मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
तुकाराम गाथा

साहित्य

तुकाराम गाथा

अभंग १६३९–१७४१

Tukaram Gatha, part 17

रचना — संत तुकाराम · १६०८–१६५०

सारांश

तुकाराम गाथेचा भाग १७ — अभंग १६३९ ते १७४१.

तुझा ह्मणऊनि जालों उतराई । त्याचें वर्म काई तें मी नेणें ॥१॥हातीं धरोनियां दावीं मज वाट । पुढें कोण नीट तें चि देवा ॥ध्रु.॥देवभक्तपण करावें जतन । दोहीं पक्षीं जाण तूं चि बळी ॥२॥अभिमानें तुज लागली हे लाज । शरणागतां काज करावया ॥३॥तुका ह्मणे बहु नेणता मी फार । ह्मणऊनि विचार जाणविला ॥४॥
मारगीं चालतां पाउलापाउलीं । चिंतावी माउली पांडुरंग ॥१॥सर्व सुख लागे घेउनिया पाठी । आवडींचा कंठीं रस ओती ॥ध्रु.॥पीतांबरें छाया करी लोभापर । पाहे तें उत्तर आवडीचें ॥२॥तुका ह्मणे हें चि करावें जीवन । वाचे नारायण तान भूक ॥३॥
जालों आतां दास । माझे तोडोनियां पाश ॥१॥ठाव द्यावा पायांपाशीं । मी तो पातकांची राशी ॥ध्रु.॥सकळ ही गोवा । माझा उगवूनि देवा ॥२॥तुका ह्मणे भय । करा जवळी तें नये ॥३॥
अंतरींचें जाणां । तरि कां येऊं दिलें मना ॥१॥तुमची करावी म्यां सेवा । आतां अव्हेरितां देवा ॥ध्रु.॥नव्हती मोडामोडी । केली मागें ते चि घडी ॥२॥तुका ह्मणे दिला वाव । पायीं लागों दिला भाव ॥३॥
पवित्र होईन चरित्रउच्चारें । रूपाच्या आधारें गोजिरिया ॥१॥आपुरती बुद्धि पुण्य नाहीं गांठी । पायीं घालीं मिठी पाहें डोळां ॥ध्रु.॥गाईन ओविया शिष्टांच्या आधारें । सारीन विचारें आयुष्या या ॥२॥तुका ह्मणे तुझें नाम नारायणा । ठेवीन मी मना आपुलिया ॥३॥
काय ऐसा जन्म जावा वांयांविण । कांहीं तरी ॠण असो माथां ॥१॥कोणे तरी काळें होईल आठव । नाहीं जरी भाव भार खरा ॥ध्रु.॥शता एकातरी जन्माच्या शेवटीं । कृपाळुवा पोटीं होइल दया ॥२॥तुका ह्मणे नाहीं फांकों तरी देत । सर्वांचें उचित सांपडलें ॥३॥
नाहीं कोणी दिस जात वांयांविण । साध्य नाहीं सीण लटिका चि ॥१॥एकाचिये माथां असावें निमित्त । नसो नाहीं हित कपाळीं तें ॥ध्रु.॥कांहीं एक तरी बोलायाचा जागा । नेदिती वाउगा उभा ठाकों ॥२॥तुका ह्मणे वर्में कळों येती कांहीं । ओळखी जे नाहीं होईल ते ॥३॥
काय करील तें नव्हे विश्वंभर । सेवका दारिद्र लाज नाहीं ॥१॥मजपासूनि हें पडिलें अंतर । काय तो अव्हेर करूं जाणे ॥ध्रु.॥नामाच्या चिंतनें नासी गर्भवास । नेदी करूं आस आणिकांची ॥२॥तुका ह्मणे नेणों किती वांयां गेले । तयां उद्धरिलें पांडुरंगें ॥३॥
संध्या करितोसी केशवाच्या नांवें । आरंभीं तें ठावें नाहीं कैसें ॥१॥किती या सांगावें करूनि फजित । खळ नेणे हित जवळीं तें ॥ध्रु.॥माजल्या न कळे उचित तें काय । नेघावें तें खाय घ्यावें सांडी ॥२॥तुका ह्मणे घेती भिंती सवें डोकें । वावसी तें एकें अंधारलीं ॥३॥
दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद । पडिलिया शुद्ध नव्हे मग ॥१॥तैसे खळां मुखें न करावें श्रवण । अहंकारें मन विटाळलें ॥ध्रु.॥काय करावीं तें बत्तीस लक्षणें । नाक नाहीं तेणें वांयां गेलीं ॥२॥तुका ह्मणे अन्न जिरों नेदी माशी । आपुलिया जैशी सवें श्वगॉ ॥३॥
सांगावें तें बरें असतें हें पोटीं । दुःख देते खोटी बुद्धि मग ॥१॥आपला आपण करावा वेव्हार । जिंकोनि अंतर मन ग्वाही ॥ध्रु.॥नाहीं मागें येत बोलिलें वचन । पावावा तो सीण बरा मग ॥२॥तुका ह्मणे बहु भ्यालों खटपटे । आतां देवा खोटे शब्द पुरे ॥३॥वाराणसीस यात्रा चालली तेव्हां स्वामींनीं भागीरथीस पत्र धाडिलें - ते अभंग ॥ ४ ॥
परिसें वो माते माझी विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ॥१॥भागीरथी महादोष निवारणी । सकळां स्वामिणी तीर्थांचिये ॥ध्रु.॥जीतां भुक्ति मोक्ष मरणें तुझ्या तिरीं । अहिक्यपरत्री सुखरूप ॥२॥तुका विष्णुदास संतांचें पोसनें । वागपुष्प तेणें पाठविलें ॥३॥
