मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
ज्ञानेश्वरी — अध्याय नववा

साहित्य

ज्ञानेश्वरी — अध्याय नववा

ओव्या ५०१–५३५

Dnyaneshwari — Adhyay 9, part 3

रचना — संत ज्ञानेश्वर · १२७५–१२९६

सारांश

‘राजविद्या’ — विद्यांमधील राजा. हे ज्ञान गुप्त असले तरी दुर्गम नाही, हा या अध्यायाचा स्वर. ‘पत्र, पुष्प, फळ किंवा पाणी — भक्तीने जे दिले ते मी स्वीकारतो’ हे वचन येथले. जन्म, जात किंवा विद्या यांची अट न ठेवता भक्तीचा दरवाजा सर्वांसाठी उघडणारा हा अध्याय वारकरी परंपरेचा आधार आहे.

म्हणौनि मृत्युलोकीं सुखाची कहाणी ।ऐकिजेल कवणाचिये श्रवणीं ।कैंची सुखनिद्रा अंथरुणीं ।इंगळांच्या ॥ ५०१ ॥
जिये लोकींचा चंद्र क्षयरोगी ।जेथ उदयो होय अस्तालागीं ।दुःख लेऊनि सुखाची आंगीं ।सळित जगातें ॥ ५०२ ॥
जेथ मंगळाचिया अंकुरीं ।सवेंचि अमंगळाची पडे पोहरी ।मृत्यु उदराचिया परिवरी ।गर्भु गिंवसी ॥ ५०३ ॥
जें नाहीं तयातें चिंतवी ।तंव तेंचि नेइजे गंधर्वीं ।गेलियाची कवणें गांवीं ।शुद्धी न लगे ॥ ५०४ ॥
अगा गिंवसितां आघविया वाटी ।परतलें पाऊलचि नाहीं किरीटी ।सैंघ निमालियांचिया गोठी ।तियें पुराणें जेथिंचीं ॥ ५०५ ॥
जेथिंचिये अनित्यतेची थोरी ।करितया ब्रह्मयाचे आयुष्यवेरी ।कैसें नाहीं होणें अवधारीं ।निपटूनियां ॥ ५०६ ॥
ऐसी लोकींची जिये नांदणूक ।तेथ जन्मले आथि जे लोक ।तयांचिये निश्चिंतीचें कौतुक ।दिसत असे ॥ ५०७ ॥
पैं दृष्टादृष्टाचिये जोडी- ।लागीं भांडवल न सुटे कवडी ।जेथ सर्वस्वें हानि तेथ कोडी ।वेंचिती गा ॥ ५०८ ॥
जो बहुवें विषयविलासें गुंफे ।तो म्हणती उवाईं पडिला सापें ।जो अभिलाषभारें दडपे ।तयातें सज्ञान म्हणती ॥ ५०९ ॥
जयाचें आयुष्य धाकुटें होय ।बळ प्रज्ञा जिरौनि जाय ।तयाचे नमस्कारिती पाय ।वडील म्हणुनी ॥ ५१० ॥
जंव जंव बाळ बळिया वाढे ।तंव तंव भोजे नाचती कोडें ।आयुष्य निमालें आंतुलियेकडे ।ते ग्लानीचि नाहीं ॥ ५११ ॥
जन्मलिया दिवसदिवसें ।हों लागे काळाचेंचि ऐसें ।कीं वाढती करिती उल्हासें ।उभविती गुढिया ॥ ५१२ ॥
अगा मर हा बोलु न साहती ।आणि मेलिया तरी रडती ।परि असतें जात न गणिती ।गहिंसपणें ॥ ५१३ ॥
दर्दूर सापें गिळिजतु आहे उभा ।कीं तो मासिया वेंटाळी जिभा ।तैसें प्राणिये कवणा लोभा ।वाढविती तृष्णा ॥ ५१४ ॥
अहा कटकटा हें वोखटें ।इये मृत्युलोकींचें उफराटें ।एथ अर्जुना जरी अवचटें ।जन्मलासी तूं ॥ ५१५ ॥
तरि झडझडोनि वहिला निघ ।इये भक्तीचिये वाटे लाग ।जिया पावसी अव्यंग ।निजधाम माझें ॥ ५१६ ॥
तूं मन हें मीचि करीं ।माझिया भजनीं प्रेम धरीं ।सर्वत्र नमस्कारीं ।मज एकातें ॥ ५१७ ॥
माझेनि अनुसंधानें देख ।संकल्पु जाळणें निःशेख ।मद्याजी चोख ।याचि नांव ॥ ५१८ ॥
ऐसा मियां आथिला होसी ।तेथ माझियाचि स्वरूपा पावसी ।हें अंतःकरणींचें तुजपासीं ।बोलिजत असें ॥ ५१९ ॥
