मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
ज्ञानेश्वरी — अध्याय नववा

साहित्य

ज्ञानेश्वरी — अध्याय नववा

ओव्या २५१–५००

Dnyaneshwari — Adhyay 9, part 2

रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६

सारांश

‘राजविद्या’ — विद्यांमधील राजा. हे ज्ञान गुप्त असले तरी दुर्गम नाही, हा या अध्यायाचा स्वर. ‘पत्र, पुष्प, फळ किंवा पाणी — भक्तीने जे दिले ते मी स्वीकारतो’ हे वचन येथले. जन्म, जात किंवा विद्या यांची अट न ठेवता भक्तीचा दरवाजा सर्वांसाठी उघडणारा हा अध्याय वारकरी परंपरेचा आधार आहे.

कां शाखा सानिया थोरा ।परि आहाति एकाचिया तरुवरा ।बहु रश्मि परि दिनकरा ।एकाचे जेवीं ॥ २५१ ॥
तेवीं नानाविधा व्यक्ती ।आनानें नामें आनानी वृत्ती ।ऐसें जाणती भेदलां भूतीं ।अभेदा मातें ॥ २५२ ॥
येणें वेगळालेपणें पांडवा ।करिती ज्ञानयज्ञु बरवा ।जे न भेदती जाणिवा ।जाणते म्हणौनि ॥ २५३ ॥
ना तरी जेधवां जिये ठायीं ।देखती कां जें जें कांहीं ।तें मीवांचूनि नाहीं ।ऐसाचि बोधु ॥ २५४ ॥
पाहें पां बुडबुडा जेउता जाये ।तेउतें जळचि एक तया आहे ।मग विरे अथवा राहे ।तर्ही जळाचिमाजीं ॥ २५५ ॥
कां पवनें परमाणु उचलले ।ते पृथ्वीपणावेगळे नाहीं केले ।आणि माघौते जरी पडले ।तरी पृथ्वीचिवरी ॥ २५६ ॥
तैसें भलतेथ भलतेणें भावें ।भलतेंही हो अथवा नोहावें ।परि तें मी ऐसें आघवें ।होऊनि ठेले ॥ २५७ ॥
अगा हे जेव्हडी माझी व्याप्ती ।तेव्हडीचि तयांची प्रतीती ।ऐसें बहुधाकारीं वर्तती ।बहुचि होउनि ॥ २५८ ॥
हें भानुबिंब आवडे तया ।सन्मुख जैसें धनंजया ।तैसे ते विश्वा यया ।समोर सदा ॥ २५९ ॥
अगा तयांचिया ज्ञाना ।पाठी पोट नाहीं अर्जुना ।वायु जैसा गगना ।सर्वांगीं असे ॥ २६० ॥
तैसा मी जेतुला आघवा ।तेंचि तुक तयांचिया सद्भावा ।तरी न करितां पांडवा ।भजन जहालें ॥ २६१ ॥
एर्हवीं तरी सकळ मीचि आहें ।तरी कवणीं कें उपासिला नोहें ? ।एथ एकें जाणणेवीण ठाये ।अप्राप्तासी ॥ २६२ ॥
परि तें असो येणें उचितें ।ज्ञानयज्ञें यजितसांते ।उपासिती मातें ।ते सांगितलें ॥ २६३ ॥
अखंड सकळ हें सकळां मुखीं ।सहज अर्पत असे मज एकीं ।कीं नेणणें यासाठीं मूर्खीं ।न पविजेचि मातें ॥ २६४ ॥
तोचि जाणिवेचा जरी उदयो होये ।तरी मुद्दल वेदु मीचि आहें ।आणि तो विधानातें जया विये ।तो क्रतुही मीचि ॥ २६५ ॥
मग तया कर्मापासूनि बरवा ।जो सांगोपांगु आघवा ।यज्ञु प्रकटे पांडवा ।तोही मी गा ॥ २६६ ॥
स्वाहा मी स्वधा ।सोमादि औषधी विविधा ।आज्य मी समिधा ।मंत्रु मी हवि ॥ २६७ ॥
होता मी हवन कीजे ।तेथ अग्नी तो स्वरूप माझें ।आणि हुतवस्तु जें जें ।तेही मीचि ॥ २६८ ॥
पैं जयाचेनि अंगसंगें ।इये प्रकृतीस्तव अष्टांगें ।जन्म पाविजत असे जगें ।तो पिता मी गा ॥ २६९ ॥
अर्धनारीनटेश्वरीं ।जो पुरुष तोचि नारी ।तेवीं मी चराचरीं ।माताही होय ॥ २७० ॥
आणि जाहाले जग जेथ राहे ।जेणें जीवित वाढत आहे ।तें मी वांचूनि नोहे ।आन निरुतें ॥ २७१ ॥
इयें प्रकृतिपुरुषें दोन्हीं ।उपजलीं जयाचिया अमनमनीं ।तो पितामह त्रिभुवनीं ।विश्वाचा मी ॥ २७२ ॥
आणि आघवेया जाणणेयाचिया वाटा ।जया गांवा येती गा सुभटा ।वेदांचिया चोहटां ।वेद्य जें म्हणिजे ॥ २७३ ॥
जेथ नानामतां बुझावणी जाहाली ।एकमेकां शास्त्रांची अनोळखी फिटली ।चुकलीं ज्ञानें जेथ मिळों आलीं ।जें पवित्र म्हणिजे ॥ २७४ ॥
पैं ब्रह्मबीजा जाहला अंकुरु ।घोषध्वनीनादाकारु ।तयाचें गा भुवन जो ॐकारु ।तोही मी गा ॥ २७५ ॥
जया ॐकाराचिये कुशीं ।अक्षरें होतीं अउमकारेंसीं ।जियें उपजत वेदेंसीं ।उठलीं तिन्हीं ॥ २७६ ॥
म्हणौनि ऋग्यजुःसामु ।हे तीन्ही म्हणे मी आत्मारामु ।एवं मीचि कुलक्रमु ।शब्दब्रह्माचा ॥ २७७ ॥
हें चराचर आघवें ।जिये प्रकृती आंत सांठवे ।ते शिणली जेथ विसवे ।ते परमगती मी ॥ २७८ ॥
