मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
ज्ञानेश्वरी — अध्याय नववा

साहित्य

ज्ञानेश्वरी — अध्याय नववा

ओव्या १–२५०

Dnyaneshwari — Adhyay 9, part 1

रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६

सारांश

‘राजविद्या’ — विद्यांमधील राजा. हे ज्ञान गुप्त असले तरी दुर्गम नाही, हा या अध्यायाचा स्वर. ‘पत्र, पुष्प, फळ किंवा पाणी — भक्तीने जे दिले ते मी स्वीकारतो’ हे वचन येथले. जन्म, जात किंवा विद्या यांची अट न ठेवता भक्तीचा दरवाजा सर्वांसाठी उघडणारा हा अध्याय वारकरी परंपरेचा आधार आहे.

तरी अवधान एकलें दीजे ।मग सर्वसुखासि पात्र होईजे ।हें प्रतिज्ञोत्तर माझें ।उघड ऐका ॥ १ ॥
परी प्रौढी न बोलों हो जी ।तुम्हां सर्वज्ञांच्या समाजीं ।देयावें अवधान हे माझी ।विनवणी सलगीची ॥ २ ॥
कां जे लळेयांचे लळे सरती ।मनोरथांचे मनोरथ पुरती ।जरी माहेरें श्रीमंतें होती ।तुम्हां ऐसीं ॥ ३ ॥
तुमचे या दिठिवेयाचिये वोलें ।सासिन्नले प्रसन्नतेचे मळे ।ते साउली देखोनि लोळें ।श्रांतु जी मी ॥ ४ ॥
प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो ।म्हणौनि आम्हीं आपुलिया स्वेच्छा वोलावो लाहों ।येथही जरी सलगी करूं बिहों ।तरी निवों कें पां ? ॥ ५ ॥
नातरी बालक बोबडां बोलीं ।कां वांकुडा विचुका पाउलीं ।ते चोज करूनि माउली ।रिझे जेवीं ॥ ६ ॥
तेवीं तुम्हां संतांचा पढियावो ।कैसेनि तरी आम्हांवरी हो ।या बहुवा आळुकिया जी आहों ।सलगी करीत ॥ ७ ॥
वांचूनि माझिये बोलतिये योग्यते ।सर्वज्ञ भवादृश श्रोते ।काय धड्यावरी सारस्वतें ।पढों सिकिजे ॥ ८ ॥
अवधारा आवडे तेसणा धुंधुरु ।परि महातेजीं न मिरवे काय करूं ।अमृताचिया ताटीं वोगरूं ।ऐसी रससोय कैंची ? ॥ ९ ॥
हां हो हिमकरासी विंजणें ।कीं नादापुढें आइकवणें ।लेणियासी लेणें ।हें कहीं आथी ? ॥ १० ॥
सांगा परिमळें काय तुरंबावें ।सागरें कवणें ठायीं नाहावें ? ।हें गगनचि आडे आघवें ।ऐसा पवाडु कैंचा ? ॥ ११ ॥
तैसें तुमचें अवधान धाये ।आणि तुम्ही म्हणा हें होये ।ऐसें वक्तृत्व कवणा आहे ।जेणें रिझा तुम्ही ? ॥ १२ ॥
तरी विश्वप्रगटितिया गभस्ती ।काय हातिवेन न कीजे आरती ? ।कां चुळोदकें आपांपती ।अर्घ्यु नेदिजे ? ॥ १३ ॥
प्रभू तुम्ही महेशाचिया मूर्ती ।आणि मी दुबळा अर्चितुसें भक्ती ।म्हणौनि बोल जर्ही गंगावती ।तर्ही स्वीकाराल कीं ॥ १४ ॥
बाळक बापाचिये ताटीं रिगे ।आणि बापातेंचि जेवऊं लागे ।कीं तो संतोषिलेनि वेगें ।मुखचि वोढवी ॥ १५ ॥
तैसा मीं जरी तुम्हांप्रती ।चावटी करीतसें बाळमती ।तरी तुम्ही संतोषिजे ऐसी जाती ।प्रेमाची असे ॥ १६ ॥
आणि तेणें आपुलेपणाचेनि मोहें ।तुम्हीं संत घेतले असा बहुवें ।म्हणौनि केलिये सलगीचा नोहे ।आभारु तुम्हां ॥ १७ ॥
अहो तान्हयाचें लागतां झटें ।तेणें अधिकचि पान्हा फुटे ।रोषें प्रेम दुणवटे ।पढियंतयाचेनि ॥ १८ ॥
म्हणौनि मज लेंकुरवाचेनि बोलें ।तुमचें कृपाळूपण निदैलें ।तें चेइलें ऐसें जी जाणवलें ।यालागीं बोलिलो मीं ॥ १९ ॥
एर्हवीं चांदिणें पिकविजत आहे चेपणीं ? ।कीं वारया घापत आहे वाहणी ? ।हां हो गगनासि गंवसणी ।घालिजे केवीं ? ॥ २० ॥
आइका पाणी वोथिजावें न लगे ।नवनीतीं माथुला न रिगे ।तेवीं लाजिलें व्याख्यान निगे ।देखोनि जयातें ॥ २१ ॥
हें असो शब्दब्रह्म जिये बाजे ।शब्द मावळलेया निवांतु निजे ।तो गीतार्थु मर्हाठिया बोलिजे ।हा पाडु काई ? ॥ २२ ॥
परि ऐसियाही मज धिंवसा ।तो पुढति याचि येकी आशा ।जे धिटींवा करूनि भवादृशां ।पढियंतया होआवें ॥ २३ ॥
तरि आतां चंद्रापासोनि निववितें ।जें अमृताहूनि जीववितें ।तेणें अवधानें कीजो वाढतें ।मनोरथां माझिया ॥ २४ ॥
कां जैं दिठिवा तुमचा वरुषे ।तैं सकळार्थ सिद्धि मती पिके ।एर्हवीं कोंभेला उन्मेषु सुके ।जरी उदास तुम्ही ॥ २५ ॥
सहजें तरी अवधारा ।वक्तृत्वा अवधानाचा होय चारा ।तरी दोंदें पेलती अक्षरां ।प्रमेयाचीं ॥ २६ ॥