तुह्मी विश्वनाथ । दीनरंक मी अनाथ ॥१॥कृपा कराल ते थोडी । पायां पडिलों बराडी ॥ध्रु.॥काय उणें तुह्मांपाशीं। मी तों अल्पें चि संतोषी ॥२॥तुका ह्मणे देवा । कांहीं भातुकें पाठवा ॥३॥
पिंड पदावरी । दिला आपुलिये करीं ॥१॥माझें जालें गयावर्जन । फिटलें पितरांचें ॠण ॥ध्रु.॥केलें कर्मांतर । बोंब मारिली हरिहर ॥२॥तुका ह्मणे माझें । भार उतरलें ओझें ॥३॥ ॥३॥
मथुरेच्या राया । माझें दंडवत पायां ॥१॥तुमचे कृपेचें पोसनें । माझा समाचार घेणें ॥ध्रु.॥नाम धरिलें कंठीं । असें आर्तभूत पोटीं ॥२॥जीवींचें ते जाणा । तुका ह्मणे नारायणा ॥३॥
जाय तिकडे लागे पाठीं । नाहीं तुटी आठवाची ॥१॥हरूनियां नेलें चित्त । माझें थीत भांडवल ॥ध्रु.॥दावूनियां रूप डोळां। मन चाळा लावियेलें ॥२॥आणीक तोंडा पडिली मिठी । कान गोठी नाइकती ॥३॥बोलिल्याचा आठव न घडे । वाणी ओढे ते सोई ॥४॥तुका ह्मणे प्रेमधगी । भरली अंगीं अखंड ॥५॥
नको ऐसें जालें अन्न । भूक तान ते गेली ॥१॥गोविंदाची आवडी जीवा । करीन सेवा धणीवरी ॥ध्रु.॥राहिलें तें राहो काम । सकळ धर्म देहीचे ॥२॥देह घरिला त्याचें फळ । आणीक काळ धन्य हा ॥३॥जाऊं नेदीं करितां सोस । क्षेमा दोष करवीन ॥४॥तुका ह्मणे या च पाठी । आता साटी जीवाची ॥५॥
वाट पाहें हरि कां नये आझूनि । निष्ठ कां मनीं धरियेलें ॥१॥काय करूं धीर होत नाहीं जीवा । काय आड ठेवा उभा ठेला ॥ध्रु.॥नाहीं माझा धांवा पडियेला कानीं । कोठें चक्रपाणी गुंतलेती ॥२॥नाही आलें कळों अंतरा अंतर । कृपावंत फार ऐकतो ॥३॥बहुता दिसांचें राहिलें भातुकें । नाहीं कवतुकें कृवाळिलें ॥४॥तुका ह्मणे देइप एकवेळा भेटी । शीतळ हें पोटीं होइल मग ॥५॥
नाहीं दिलें कधीं कठिण उत्तर । तरी कां अंतर पडियेलें ॥१॥ह्मणऊनि आतां वियोग न साहे । लांचावलें देहे संघष्टणें ॥ध्रु.॥वेळोवेळां वाचे आठवितों नाम । अधिक चि प्रेम चढे घेतां ॥२॥तुका ह्मणे पांडुरंगे जननिये । घेऊनि कडिये बुझाविलें ॥३॥
आतां न करीं सोस । सेवीन हा ब्रह्मरस ॥१॥सुखें सेवीन अमृत । ब्रह्मपदींचें निश्चित ॥ध्रु.॥तुमचा निज ठेवा । आह्मी पाडियेला ठावा ॥२॥तुका ह्मणे देवरांया । आतां लपालेती वांयां ॥३॥
जेथें जेथें जासी । तेथें मज चि तूं पासी ॥१॥ऐसा पसरीन भाव । रिता नाहीं कोणी ठाव ॥ध्रु.॥चित्त जडलें पायीं । पाळती हें ठायीं ठायीं ॥२॥तुका ह्मणे पोटीं । देव घालुनि सांगें गोष्टी ॥३॥
मुक्तिपांग नाहीं विष्णुचिया दासां । संसार तो कैसा न देखती ॥१॥बैसला गोविंद जडोनियां चित्ती । आदि ते चि अंतीं अवसान ॥ध्रु.॥भोग नारायणा देऊनि निराळीं । ओविया मंगळीं तो चि गाती ॥२॥बळ बुद्धि त्यांची उपकारासाटीं । अमृत तें पोटी सांटवलें ॥३॥दयावेंत तरी देवा च सारिखीं । आपुलीं पारखीं नोळखती ॥४॥तुका ह्मणे त्यांचा जीव तो चि देव । वैकुंठ तो ठाव वसती तो ॥५॥
सेवीन उिच्छष्ट लोळेन अंगणीं । वैष्णवां चरणीं होइन जोडा ॥१॥ऐसें जन्म आतां मज देइप देवा । आवडी हे जीवा सर्व काळ ॥ध्रु.॥त्यांचे चरणरज येती अंगावरी । वंदीत ते शिरीं जाइन मागें ॥२॥तुका ह्मणे येथें राहिलासे भाव । सकळ ही वाव जाणोनियां ॥३॥
क्षेम देयाला हो । स्फुरताती दंड बाहो ॥१॥आतां झडझडां चालें । देइप उचलूं पाउलें ॥ध्रु.॥सांडीं हंसगती । बहु उत्कंठा हे चित्तीं ॥२॥तुका ह्मणे आई । श्रीरंगे विठाबाई ॥३॥
जेणें वेळ लागे । ऐसें सांडीं पांडुरंगे ॥१॥कंठ कंठा मिळों देइप । माझा वोरस तूं घेइप ॥ध्रु.॥नको पीतांबर । सांवरूं हे अळंकार ॥२॥टाकीं वो भातुकें । लौकिकाचें कवतुकें ॥३॥हातां पायां नको । कांहीं वेगळालें राखों ॥४॥तुका ह्मणे यावरी । मग सुखें अळंकारीं ॥५॥
कृपेचा ओलावा । दिसे वेगळा चि देवा ॥१॥मी हें इच्छीतसें साचें । न लगे फुकटशाई काचें ॥ध्रु.॥जेणें जाय कळसा। पाया उत्तम तो तैसा ॥२॥तुका ह्मणे घरीं । तुझ्या अवघिया परी ॥३॥