अगा अवघिया चोरिया आपुलें ।जें सर्वस्व आम्हीं असें ठेविलें ।तें पावोनि सुख संचलें ।होऊनि ठासी ॥ ५२० ॥
ऐसें सांवळेनि परब्रह्में ।भक्तकामकल्पद्रुमें ।बोलिलें आत्मारामें ।संजयो म्हणे ॥ ५२१ ॥
अहो ऐकिजत असें कीं अवधारा ।तंव इया बोला निवांत म्हातारा ।जैसा म्हैसा नुठी कां पुरा ।तैसा उगाचि असे ॥ ५२२ ॥
तेथ संजयें माथा तुकिला ।अहा अमृताचा पाऊस वर्षला ।कीं हा एथ असतुचि गेला ।सेजिया गांवा ॥ ५२३ ॥
तर्ही दातारु हा आमुचा ।म्हणौनि हें बोलतां मैळेल वाचा ।काय कीजे ययाचा ।स्वभावोचि ऐसा ॥ ५२४ ॥
परि बाप भाग्य माझें ।जे वृत्तांतु सांगावयाचेनि व्याजें ।कैसा रक्षिलों मुनिराजें ।श्रीव्यासदेवें ॥ ५२५ ॥
येतुलें हें वाड सायासें ।जंव बोलत असे दृढमानसें ।तंव न धरवेचि आपुलिया ऐसें ।सात्त्विकें केलें ॥ ५२६ ॥
चित्त चाकाटलें आटु घेत ।वाचा पांगुळली जेथिंची तेथ ।आपाद कंचुकित ।रोमांच आले ॥ ५२७ ॥
अर्धोन्मीलित डोळे ।वर्षताति आनंदजळें ।आंतुलिया सुखोर्मींचेनि बळें ।बाहेरी कांपे ॥ ५२८ ॥
पैं आघवाचि रोममूळीं ।आली स्वेदकणिका निर्मळी ।लेइला मोतियांची कडियाळीं ।आवडे तैसा ॥ ५२९ ॥
ऐसा महासुखाचेनि अतिरसें ।जेथ आटणी हों पाहे जीवदशे ।तेथ निरोपिलें व्यासें ।तें नेदीच हों ॥ ५३० ॥
आणिक श्रीकृष्णाचें बोलणें ।घोकरी आलें श्रवणें ।कीं देहस्मृतीचा तेणें ।वापसा केला ॥ ५३१ ॥
तेव्हां नेत्रींचें जळ विसर्जी ।सर्वांगींचा स्वेदु परिमार्जीं ।तेवींचि अवधारा म्हणे हो जी ।धृतराष्ट्रातें ॥ ५३२ ॥
आतां श्रीकृष्णवाक्यबीजा निवाडु ।आणि संजय सात्त्विकाचा बिवडु ।म्हणौनि श्रोतयां होईल सुरवाडु ।प्रमेय पिकाचा ॥ ५३३ ॥
अहो अळुमाळ अवधान देयावें ।येतुलेनि आनंदाचे राशीवरी बैसावें ।बाप श्रवणेंद्रिया दैवें ।घातली माळ ॥ ५३४ ॥
म्हणौनि विभूतींचा ठावो ।अर्जुना दावील सिद्धांचा रावो ।तो ऐका म्हणे ज्ञानदेवो ।निवृत्तीचा ॥ ५३५ ॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

तेथ
— तिथे
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
म्हणौनि
— म्हणून, याकारणाने
जेथ
— जिथे
अगा
— अरे (संबोधन)
जंव
— जोपर्यंत
ऐसें
— असे
पैं
— खरोखर, निश्चितच (जोर देणारा शब्द)
इये
— या (स्त्रीलिंगी)
अर्जुना
— अर्जुन — संबोधन
किरीटी
— इंद्राने दिलेला किरीट धारण करणारा — अर्जुन
अवधारीं
— ऐक, लक्ष दे
तैसें
— तसे
मियां
— मी (करणरूप)
कीजे
— केले जाते
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
ठावो
— ठिकाण; थांग

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Krishna Splits the Double Arjuna Tree — Anonymous, India, Gujarat, probably Surat, Public domain, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा

स्रोत — santsahitya.in

पडताळणी बाकी — मूळ मुद्रित प्रतीशी ओवीवार पडताळणी बाकी आहे. चूक कळवा.