अर्थ बोलाची वाट पाहे ।तेथ अभिप्रावोचि अभिप्रायातें विये ।भावाचा फुलौरा होत जाये ।मतिवरी ॥ २७ ॥
म्हणौनि संवादाचा सुवावो ढळे ।तर्ही हृदयाकाश सारस्वतें वोळे ।आणि श्रोता दुश्चिता तरि वितुळे ।मांडला रसु ॥ २८ ॥
अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये ।परि ते हातवटी चंद्रीं कीं आहे ।म्हणौनि वक्ता तो वक्ता नोहे ।श्रोतेनिविण ॥ २९ ॥
परि आतां आमुतें गोड करावें ।ऐसें तांदुळीं कायसा विनवावें ? ।साइखडियानें काइ प्रार्थावें ।सूत्रधारातें ? ॥ ३० ॥
तो काय बाहुलियांचिया काजा नाचवी ? ।कीं आपुलिये जाणिवेची कळा वाढवी ।म्हणौनि आम्हां या ठेवाठेवी ।काय काज ॥ ३१ ॥
तवं श्रीगुरू म्हणती काइ जाहलें ।हें समस्तही आम्हां पावलें ।आतां सांगैं जें निरोपिलें ।नारायणें ॥ ३२ ॥
येथ संतोषोनि निवृत्तिदासें ।जी जी म्हणौनि उल्हासें ।अवधारा श्रीकृष्ण ऐसें ।
नातरि अर्जुना हें बीज ।पुढती सांगिजेल तुज ।जें हें अंतःकरणींचें गुज ।जिवाचिये ॥ ३४ ॥
येणें मानें जीवाचें हिये फोडावें ।मग गुज कां पां मज सांगावें ? ।ऐसें कांहीं स्वभावें ।कल्पिशी जरी ॥ ३५ ॥
तरी परियेसी गा प्राज्ञा ।तूं आस्थेचीच संज्ञा ।बोलिलिये गोष्टीची अवज्ञा ।नेणसी करूं ॥ ३६ ॥
म्हणौनि गूढपण आपुलें मोडो ।वरि न बोलणेंही बोलावें घडो ।परि आमुचिये जीवींचें पडो ।तुझ्या जीवीं ॥ ३७ ॥
अगा थानीं कीर दूध गूढ ।परि थानासीचि नव्हे कीं गोड ।म्हणौनि सरो कां सेवितयाची चाड ।जरी अनन्यु मिळे ॥ ३८ ॥
मुडांहूनि बीज काढिलें ।मग निर्वाळलिये भूमीं पेरिलें ।तरि तें सांडीविखुरीं गेलें ।म्हणों ये कायी ? ॥ ३९ ॥
यालागीं सुमनु आणि शुद्धमती ।जो अनिंदकु अनन्यगती ।पैं गा गौप्यही परी तयाप्रती ।चावळिजे सुखें ॥ ४० ॥
तरि प्रस्तुत आतां गुणीं इहीं ।तूं वांचून आणिक नाहीं ।म्हणौनि गुज तरी तुझ्या ठायीं ।लपऊं नये ॥ ४१ ॥
आतां किती नावानावा गुज ।म्हणतां कानडें वाटेल तुज ।तरी ज्ञान सांगेन सहज ।विज्ञानेंसी ॥ ४२ ॥
परि तेंचि ऐसेनि निवाडें ।जैसें भेसळलें खरें कुडें ।मग काढिजे फाडोवाडें ।पारखूनियां ॥ ४३ ॥
कां चांचूचेनि सांडसें ।खांडिजे पय पाणी राजहंसें ।तुज ज्ञान विज्ञान तैसें ।वांटूनि देऊं ॥ ४४ ॥
मग वारयाचिया धारसा ।पडिन्नला कोंडा कां नुरेचि जैसा ।आणि कणांचा आपैसा ।राशिवा जोडे ॥ ४५ ॥
तैसें जें जाणितलेयासाठीं ।संसार संसाराचिये गांठीं ।लाऊनि बैसवी पाटीं ।मोक्षश्रियेच्या ॥ ४६ ॥
जे जाणणेया आघवेयांच्या गांवीं ।गुरुत्वाची आचार्य पदवी ।जें सकळ गुह्यांचा गोसावी ।पवित्रां रावो ॥ ४७ ॥
आणि धर्माचें निजधाम ।तेवींची उत्तमाचें उत्तम ।पैं जया येतां नाहीं काम ।जन्मांतराचें ॥ ४८ ॥
मोटकें गुरुमुखें उदैजत दिसे ।आणि हृदयीं स्वयंभचि असे ।प्रत्यक्ष फावों लागे तैसें ।आपैसयाचि ॥ ४९ ॥
तेवींचि गा सुखाच्या पाउटीं ।चढतां येइजे जयाच्या भेटी ।मग भेटल्या कीर मिठी ।भोगणेंयाही पडे ॥ ५० ॥
परि भोगाचिये एलीकडिलिये मेरे ।चित्त उभें ठेलें सुखा भरे ।ऐसें सुलभ आणि सोपारें ।वरि परब्रह्म ॥ ५१ ॥
पैं गा आणिकही एक याचें ।जें हातां आलिया तरी न वचे ।आणि अनुभवितां कांही न वेचे ।वरि विटेहि ना ॥ ५२ ॥
येथ जरी तूं तार्किका ।ऐसी हन घेसी शंका ।ना येवढी वस्तु हे लोकां ।उरली केविं पां ? ॥ ५३ ॥
जे एकोत्तरेयाचिया वाढी ।जळतिये आगीं घालिती उडी ।ते अनायासें स्वगोडी ।सांडिती केवीं ? ॥ ५४ ॥
तरी पवित्र आणि रम्य ।तेवींचि सुखोपाय गम्य ।आणि स्वसुख परम धर्म्य ।वरि आपणपां जोडे ॥ ५५ ॥
ऐसा अवघाचि हा सुरवाडु आहे ।तरी जना हातीं केविं उरों लाहे ।हा शंकेचा ठावो कीर होये ।परि न धरावी तुवां ॥ ५६ ॥
पाहे पां दूध पवित्र आणि गोड ।पासी त्वचेचिया पदराआड ।परि तें अव्हेरूनि गोचिड ।अशुद्ध काय न सेविती ? ॥ ५७ ॥
कां कमलकंदा आणि दर्दुरीं ।नांदणूक एकेचि घरीं ।परि परागु सेविजे भ्रमरीं ।येरां चिखलुचि उरे ॥ ५८ ॥