दावूनियां कोणां कांहीं । ते चि वाहीं चाळविलीं ॥१॥तैसें नको करूं देवा । शुद्धभावा माझिया ॥ध्रु.॥रिद्धिसिद्धी ऐसे आड । येती नाड नागवूं ॥२॥उदकाऐसे दावुनि ओढी । उर फोडी झळई ॥३॥दर्पणींचें दिलें धन । दिसे पण चरफडी ॥४॥तुका ह्मणे पायांसाटीं । करीं आटी कळों द्या ॥५॥
काय माता विसरे बाळा । कळवळा प्रीतीचा ॥१॥आवडीनें गळां मिठी । घाली उठी बैसवी ॥ध्रु.॥लावूं धांवे मुख स्तना । नये मना निराळें ॥२॥भावंडाचें भातें दावी । आपुलें लावी त्यास जी ॥३॥माझें थोडें त्याचें फार । उत्तर हें वाढवी ॥४॥तुका ह्मणे नारायणा । तुह्मी जाणां बुझावूं ॥५॥
तरीं आह्मी तुझी धरियेली कास । नाहीं कोणी दास वांयां गेला ॥१॥आगा पंढरीच्या उभ्या विटेवरी । येइप लवकरी धांवें नेटे ॥ध्रु.॥पालवितों तुज उभी करोनि बाहे । कृपावंता पाहे मजकडे ॥२॥तुका ह्मणे तुज बहु कान डोळे । कां हे माझे वेळे ऐसी परी ॥३॥
करावा कांटाळा नव्हे हें उचित । आधीं च कां प्रीत लावियेली ॥१॥जाणतसां तुह्मीं रूपाचें लाघव । आपुलें तें जीव घेतें ऐसा ॥ध्रु.॥काय ह्मणऊनि आलेती आकारा । आह्मां उजगरा करावया ॥२॥तुका ह्मणे भीड होती आजिवरी । आतां देवा उरी कोण ठेवी ॥३॥
धरूनि पालव असुडीन करें । मग काय बरें दिसे लोकीं ॥१॥काय तें विचारा ठायींचें आपणां । जो हा नारायणा अवकाश ॥ध्रु.॥अंतर पायांसी तो वरी या गोष्टी । पडिलिया मिठी हालों नेदीं ॥२॥रुसलेती तरी होईल बुझावणी । तांतडी करूनि साधावें हें ॥३॥सांपडलिया आधीं कारणासी ठाव । येथें करूं भाव दृढ आतां ॥४॥तुका ह्मणे तुझे ठाउके बोभाट । मग खटपट चुकली ते ॥५॥
निष्ठा उत्तरीं न धरावा राग । आहे लागभाग ठायींचा चि ॥१॥तूं माझा जनिता तूं माझा जनिता । रखुमाईच्या कांता पांडुरंगा ॥ध्रु.॥मुळींच्या ठेवण्यां आहे अधिकार । दुरावोनि दूर गेलों होतों ॥२॥पोटींच्या आठवा पडिला विसर । काहीं आला भार माथां तेणें ॥३॥राखिला हा होता बहु चौघां चार । साक्षीने वेव्हार निवडिला ॥४॥तुका ह्मणे कांहीं बोलणें न लगे । आतां पांडुरंगे तूं मी ऐसें ॥५॥
सांगतां गोष्टी लागती गोडा । हा तो रोकडा अनुभव ॥१॥सुख जालें सुख जालें । नये बोले बोलतां ॥ध्रु.॥अंतर तें नये दिसों । आतां सोस कासया ॥२॥तुका ह्मणे जतन करूं । हें चि धरूं जीवेंसी ॥३॥
मजशीं पुरे न पडे वादें । सुख दोहींच्या संवादें ॥१॥तूं चि आगळा काशानें । शिर काय पायांविणे ॥ध्रु.॥वाहों तुझा भार । दुःख साहोनि अपार ॥२॥तुका ह्मणे नाहीं भेद । देवा करूं नये वाद ॥३॥
तुज नाहीं शिक्त । काम घेसी आह्मां हातीं ॥१॥ऐसें अनुभवें पाहीं । उरलें बोलिजेसें नाहीं ॥ध्रु.॥लपोनियां आड । आह्मां तुझा कैवाड ॥२॥तुका ह्मणे तुजसाठी । आह्मां संवसारें तुटी ॥३॥
तुझाठायीं ओस । दोन्ही पुण्य आणि दोष ॥१॥झडलें उरलें किती । आह्मी धरियेलें चित्तीं ॥ध्रु.॥कळलासी नष्टा। यातिक्रियाकर्मभ्रष्टा ॥२॥तुका ह्मणे बोला । नाहीं ताळा गा विठ्ठला ॥३॥
भांडावें तों हित । ठायी पडा तें उचित ॥१॥नये खंडों देऊं वाद । आह्मां भांडवलभेद ॥ध्रु.॥शब्दासारसें भेटी । नये पडों देऊं तुटी ॥२॥तुका ह्मणे आळस । तो चि कारणांचा नास ॥३॥
नव्हों गांढे आळसी । जो तूं आह्मांपुढें जासी ॥१॥अरे दिलें आह्मां हातीं । वर्म वेवादाचें संतीं ॥ध्रु.॥धरोनियां वाट। जालों शिरोमणि थोंट ॥२॥तुका ह्मणे देवा । वाद करीन खरी सेवा ॥३॥
तुझा विसर नको माझिया जीवा । क्षण एक केशवा मायबापा ॥१॥जाओ राहो देह आतां ये चि घडी । कायसी आवडी याची मज ॥ध्रु.॥कुश्चीळ इंिद्रयें आपुलिया गुणें । यांचिया पाळणें कोण हित ॥२॥पुत्र पत्नी बंधु सोयरीं खाणोरीं । यांचा कोण धरी संग आतां ॥३॥पिंड हा उसना आणिला पांचांचा । सेकीं लागे ज्याचा त्यासी देणें ॥४॥तुका ह्मणे नाहीं आणिक सोइरें । तुजविण दुसरें पांडुरंगा ॥५॥
