते वेळीं तेथिंचें आकाश लागे नीट वाटे ।वाटा लागे तरी गगना भेटे ।एर्हवीं चुके ? ॥ २५३ ॥
पाहें पां ऐसें हन आहे ।कीं तो आकारुचि जाये ।येर गगन तें गगनींचि आहे ।घटत्वाहि आधीं ॥ २५४ ॥
ऐसिया बोधाचेनि सुरवाडें ।मार्गामार्गाचे सांकडें ।तया सोऽहंसिद्धां न पडे ।योगियांसी ॥ २५५ ॥
याकारणें पंडुसुता ।तुवां होआवें योगयुक्ता ।येतुलेनि सर्वकाळीं साम्यता ।आपैसया होईल ॥ २५६ ॥
मग भलतेथ भलतेव्हां ।देह असो अथवा जावा ।परि अबंधा नित्य ब्रह्मभावा ।विघडु नाहीं ॥ २५७ ॥
तो कल्पादि जन्मा नागवे ।कल्पांतीं मरणें नाप्लवें ।माजीं स्वर्गसंसाराचेनि लाघवें ।झकवेना ॥ २५८ ॥
येणें बोधें जो योगी होये ।तयासीचि या बोधाचें नीटपण आहे ।कां जे भोगातें पेलूनि पायें ।निजरूपा ये ॥ २५९ ॥
पै गा इंद्रादिकां देवां ।जयां सर्वस्वें गाजती राणिवा ।तें सांडणें मानूनि पांडवा ।डावली जो ॥ २६० ॥
जरी वेदाध्ययनाचें जालें ।अथवा यज्ञाचें शेतचि पिकलें ।कीं तपोदानांचे जोडलें ।सर्वस्व हन जें ॥ २६१ ॥
तया आघवयाचि पुण्याचा मळा ।भारु आंतौनि जया ये फळा ।तें परब्रह्मा निर्मळा ।सांटि न सरे ॥ २६२ ॥
जें नित्यानंदाचेनि मानें ।उपमेचा कांटाळा न दिसे सानें ।पाहा पां वेदयज्ञादि साधनें ।जया सुखा ॥ २६३ ॥
जें विटे ना सरे ।भोगी तयाचेनि पवाडें पुरे ।पुढती महासुखाचें सोयरें ।भावंडचि ॥ २६४ ॥
ऐसें दृष्टीचेनि सुखपणें ।जयासी अदृष्टाचें बैसणें ।जें शतमखाही आंगवणें ।नोहेचि एका ॥ २६५ ॥
तयातें योगीश्वर अलौकिकें ।दिठीचेनि हाततुकें ।अनुमानती कौतुकें ।तंव हळुवट आवडे ॥ २६६ ॥
मग तया सुखाची किरीटी ।करूनियां गा पाउटी ।परब्रह्माचिये पाठीं ।आरूढती ॥ २६७ ॥
ऐसे चराचरैक भाग्य ।जें ब्रह्मेशां आराधना योग्य ।योगियांचें भोग्य ।भोगधन जें ॥ २६८ ॥
जो सकळ कळांची कळा ।जो परमानंदाचा पुतळा ।जो जिवाचा जिव्हाळा ।विश्वाचिया ॥ २६९ ॥
जो सर्वज्ञतेचा वोलावा ।जो यादवकुळींचा कुळदिवा ।तो श्रीकृष्णजी पांडवा- ।प्रती बोलिला ॥ २७० ॥
ऐसा कुरुक्षेत्रींचा वृत्तांतु ।संजयो रायासी असे सांगतु ।तेचि परियेसा पुढारी मातु ।ज्ञानदेव म्हणे ॥ २७१ ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

ऐसें
— असे
म्हणौनि
— म्हणून, याकारणाने
पां
— बरं का, नाही का (संवादातील उद्गार)
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
तया
— त्याला, त्या
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
पांडवा
— पांडुपुत्र — अर्जुन
जैसें
— जसे
येर
— दुसरा, इतर
एर्हवीं
— एरवी, इतर वेळी
तेथ
— तिथे
इये
— या (स्त्रीलिंगी)
घडे
— घडते, शक्य होते
तुज
— तुला
देखे
— पाहतो
देखोनि
— पाहून
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
तैसें
— तसे
काई
— काय
आघवें
— सगळे, संपूर्ण
पंडुसुता
— पंडूचा पुत्र — अर्जुन
तुवां
— तू (करणरूप)
माजीं
— मध्ये, आत
पुढती
— पुन्हा, पुढे

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: KRISHNA AND ARJUNA ARRIVE AT HASTINAPURA — Unknown author Unknown author, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — santsahitya.in

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित प्रतीशी ओवीवार पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.