नातरी निदैवाच्या परिवरीं ।लोह्या रुतलिया आहाति सहस्रवरी ।परि तेथ बैसोनि उपवासु करी ।कां दरिद्रें जिये ॥ ५९ ॥
तैसा हृदयामध्यें मी रामु ।असतां सर्वसुखाचा आरामु ।कीं भ्रांतासी कामु ।विषयावरी ॥ ६० ॥
बहु मृगजळ देखोनि डोळां ।थुंकिजे अमृताचा गिळितां गळाळा ।तोडिला परिसु बांधिला गळां ।शुक्तिकालाभें ॥ ६१ ॥
तैसी अहंममतेचिये लवडसवडी ।मातें न पवतीचि बापुडीं ।म्हणौनि जन्ममरणाची दुथडीं ।डहुळितें ठेलीं ॥ ६२ ॥
एर्हवीं मी तरी कैसा ।मुखाप्रति भानु कां जैसा ।कहीं दिसे न दिसे ऐसा ।वाणीचा नोहे ॥ ६३ ॥
माझेया विस्तारलेपणा नांवें ।हें जगचि नोहे आघवें ? ।जैसें दूध मुरालें स्वभावें ।तरि तेंचि दहीं ॥ ६४ ॥
कां बीजचि जाहलें तरु ।अथवा भांगारचि अळंकारु ।तैसा मज एकाचा विस्तारु ।तें हें जग ॥ ६५ ॥
हें अव्यक्तपणें थिजलें ।तेंचि मग विश्वाकारें वोथिजलें ।तैसें अमूर्तमूर्ति मियां विस्तारलें ।त्रैलोक्य जाणें ॥ ६६ ॥
महदादि देहांतें ।इयें अशेषेंही भूतें ।परी माझ्या ठायीं बिंबतें ।जैसें जळीं फेण ॥ ६७ ॥
परि तया फेणांआंतु पाहतां ।जेवीं जळ न दिसे पंडुसुता ।नातरी स्वप्नींची अनेकता ।चेइलिया नोहिजे ॥ ६८ ॥
तैसीं भूतें इयें माझ्या ठायीं ।बिंबती तयांमाजीं मी नाहीं ।इया उपपत्ती तुज पाहीं ।सांगितलिया मागां ॥ ६९ ॥
म्हणौनि बोलिलिया बोलाचा अतिसो ।न कीजे यालागीं हें असो ।परी मज आंत पैसो ।दिठी तुझी ॥ ७० ॥
आमुचा प्रकृतीपैलीकडील भावो ।जरी कल्पनेवीण लागसी पाहों ।तरी मजमाजीं भूतें हेंही वावो ।जें मी सर्व म्हणौनी ॥ ७१ ॥
एर्हवीं संकल्पाचिये सांजवेळे ।नावेक तिमिरेजती बुद्धीचे डोळे ।म्हणौनि अखंडितचि परि झांवळे ।भूतभिन्न ऐसें देखे ॥ ७२ ॥
तेचि संकल्पाची सांज जैं लोपे ।तैं अखंडितचि आहे स्वरूपें ।जैसें शंका जातखेंवो लोपे ।सापपण माळेचें ॥ ७३ ॥
एर्हवीं तरी भूमीआंतूनि स्वयंभ ।काय घडेयागाडगेयाचे निघती कोंभ ? ।परि ते कुलालमतीचे गर्भ ।उमटले कीं ॥ ७४ ॥
नातरी सागरींच्या पाणी ।काय तरंगाचिया आहाती खाणी ? ।ते अवांतर करणी ।वारयाची नव्हे ? ॥ ७५ ॥
पाहें पां कापसाच्या पोटीं ।काय कापडाची होती पेटी ? ।तो वेढितयाचिया दिठी ।कापड जाहला ॥ ७६ ॥
जरी सोनें लेणें होउनी घडे ।तरी तयाचें सोनेंपण न मोडे ।येर अळंकार हे वरचिलीकडे ।लेतयाचेनि भावें ॥ ७७ ॥
सांगें पडिसादाचीं प्रत्युत्तरें ।कां आरिसां जें आविष्करें ।तें आपलें कीं साचोकारें ।तेथेंचि होतें ? ॥ ७८ ॥
तैसी इये निर्मळे माझ्या स्वरूपीं ।जो भूतभावना आरोपी ।तयासी तयाच्या संकल्पीं ।भूताभासु असे ॥ ७९ ॥
तेचि कल्पिती प्रकृती पुरे ।तरि भूताभासु आधींचि सरे ।मग स्वरूप उरे एकसरें ।निखळ माझें ॥ ८० ॥
हें असो आंगीं भरलिया भवंडी ।जैशा भोंवत दिसती अरडीदरडी ।तैशी आपुलिया कल्पना अखंडीं ।गमती भूतें ॥ ८१ ॥
तेचि कल्पना सांडूनि पाहीं ।तरि मी भूतीं भूतें माझिया ठायीं ।हें स्वप्नींही परि नाहीं ।कल्पावयाजोगें ॥ ८२ ॥
आतां मीच एक भूतांतें धर्ता ।अथवा भूतांमाजीं मी असता ।या संकल्पसन्निपाता- ।आंतुलिया बोलिया ॥ ८३ ॥
म्हणौनि परियेसी गा प्रियोत्तमा ।यापरी मी विश्वेंसीं विश्वात्मा ।जो इया लटकिया भूतग्रामा ।भाव्यु सदा ॥ ८४ ॥
रश्मीचेनि आधारें जैसें ।नव्हे तेंचि मृगजळ आभासे ।माझ्या ठायीं भूतजात तैसें ।आणि मातेंहीं भावी ॥ ८५ ॥
मी ये परीचा भूतभावनु ।परि सर्व भूतांसि अभिन्नु ।जैसी प्रभा आणि भानु ।एकचि ते ॥ ८६ ॥
हा आमुचा ऐश्वर्ययोगु ।तुवां देखिला कीं चांगु ? ।आतां सांगे कांहीं एथ लागु ।भूतभेदाचा असे ? ॥ ८७ ॥
यालागीं मजपासूनि भूतें ।आनें नव्हती हें निरुतें ।आणि भूतांवेगळिया मातें ।कहींच न मनीं हो ! ॥ ८८ ॥
पैं गगन जेवढें जैसें ।पवनुहि गगनीं तेवढाचि असे ।सहजें हालविलिया वेगळा दिसे ।एर्हवीं गगन तेंचि तो ॥ ८९ ॥
तैसें भूतजात माझ्या ठायीं ।कल्पिजे तरी आभासे कांहीं ।निर्विकल्पीं तरी नाहीं ।तेथ मीचि मी आघवें ॥ ९० ॥