ऐसें सत्य माझें येईल अंतरा । तरि मज करा कृपा देवा ॥१॥वचनांसारिखें तळमळी चित्त । बाहेरि तो आंत होइल भाव ॥ध्रु.॥तरि मज ठाव द्यावा पायांपाशीं । सत्यत्वें जाणसी दास खरा ॥२॥तुका ह्मणे सत्य निकट सेवकें । तरि च भातुकें प्रेम द्यावें ॥३॥
आदि वर्तमान जाणसी भविष्य । मागें पुढें नीस संचिताचा ॥१॥आतां काय देऊं पायांपें परिहार । जाणां तो विचार करा देवा ॥ध्रु.॥आपुलें तें येथें काय चाले केलें । जोडावे ते भले हात पुढें ॥२॥तुका ह्मणे फिके बोल माझे वारा । कराल दातारा होईल तें ॥३॥
सुखें न मनी अवगुण । दुःख भोगी त्याचें कोण ॥१॥हें कां ठायींचें न कळे । राती करा झांकुनि डोळे ॥ध्रु.॥चालोनि आड वाटे । पायीं मोडविले कांटे ॥२॥तुका ह्मणे कोणा। बोल ठेवितो शाहाणा ॥३॥
आह्मी न देखों अवगुणां । पापी पवित्र शाहाणा ॥१॥अवघीं रूपें तुझीं देवा । वंदूं भावें करूं सेवा ॥ध्रु.॥मज मुक्ती सवें चाड । नेणें पाषाण धातु वाड ॥२॥तुका ह्मणे घोटीं। विष अमृत तुजसाटीं ॥३॥
मज नाहीं तुझ्या ज्ञानाची ते चाड । घेतां वाटे गोड नाम तुझें ॥१॥नेणतें लेंकरूं आवडीचें तान्हें । बोलतों वचनें आवडीनें ॥ध्रु.॥भक्ती नेणें कांहीं वैराग्य तें नाहीं । घातला विठाई भार तुज ॥२॥तुका ह्मणे नाचें निर्लज्ज होऊनि । नाहीं माझे मनीं दुजा भाव ॥३॥
काय माझी संत पाहाती जाणीव । सर्व माझा भावत्यांचे पायीं ॥१॥कारण सरतें करा पांडुरंगीं । भूषणाची जगीं काय चाड ॥ध्रु.॥बोबडा उत्तरीं ह्मणें हरिहरि । आणीक भीकारी नेणें दुजें॥२॥तुका ह्मणे तुह्मी विठ्ठलाचे दास । करितों मी आस उिच्छष्टाची॥३॥
जीवाचें जीवन अमृताची तनु । ब्रह्मांड भूषणु नारायण ॥१॥सुखाचा सांगात अंतकासी अंत । निजांचा निवांत नारायण ॥ध्रु.॥गोडाचें ही गोड हर्षाचें ही कोड । प्रीतीचा ही लाड नारायण ॥२॥भावाचा निज भाव नांवांचा हा नांव । अवघा पंढरिराव अवतरलासे ॥३॥तुका ह्मणे जें हें साराचें हें सार । माझा अंगीकार तेणें केला ॥४॥
आतां मी सर्वथा नव्हें गा दुर्बळ । यातिहीनकुळ दैन्यवाणा ॥१॥माय रखुमाई पांडुरंग पिता । शुद्ध उभयतां पक्ष दोन्ही ॥ध्रु.॥बापुडा मी नव्हें दुर्बळ ठेंगणा । पांगिला हा कोणा आणिकांसी ॥२॥दृष्ट नव्हों आह्मी अभागी अनाथ । आमुचा समर्थ कैवारी हा ॥३॥संवसार आह्मां सरला सकळ । लपोनियां काळ ठेला धाकें ॥४॥तुका ह्मणे जालों निर्भर मानसीं । जोडलिया रासी सुखाचिया ॥५॥
केलें नाहीं मनीं तया घडे त्याग । उबगें उद्वेग नाहीं चित्तीं ॥१॥देव चि हा जाणे अंतरींचा भाव । मिथ्या तो उपाव बाहए रंग ॥ध्रु.॥त्यागिल्याचें ध्यान राहिलें अंतरीं । अवघी ते परी विटंबना ॥२॥तुका ह्मणे आपआपण्यां विचारा । कोण हा दुसरा सांगे तुह्मां ॥३॥
हित व्हावें तरी दंभ दुरी ठेवा । चित्त शुद्ध सेवा देवाची हे ॥१॥आवडी विठ्ठल गाईजे एकांतीं । अलभ्य ते येती लाभ घरा ॥ध्रु.॥आणीकां अंतरीं निदावी वसति । करावी हे शांती वासनेची ॥२॥तुका ह्मणे बाण हा चि निर्वाणींचा । वाउगी हे वाचा वेचूं नये ॥३॥
हो कां नर अथवा नारी । ज्यांचा आवडता हरि ॥१॥ते मज विठोबासमान । नमूं आवडी ते जन ॥ध्रु.॥ज्याचें अंतर निर्मळ । त्याचें सबाहए कोमळ ॥२॥तुका ह्मणे भावें । जिव्हें प्रेम वोसंडावें ॥३॥
हरिची हरिकथा नावडे जया । अधम ह्मणतां तया वेळ लागे ।मनुष्यदेहीं तया नाट लागलें । अघोर साधिलें कुंभपाक ॥१॥कासया जन्मा आला तो पाषाण । जंत कां होऊन पडिला नाहीं।उपजे मरोनि वेळोवेळां भांड । परिलाज लंड न धरी कांहीं ॥ध्रु.॥ऐसियाची माता कासया प्रसवली । वर नाहीं घातली मुखावरी।देवधर्मांविण तो हा चांडाळ नर । न साहे भूमि भार क्षणभरी ॥२॥राम ह्मणतां तुझें काय वेचेल । कां हित आपुलें न विचारिसी ।जन्मोजन्मींचा होईल नरकीं । तुका ह्मणे चुकी जरी यासी ॥३॥