आणि जयाचेनि प्रकृति जिये ।जेणें अधिष्ठिली विश्व विये ।जो येऊनि प्रकृती इये ।गुणातें भोगी ॥ २७९ ॥
तो विश्वश्रियेचा भर्ता ।मीचि गा एथ पंडुसुता ।मी गोसावी असे समस्ता ।त्रैलोक्याचा ॥ २८० ॥
आकाशें सर्वत्र वसावें ।वायूनें नावभरी उगे नसावें ।पावकें दाहावें ।वर्षावें जळें ॥ २८१ ॥
पर्वतीं बैसका न संडावी ।समुद्रीं रेखा नोलांडावी ।पृथ्वीया भूतें वाहावीं ।हे आज्ञा माझी ॥ २८२ ॥
म्यां बोलिविल्या वेदु बोले ।म्यां चालविल्या सूर्यु चाले ।म्यां हालविल्या प्राणु हाले ।जो जगातें चाळिता ॥ २८३ ॥
मियांचि नियमिलासांता ।काळु ग्रासितसे भूतां ।इयें म्हणियागतें पंडुसुता ।सकळें जयाचीं ॥ २८४ ॥
जो ऐसा समर्थु ।तो मी जगाचा नाथु ।आणि गगनाऐसा साक्षिभूतु ।तोही मीचि ॥ २८५ ॥
इहीं नामरूपीं आघवा ।जो भरला असे पांडवा ।आणि नामरूपांचाही वोल्हावा ।आपणचि जो ॥ २८६ ॥
जैसे जळाचे कल्लोळ ।आणि कल्लोळीं आथी जळ ।ऐसेनि वसवीतसे सकळ ।तो निवासु मी ॥ २८७ ॥
जो मज होय अनन्य शरण ।त्याचें निवारी मी जन्ममरण ।यालागीं शरणागता शरण्य ।मीचि एकु ॥ २८८ ॥
मीचि एक अनेकपणें ।वेगळालेनि प्रकृतीगुणें ।जीत जगाचेनि प्राणें ।वर्तत असें ॥ २८९ ॥
जैसा समुद्र थिल्लर न म्हणतां ।भलतेथ बिंबे सविता ।तैसा ब्रह्मादि सर्वा भूतां ।सुहृद तो मी ॥ २९० ॥
मीचि गा पांडवा ।या त्रिभुवनासि वोलावा ।सृष्टिक्षयप्रभवा ।मूळ तें मी ॥ २९१ ॥
बीज शाखांतें प्रसवे ।मग तें रूखपण बीजीं सामावे ।तैसें संकल्पें होय आघवें ।पाठीं संकल्पीं मिळे ॥ २९२ ॥
ऐसें जगाचें बीज जो संकल्पु ।अव्यक्त वासनारूपु ।तया कल्पांतीं जेथ निक्षेपु ।होय तें स्थान मी ॥ २९३ ॥
इयें नामरूपे लोटती ।वर्णव्यक्ती आटती ।जातीचे भेद फिटती ।जैं आकारू नाहीं ॥ २९४ ॥
तैं संकल्पवासनासंस्कार ।माघौतें रचावया चराचर ।जेथ राहोनि असती अमर ।तें निधान मी ॥ २९५ ॥
मी सूर्याचेनि वेषें ।तपें तैं हें शोषे ।पाठीं इंद्र होऊनि वर्षें ।तैं पुढति भरे ॥ २९६ ॥
अग्नि काष्ठें खाये ।तें काष्ठचि अग्नि होये ।तैसें मरतें मारितें पाहें ।स्वरूप माझें ॥ २९७ ॥
यालागीं मृत्यूच्या भागीं जें जें ।तेंही पैं रूप माझें ।आणि न मरतें तंव सहजें ।मीचि आहें ॥ २९८ ॥
आतां बहु बोलोनि सांगावें ।तें एकिहेळां घे पां आघवें ।तरी सतासतही जाणावें ।मीचि पैं गा ॥ २९९ ॥
म्हणौनि अर्जुना मी नसें ।ऐसा कवणु ठाव असे ? ।परि प्राणियांचें दैव कैसें ।जे न देखती मातें ? ॥ ३०० ॥
तरंग पाणियेवीण सुकती ।रश्मि वातीवीण न देखती ।तैसे मीचि ते मी नव्हती ।विस्मो देखें ॥ ३०१ ॥
हें आंतबाहेर मियां कोंदलें ।जग निखिल माझेंचि वोतिलें ।कीं कैसें कर्म तयां आड आलें ।जें मीचि नाहीं म्हणती ? ॥ ३०२ ॥
परि अमृतकुहां पडिजे ।कां आपणयांतें कडिये काढिजे ।ऐसे आथी काय कीजे ।अप्राप्तासी ॥ ३०३ ॥
ग्रासा एका अन्नासाठीं ।अंधु धांवताहे किरीटी ।आढळला चिंतामणि पायें लोटी ।आंधळेपणें ॥ ३०४ ॥
तैसें ज्ञान जैं सांडूनि जाये ।तैं ऐसी हे दशा आहे ।म्हणौनि कीजे तें केलें नोहे ।ज्ञानेंवीण ॥ ३०५ ॥
आंधळेया गरुडाचे पांख आहाती ।ते कवणा उपेगा जाती ? ।तैसें सत्कर्माचे उपखे ठाती ।ज्ञानेंवीण ॥ ३०६ ॥
देख पां गा किरीटी ।आश्रमधर्माचिया राहाटी ।विधिमार्गां कसवटी ।जे आपणचि होती ॥ ३०७ ॥
यजन करितां कौतुकें ।तिहीं वेदांचा माथा तुके ।क्रिया फळेंसि उभी ठाके ।पुढां जयां ॥ ३०८ ॥
ऐसे दीक्षित जे सोमप ।जे आपणचि यज्ञाचें स्वरूप ।तींहीं तया पुण्याचेनि नांवें पाप ।जोडिलें देखें ॥ ३०९ ॥
श्रुतित्रयांतें जाणोनी ।शतवरी यज्ञ करुनी ।यजिलिया मातें चुकोनी ।स्वर्गा वरिती ॥ ३१० ॥
जैसें कल्पतरूतळवटीं ।बैसोनि झोळिये देतसे गांठी ।मग निदैव निघे किरीटी ।दैन्यचि करूं ॥ ३११ ॥
तैसे शतक्रतु यजिलें मातें ।कीं ईप्सिताति स्वर्गसुखातें ।आतां पुण्य कीं हें निरुतें ।पाप नोहे ? ॥ ३१२ ॥