म्हणौनि नाहीं आणि असे ।हें कल्पनेचेनि सौरसें ।जें कल्पनालोपें भ्रंशे ।आणि कल्पनेसवें होय ॥ ९१ ॥
तेंचि कल्पितें मुद्दल जाये ।तैं असे नाहीं हें कें आहे ? ।म्हणौनि पुढती तूं पाहे ।हा ऐश्वर्ययोगु ॥ ९२ ॥
ऐसिया प्रतीतिबोधसागरीं ।तूं आपणेयातें कल्लोळु एक करीं ।मग जंव पाहासी चराचरीं ।तंव तूंचि आहासी ॥ ९३ ॥
या जाणणेयाचा चेवो ।तुज आला ना ? म्हणती देवो ।तरी आतां द्वैत स्वप्न वावो ।जालें कीं ना ? ॥ ९४ ॥
तरी पुढती जरी विपायें ।बुद्धीसी कल्पनेची झोंप ये ।तरी अभेदबोधु जाये ।जैं स्वप्नीं पडिजे ॥ ९५ ॥
म्हणौनि ये निद्रेची वाट मोडे ।निखळ उद्बोधाचेंचि आपणपें घडे ।ऐसें वर्म जें आहे फुडें ।तें दावों आतां ॥ ९६ ॥
तरी धनुर्धरा धैर्या ।निकें अवधान देईं बा धनंजया ।पैं सर्व भूतांतें माया ।करी हरी गा ॥ ९७ ॥
जिये नांव गा प्रकृती ।जे द्विविधा सांगितली तुजप्रती ।एकी अष्टधा भेदव्यक्ती ।दुजी जीवरूपा ॥ ९८ ॥
हा प्रकृतीविखो आघवा ।तुवां मागां परिसिलासी पांडवा ।म्हणौनि असो काई सांगावा ।पुढतपुढती ॥ ९९ ॥
तरी ये माझिये प्रकृती ।महाकल्पाच्या अंतीं ।सर्व भूतें अव्यक्तीं ।ऐक्यासि येती ॥ १०० ॥
ग्रीष्माच्या अतिरसीं ।सबीजें तृणें जैसीं ।मागुती भूमीसी ।सुलीनें होतीं ॥ १०१ ॥
कां वार्षिये ढेंढें फिटे ।जेव्हां शारदीयेचा अनुघडु फुटे ।तेव्हां घनजात आटे ।गगनींचे गगनीं ॥ १०२ ॥
नातरी आकाशाचे खोंपे ।वायु निवांतुचि लोपे ।कां तरंगता हारपे ।जळीं जेवीं ॥ १०३ ॥
अथवा जागिनलिये वेळे ।स्वप्न मनींचें मनीं मावळे ।तैसें प्राकृत प्रकृतीं मिळे ।कल्पक्षयीं ॥ १०४ ॥
मग कल्पादीं पुढती ।मीचि सृजीं ऐसी वदंती ।तरी इयेविषयीं निरुती ।उपपत्ती आइक ॥ १०५ ॥
तरी हेचि प्रकृती किरीटी ।मी स्वकीया सहजें अधिष्ठीं ।तेथ तंतूसमवाय पटी ।जेंवि विणावणी दिसे ॥ १०६ ॥
मग तिये विणावणीचेनि आधारें ।लहाना चौकडिया पटत्व भरे ।तैसीं पंचात्मकें आकारें ।प्रकृतीचि होय ॥ १०७ ॥
जैसें विरजणियाचेनि संगें ।दूधचि आटेजों लागे ।तैशी प्रकृती आंगा रिगे ।सृष्टीपणाचिया ॥ १०८ ॥
बीज जळाची जवळीक लाहे ।आणि तेंचि शाखोपशाखीं होये ।तैसें मज करणें आहे ।भूतांचें हें ॥ १०९ ॥
अगा नगर हें रायें केंलें ।या म्हणणया साचपण कीर आलें ।परि निरुतें पाहतां काय सिणलें ।रायाचे हात ? ॥ ११० ॥
आणि मी प्रकृती अधिष्ठीं तें कैसें ।जैसा स्वप्नीं जो असे ।मग तोचि प्रवेशे ।जागृतावस्थे ॥ १११ ॥
तरी स्वप्नौनि जागृती येतां ।काय पाय दुखती पंडुसुता ।कीं स्वप्नामाजीं असतां ।प्रवासु होय ? ॥ ११२ ॥
या आघवियाचा अभिप्रावो कायी ।जे हें भूतसृष्टीचें कांहीं ।मज एकही करणें नाहीं ।ऐसाचि अर्थु ॥ ११३ ॥
जैसी रायें अधिष्ठिली प्रजा ।व्यापारें आपुलालिया काजा ।तैसा प्रकृतिसंगु हा माझा ।येर करणें तें इयेचें ॥ ११४ ॥
पाहे पां पूर्णचंद्राचिये भेटी ।समुद्रीं अपार भरतें दाटी ।तेथ चंद्रासि काय किरीटी ।उपखा पडे ? ॥ ११५ ॥
जड परि जवळिका ।लोह चळे तरी चळो कां ।तरि कवणु शीणु भ्रामका ।सन्निधानाचा ? ॥ ११६ ॥
किंबहुना यापरी ।मी निजप्रकृति अंगिकारीं ।आणि भूतसृष्टी एकसरी ।प्रसवोंचि लागे ॥ ११७ ॥
जो हा भूतग्रामु आघवा ।असे प्रकृतीआधीन पांडवा ।जैसी बीजाचिया वेलपालवा ।समर्थ भूमी ॥ ११८ ॥
नातरी बाळादिकां वयसा ।गोसावी देहसंगु जैसा ।अथवा घनावळी आकाशा ।वार्षिये जेवीं ॥ ११९ ॥
कां स्वप्नासि कारण निद्रा ।तैसी प्रकृती हे नरेंद्रा ।या अशेषाहि भूतसमुद्रा ।गोसाविणी गा ॥ १२० ॥
स्थावरा आणि जंगमा ।स्थूळा अथवा सूक्ष्मा ।हे असो भूतग्रामा ।प्रकृतिचि मूळ ॥ १२१ ॥
म्हणौनि भूतें हन सृजावीं ।कां सृजिलीं प्रतिपाळावीं ।इयें करणीं न येती आघवीं ।आमुचिया आंगा ॥ १२२ ॥
जळीं चंद्रिकेचिया पसरती वेली ।ते वाढी चंद्रें नाहीं वाढविली ।तेविं मातें पावोनि ठेलीं ।दूरी कर्में ॥ १२३ ॥
आणि सुटलिया सिंधुजळाचा लोटु ।न शके धरूं सैंधवाचा घाटु ।तेविं सकळ कर्मा मीचि शेवटु ।तीं काय बांधती मातें ? ॥ १२४ ॥