उपेक्षिला येणें कोणी शरणागत । ऐसी नाहीं मात आईिकली ॥१॥आतां काय ब्रीद सांडील आपुलें । ठायींचें धरिलें जाणोनियां ॥ध्रु.॥माझ्या दोषासाटीं होइल पाठमोरा । ऐसा कोण पुरा भोग बळी ॥२॥तुका ह्मणे रूप आमुच्या कैवारें । धरिलें गोजिरें चतुर्भुज ॥३॥
आवडीसारिखें संपादिलें सोंग । अनंत हें मग जालें नाम ॥१॥कळे ऐशा वाटा रचिल्या सुलभा । दुर्गम या नभाचा ही साक्षी ॥ध्रु.॥हातें जेवी एक मुखीं मागे घांस । माउली जयास तैसी बाळा ॥२॥तुका ह्मणे माझें ध्यान विटेंवरी । तैसी च गोजिरी दिसे मूर्ति ॥३॥
धन्य मी मानीन आपुलें संचित । राहिलीसे प्रीत तुझे नामीं ॥१॥धन्य जालों आतां यासि संदेह नाहीं । न पडों या वाहीं काळा हातीं ॥ध्रु.॥ब्रह्मरस करूं भोजन पंगती । संतांचे संगती सर्वकाळ ॥२॥तुका ह्मणे पोट धालें चि न धाये । खादलें चि खायें आवडीनें ॥३॥
आवडी न पुरे सेवितां न सरे । पडियेली धुरेसवें गांठी ॥१॥न पुरे हा जन्म हें सुख सांटितां । पुढती ही आतां हें चि मागों ॥ध्रु.॥मारगाची चिंता पालखी बैसतां । नाहीं उसंतितां कोसपेणी ॥२॥तुका ह्मणे माझी विठ्ठल माउली । जाणे ते लागली भूक तान ॥३॥
नाहीं त्रिभुवनीं सुख या समान । ह्मणऊनि मन िस्थरावलें ॥१॥धरियेलीं जीवीं पाउलें कोमळीं । केली एकावळी नाममाळा ॥ध्रु.॥शीतळ होऊनियां पावलों विश्रांती । न साहे पुढती घाली चित्ता ॥२॥तुका ह्मणे जाले सकळ सोहळे । पुरविले डोहळे पांडुरंगें ॥३॥
मायबापापुढें लाटिकें लेंकरूं । तैसे बोल करूं कवतुकें ॥१॥कृपावंता घालीं प्रेमपान्हारस । वोळली वोरसे पांडुरंग ॥ध्रु.॥नाहीं धीर खुंटी जवळी हुंबरे । ठायीं च पाखर कविळते ॥२॥तुका ह्मणे मज होऊं नेदी सीण । कळों नेदी भिन्न आहे ऐसें ॥३॥
आठवों नेंदी आवडी आणीक । भरूनियां लोक तिन्ही राहे ॥१॥मन धांवे तेथें तिचें चि दुभतें । संपूर्ण आइतें सर्वकाळ ॥ध्रु.॥न लगे वोळावीं इंिद्रयें धांवतां । ठाव नाहीं रिता उरों दिला ॥२॥तुका ह्मणे समपाउलाचा खुंट । केला बळकट हालों नेदी ॥३॥
उत्तम घालावें आमुचिये मुखीं । निवारावें दुःखी होऊनि तें ॥१॥न बैसे न वजे जवळूनि दुरी । मागें पुढें वारी घातपात ॥ध्रु.॥नाहीं शंका असो भलतिये ठायीं । मावळलें पाहीं द्वैताद्वैत ॥२॥तुका ह्मणे भार घेतला विठ्ठलें । अंतरीं भरलें बाहए रूप ॥३॥
आह्मां अळंकार मुद्रांचे शृंगार । तुळसीचे हार वाहों कंठीं ॥१॥लाडिके डिंगर पंढरिरायाचे । निरंतर वाचे नामघोष ॥ध्रु.॥आह्मां आणिकांची चाड चि नाहीं । सर्व सुखें पायीं विठोबाच्या ॥२॥तुका ह्मणे आह्मी नेघों या मुक्ती । एकविण चित्तीं दुजें नाहीं ॥३॥
चला पंढरीसी जाऊं । रखुमादेवीवरा पाहूं ॥१॥डोळे निवतील कान । मना तेथें समाधान ॥ध्रु.॥संतां महंतां होतील भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ॥२॥तें तीर्थांचे माहेर । सर्वसुखाचें भांडार ॥३॥जन्म नाहीं रे आणीक । तुका ह्मणे माझी भाक ॥४॥
पैल घरीं जाली चोरी । देहा करीं बोंब ॥१॥हाबा हाबा करिसी काये । फिराऊनि नेटएां वायें ॥ध्रु.॥सांडुनियां शुद्धी। निजलासी गेली बुद्धी ॥२॥चोरीं तुझा काढला बुर । वेगळें भावा घातलें दूर ॥३॥भलतियासी देसी वाव । लाहेसि तूं एवढा ठाव ॥४॥तुका ह्मणे अझुनि तरी । उरलें तें जतन करीं ॥५॥
किती वेळा खादला दगा । अझून कां जागसी ना ॥१॥लाज नाहीं हिंडतां गांवें । दुःख नवें नित्य नित्य ॥ध्रु.॥सवें चोरा हातीं फांसे । देखतां कैसे न देखसी ॥२॥तुका ह्मणे सांडिती वाट । तळपट करावया ॥३॥
मुदलामध्यें पडे तोटा । ऐसा खोटा उदीम ॥१॥आणिकांची कां लाज नाहीं । आळसा जिहीं तजिलें ॥ध्रु.॥एके सांते सरिखीं वित्तें । हानि हित वेगळालीं ॥२॥तुका ह्मणे हित धरा । नव्हे पुरा गांवढाळ ॥३॥
निरोप सांगतां । न धरीं भय न करीं चिंता ॥१॥असो ज्याचें त्याचे त्याचे माथां । आपण करावी ते कथा ॥ध्रु.॥उतरावा भार । किंवा न व्हावें सादर ॥२॥तुका ह्मणे धाक । तया इह ना परलोक ॥३॥