म्हणौनि मजवीण पाविजे स्वर्गु ।तो अज्ञानाचा पुण्यमार्गु ।ज्ञानिये तयातें उपसर्गु ।हानि म्हणती ॥ ३१३ ॥
एर्हवीं तरी नरकींचें दुःख ।पावोनि स्वर्गा नाम कीं सुख ।वांचूनि नित्यानंद गा निर्दोख ।तें स्वरूप माझें ॥ ३१४ ॥
मज येतां पैं सुभटा ।या द्विविधा गा आव्हांटा ।स्वर्गु नरकु या वाटा ।चोरांचिया ॥ ३१५ ॥
स्वर्गा पुण्यात्मकें पापें येइजे ।पापात्मकें पापें नरका जाइजे ।मग मातें जेणें पाविजे ।तें शुद्ध पुण्य ॥ ३१६ ॥
आणि मजचिमाजीं असतां ।जेणें मी दुर्हावें पंडुसुता ।तें पुण्य ऐसें म्हणतां ।जीभ न तुटे काई ? ॥ ३१७ ॥
परि हें असो आतां प्रस्तुत ।ऐकें यापरि ते दीक्षित ।यजूनि मातें याचित ।स्वर्गभोगु ॥ ३१८ ॥
मग मी न पविजे ऐसें ।जें पापरूप पुण्य असे ।तेणें लाधलेनि सौरसें ।स्वर्गा येती ॥ ३१९ ॥
जेथ अमरत्व हें सिंहासन ।ऐरावतासारिखें वाहन ।राजधानीभुवन ।अमरावती ॥ ३२० ॥
जेथ महासिद्धींचीं भांडारें ।अमृताचीं कोठारें ।जिये गांवीं खिल्लारें ।कामधेनूंचीं ॥ ३२१ ॥
जेथ वोळगे देव पाइका ।सैंघ चिंतामणीचिया भूमिका ।विनोदवनवाटिका ।सुरतरूंचिया ॥ ३२२ ॥
गंधर्व गात गाणीं ।जेथ रंभे ऐसिया नाचणी ।उर्वशी मुख्य विलासिनी ।अंतौरिया ॥ ३२३ ॥
मदन वोळगे शेजारें ।जेथ चंद्र शिंपे सांबरें ।पवना ऐसे म्हणियारे ।धांवणें जेथ ॥ ३२४ ॥
पैं बृहस्पती मुख्य आपण ।ऐसे स्वस्तीश्रियेचे ब्राह्मण ।ताटियेचे सुरगण ।बहुवस जेथें ॥ ३२५ ॥
लोकपाळ रांगेचे ।राउत जिये पदवीचे ।उच्चैःश्रवा खांचे ।खोळणिये ॥ ३२६ ॥
हे असो बहु ऐसे ।भोग इंद्रसुखासरिसे ।ते भोगिजती जंव असे ।पुण्यलेशु ॥ ३२७ ॥
मग तया पुण्याची पाउटी सरे ।सवेंचि इंद्रपणाची उटी उतरे ।आणि येऊं लागती माघारे ।मृत्युलोका ॥ ३२८ ॥
जैसा वेश्याभोगी कवडा वेंचे ।मग दारही चेपूं नये तियेचें ।तैसें लाजिरवाणें दीक्षितांचें ।काय सांगों ? ॥ ३२९ ॥
एवं थितिया मातें चुकले ।जींहीं पुण्यें स्वर्ग कामिलें ।तयां अमरपण तें वावों जालें ।अंतीं मृत्युलोकु ॥ ३३० ॥
मातेचिया उदरकुहरीं ।पचूनि विष्ठेच्या दाथरीं ।उकडूनि नवमासवरी ।जन्मजन्मोनि मरती ॥ ३३१ ॥
अगा स्वप्नीं निधान फावे ।परि चेइलिया हारपे आघवें ।तैसें स्वर्गसुख जाणावें ।वेदज्ञाचें ॥ ३३२ ॥
अर्जुना वेदविद जर्ही जाहला ।तरी मातें नेणता वायां गेला ।कणु सांडूनि उपणिला ।कोंडा जैसा ॥ ३३३ ॥
म्हणौनि मज एकेंविण ।हे त्रयीधर्म अकारण ।आतां मातें जाणोनि कांहीं नेण ।तूं सुखिया होसी ॥ ३३४ ॥
पैं सर्वभावेसीं उखितें ।जे वोपिलें मज चित्तें ।जैसा गर्भगोळु उद्यमातें ।कोणाही नेणें ॥ ३३५ ॥
तैसा मीवांचूनि कांहीं ।आणीक गोमटेंचि नाहीं ।मजचि नाम पाहीं ।जिणेंया ठेविलें ॥ ३३६ ॥
ऐसे अनन्यगतिकें चित्तें ।चिंतितसांतें मातें ।जे उपासिति तयांतें ।मीचि सेवीं ॥ ३३७ ॥
ते एकवटूनि जिये क्षणीं ।अनुसरले गा माझिये वाहणीं ।तेव्हांचि तयांची चिंतवणी ।मजचि पडली ॥ ३३८ ॥
मग तींहीं जें जें करावें ।तें मजचि पडिलें आघवें ।जैसी अजातपक्षाचेनि जीवें ।पक्षिणी जिये ॥ ३३९ ॥
आपुली तहान भूक नेणें ।तान्हया निकें तें माउलीसीचि करणें ।तैसें अनुसरले जे मज प्राणें ।तयांचें सर्व मी करीं ॥ ३४० ॥
तया माझिया सायुज्याची चाड ।तरि तेंचि पुरवीं कोड ।कां सेवा म्हणती तरी आड ।प्रेम सूयें ॥ ३४१ ॥
ऐसा मनीं जो जो धरिती भावो ।तो तो पुढां पुढां लागे तयां देवों आणि दिधलियाचा निर्वाहो ।तोही मीचि करीं ॥ ३४२ ॥
हा योगक्षेमु आघवा ।तयांचा मजचि पडिला पांडवा ।जयांचिया सर्वभावा ।आश्रयो मी ॥ ३४३ ॥
आतां आणिकही संप्रदायें ।परी मातें नेणती समवायें ।जें अग्निइंद्रसूर्यसोमाये ।म्हणौनि यजिती ॥ ३४४ ॥
तेही कीर मातेंचि होये ।कां जें हें आघवें मीचि आहें ।परि ते भजती उजरी नव्हे ।विषम पडे ॥ ३४५ ॥
पाहें पां शाखा पल्लव रुखाचें ।हे काय नव्हती एकाचि बीजाचें ? ।परी पाणी घेणें मुळाचें ।तें मुळींचि घापे ॥ ३४६ ॥
कां दहाही इंद्रियें आहाती ।इयें जरी एकेचि देहींचीं होती ।आणि इहीं सेविले विषयो जाती ।एकाचि ठायीं ॥ ३४७ ॥
तरि करोनि रससोय बरवी ।कानीं केवीं भरावी ? ।फुलें आणोनि बांधावीं ।डोळां केवीं ? ॥ ३४८ ॥
तेथ रसु तो मुखेंचि सेवावा ।परिमळु तो घ्राणेंचि घ्यावा ।तैसा मी तो यजावा ।मीचि म्हणौनि ॥ ३४९ ॥
येर मातें नेणोनि भजन ।तें वायांचि गा आनेंआन ।म्हणौनि कर्माचे डोळे ज्ञान ।तें निर्दोष होआवें ॥ ३५० ॥
एर्हवीं पाहे पां पंडुसुता ।या यज्ञोपहारां समस्तां ।मीवांचूनि भोक्ता ।कवणु आहे ? ॥ ३५१ ॥
मी सकळां यज्ञांचा आदि ।आणि यजना या मीचि अवधि ।कीं मातें चुकोनि दुर्बुद्धि ।देवां भजले ॥ ३५२ ॥
गंगेचें उदक गंगें जैसें ।अर्पिजे देवपितरोद्देशें ।माझें मज देती तैसें ।परि आनानीं भावी ॥ ३५३ ॥
म्हणौनि ते पार्था ।मातें न पवतीचि सर्वथा ।मग मनीं वाहिली जे आस्था ।तेथ आले ॥ ३५४ ॥
मनें वाचा करणीं ।जयांचीं भजनें देवांचिया वाहणीं ।ते शरीर जातिये क्षणीं ।देवचि जाले ॥ ३५५ ॥
अथवा पितरांचीं व्रतें ।वाहती जयांचीं चित्तें ।जीवित सरलिया तयांतें ।पितृत्व वरी ॥ ३५६ ॥
कां क्षुद्रदेवतादि भूतें ।तियेचि जयांचि परमदैवतें ।जिहीं अभिचारिकीं तयांतें ।उपासिलें ॥ ३५७ ॥
तयां देहाची जवनिका फिटली ।आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली ।एवं संकल्पवशें फळलीं ।कर्में तयां ॥ ३५८ ॥
मग मीचि डोळां देखिला ।जिहीं कानीं मीचि ऐकिला ।मीचि मनीं भाविला ।वानिला वाचा ॥ ३५९ ॥
सर्वांगीं सर्वांठायीं ।मीचि नमस्करिला जिहीं ।दानपुण्यादिकें जें कांहीं ।तें माझियाचि मोहरां ॥ ३६० ॥
जिहीं मातेंचि अध्ययन केलें ।जे आंतबाहेरि मियांचि धाले ।जयांचें जीवित्व जोडलें ।मजचिलागीं ॥ ३६१ ॥
जे अहंकारु वाहत आंगीं ।आम्ही हरीचे भूषावयालागीं ।जे लोभिये एकचि जगीं ।माझेनि लोभें ॥ ३६२ ॥
जे माझेनि कामें सकाम ।जे माझेनि प्रेमें सप्रेम ।जे माझिया भुली सभ्रम ।नेणती लोक ॥ ३६३ ॥
जयांचीं जाणती मजचि शास्त्रें ।मी जोडें जयांचेनि मंत्रें ।ऐसें जे चेष्टामात्रें ।भजले मज ॥ ३६४ ॥
ते मरणा ऐलीचकडे ।मज मिळोनि गेले फुडे ।मग मरणीं आणिकीकडे ।जातील केवीं ? ॥ ३६५ ॥
म्हणौनि मद्याजी जे जाहाले ।ते माझियाचि सायुज्या आले ।जिहीं उपचारमिषें दिधलें ।आपणपें मज ॥ ३६६ ॥
पैं अर्जुना माझे ठायीं ।आपणपेंवीण सौरसु नाहीं ।मी उपचारें कवणाही ।नाकळें गा ॥ ३६७ ॥
एथ जाणीव करी तोचि नेणें ।आथिलेंपण मिरवी तेंचि उणें ।आम्ही जाहलों ऐसें जो म्हणे ।तो कांहींचि नव्हे ॥ ३६८ ॥
अथवा यज्ञदानादि किरीटी ।कां तपें हन जे हुटहुटी ।ते तृणा एकासाठीं ।न सरे एथ ॥ ३६९ ॥
पाहें पां जाणिवेचेनि बळें ।कोण्ही वेदांपासूनि असे आगळें ? ।कीं शेषाहूनि तोंडाळें ।बोलकें आथी ? ॥ ३७० ॥
तोही आंथरुणातळवटीं दडे ।येरु नेति नेति म्हणौनि बहुडे ।एथ सनकादिक वेडे ।पिसे जाहले ॥ ३७१ ॥
करितां तापसांची कडसणी ।कवणु जवळां ठेविजे शूळपाणी ।तोही अभिमानु सांडूनि पायवणी ।माथां वाहे ॥ ३७२ ॥
नातरी आथिलेपणें सरिशी ।कवणी आहे लक्ष्मिये ऐसी ? ।श्रियेसारिखिया दासी ।घरीं जियेतें ॥ ३७३ ॥
तिया खेळतां करिती घरकुलीं ।तयां नामें अमरपुरें जरी ठेविलीं ।तरि न होती काय बाहुलीं ।इंद्रादिक तयांचीं ? ॥ ३७४ ॥
तिया नावडोनि जेव्हां मोडिती ।तेव्हां महेंद्राचे रंक होती ।तिया झाडा जेउते पाहती ।ते कल्पवृक्ष ॥ ३७५ ॥
ऐसिया जियेचिया जवळिका ।सामर्थ्य घरींचिया पाइका ।ते लक्ष्मी मुख्यनायका ।न मनेचि एथ ॥ ३७६ ॥
मग सर्वस्वें करूनि सेवा ।अभिमानु सांडूनि पांडवा ।ते पाय धुवावयाचिया दैवा ।पात्र जाहाली ॥ ३७७ ॥
म्हणौनि थोरपण पर्हां सांडिजे ।एथ व्युत्पत्ति आघवी विसरिजे ।जैं जगा धाकुटें होईजे ।तैं जवळीक माझी ॥ ३७८ ॥
अगा सहस्रकिरणांचिये दिठी- ।पुढां चंद्रही लोपे किरीटी ।तेथ खद्योत कां हुटहुटी ।आपुलेनि तेजें ? ॥ ३७९ ॥
तैसें लक्ष्मियेचें थोरपण न सरे ।जेथ शंभूचेंही तप न पुरे ।तेथ येर प्राकृत हेंदरें ।केवीं जाणों लाहे ? ॥ ३८० ॥
यालागीं शरीरसांडोवा कीजे ।सकळ गुणांचें लोण उतरिजे ।संपत्तिमदु सांडिजे ।कुरवंडी करुनी ॥ ३८१ ॥
मग निस्सीमभाव उल्हासें ।मज अर्पावयाचेनि मिसें ।फळ आवडे तैसें ।भलतयाचें हो ॥ ३८२ ॥
भक्तु माझियाकडे दावी ।आणि मी दोन्हीं हात वोडवीं ।मग देंठु न फेडितां सेवीं ।आदरेंशी ॥ ३८३ ॥
पैं गा भक्तीचेनि नांवें ।फूल एक मज द्यावें ।तें लेखें तरि म्यां तुरंबावें ।परि मुखींचि घालीं ॥ ३८४ ॥
हें असो कायसीं फुलें ।पानचि एक आवडे तें जाहलें ।तें साजुकही न हो सुकलें ।भलतैसें ॥ ३८५ ॥
परि सर्वभावें भरलें देखें ।आणि भुकेला अमृतें तोखें ।तैसें पत्रचि परि तेणें सुखें ।आरोगूं लागें ॥ ३८६ ॥
अथवा ऐसेंहीं एक घडे ।जे पालाही परी न जोडे ।तरि उदकाचें तंव सांकडें ।नव्हेल कीं ? ॥ ३८७ ॥
तें भलतेथ निमोलें ।न जोडितां आहे जोडलें ।तेंचि सर्वस्व करूनि अर्पिलें ।जेणें मज ॥ ३८८ ॥
तेणें वैकुंठांपासोनि विशाळें ।मजलागीं केली राऊळें ।कौस्तुभाहोनि निर्मळें ।लेणीं दिधलीं ॥ ३८९ ॥
दुधाचीं सेजारें ।क्षीराब्धी ऐसीं मनोहरें ।मजलागीं अपारें ।सृजिलीं तेणें ॥ ३९० ॥
कर्पूर चंदन अगरु ।ऐसेया सुगंधाचा महामेरु ।मज हातीवा लाविला दिनकरु ।दीपमाळे ॥ ३९१ ॥
गरुडासारिखीं वाहनें ।मज सुरतरूंचीं उद्यानें ।कामधेनूंचीं गोधनें ।अर्पिलीं तेणें ॥ ३९२ ॥
मज अमृताहूनि सुरसें ।बोनीं वोगरिली बहुवसें ।ऐसा भक्तांचेनि उदकलेशें ।परितोषें गा ॥ ३९३ ॥
हें सांगावें काय किरीटी ।तुवांचि देखिलें आपुलिया दिठी ।मी सुदामाचिया सोडीं गांठीं ।पव्हयांलागीं ॥ ३९४ ॥
पैं भक्ति एकी मी जाणें ।तेथ सानें थोर न म्हणे ।आम्ही भावाचे पाहुणे ।भलतेया ॥ ३९५ ॥
येर पत्र पुष्प फळ ।हें भजावया मिस केवळ ।वांचूनि आमुचा लाग निष्कळ ।भक्तितत्त्व ॥ ३९६ ॥
म्हणौनि अर्जुना अवधारीं ।तूं बुद्धी एकी सोपारी करीं ।तरि सहजें आपुलिया मनोमंदिरीं ।न विसंबें मातें ॥ ३९७ ॥
जे जे कांहीं व्यापार करिसी ।कां भोग हन भोगिसी ।अथवा यज्ञीं यजिसी ।नानाविधीं ॥ ३९८ ॥
नातरी पात्रविशेषें दानें ।कां सेवकां देसी जीवनें ।तपादि हन साधनें ।व्रतें करिसी ॥ ३९९ ॥
तें क्रियाजात आघवें ।जें जैसें निपजेल स्वभावें ।तें भावना करोनि करावें ।माझिया मोहरा ॥ ४०० ॥
परि सर्वथा आपुले जीवीं ।केलियाची से कांहींचि नुरवीं ।ऐसीं धुवोनि कर्में द्यावीं ।माझियां हातीं ॥ ४०१ ॥
मग अग्निकुंडीं बीजें घातलीं ।तियें अंकुरदशे जेवीं मुकलीं ।तेवीं न फळतीचि मज अर्पिलीं ।शुभाशुभें ॥ ४०२ ॥
अगा कर्में जैं उरावें ।तैं तिहीं सुखदुःखीं फळावें ।आणि तयातें भोगावया यावें ।देहा एका ॥ ४०३ ॥
ते उगाणिलें मज कर्म ।तेव्हांचि पुसिलें मरण जन्म ।जन्मासवें श्रम ।वरचिलही गेले ॥ ४०४ ॥
म्हणौनि अर्जुना यापरी ।पाहेचा वेळु नव्हेल भारी ।हे संन्यासयुक्ति सोपारी ।दिधली तुज ॥ ४०५ ॥
या देहाचिया बांदोडी न पडिजे ।सुखदुःखांचियां सागरीं न बुडिजे ।सुखें सुखरूपा घडिजे ।माझियाचि आंगा ॥ ४०६ ॥
तो मी पुससी कैसा ।तरि जो सर्वभूतीं सदा सरिसा ।जेथ आपपरु ऐसा ।भागु नाहीं ॥ ४०७ ॥
जे ऐसिया मातें जाणोनि ।अहंकाराचा कुरुठा मोडोनि ।जे जीवें कर्में करूनि ।मातें भजलें ॥ ४०८ ॥
ते वर्तत दिसती देहीं ।परि ते देहीं ना माझ्या ठायीं ।आणि मी तयांच्या हृदयीं ।समग्र असे ॥ ४०९ ॥
सविस्तर वटत्व जैसें ।बीजकणिकेमाजीं असे ।आणि बीजकणु वसे ।वटीं जेवीं ॥ ४१० ॥
तेवीं आम्हां तयां परस्परें ।बाहेरी नामाचींचि अंतरें ।वांचूनि आंतुवट वस्तुविचारें ।मी तेचि ते ॥ ४११ ॥
आतां जायांचें जैसें लेणें ।आंगावरी आहाचवाणें ।तैसें देहधरणें ।उदास तयांचें ॥ ४१२ ॥
परिमळु निघालिया पवनापाठीं ।मागें वोस फूल राहे देंठीं ।तैसें आयुष्याचिये मुठी ।केवळ देह ॥ ४१३ ॥
येर अवष्टंभु जो आघवा ।तो आरूढोनि मद्भावा ।मजचि आंतु पांडवा ।पैठा जाहला ॥ ४१४ ॥
ऐसे भजतेनि प्रेमभावें ।जयां शरीरही पाठीं न पवे ।तेणें भलतया व्हावें ।जातीचिया ॥ ४१५ ॥
आणि आचरण पाहतां सुभटा ।तो दुष्कृताचा कीर सेल वांटा ।परि जीवित वेंचिलें चोहटां ।भक्तीचिया कीं ॥ ४१६ ॥
अगा अंतींचिया मती ।साचपण पुढिले गती ।म्हणौनि जीवित जेणें भक्ती ।दिधलें शेखीं ॥ ४१७ ॥
तो आधीं जरी दुराचारी ।तरी सर्वोत्तमुचि अवधारीं ।जैसा बुडाला महापुरीं ।न मरतु निघाला ॥ ४१८ ॥
तयाचें जीवित ऐलथडिये आलें ।म्हणौनि बुडालेपण जेवीं वायां गेलें ।तेवीं नुरेचि पाप केलें ।शेवटलिये भक्ती ॥ ४१९ ॥
यालागीं दुष्कृती जर्ही जाहला ।तरी अनुतापतीर्थीं न्हाला ।न्हाऊनि मजआंतु आला ।सर्वभावें ॥ ४२० ॥
तरी आतां पवित्र तयाचेंचि कुळ ।अभिजात्य तेंचि निर्मळ ।जन्मलेयाचें फळ ।तयासीच जोडलें ॥ ४२१ ॥
तो सकळही पढिन्नला ।तपें तोचि तपिन्नला ।अष्टांग अभ्यासिला ।योगु तेणें ॥ ४२२ ॥
हें असो बहुत पार्था ।तो उतरला कर्में सर्वथा ।जयाची अखंड गा आस्था ।मजचिलागीं ॥ ४२३ ॥
अवघिया मनोबुद्धीचिया राहटी ।भरोनि एकनिष्ठेची पेटी ।मजमाजीं किरीटी ।निक्षेपिलीं जेणें ॥ ४२४ ॥
तो आतां अवसरें मजसारिखा होईल ।ऐसा हन भाव तुज जाईल ।हां गा अमृताआंत राहील ।तया मरण कैचें ? ॥ ४२५ ॥
पैं सूर्यु जो वेळु नुदैजे ।तया वेळा कीं रात्रि म्हणिजे ।तेवीं माझिये भक्तीविण जें कीजे ।तें महापाप नोहें ? ॥ ४२६ ॥
म्हणौनि तयाचिया चित्ता ।माझी जवळिक पंडुसुता ।तेव्हांचि तो तत्त्वता ।स्वरूप माझें ॥ ४२७ ॥
जैसा दीपें दीपु लाविजे ।तेथ आदील कोण हें नोळखिजे ।तैसा सर्वस्वें जो मज भजे ।तो मीचि होऊनि ठाके ॥ ४२८ ॥
मग माझी नित्य शांती ।तया दशा तेचि कांती ।किंबहुना जिती ।माझेनि जीवें ॥ ४२९ ॥
एथ पार्था पुढतपुढती ।तेंचि तें सांगों किती ।जरी मियां चाड तरी भक्ती ।न विसंबिजे गा ॥ ४३० ॥
अगा कुळाचिया चोखटपणा नलगा ।आभिजात्य झणीं श्लाघा ।व्युत्पत्तीचा वाउगा ।सोसु कां वहावा ? ॥ ४३१ ॥
कां रूपवयसा माजा ।आथिलेपणें कां गाजा ? ।एक भाव नाहीं माझा ।तरी पाल्हाळ तें ॥ ४३२ ॥
कणेंविण सोपटें ।कणसें लागलीं घनदाटें ।काय करावें गोमटें ।वोस नगर ? ॥ ४३३ ॥
नातरी सरोवर आटलें ।रानीं दुःखिया दुःखी भेटलें ।कां वांझ फुलीं फुललें ।झाड जैसें ॥ ४३४ ॥
तैसें सकळ तें वैभव ।अथवा कुळ जाति गौरव ।जैसें शरीर आहे सावेव ।परि जीवचि नाहीं ॥ ४३५ ॥
तैसें माझिये भक्तीविण ।जळो तें जियालेंपण ।अगा पृथ्वीवरी पाषाण ।नसती काईं ? ॥ ४३६ ॥
पैं हिंवराची दाट साउली ।सज्जनीं जैसी वाळिली ।तैसीं पुण्यें डावलूनि गेलीं ।अभक्तांतें ॥ ४३७ ॥
निंब निंबोळियां मोडोनि आला ।तरी तो काउळियांसीचि सुकाळु जाहला ।तैसा भक्तिहीनु वाढिन्नला ।दोषांचिलागीं ॥ ४३८ ॥
कां षड्रस खापरीं वाढिले ।वाढूनि चोहटां ठेविले ।ते सुणियांचेचि ऐसे झाले ।जियापरी ॥ ४३९ ॥
तैसें भक्तिहीनाचें जिणें ।जो स्वप्नींहि परि सुकृत नेणे ।संसारदुःखासि भाणें ।वोगरिलें ॥ ४४० ॥
म्हणौनि कुळ उत्तम नोहावें ।जाती अंत्यजहि व्हावें ।वरि देहाचेनि नांवें ।पशूचेंहि लाभो ॥ ४४१ ॥
पाहें पां सावजें हातिरूं धरिलें ।तेणें तया काकुळती मातें स्मरिलें ।कीं तयाचें पशुत्व वावो जाहलें ।पावलिया मातें ॥ ४४२ ॥
अगा नांवें घेतां वोखटीं ।जे आघवेया अधमांचिये शेवटीं ।तिये पापयोनींही किरीटी ।जन्मले जे ॥ ४४३ ॥
ते पापयोनि मूढ ।मूर्ख जैसे कां दगड ।परि माझ्यां ठायीं दृढ ।सर्वभावें ॥ ४४४ ॥
जयांचिये वाचें माझे आलाप ।दृष्टी भोगी माझेंचि रूप ।जयांचें मन संकल्प ।माझाचि वाहे ॥ ४४५ ॥
माझिया कीर्तीविण ।जयांचे रिते नाहीं श्रवण ।जयां सर्वांगीं भूषण ।माझी सेवा ॥ ४६ ॥
जयांचे ज्ञान विषो नेणे ।जाणीव मज एकातेंचि जाणे ।जया ऐसें लाभे तरी जिणें ।एर्हवीं मरण ॥ ४४७ ॥
ऐसा आघवाचि परी पांडवा ।जिहीं आपुलिया सर्वभावा ।जियावयालागीं वोलावा ।मीचि केला ॥ ४४८ ॥
ते पापयोनीही होतु कां ।ते श्रुताधीतही न होतु कां ।परि मजसीं तुकितां तुकां ।तुटी नाहीं ॥ ४४९ ॥
पाहें पां भक्तीचेनि आथिलेपणें ।दैत्यीं देवां आणिलें उणें ।माझें नृसिंहत्व लेणें ।जयाचिये महिमें ॥ ४५० ॥
तो प्रल्हादु गा मजसाठीं ।घेतां बहुतें संकटे सदा किरीटी ।कां जें मियां द्यावें ते गोष्टी ।तयाचिया जोडे ॥ ४५१ ॥
एर्हवीं दैत्यकुळ साचोकारें ।परि इंद्रही सरी न लाहे उपरें ।म्हणौनि भक्ति गा एथ सरे ।जाति अप्रमाण ॥ ४५२ ॥
राजाज्ञेचीं अक्षरें आहाती ।तियें चामा एका जया पडती ।तया चामासाठीं जोडती ।सकळ वस्तु ॥ ४५३ ॥
वांचूनि सोनें रुपें प्रमाण नोहे ।एथ राजाज्ञाचि समर्थ आहे ।तेंचि चाम एक जैं लाहे ।तेणें विकती आघवीं ॥ ४५४ ॥
तैसें उत्तमत्व तैंचि तरे ।तैंचि सर्वज्ञता सरे ।जैं मनोबुद्धि भरे ।माझेनि प्रेमें ॥ ४५५ ॥
म्हणौनि कुळ जाति वर्ण ।हें आघवेंचि गा अकारण ।एथ अर्जुना माझेपण ।सार्थक एक ॥ ४५६ ॥
तेंचि भलतेणें भावें ।मन मज आंतु येतें होआवें ।आलें तरी आघवें ।मागील वावो ॥ ४५७ ॥
जैसें तंवचि वहाळ वोहळ ।जंव न पवती गंगाजळ ।मग होऊनि ठाकती केवळ ।गंगारूप ॥ ४५८ ॥
कां खैर चंदन काष्ठें ।हे विवंचना तंवचि घटे ।जंव न घापती एकवटे ।अग्नीमाजीं ॥ ४५९ ॥
तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया ।कां शूद्र अंत्यजादि इया ।जाती तंवचि वेगळालिया ।जंव न पवती मातें ॥ ४६० ॥
मग जाती व्यक्ती पडे बिंदुलें ।जेव्हां भावें होती मज मीनलें ।जैसे लवणकण घातले ।सागरामाजीं ॥ ४६१ ॥
तंववरी नदानदींचीं नांवें ।तंवचि पूर्वपश्चिमेचे यावे ।जंव न येती आघवे ।समुद्रामाजीं ॥ ४६२ ॥
हेंचि कवणें एकें मिसें ।चित्त माझे ठायीं प्रवेशे ।येतुलें हो मग आपैसें ।मीचि होणें असे ॥ ४६३ ॥
अगा वरी फोडावयाचि लागीं ।लोहो मिळो कां परिसाचे आंगीं ।कां जे मिळतिये प्रसंगी ।सोनेंचि होईल ॥ ४६४ ॥
पाहें पां वालभाचेनि व्याजें ।तिया व्रजांगनांचीं निजें ।मज मीनलिया काय माझें ।स्वरूप नव्हती ? ॥ ६५ ॥
नातरी भयाचेनि मिसें ।मातें न पविजेचि काय कंसें ? ।कीं अखंड वैरवशें ।चैद्यादिकीं ॥ ४६६ ॥
अगा सोयरेपणेंचि पांडवा ।माझें सायुज्य यादवां ।कीं ममत्वें वसुदेवा- ।दिकां सकळां ॥ ४६७ ॥
नारदा ध्रुवा अक्रूरा ।शुका हन सनत्कुमारा ।यां भक्तीं मी धनुर्धरा ।प्राप्यु जैसा ॥ ४६८ ॥
तैसाचि गोपीकांसि कामें ।तया कंसा भयसंभ्रमें ।येरां घातकां मनोधर्में ।शिशुपालादिकां ॥ ४६९ ॥
अगा मी एकुलाणीचें खागें ।मज येवों पां भलतेनि मार्गें ।भक्ती कां विषयविरागें ।अथवा वैरें ॥ ४७० ॥
म्हणौनि पार्था पाहीं ।प्रवेशावया माझ्या ठायीं ।उपायांची नाहीं ।वाणी एथ ॥ ४७१ ॥
आणि भलतिया जातीं जन्मावें ।मग भजिजे कां विरोधावें ।परि भक्त कां वैरिया व्हावें ।माझियाचि ॥ ४७२ ॥
अगा कवणें एकें बोलें ।माझेपण जर्ही जाहालें ।तरी मी होणें आलें ।हाता निरुतें ॥ ४७३ ॥
यालागीं पापयोनीही अर्जुना ।कां वैश्य शूद्र अंगना ।मातें भजतां सदना ।माझिया येती ॥ ४७४ ॥
मग वर्णांमाजीं छत्रचामर ।स्वर्ग जयांचें अग्रहार ।मंत्रविद्येसि माहेर ।ब्राह्मण जे ॥ ४७५ ॥
जे पृथ्वीतळींचें देव ।जे तपोवतार सावयव ।सकळ तीर्थांसि दैव ।उदयलें जें ॥ ४७६ ॥
जेथ अखंड वसिजे यागीं ।जे वेदांची वज्रांगी ।जयांचेनि दिठीचिया उत्संगीं ।मंगळ वाढे ॥ ४७७॥
जयांचिये आस्थेचेनि वोलें ।सत्कर्म पाल्हाळीं गेलें ।संकल्पें सत्य जियालें ।जियांचेनि ॥ ४७८ ॥
जयांचेनि गा बोलें ।अग्नीसि आयुष्य जाहालें ।म्हणौनि समुद्रें पाणी आपुलें ।दिधलें यांचिया प्रीती ॥ ४७९ ॥
मियां लक्ष्मी डावलोनि केली परौती ।फेडोनि कौस्तुभ घेतला हातीं ।मग वोढविली वक्षस्थळाची वाखती ।चरणरजां ॥ ४८० ॥
आझुनि पाउलाची मुद्रा ।मी हृदयीं वाहें गा सुभद्रा ।जे आपुलिया दैवसमुद्रा ।जतनेलागीं ॥ ४८१ ॥
जयांचा कोप सुभटा ।काळाग्निरुद्राचा वसौटा ।जयांचे प्रसादीं फुकटा ।जोडती सिद्धी ॥ ४८२ ॥
ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण ।आणि माझ्या ठायीं अतिनिपुण ।आतां मातें पावती हे कवण ।समर्थावें ? ॥ ४८३ ॥
पाहें पां चंदनाचेनि अंगानिळें ।शिवतिले निंब होते जे जवळें ।तिहीं निर्जिवींही देवांचीं निडळें ।बैसणीं केलीं ॥ ४८४ ॥
मग तो चंदनु तेथ न पवे ।ऐसें मनीं कैसेनि धरावें ।अथवा पातला हें समर्थावें ।तेव्हां कायी साच ? ॥ ४८५ ॥
जेथ निववील ऐशिया आशा ।हरें चंद्रमा आधा ऐसा ।वाहिजत असे शिरसा ।निरंतर ॥ ४८६ ॥
तेथ निवविता आणि सगळा ।परिमळें चंद्राहूनि आगळा ।तो चंदनु केवीं अवलीळा ।सर्वांगीं न बैसे ? ॥ ४८७ ॥
कां रथ्योदकें जियेचिये कासे ।लागलिया समुद्र जालीं अनायासें ।तिये गंगेसि काय अनारिसें ।गत्यंतर असे ? ॥ ४८८ ॥
म्हणौनि राजर्षि कां ब्राह्मण ।जयां गति मति मीचि शरण्य ।तयां त्रिशुद्धी मीच निर्वाण ।स्थितीही मीचि ॥ ४८९ ॥
यालागीं शतजर्जर नावें ।रिगोनि केवीं निश्चिंत होआवें ।कैसेनि उघडिया असावें ।शस्त्रवर्षीं ॥ ४९० ॥
आंगावरी पडतां पाषाण ।न सुवावें केवीं वोडण ।रोगें दाटला आणि उदासपण ।वोखदेंसी ? ॥ ४९१ ॥
जेथ चहूंकडे जळत वणवा ।तेथूनि न निगिजे केवीं पांडवा ।तेवीं लोकां येऊनि सोपद्रवां ।केवीं न भजिजे मातें ॥ ४९२ ॥
अगा मातें न भजावयालागीं ।कवण बळ पां आपुलिया आंगीं ।काई घरीं कीं भोगी ।निश्चिंती केलीं ? ॥ ४९३ ॥
नातरी विद्या कीं वयसा ।ययां प्राणियांसि हा ऐसा ।मज न भजतां भरंवसा ।सुखाचा कोण ? ॥ ४९४ ॥
तरी भोग्यजात जेतुलें ।तें एका देहाचिया निकिया लागलें ।आणि एथ देह तंव असे पडिलें ।काळाचिये तोंडीं ॥ ४९५ ॥
बाप दुःखाचें केणें सुटलें ।जेथ मरणाचे भरे लोटले ।तिये मृत्युलोकींचिये शेवटिलें ।येणें जाहालें हाटवेळे ॥ ४९६ ॥
आंता सुखेंसि जीविता ।कैंचीं ग्राहिकी किजेल पंडुसुता ।काय राखोंडी फुंकितां ।दीपु लागे ? ॥ ४९७ ॥
अगा विषाचे कांदे वाटुनी ।जो रसु घेईजे पिळुनी ।तया नाम अमृत ठेवुनी ।जैसें अमर होणें ॥ ४९८ ॥
तेवीं विषयांचें जें सुख ।तें केवळ परम दुःख ।परि काय कीजे मूर्ख ।न सेवितां न सरे ॥ ४९९ ॥
कां शीस खांडूनि आपुलें ।पायींच्या खतीं बांधिलें ।तैसें मृत्युलोकींचें भलें ।आहे आघवें ॥ ५०० ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

मातें
— मला
म्हणौनि
— म्हणून, याकारणाने
तैसें
— तसे
जेथ
— जिथे
अगा
— अरे (संबोधन)
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
तया
— त्याला, त्या
पां
— बरं का, नाही का (संवादातील उद्गार)
पैं
— खरोखर, निश्चितच (जोर देणारा शब्द)
पांडवा
— पांडुपुत्र — अर्जुन
ऐसें
— असे
आघवें
— सगळे, संपूर्ण
जैसें
— जसे
तेथ
— तिथे
किरीटी
— इंद्राने दिलेला किरीट धारण करणारा — अर्जुन
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
केवीं
— कसे
तेवीं
— त्याप्रमाणे
ठायीं
— ठिकाणी
अर्जुना
— अर्जुन — संबोधन
सकळ
— सर्व
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
कीजे
— केले जाते
पंडुसुता
— पंडूचा पुत्र — अर्जुन

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Krishna Splits the Double Arjuna Tree — Anonymous, India, Gujarat, probably Surat, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — santsahitya.in

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित प्रतीशी ओवीवार पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.