धूम्ररजांची पिंजरीं ।वाजतिया वायूतें जरी होकारी ।कां सूर्यबिंबामाझारीं ।आंधारें शिरे ? ॥ १२५ ॥
हें असो पर्वताचिये हृदयींचें ।जेविं पर्जन्यधारास्तव न खोंचें ।तेविं कर्मजात प्रकृतीचें ।न लगे मज ॥ १२६ ॥
एर्हवीं इये प्रकृतिविकारीं ।एकु मीचि असे अवधारीं ।परि उदासीनाचिया परी ।करीं ना करवीं ॥ १२७ ॥
जैसा दीपु ठेविला परिवरीं ।कवणातें नियमी ना निवारी ।आणि कवण कवणिये व्यापारीं ।राहाटे तेंहि नेणें ॥ १२८ ॥
तो जैसा कां साक्षिभूतु ।गृहव्यापारप्रवृत्तिहेतु ।तैसा भूतकर्मीं अनासक्तु ।मी भूतीं असें ॥ १२९ ॥
हा एकचि अभिप्रावो पुढतपुढती ।काय सांगों बहुतां उपपत्ती ।येथ एकहेळां सुभद्रापती ।येतुलें जाण पां ॥ १३० ॥
जे लोकचेष्टां समस्तां ।जैसा निमित्तमात्र कां सविता ।तैसा जगत्प्रभवीं पंडुसुता ।हेतु मी जाणें ॥ १३१ ॥
कां जें मियां अधिष्ठिलिया प्रकृती ।होती चराचराचिया संभूती ।म्हणौनि मी हेतु हे उपपत्ती ।घडे यया ॥ १३२ ॥
आतां येणें उजिवडें निरुतें ।न्याहाळीं पां ऐश्वर्ययोगातें ।जे माझ्या ठायीं भूतें ।परी भूतीं मी नसें ॥ १३३ ॥
अथवा भूतें ना माझ्या ठायीं ।आणि भूतांमाजीं मी नाहीं ।या खुणा तूं कहीं ।चुकों नको ॥ १३४ ॥
हें सर्वस्व आमुचें गूढ ।परि दाविलें तुज उघड ।आतां इंद्रियां देऊनि कवाड ।हृदयीं भोगीं ॥ १३५ ॥
हा दंशु जंव नये हातां ।तंव माझें साचोकारपण पार्था ।न संपडे गा सर्वथा ।जेविं तुषीं कणु ॥ १३६ ॥
एर्हवीं अनुमानाचेनि पैसें ।आवडे कीर कळलें ऐसें ।परि मृगजळाचेनि वोलांशें ।काय भूमि तिमे ? ॥ १३७ ॥
जें जाळ जळीं पांगिलें ।तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडलें ।परि थडिये काढूनि झाडिलें ।तेव्हां बिंब कें सांगैं ? ॥ १३८ ॥
तैसें बोलवरी वाचाबळें ।वायांचि झकविजती प्रतीतीचें डोळे ।मग साचोकारें बोधावेळे ।आथि ना होइजे ॥ १३९ ॥
किंबहुना भवा बिहाया ।आणि साचें चाड आथि जरी मियां ।तरि तूं गा उपपत्ती इया ।जतन कीजे ॥ १४० ॥
एर्हवीं दिठी वेधली कवळें ।तैं चांदणियातें म्हणे पिंवळें ।तेंविं माझ्या स्वरूपीं निर्मळें ।देखती दोष ॥ १४१ ॥
नातरी ज्वरें विटाळलें मुख ।तें दुधातें म्हणे कडू विख ।तेविं अमानुषा मानुष ।मानिती मातें ॥ १४२ ॥
म्हणौनि पुढतपुढती धनंजया ।झणें विसंबसी या अभिप्राया ।जे इया स्थूलदृष्टी वायां ।जाइजेल गा ॥ १४३ ॥
पैं स्थूलदृष्टी देखती मातें ।तेंचि न देखणें जाण निरुतें ।जैसें स्वप्नींचेनि अमृतें ।अमरा नोहिजे ॥ १४४ ॥
एर्हवीं स्थूलदृष्टी मूढ ।मातें जाणती कीर दृढ ।परि तें जाणणेचि जाणणेया आड ।रिगोनि ठाके ॥ १४५ ॥
जैसा नक्षत्राचिया आभासा- ।साठीं घातु झाला तया हंसा ।माजीं रत्नबुद्धीचिया आशा ।रिगोनियां ॥ १४६ ॥
सांगैं गंगा या बुद्धी मृगजळ ।ठाकोनि आलियाचें कवण फळ ।काय सुरतरु म्हणौनि बाबुळ ।सेविली करी ? ॥ १४७ ॥
हार निळयाचाचि दुसरा ।या बुद्धी हातु घातला विखारा ।कां रत्ने म्हणौनि गारा ।वेंचि जेंवीं ॥ १४८ ॥
अथवा निधान हें प्रगटलें ।म्हणौनि खदिरांगार खोळे भरिले ।कां साउली नेणतां घातलें ।कुहा सिंहें ॥ १४९ ॥
तेवीं मी म्हणौनि प्रपंचीं ।जिहीं बुडी दिधली कृतनिश्चयाची ।तिहीं चंद्रासाठीं जेवीं जळींची ।प्रतिभा धरिली ॥ १५० ॥
तैसा कृतनिश्चयो वायां गेला ।जैसा कोण्ही एकु कांजी प्याला ।मग परिणाम पाहों लागला ।अमृताचा ॥ १५१ ॥
तैसें स्थूलाकारी नाशिवंतें ।भरंवसा बांधोनि चित्तें ।पाहती मज अविनाशातें ।तरी कैंचा दिसें ? ॥ १५२ ॥
अगा काई पश्चिमसमुद्राचिया तटा ।निघिजत आहे पूर्विलिया वाटा ।कां कोंडा कांडतां सुभटा ।कणु आतुडे ? ॥ १५३ ॥
तैसें विकारलें हें स्थूळ ।जाणितले या मी जाणवतसें केवळ ।काई फेण पितां जळ ।सेविलें होय ? ॥ १५४ ॥
म्हणौनि मोहिलेंनि मनोधर्में ।हेंचि मी मानूनि संभ्रमें ।मग येथिंची जियें जन्मकर्में ।तियें मजचि म्हणती ॥ १५५ ॥
येतुलेनि अनामा नाम ।मज अक्रियासि कर्म ।विदेहासि देहधर्म ।आरोपिती ॥ १५६ ॥