शूरत्वासी मोल । नये कामा फिके बोल ॥१॥केला न संडी कैवाड । जीवेंसाटीं तों हे होड ॥ध्रु.॥धीर तो कारण । साहए होतो नारायण ॥२॥तुका ह्मणे हरि । दासां रिक्षतो निर्धारीं ॥३॥
हरिच्या दासां भये । ऐसें बोलों तें ही नये ॥१॥राहोनियां आड । उभा देव पुरवी कोड ॥ध्रु.॥हरिच्या दासां चिंता। अघटित हे वार्ता ॥२॥खावे ल्यावें द्यावें । तुका ह्मणे पुरवावें ॥३॥
दासां सर्व काळ । तेथें सुखाचे कल्लोळ ॥१॥जेथें वसती हरिदास । पुण्य पिके पापा नास ॥ध्रु.॥फिरे सुदर्शन । घेऊनियां नारायण ॥२॥तुका ह्मणे घरीं । होय ह्मणियारा कामारी ॥३॥
आमचा स्वदेश । भुवनत्रयामध्यें वास ॥१॥मायबापाचीं लाडकीं । कळों आलें हें लौकिकीं ॥ध्रु.॥नाहीं निपराद । कोणां आह्मांमध्यें भेद ॥२॥तुका ह्मणे मान । अवघें आमचें हें धन ॥३॥
काय ढोरापुढें घालूनि मिष्टान्न । खरा विलेपन चंदनाचें ॥१॥नको नको देवा खळाची संगति । रस ज्या पंगती नाहीं कथे ॥ध्रु.॥काय सेज बाज माकडा विलास । अळंकारा नास करुनी टाकी ॥२॥तुका ह्मणे काय पाजूनि नवनीत । सर्पा विष थीत अमृताचें ॥३॥
आनंदें एकांतीं प्रेमें वोसंडत । घेऊं अगणित प्रेमसुख ॥१॥गोप्य धन वारा लागों यास । पाहों नेदूं वास दुर्जनासी ॥ध्रु.॥झणी दृष्टि लागे आवडीच्या रसा । सेवूं जिरे तैसा आपणासी ॥२॥तुका ह्मणे हें बहु सकुमार । न साहावे भार वचनाचा ॥३॥
मोक्षपदें तुच्छ केलीं याकारणें । आह्मां जन्म घेणें युगायुगीं ॥१॥विटे ऐसें सुख नव्हे भिक्तरस । पुडतीपुडती आस सेवावें हें ॥ध्रु.॥देवा हातीं रूप धरविला आकार । नेदूं निराकार होऊं त्यासी ॥२॥तुका ह्मणे चित्त निवांत राहिलें । ध्याइप तीं पाउलें विटेवरि ॥३॥
नको बोलों भांडा । खीळ घालुन बैस तोंडा ॥१॥ऐक विठोबाचे गुण । करीं सादर श्रवण ॥ध्रु.॥प्रेमसुखा आड । काय वाजातें चाभाड ॥२॥तुका ह्मणे हिता । कां रे नागवसी थीता ॥३॥
अति जालें उत्तम वेश्येचें लावण्य । परि ते सवासीण न ह्मणावी ॥१॥उचित अनुचित केले ठाया ठाव । गुणां मोल वाव थोरपण ॥ध्रु.॥शूरत्वावांचूनि शूरांमाजी ठाव । नाहीं आयुर्भाव आणिलिया ॥२॥तुका ह्मणे सोंग पोटाचे उपाय । कारण कमाईिवण नाहीं ॥३॥
शूरां साजती हतियारें । गांढएां हासतील पोरें ॥१॥काय केली विटंबण । मोतीं नासिकावांचून ॥ध्रु.॥पतिव्रते रूप साजे। सिंदळ काजळ लेतां लाजे ॥२॥दासी पत्नी सुता । नव्हे सरी एक पिता ॥३॥मान बुद्धिवंतां । थोर न मनिती पिता ॥४॥तुका ह्मणे तरी । आंत शुद्ध दंडे वरी ॥५॥
काय केलें जळचरीं । ढीवर त्यांच्या घातावरी ॥१॥हा तों ठायींचा विचार । आहे यातिवैराकार ॥ध्रु.॥श्वापदातें वधी । निरपराधें पारधी ॥२॥तुका ह्मणे खळ । संतां पीडिती चांडाळ ॥३॥
वाइटानें भलें । हीनें दाविलें चांगलें ॥१॥एकाविण एका । कैचें मोल होतें फुका ॥ध्रु.॥विषें दाविलें अमृत । कडू गोड घातें हित ॥२॥काळिमेनें ज्योती । दिवस कळों आला राती ॥३॥उंच निंच गारा । हिरा परिस मोहरा ॥४॥तुका ह्मणे भले । ऐसे नष्टांनीं कळले ॥५॥
असो खळ ऐसे फार । आह्मां त्यांचे उपकार ॥१॥करिती पातकांची धुनी । मोल न घेतां साबनीं ॥ध्रु.॥फुकाचे मजुर। ओझें वागविती भार ॥२॥पार उतरुन ह्मणे तुका । आह्मां आपण जाती नरका ॥३॥
संत पंढरीस जाती । निरोप धाडीं तया हातीं ॥१॥माझा न पडावा विसर । तुका विनवितो किंकर ॥ध्रु.॥केरसुणी महाद्वारीं । ते मी असें निरंतरीं ॥२॥तुमचे पायीं पाइतन । मोचे माझे तन मन ॥३॥तांबुलाची पिकधरणी । ते मी असें मुख पसरूनि ॥४॥तुमची इष्टा पंढरीराया । ते सारसुबी माझी काया ॥५॥लागती पादुका । ते मी तळील मृत्तिका ॥६॥तुका ह्मणे पंढरिनाथा। दुजें न धरावें सर्वथा ॥७॥
इच्छेचें पाहिलें । डोळीं अंतीं मोकलिलें ॥१॥यांचा विश्वास तो काई । ऐसें विचारूनि पाहीं ॥ध्रु.॥सुगंध अभ्यंगें पाळितां । केश फिरले जाणतां ॥२॥पिंड पाळितां ओसरे । अवघी घेऊनि मागें सरे ॥३॥करितां उपचार । कोणां नाहीं उपकार ॥४॥अल्प जीवन करीं । तुका ह्मणे साधीं हरी ॥५॥