मज आकारशून्या आकारु ।निरुपाधिका उपचारु ।मज विधिवर्जिता व्यवहारु ।आचारादिक ॥ १५७ ॥
मज वर्णहीना वर्णु ।गुणातीतासि गुणु ।मज अचरणा चरणु ।अपाणिया पाणी ॥ १५८ ॥
मज अमेया मान ।सर्वगतासी स्थान ।जैसें सेजेमाजीं वन ।निदेला देखे ॥ १५९ ॥
तैसें अश्रवणा श्रोत्र ।मज अचक्षूसी नेत्र ।अगोत्रा गोत्र ।अरूपा रूप ॥ १६० ॥
मज अव्यक्तासी व्यक्ती ।अनार्तासी आर्ती ।स्वयंतृप्ता तृप्ती ।भाविती गा ॥ १६१ ॥
मज अनावरणा प्रावरण ।भूषणातीतासि भूषण ।मज सकळ कारणा कारण ।देखती ते ॥ १६२ ॥
मज सहजातें करिती ।स्वयंभातें प्रतिष्ठिती ।निरंतरातें आव्हानिती ।विसर्जिती गा ॥ १६३ ॥
मी सर्वदा स्वतःसिद्धु ।तो कीं बाळ तरुण वृद्धु ।मज एकरूपा संबंधु ।जाणती ऐसे ॥ १६४ ॥
मज अद्वैतासि दुजें ।मज अकर्तयासि काजें ।मी अभोक्ता कीं भुंजें ।ऐसें म्हणती ॥ १६५ ॥
मज अकुळाचें कुळ वानिती ।मज नित्याचेनि निधनें शिणती ।मज सर्वांतरातें कल्पिती ।अरि मित्र गा ॥ १६६ ॥
मी स्वानंदाभिरामु ।तया मज अनेक सुखांचा कामु ।आघवाचि मी असे समु ।कीं म्हणती एकदेशी ॥ १६७ ॥
मी आत्मा एक चराचरीं ।म्हणती एकाचा कैंपक्ष करीं ।आणि कोपोनि एकातें मारीं ।हेंचि वाढविती ॥ १६८ ॥
किंबहुना ऐसें समस्त ।जे हे मानुषधर्म प्राकृत ।तयाचि नांव मी ऐसें विपरीत ।ज्ञान तयांचें ॥ १६९ ॥
जंव आकारु एक पुढां देखती ।तंव हा देव येणें भावें भजती ।मग तोचि विघडलिया टाकिती ।नाहीं म्हणौनि ॥ १७० ॥
मातें येणें येणें प्रकारें ।जाणती मनुष्य ऐसेनि आकारें ।म्हणौनि ज्ञानचि तें आंधारें ।ज्ञानासि करी ॥ १७१ ॥
यालागीं जन्मलेचि ते मोघ ।जैसें वार्षियेवीण मेघ ।कां मृगजळाचे तरंग ।दुरूनीचि पाहावें ॥ १७२ ॥
अथवा कोल्हेरीचे असिवार ।नातरी वोडंबरीचे अळंकार ।कीं गंधर्वनगरीचे आवार ।आभासती कां ॥ १७३ ॥
साबरी वाढिन्नल्या सरळा ।वरी फळ ना आंतु पोकळा ।कां स्तन जाले गळां ।शेळिये जैसें ॥ १७४ ॥
तैसें मूर्खाचें तया जियालें ।आणि धिग् कर्म तयांचें निपजलें ।जैसें साबरी फळ आलें ।घेपे ना दीजे ॥ १७५ ॥
मग जें कांहीं ते पढिन्नले ।तें मर्कटें नारळ तोडिले ।कां आंधळ्या हातीं पडिलें ।मोतीं जैसें ॥ १७६ ॥
किंबहुना तयांचीं शास्त्रें ।जैशीं कुमारीं हातीं दिधलीं शस्त्रें ।कां अशौच्या मंत्रें ।बीजें कथिलीं ॥ १७७ ॥
तैसें ज्ञानजात तयां ।आणि जें कांहीं आचरलें गा धनंजया ।तें आघवेंचि गेलें वायां ।जें चित्तहीन ॥ १७८ ॥
पैं तमोगुणाची राक्षसी ।जे सद्बुद्धीतें ग्रासी ।विवेकाचा ठावोचि पुसी ।निशाचरी जे ॥ १७९ ॥
तिये प्रकृती वरपडे जाले ।म्हणौनि चिंतेचेनि कपोलें गेले ।वरि तामसीयेचिये पडिले ।मुखामाजीं ॥ १८० ॥
जेथ आशेचिये लाळे ।आंतु हिंसा जीभ लोळे ।तेवींचि असंतोषाचे चाकळे ।अखंड चघळी ॥ १८१ ॥
जे अनर्थाचे कानवेरी ।आवाळुवें चाटीत निघे बाहेरी ।जे प्रमादपर्वतींची दरी ।सदाचि मातली ॥ १८२ ॥
जेथ द्वेषाचिया दाढा ।खसखसां ज्ञानाचा करिती रगडा ।जे अगस्ती गवसणी मूढां ।स्थूल बुद्धि ॥ १८३ ॥
ऐसे आसुरिये प्रकृतीचे तोंडीं ।जे जाले गा भूतोंडीं ।ते बुडोनि गेले कुंडीं ।व्यामोहाच्या ॥ १८४ ॥
एवं तमाचिये पडिले गर्तें ।न पविजतीचि विचाराचेनि हातें ।हें असो ते गेले जेथें ।ते शुद्धीचि नाहीं ॥ १८५ ॥
म्हणौनि असोतु इयें वायाणीं ।कायशीं मूर्खांचीं बोलणीं ।वायां वाढवितां वाणी ।शिणेल हन ॥ १८६ ॥
ऐसें बोलिलें देवें ।तेथ जी जी म्हणितलें पांडवें ।आइकें जेथ वाचा विसवे ।ते साधुकथा ॥ १८७ ॥
तरी जयाचे चोखटे मानसीं ।मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी ।जया निजेलियातें उपासी ।वैराग्य गा ॥ १८८ ॥
जयाचिया आस्थेचिया सद्भावा ।आंतु धर्म करी राणिवा ।जयाचें मन ओलावा ।विवेकासी ॥ १८९ ॥
जे ज्ञानगंगे नाहाले ।पूर्णता जेऊनि धाले ।जे शांतीसी आले ।पालव नवे ॥ १९० ॥
जे परिणामा निघाले कोंभ ।जे धैर्यमंडपाचे स्तंभ ।जे आनंदसमुद्रीं कुंभ ।चुबकळोनि भरिले ॥ १९१ ॥
जया भक्तीची येतुली प्राप्ती ।जे कैवल्यातें परौतें सर म्हणती ।जयांचिये लीलेमाजीं नीति ।जियाली दिसे ॥ १९२ ॥
जे आघवांचि करणीं ।लेईले शांतीचीं लेणीं ।जयांचें चित्त गवसणी ।व्यापका मज ॥ १९३ ॥
ऐसें जे महानुभाव ।दैविये प्रकृतीचें दैव ।जे जाणोनियां सर्व ।स्वरूप माझें ॥ १९४ ॥
मग वाढतेनि प्रेमें ।मातें भजती जे महात्मे ।परि दुजेपण मनोधर्में ।शिवतलें नाहीं ॥ १९५ ॥
ऐसें मीच होऊनि पांडवा ।करिती माझी सेवा ।परि नवलावो तो सांगावा ।असे आइक ॥ १९६ ॥
तरी कीर्तनाचेनि नटनाचे ।नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे ।जें नामचि नाहीं पापाचें ।ऐसें केलें ॥ १९७ ॥
यमदमा अवकळा आणिली ।तीर्थें ठायावरूनि उठविलीं ।यमलोकींची खुंटिली ।राहाटी आघवी ॥ १९८ ॥
यमु म्हणे काय यमावें ।दमु म्हणे कवणातें दमावें ।तीर्थें म्हणतीं काय खावें ।दोष ओखदासि नाहीं ॥ १९९ ॥
ऐसें माझेनि नामघोषें ।नाहींचि करिती विश्वाचीं दुःखें ।अवघें जगचि महासुखें ।दुमदुमित भरलें ॥ २०० ॥
ते पाहांटेवीण पाहावित ।अमृतेंवीण जीववित ।योगेंवीण दावित ।कैवल्य डोळां ॥ २०१ ॥
परी राया रंका पाड धरूं ।नेणती सानेयां थोरां कडसणी करूं ।एकसरें आनंदाचें आवारु ।होत जगा ॥ २०२ ॥
कहीं एकाधेनि वैकुंठा जावें ।तें तिहीं वैकुंठचि केलें आघवें ।ऐसें नामघोषगौरवें ।धवळलें विश्व ॥ २०३ ॥
तेजें सूर्य तैसें सोज्वळ ।परि तोहि अस्तवे हें किडाळ ।चंद्र संपूर्ण एखादे वेळ ।हे सदा पुरते ॥ २०४ ॥
मेघ उदार परी वोसरे ।म्हणौनि उपमेसी न पुरे ।हे निःशंकपणें सपांखरे ।पंचानन ॥ २०५ ॥
जयांचे वाचेपुढां भोजें ।नाम नाचत असे माझें ।जें जन्मसहस्रीं वोळगिजे ।एकवेळ यावया ॥ २०६ ॥
तो मी वैकुंठीं नसें ।वेळु एक भानुबिंबींही न दिसें ।वरी योगियांचींही मानसें ।उमरडोनि जाय ॥ २०७ ॥
परी तयांपाशीं पांडवा ।मी हारपला गिंवसावा ।जेथ नामघोषु बरवा ।करिती माझा ॥ २०८ ॥
कैसे माझ्या गुणीं धाले ।देशकालातें विसरले ।कीर्तनें सुखी झाले ।आपणपांचि ॥ २०९ ॥
कृष्ण विष्णु हरि गोविंद ।या नामाचे निखळ प्रबंध ।माजी आत्मचर्चा विशद ।उदंड गाती ॥ २१० ॥
हे बहु असो यापरी ।कीर्तित मातें अवधारीं ।एक विचरती चराचरीं ।पंडुकुमरा ॥ २११ ॥
मग आणिक ते अर्जुना ।साविया बहुवा जतना ।पंचप्राण मना ।पाढाऊ घेउनी ॥ २१२ ॥
बाहेरी यमनियमांची कांटी लाविली ।आंतु वज्रासनाची पौळी पन्नासिली ।वरी प्राणायामाचीं मांडिलीं ।वाहातीं यंत्रें ॥ २१३ ॥
तेथ उल्हाट शक्तीचेनि उजिवडें ।मन पवनाचेनि सुरवाडें ।सतरावियेचें पाणियाडें ।बळियाविलें ॥ २१४ ॥
तेव्हां प्रत्याहारें ख्याती केली ।विकारांची सपिली बोहलीं ।इंद्रियें बांधोनि आणिली ।हृदयाआंतु ॥ २१५ ॥
तंव धारणावारु दाटिन्नले ।महाभूतांतें एकवटिलें ।मग चतुरंग सैन्य निवटिलें ।संकल्पाचें ॥ २१६ ॥
तयावरी जैत रे जैत ।म्हणौनि ध्यानाचें निशाण वाजत ।दिसे तन्मयाचें झळकत ।एकछत्र ॥ २१७ ॥
पाठीं समाधीश्रियेचा अशेखा ।आत्मानुभव राज्यसुखा ।पट्टाभिषेकु देखा ।समरसें जाहला ॥ २१८ ॥
ऐसें हें गहन ।अर्जुना माझें भजन ।आतां ऐकें सांगेन ।जे करिती एक ॥ २१९ ॥
तरी दोन्ही पालववेरी ।जैसा एक तंतू अंबरीं ।तैसा मीवांचूनि चराचरीं ।जाणती ना ॥ २२० ॥
आदि ब्रह्मा करूनी ।शेवटीं मशक धरूनी ।माजी समस्त हें जाणोनि ।स्वरूप माझें ॥ २२१ ॥
मग वाड धाकुटें न म्हणती ।सजीव निर्जीव नेणती ।देखिलिये वस्तु उजू लुंटिती ।मीचि म्हणौनि ॥ २२२ ॥
आपुलें उत्तमत्व नाठवे ।पुढील योग्यायोग्य नेणवे ।एकसरें व्यक्तिमात्राचेनि नांवें ।नमूंचि आवडे ॥ २२३ ॥
जैसें उंचीं उदक पडिलें ।ते तळवटवरी ये उगेलें ।तैसें नमिजे भूतजात देखिलें ।ऐसा स्वभावोचि तयांचा ॥ २२४ ॥
कां फळलिया तरूची शाखा ।सहजें भूमीसी उतरे देखा ।तैसें जीवमात्रां अशेखां ।खालावती ते ॥ २२५ ॥
अखंड अगर्वता होऊनि असती ।तयांची विनय हेचि संपत्ती ।जे जयजय मंत्रें अर्पिती ।माझ्याचि ठायीं ॥ २२६ ॥
नमितां मानापमान गळाले ।म्हणौनि अवचितां मीचि जहाले ।ऐसे निरंतर मिसळले ।उपासिती ॥ २२७ ॥
अर्जुना हे गुरुवी भक्ती ।सांगितली तुजप्रती ।आतां ज्ञानयज्ञें यजिती ।ते भक्त आइकें ॥ २२८ ॥
परि भजन करिती हातवटी ।तूं जाणत आहासि किरीटी ।जे मागां इया गोष्टी ।केलिया आम्हीं ॥ २२९ ॥
तंव आथि जी अर्जुन म्हणे ।हें दैविकिया प्रसादाचें करणें ।तरि काय अमृताचें आरोगणें ।पुरे म्हणवे ? ॥ २३० ॥
या बोला श्रीअनंतें ।लागटा देखिलें तयांतें ।कीं सुखावलेनि चित्तें ।डोलतु असे ॥ २३१ ॥
म्हणे भलें केलें पार्था ।एर्हवीं हा अनवसरु सर्वथा ।परि बोलवितसे आस्था ।तुझी मातें ॥ २३२ ॥
तंव अर्जुन म्हणे हे कायी ।चकोरेंवीण चांदणेंचि नाहीं ।जगचि निवविजे हा तयाच्या ठायीं ।स्वभावो कीं जी ॥ २३३ ॥
येरें चकोरें तिये आपुलिये चाडे ।चांचू करिती चंद्राकडे ।तेवीं आम्ही विनवूं तें थोकडें ।देवो कृपासिंधु ॥ २३४ ॥
जी मेघु आपुलिये प्रौढी ।जगाची आर्ती दवडी ।वांचूनि चातकाची ताहान केवढी ।तो वर्षावो पाहुनी ? ॥ २३५ ॥
परि चुळा एकाचिया चाडे ।जेवीं गंगेतेंचि ठाकणें पडे ।तेवीं आर्त बहु कां थोडे ।तरी सांगावें देवें ॥ २३६ ॥
तेथें देवें म्हणितलें राहें ।जो संतोषु आम्हां जाहला आहे ।तयावरी स्तुति साहे ।ऐसें उरलें नाहीं ॥ २३७ ॥
पैं परिसतु आहासि निकियापरी ।तेंचि वक्तृत्वा वर्हाडीक करी ।ऐसें पुरस्करोनि श्रीहरी ।आदरिलें बोलों ॥ २३८ ॥
तरी ज्ञानयज्ञु तो एवं रूपु ।तेथ आदिसंकल्पु हा यूपु ।महाभूतें मंडपु ।भेदु तो पशु ॥ २३९ ॥
मग पांचांचे जे विशेष गुण ।अथवा इंद्रियें आणि प्राण ।हेचि यज्ञोपचारभरण ।अज्ञान घृत ॥ २४० ॥
तेथ मनबुद्धीचिया कुंडा ।आंतु ज्ञानाग्नि धडफुडा ।साम्य तेचि सुहाडा ।वेदिका जाणें ॥ २४१ ॥
सविवेकमतिपाटव ।तेचि मंत्र विद्यागौरव ।शांति स्रुक्-स्रुव ।जीवु यज्वा ॥ २४२ ॥
तो प्रतीतीचेनि पात्रें ।विवेकमहामंत्रें ।ज्ञानाग्निहोत्रें ।भेदु नाशी ॥ २४३ ॥
तेथ अज्ञान सरोनि जाये ।आणि यजिता यजन हें ठाये ।आत्मसमरसीं न्हाये ।अवभृथीं जेव्हां ॥ २४४ ॥
तेव्हां भूतें विषय करणें ।हें वेगळालें कांहीं न म्हणे ।आघवें एकचि ऐसें जाणें ।आत्मबुद्धि ॥ २४५ ॥
जैसा चेइला तो अर्जुना ।म्हणे स्वप्नींची हे विचित्र सेना ।मीचि जाहालों होतों ना ।निद्रावशें ? ॥ २४६ ॥
आतां सेना ते सेना नव्हे ।हें मीच एक आघवें ।ऐसें एकत्वें मानवें ।विश्व तयां ॥ २४७ ॥
मग तो जीवु हे भाष सरे ।आब्रह्म परमात्मबोधें भरे ।ऐसे भजती ज्ञानाध्वरें ।एकत्वें येणें ॥ २४८ ॥
अथवा अनादि हें अनेक ।जें आनासारिखें एका एक ।आणि नामरूपादिक ।तेंही विषम ॥ २४९ ॥
म्हणौनि विश्व भिन्न ।परि न भेदे तयाचें ज्ञान ।जैसे अवयव तरि आन आन ।परि एकेचि देहींचे ॥ २५० ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

म्हणौनि
— म्हणून, याकारणाने
ऐसें
— असे
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
तैसें
— तसे
जैसें
— जसे
ठायीं
— ठिकाणी
एर्हवीं
— एरवी, इतर वेळी
तेथ
— तिथे
मातें
— मला
पां
— बरं का, नाही का (संवादातील उद्गार)
नातरी
— नाहीतर, अन्यथा
पैं
— खरोखर, निश्चितच (जोर देणारा शब्द)
कीर
— खरोखर, खरे तर
जेवीं
— ज्याप्रमाणे
आघवें
— सगळे, संपूर्ण
तुज
— तुला
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
तेवीं
— त्याप्रमाणे
अर्जुना
— अर्जुन — संबोधन
नोहे
— नाही, होत नाही
काई
— काय
तैं
— तेव्हा
सहजें
— सहजपणे, आपोआप
पुढती
— पुन्हा, पुढे

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Krishna Splits the Double Arjuna Tree — Anonymous, India, Gujarat, probably Surat, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — santsahitya.in

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित प्रतीशी ओवीवार पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.