यज्ञनिमित्त तें शरिरासी बंधन । कां रे तृष्णा वांयांविण वाढविली ॥१॥नव्हे ते भिक्त परलोकसाधन । विषयांनीं बंधन केलें तुज ॥ध्रु.॥आशा धरूनि फळाची । तीथाअ व्रतीं मुक्ति कैंचि ॥२॥तुका ह्मणे सिणसी वांया । शरण न वजतां पंढरिराया ॥३॥
संध्या कर्म ध्यान जप तप अनुष्ठान । अवघें घडे नाम उच्चारितां ।न वेचे मोल कांहीं लागती न सायास । तरी कां आळस करिसी झणी ॥१॥ऐसें हे सार कां नेघेसी फुकाचें । काय तुझें वेचे मोल तया ॥ध्रु.॥पुत्रस्नेहें शोक करी अजामेळ । तंव तो कृपाळ जवळी उभा ।अनाथांच्या नाथें घातला विमानीं । नेला उचलूनि परलोका ॥२॥अंतकाळीं गणिका पिक्षयाच्या छंदें । राम राम उच्चारिलें ।तंव त्या दिनानाथा कृपा आली । त्यानें तयेसी वैकुंठा नेलें ॥३॥अवचिता नाम आलिया हे गती । चिंतितां चित्तीं जवळी असे ।तुका ह्मणे भावें स्मरा राम राम । कोण जाणे तये दशे ॥४॥
दुष्टाचें चित्त न भिन्ने अंतरीं । जरी जन्मवरी उपदेशिला।पालथे घागरी घातलें जीवन । न धरी च जाण तें ही त्याला ॥१॥जन्मा येउनि तेणें पतन चि साधिलें । तमोगुणें व्यापिलें जया नरा।जळो जळो हें त्याचें ज्यालेपण । कासया हे आलें संवसारा ॥ध्रु.॥पाषाण जीवनीं असतां कल्पवरी । पाहातां अंतरीं कोरडा तो।कुचर मुग नये चि पाका । पाहातां सारिखा होता तैसा ॥२॥तुका ह्मणे असे उपाय सकळां । न चले या खळा प्रेत्न कांहीं ।ह्मणऊनि संग न करितां भला । धरितां अबोला सर्व हित ॥३॥
कासियानें पूजा करूं केशीराजा । हा चि संदेह माझा फेडीं आतां ॥१॥उदकें न्हाणूं तरी स्वरूप तुझें । तेथें काय माझें वेचे देवा ॥ध्रु.॥गंधाचा सुगंध पुष्पाचा परिमळ । तेथें मी दुर्बळ काय करूं ॥२॥फळदाता तूंच तांबोल अक्षता । तरी काय आतां वाहों तुज ॥३॥वाहूं दिक्षणा जरी धातु नारायण । ब्रह्म तें चि अन्न दुजें काई ॥४॥गातां तूं ओंकार टाळी नादेश्वर । नाचावया थार नाहीं कोठें ॥५॥तुका ह्मणें मज अवघें तुझें नाम । धूप दीप रामकृष्णहरि ॥६॥
गातां आइकतां कांटाळा जो करी । वास त्या अघोरीं कुंभपाकीं ॥१॥रागें यमधर्म जाचविती तया । तु दिलें कासया मुख कान ॥ध्रु.॥विषयांच्या सुखें अखंड जगासी । न वजे एकादशी जागरणा ॥२॥वेचूनियां द्रव्य सेवी मद्यपान । नाहीं दिलें अन्न अतीतासी ॥३॥तीर्थाटण नाहीं केले उपकार । पाळिलें शरीर पुष्ट लोभें ॥४॥तुका ह्मणे मग केला साहे दंड । नाइकती लंड सांगितलें ॥५॥
तुझें ह्मणवितां काय नास जाला । ऐकें बा विठ्ठला कीर्ती तुझी ॥१॥परी तुज नाहीं आमचे उपकार । नामरूपा थार केलियाचे ॥ध्रु.॥समूळीं संसार केला देशधडी । सांडिली आवडी ममतेची ॥२॥लोभ दंभ काम क्रोध अहंकार । यांसी नाहीं थार ऐसें केलें ॥३॥मृत्तिका पाषाण तैसें केलें धन । आपले ते कोण पर नेणों ॥४॥तुका ह्मणे जालों देहासी उदार । आणीक विचार काय तेथें ॥५॥
बैसोनि निवांत शुद्ध करीं चित्त । तया सुखा अंतपार नाहीं ॥१॥येऊनि अंतरीं राहील गोपाळ । सायासाचें फळ बैसलिया ॥ध्रु.॥राम कृष्ण हरि मुकुंद मुरारि । मंत्र हा उच्चारीं वेळोवेळां ॥२॥तुका ह्मणे ऐसें देईन मी दिव्य । जरी होइल भाव एकविध ॥३॥
धन्य ते पंढरी धन्य भीमातीर । आणियेलें सार पुंडलिकें ॥१॥धन्य तो हि लोक अवघा दैवांचा । सुकाळ प्रेमाचा घरोघरीं ॥ध्रु.॥धन्य ते ही भूमी धन्य तरुवर । धन्य ते सुरवर तीर्थरूप ॥२॥धन्य त्या नरनारी मुखीं नाम ध्यान । आनंदें भवन गर्जतसे ॥३॥धन्य पशु पक्षी कीटक पाषाण । अवघा नारायण अवतरला ॥४॥तुका ह्मणे धन्य संसारातें आलीं । हरिरंगीं रंगलीं सर्वभावें ॥५॥
मायबाप करिती चिंता । पोर नाइके सांगतां ॥१॥नको जाऊं देउळासी । नेतो बागुल लोकांसी ॥ध्रु.॥कर्णद्वारें पुराणिक। भुलवी शब्दें लावी भीक ॥२॥वैष्णवां संगती । हातीं पडलीं नेणों किती ॥३॥आह्मां कैंचा मग । करिसी उघडियांचा संग ॥४॥तुका ह्मणे जाणें नरका । त्यांचा उपदेश आइका ॥५॥
मन माझें चपळ न राहे निश्चळ । घडी एकी पळ िस्थर नाहीं ॥१॥आतां तूं उदास नव्हें नारायणा । धांवें मज दीना गांजियेलें ॥ध्रु.॥धांव घालीं पुढें इंिद्रयांचे ओढी । केलें तडातडी चित्त माझें ॥२॥तुका ह्मणे माझा न चले सायास । राहिलों हे आस धरुनी तुझी ॥३॥
मागतियाचे दोनि च कर । अमित भांडार दातियाचें ॥१॥काय करूं आतां कासयांत भरूं । हा मज विचारु पडियेला ॥ध्रु.॥एकें सांटवणें प्रेमें वोसंडलीं । जिव्हा हे भागली करितां माप ॥२॥तुका ह्मणे आतां आहे तेथें असो । अंखुनियां बैसों पायांपाशीं ॥३॥
जिचें पीडे बाळ । प्राण तयेचा विकळ ॥१॥ऐसा मातेचा स्वभाव । सूत्र दोरी एक जीव ॥ध्रु.॥सुखाची विश्रांती । उमटे मातेचिये चित्तीं ॥२॥तुका ह्मणे संत । तुह्मी बहु कृपावंत ॥३॥
यावें माहेरास । हे च सर्वकाळ आस ॥१॥घ्यावी उिच्छष्टाची धणी । तीर्थ इच्छी पायवणी ॥ध्रु.॥भोग उभा आड । आहे तोंवरी च नाड ॥२॥तुका ह्मणे देवें । माझें सिद्धी पाववावें ॥३॥
लेंकराचें हित । वाहे माउलीचें चित्त ॥१॥ऐसी कळवळ्याची जाती । करी लाभेंविण प्रीती ॥ध्रु.॥पोटीं भार वाहे। त्याचें सर्वस्व ही साहे ॥२॥तुका ह्मणे माझें । तैसे तुह्मां संतां ओझें ॥३॥
आह्मां गांजी जन । तरि कां मेला नारायण ॥१॥जालों पोरटीं निढळें । नाहीं ठाव बुड आळें ॥ध्रु.॥आह्मीं जना भ्यावें। तरि कां न लाजिजे देवें ॥२॥तुका ह्मणे देश । जाला देवाविण ओस ॥३॥
तुह्मी पाय संतीं । माझे ठेवियेले चित्तीं ॥१॥आतां बाधूं न सके काळ । जालीं विषम शीतळ ॥ध्रु.॥भय नाहीं मनीं । देव वसे घरीं रानीं ॥२॥तुका ह्मणे भये । आतां स्वप्नीं ही नये ॥३॥
काळाचे ही काळ । आह्मी विठोबाचे लडिवाळ ॥१॥करूं सत्ता सर्वां ठायी । वसों निकटवासें पायीं ॥ध्रु.॥ऐसी कोणाची वैखरी । वदे आमुचे समोरी ॥२॥तुका ह्मणे बाण । हातीं हरिनाम तीक्षण ॥३॥
जन्मा येऊन उदार जाला । उद्धार केला वंशाचा । मेळवूनि धन मेळवी माती । सदा विपत्ती भोगीतसे ॥१॥नाम घेतां न मिळे अन्न । नव्हे कारण देखिलिया । धर्म करितां ऐके कानीं । बांधे निजोनि डोकियासी ॥ध्रु.॥घरा व्याही पाहुणा आला । ह्मणे त्याला बरें नाहीं । तुमचे गावीं वैद्य आहे । बैसोनि काय प्रयोजन ॥२॥उजवूं किती होतिल पोरें । मरतां बरें ह्मणे यांसी । ह्मणऊनि देवा नवस करी । दावी घरींहुनि बोनें ॥३॥पर्वकाळीं भट घरासी आला । बोंब घाला ह्मणे पोरां । तुमचा उणा होईल वांटा । काळ पिठासी आला ॥४॥दाढी करितां अडका गेला । घरांत आला बाइलेपें । ह्मणे आतां उगवीं मोडी । डोई बोडीं आपुली ॥५॥तीर्थ स्वप्नीं नेणें गंगा । पूजन लिंगा गांविंचिया । आडकुनि दार बैसे दारीं। आल्या घर ह्मणे ओस ॥६॥तुका ह्मणे ऐसे आहेत गा हरी। या ही तारीं जीवांसी । माझ्या भय वाटे चित्तीं । नरका जाती ह्मणोनि ॥७॥
जाणे वर्तमान । परि तें न वारे त्याच्याने ॥१॥तो ही कारणांचा दास । देव ह्मणवितां पावे नास ॥ध्रु.॥वेची अनुष्ठान। सिद्धी कराया प्रसन्न ॥२॥तुका ह्मणे त्याचें । मुदल गेलें हाटवेचें ॥३॥
घातला दुकान । पढीये तैसा आहे वान ॥१॥आह्मी भांडारी देवाचे । द्यावें घ्यावें माप वाचे ॥ध्रु.॥उगवूं जाणों मोडी । जाली नव्हे त्याची जोडी ॥२॥तुका ह्मणे पुडी । मोल तैसी खरी कुडी ॥३॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

ऐसें
— असे
तुज
— तुला
तया
— त्याला, त्या
सकळ
— सर्व
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
ठायीं
— ठिकाणी
काई
— काय
घडे
— घडते, शक्य होते
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
तैसें
— तसे
वरी
— वर; शिवाय
पुढती
— पुन्हा, पुढे
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
वैराग्य
— आसक्ती सुटणे
ब्रह्म
— सर्वव्यापी अंतिम तत्त्व

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा