मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
तुकाराम गाथा

साहित्य

तुकाराम गाथा

अभंग १८४५–१९४८

Tukaram Gatha, part 19

रचना — संत तुकाराम · १६०८–१६५०

सारांश

तुकाराम गाथेचा भाग १९ — अभंग १८४५ ते १९४८.

भोग द्यावे देवा । त्याग भोगीं च बरवा ॥१॥आपण व्हावें एकीकडे । देव कळेवरी जोडे ॥ध्रु.॥योजे यथाकाळें । उत्तम पाला कंदें मूळें ॥२॥वंचक त्यासी दोष । तुका ह्मणे मिथ्या सोस॥३॥
पायांच्या प्रसादें । कांहीं बोलिलों विनोदें ॥१॥मज क्षमा करणें संतीं । नव्हे अंगभूत युक्ति ॥ध्रु.॥नव्हे हा उपदेश । तुमचें बडबडिलों शेष ॥२॥तुमचे कृपेचें पोसणें । जन्मोजन्मीं तुका ह्मणे ॥३॥
जायांचें अंगुलें लेतां नाहीं मान । शोभा नेदी जन हांसविलें ॥१॥गुसिळतां ताक कांडितां भूस । साध्य नाहीं क्लेश जाती वांयां ॥२॥तुका ह्मणे नाहीं स्वता भांडवल । भिकेचें तें फोल बीज नव्हे ॥३॥
न बोलावें परी पडिला प्रसंग । हाकलितें जग तुझ्या नामें ॥१॥लटिकें चि सोंग मांडिला पसारा । भिकारी तूं खरा कळों आलें ॥ध्रु.॥निलाजिरीं आह्मी करोनियां धीर । राहिलों आधार धरूनियां ॥२॥कैसा नेणों आतां करिसी शेवट । केली कटकट त्याची पुढें ॥३॥तुका ह्मणे कांहीं न बोलसी देवा । उचित हे सेवा घेसी माझी ॥४॥
नाहीं जालें मोल कळे देतां काळीं । कोण पाहों बळी दोघांमध्यें ॥१॥आह्मी तरी जालों जीवासी उदार । कैंचा हा धीर तुजपाशीं ॥ध्रु.॥बहु चाळविलें मागें आजिवरी । आतां पुढें हरि जाऊं नेदीं ॥२॥नव्हती जों भेटी नामाची ओळखी । ह्मणऊनि दुःखी बहु जालें ॥३॥तुका ह्मणे कांहीं राहों नेदीं बाकी । एकवेळा चुकी जाली आतां ॥४॥
कैसा कृपाळु हें न कळसी देवा । न बोलसी सेवा घेसी माझी ॥१॥काय ऐसें बळ आहे तुजपाशीं । पाहों हा रिघेसी कोणा आड ॥ध्रु.॥पाडियेला ठायीं तुझा थारा मारा । अवघा दातारा लपसी तो ॥२॥आतां तुह्मां आह्मां उरी तों चि बरें । काय हें उत्तरें वाढवूनि ॥३॥तुका ह्मणे मज साहए झाले संत । ह्मणऊनि मात फावली हे ॥४॥
चुकलिया आह्मां करितसां दंड । हाकासी कां खंड पांडुरंगा ॥१॥चाळविलीं एकें रिद्धिसिद्धीवरी । तैसा मी भिकारी नव्हें देवा ॥ध्रु.॥कां मी येथें गुंतों मांडूनि पसारा । मागुता दातारा दंभासाटीं ॥२॥केलें म्यां जतन आपुलें वचन । ठायींचें धरून होतों पोटीं ॥३॥तुका ह्मणे ताळा घातला आडाखीं । ठावें होतें सेकीं आडविसी ॥४॥
आतां तुझा भाव कळों आला देवा । ठकूनियां सेवा घेसी माझी ॥१॥टाकूनि सांकडें आपुलिये माथां । घातला या संतावरी भार ॥ध्रु.॥स्तुती करवूनि पिटिला डांगोरा । तें कोण दातारा साच करी ॥२॥जातीचें वाणी मी पोटींचे कुडें । नका मजपुढें ठकाठकी ॥३॥तुका ह्मणे नाहीं आलें अनुभवा । आधीं च मी देवा कैसें नाचों ॥४॥
जन पूजी याचा मज कां आभार । हा तुह्मी विचार जाणां देवा ॥१॥पत्र कोण मानी वंदितील सिक्का । गौरव सेवका त्या चि मुळें ॥ध्रु.॥मी मीपणें होतों जनामधीं आधीं । कोणें दिलें कधीं काय तेव्हां ॥२॥आतां तूं भोगिता सर्व नारायणा । नको आह्मां दीनां पीडा करूं ॥३॥आपुलिया हातें देसील मुशारा । तुका ह्मणे खरा तो चि आह्मां ॥४॥
तुह्मां आह्मां तुटी होईल यावरी । ऐसें मज हरी दिसतसे ॥१॥वचनाचा कांहीं न देखों आधार । करावा हा धीर कोठवरी ॥ध्रु.॥सारिलें संचित होतें गांठी कांहीं । पुढें ॠण तें ही नेदी कोणी ॥२॥जावें चि न लगे कोणांचिया घरा । उडाला पातेरा तुझ्या संगें ॥३॥तुका ह्मणे आह्मां हा चि लाभ जाला । मनुष्यधर्म गेला पांडुरंगा ॥४॥
देव मजुर देव मजुर । नाहीं उजुर सेवेपुढें ॥१॥देव गांढएाळ देव गांढएाळ । देखोनियां बळ लपतसे ॥२॥देव तर काई देव तर काई । तुका ह्मणे राई तरी मोटी ॥३॥
देव दयाळ देव दयाळ । साहे कोल्हाळ बहुतांचा॥१॥देव उदार देव उदार । थोडएासाटीं फार देऊं जाणे ॥२॥देव चांगला देव चांगला । तुका लागला चरणीं ॥३॥
देव बासर देव बासर । असे निरंतर जेथें तेथें ॥१॥देव खोळंबा देव खोळंबा । मज झळंबा म्हूण कोंडी ॥ध्रु.॥देव लागट देव लागट । लाविलिया चट जीवीं जडे ॥२॥देव बावळा देव बावळा । भावें जवळा लुडबुडी ॥३॥देव न व्हावा देव न व्हावा। तुका ह्मणे गोवा करी कामीं ॥४॥
देव निढळ देव निढळ । मूळ नाहीं डाळ परदेशी॥१॥देव अकुळी देव अकुळी । भलते ठायीं सोयरीक ॥२॥देव लिगाडएा देव लिगाडएा । तुका ह्मणे भाडएा दंभें ठकी ॥३॥
देव बराडी देव बराडी । घाली देंठासाटीं उडी ॥१॥देव भ्याड देव भ्याड । राखे बळीचें कवाड ॥ध्रु.॥देव भाविक भाविक । होय दासाचें सेवक ॥२॥देव होया देव होया । जैसा ह्मणे तैसा तया ॥३॥देव लाहान लाहान । तुका ह्मणे अनुरेण॥४॥
देव भला देव भला । मिळोनि जाय जैसा त्याला॥१॥देव उदार उदार । देतां नाहीं थोडें फार ॥ध्रु.॥देव बळी देव बळी। जोडा नाहीं भूमंडळीं ॥२॥देव व्हावा देव व्हावा । आवडे तो सर्वां जीवां ॥३॥देव चांगला चांगला । तुका चरणीं लागला ॥४॥
देव पाहों देव पाहों । उंचे ठायीं उभे राहों ॥१॥देव देखिला देखिला । तो नाहीं कोणां भ्याला ॥ध्रु.॥देवा कांहीं मागों मागों । जीव भाव त्यासी सांगों ॥२॥देव जाणे देव जाणे । पुरवी मनींचिये खुणे ॥३॥देव कातर कातर । तुका ह्मणे अभ्यंतर ॥४॥
देव आमचा आमचा । जीव सकळ जीवांचा ॥१॥देव आहे देव आहे । जवळीं आह्मां अंतरबाहे ॥ध्रु.॥देव गोड देव गोड । पुरवी कोडाचें ही कोड ॥२॥देव आह्मां राखे राखे । घाली किळकाळासी काखे ॥३॥देव दयाळ देव दयाळ । करी तुक्याचा सांभाळ ॥४॥
जाऊं देवाचिया गांवां । देव देईल विसांवा ॥१॥देवा सांगों सुखदुःख । देव निवारील भूक ॥ध्रु.॥घालूं देवासी च भार। देव सुखाचा सागर ॥२॥राहों जवळी देवापाशीं । आतां जडोनि पायांसी ॥३॥तुका ह्मणे आह्मी बाळें । या देवाचीं लडिवाळें॥४॥
प्रेम तेथें वास करी । मुखीं उच्चारितां हरी ॥१॥प्रेम यावें तया गांवा । चोजवीत या वैष्णवां ॥ध्रु.॥प्रेमें पाठी लागे बळें। भक्त देखोनियां भोळे ॥२॥प्रेम न वजे दवडितां । शिरे बळें जेथें कथा ॥३॥तुका ह्मणे थोर आशा । प्रेमा घरीं विष्णुदासां॥४॥
संत मानितील मज । तेणें वाटतसे लाज ॥१॥तुह्मी कृपा केली नाहीं । चित्त माझें मज ग्वाही ॥ध्रु.॥गोविलों थोरिवां । दुःख वाटतसे जीवा ॥२॥तुका ह्मणे माया । अवरा हे पंढरिराया ॥३॥
नाहीं तुह्मी केला । अंगीकार तो विठ्ठला ॥१॥सोंगें न पवीजे थडी । माजी फुटकी सांगडी ॥ध्रु.॥प्रेम नाही अंगीं । भले ह्मणविलें जगीं ॥२॥तुका ह्मणे देवा । मज वांयां कां चाळवा॥३॥
आतां चक्रधरा । झणी आह्मांस अव्हेरा ॥१॥तुमचीं ह्मणविल्यावरी । जैसीं तैसीं तरी हरी ॥ध्रु.॥काळ आह्मां खाय । तरी तुझें नांव जाय ॥२॥तुका ह्मणे देवा । आतां पण सिद्धी न्यावा ॥३॥
मज ऐसें कोण उद्धरिलें सांगा । ब्रीदें पांडुरंगा बोलतसां ॥१॥हातींच्या कांकणां कायसा आरिसा । उरलों मी जैसा तैसा आहें ॥ध्रु.॥धनमंत्री हरी रोग्याचिये वेथे । तें तों कांहीं येथें न देखिजे ॥२॥तुका ह्मणे नाहीं अनुभव अंगें । वचन वाउगें कोण मानी ॥३॥
काय तें सामर्थ्य न चले या काळें । काय जालीं बळें शिक्तहीण ॥१॥माझिया संचितें आणिलासी हरी । जालें तुजवरी वरिष्ठ तें ॥ध्रु.॥काय गमाविली सुदर्शन गदा । नो बोला गोविंदा लाजतसां ॥२॥तुका ह्मणे काय िब्रदाचें तें काम । सांडा परतें नाम दिनानाथ ॥३॥
बळ बुद्धी वेचुनियां शक्ती । उदक चालवावें युक्ती॥१॥नाहीं चळण तया अंगीं । धांवें लवणामागें वेगीं॥ध्रु.॥पाट मोट कळा । भरित पखाळा सागळा ॥२॥बीज ज्यासी घ्यावें। तुका ह्मणे तैसें व्हावें ॥३॥
न ह्मणे साना थोर । दृष्ट पापी अथवा चोर ॥१॥सकळा द्यावी एकी चवी । तान हरूनि निववी ॥ध्रु.॥न ह्मणे दिवस राती । सर्व काल सर्वां भूतीं ॥२॥तुका ह्मणे झारी । घेतां तांब्यानें खापरी ॥३॥
इच्छा चाड नाहीं । न धरी संकोच ही कांहीं ॥१॥उदका नेलें तिकडे जावें । केलें तैसें सहज व्हावें ॥ध्रु.॥मोहरी कांदा ऊंस । एक वाफा भिन्न रस ॥२॥तुका ह्मणे सुख । पीडा इच्छा पावे दुःख ॥३॥
तरले ते मागें आपुलिया सत्ता । कमाई अनंता करूनियां ॥१॥उसनें फेडितां धर्म तेथें कोण । ते तुज अनन्ये तुह्मी त्यांसी ॥ध्रु.॥मज ऐसा कोण सांगा वांयां गेला । तो तुह्मी तारिला पांडुरंगा ॥२॥तुका ह्मणे नांवासारिखी करणी । न देखें हें मनीं समजावें ॥३॥
कवणांशीं भांडों कोण माझें साहे । कोण मज आहे तुजविण ॥१॥धरिलें उदास दुरदुरांतरें । सांडी एकसरें केली माझी॥ध्रु.॥आइकोन माझे नाइकसी बोल । देखोनियां खोळ बुंथी घेसी ॥२॥तुका ह्मणे एके गांवींची वसती । ह्मणऊनि खंती वाटे देवा ॥३॥
आळवितां कंठ शोकला भीतर । आयुष्य वेचे धीर नाहीं मना ॥१॥अझून कां नये हें तुझ्या अंतरा । दिनाच्या माहेरा पांडुरंगा ॥ध्रु.॥धन दिसे डोळा दगडाचे परी । भोग ते शरीरीं विष जालें ॥२॥चुकलों काय तें मज क्षमा करीं । आिंळगूनि हरी प्रेम द्यावें ॥३॥अवस्था राहिली रूपाची अंतरीं । बाहेर भीतरी सर्व काळ ॥४॥तुका ह्मणे माजे सकळ उपाय । पांडुरंगा पाय तुझे आतां ॥५॥॥ शिवाजी राजे यांनीं स्वामींस अबदागिरी, घोडा,कारकून असे न्यावयास पाठविले ते अभंग ॥ १४ ॥
दिवटएा छत्री घोडे । हें तों ब†यांत न पडे ॥१॥आतां येथें पंढरिराया । मज गोविसी कासया ॥ध्रु.॥मान दंभ चेष्टा। हे तों शूकराची विष्ठा ॥२॥तुका ह्मणे देवा । माझे सोडववणे धांवा ॥३॥
नावडे जें चित्ता । तें चि होसी पुरविता ॥१॥कां रे पुरविली पाठी । माझी केली जीवेसाटीं ॥ध्रु.॥न करावा संग । वाटे दुरावावें जग ॥२॥सेवावा एकांत । वाटे न बोलावी मात ॥३॥जन धन तन । वाटे लेखावें वमन ॥४॥तुका ह्मणे सत्ता । हातीं तुझ्या पंढरिनाथा ॥५॥
जाणोनि अंतर । टाळिसील करकर ॥१॥तुज लागली हे खोडी । पांडुरंगा बहु कुडी ॥ध्रु.॥उठविसी दारीं । धरणें एखादिया परी ॥२॥तुका ह्मणे पाये । कैसे सोडीन ते पाहें ॥३॥
नाहीं विचारीत । मेघ हागनदारी सेत ॥१॥नये पाहों त्याचा अंत । ठेवीं कारणापें चित्त ॥ध्रु.॥वर्जीत गंगा । नाहीं उत्तम अधम जगा ॥२॥तुका ह्मणे मळ । नाहीं अग्नीसी विटाळ॥३॥
काय दिला ठेवा । आह्मां विठ्ठल चि व्हावा ॥१॥तुह्मी कळलेती उदार । साटीं परिसाची गार ॥ध्रु.॥जीव दिला तरी। वचना माझ्या नये सरी ॥२॥तुका ह्मणे धन । आह्मां गोमासासमान ॥३॥
पिकवावें धन । ज्याची आस करी जन ॥१॥पुढें उरे खातां देतां । नव्हे खंडण मवितां ॥ध्रु.॥खोलीं पडे ओली बीज। तरीं च हातीं लागे निज ॥२॥तुका ह्मणे धनी । विठ्ठल अक्षरी हीं तिन्ही ॥३॥
मुंगी आणि राव । आह्मां सारखाची जीव ॥१॥गेला मोह आणि आशा । किळकाळाचा हा फांसा ॥ध्रु.॥सोनें आणि माती। आह्मां समान हें चित्तीं ॥२॥तुका ह्मणे आलें । घरा वैकुंठ सगळें ॥३॥
तिहीं त्रिभुवनीं । आह्मी वैभवाचे धनी ॥१॥हातां आले घाव डाव । आमचा मायबाप देव ॥ध्रु.॥काय त्रिभुवनीं बळ। अंगीं आमुच्या सकळ ॥२॥तुका ह्मणे सत्ता । अवघी आमुची च आतां ॥३॥
आह्मी तेणें सुखी । ह्मणा विठ्ठल विठ्ठल मुखीं ॥१॥तुमचें येर वित्त धन । तें मज मृत्तिकेसमान ॥ध्रु.॥कंटीं मिरवा तुळसी । व्रत करा एकादशी ॥२॥ह्मणवा हरिचे दास । तुका ह्मणे मज हे आस ॥३॥॥९॥
भावापुढें बळ । नाहीं कोणाचे सबळ ॥१॥करी देवावरी सत्ता । कोण त्याहूनि परता ॥ध्रु.॥बैसे तेथें येती । न पाचारितां सर्व शिक्त ॥२॥तुका ह्मणे राहे । तयाकडे कोण पाहे॥३॥
भावाचिया बळें । आह्मी निर्भर दुर्बळें ॥१॥नाहीं आणिकांची सत्ता । सदा समाधान चित्ता ॥ध्रु.॥तर्का नाहीं ठाव । येथें रिघावया वाव ॥२॥एकछत्रीं राज । तुक्या पांडुरंगीं काज॥३॥
सत्तावर्त्ते मन । पाळी विठ्ठलाची आन ॥१॥आज्ञा वाहोनियां शिरीं । सांगितलें तें चि करीं ॥ध्रु.॥सरलीसे धांव । न लगे वाढवावी हांव ॥२॥आहे नाहीं त्याचें । तुका ह्मणे कळे साचें॥३॥
खावें ल्यावें द्यावें । जमाखर्च तुझ्या नांवें ॥१॥आतां चुकली खटपट । झाडएा पाडएाचा बोभाट ॥ध्रु.॥आहे नाहीं त्याचें । आह्मां काम सांगायाचें ॥२॥तुका ह्मणे चिंता । भार वाहे तुझ्या माथां ॥३॥
आतां बरें जालें । माझे माथांचें निघालें ॥१॥चुकली हे मरमर । भार माथांचे डोंगर ॥ध्रु.॥नसतां कांहीं जोडी । करिती बहुतें तडातोडी ॥२॥जाला झाडापाडा । तुका ह्मणे गेली पीडा ॥३॥
संचितें चि खावें । पुढें कोणाचें न घ्यावें ॥१॥आतां पुरे हे चाकरी । राहों बैसोनियां घरीं ॥ध्रु.॥नाहीं काम हातीं। आराणूक दिसराती ॥२॥तुका ह्मणे सत्ता । पुरे पराधीन आतां ॥३॥
ज्याचे गांवीं केला वास । त्यासी नसावें उदास॥१॥तरी च जोडिलें तें भोगे । कांहीं आघात न लगे ॥ध्रु.॥वाढवावी थोरी। मुखें ह्मणे तुझे हरी ॥२॥तुका ह्मणे हे गोमटी । दासा न घलावी तुटी ॥३॥
माझा तुह्मी देवा केला अंगीकार । हें मज साचार कैसें कळे ॥१॥कां हो कांहीं माझ्या नये अनुभवा । विचारितां देवा आहें तैसा ॥ध्रु.॥लौकिकाचा मज लाविसी आभार । शिरोरत्नभार दुःखाचा हा ॥२॥तुका ह्मणे नाहीं पालट अंतरीं । तेथें दिसे हरी ठकाठकी ॥३॥
तोंडें बोलावें तें तरी वाटे खरें । जीव येरेयेरें वंचिजे ना ॥१॥हें तुह्मां सांगणें काय उगवूनि । जावें समजोनि पांडुरंगा॥ध्रु.॥जेवित्याची खूण वाढित्या अंतरीं । प्रीतीनें हे धरी चाली तेथें ॥२॥तुका ह्मणे बहु परीचे आदर । अत्यंत वेव्हारसंपादणी ॥३॥
न पालटे एक । भोळा भक्त चि भाविक ॥१॥येरां नास आहे पुढें । पुण्य सरतां उघडें ॥ध्रु.॥नेणे गर्भवास । एक विष्णूचा चि दास ॥२॥तुका ह्मणे खरें । नाम विठोबाचे बरें ॥३॥॥ स्वामींनीं पत्र पंढरीनाथास पंढरीस पाठविलें ते अभंग ॥ ६६ ॥संतांबरोबर पाठविल्या पत्राचे अभंग ३६
कोणा मुखें ऐसी ऐकेन मी मात । चाल तुज पंढरिनाथ बोलावितो ॥१॥मग मी न धरीं आस मागील बोभाट । वेगीं धरिन वाट माहेराची ॥ध्रु.॥निरांजिरें चित्त करितें तळमळ । केधवां देखती मूळ आलें डोळे ॥२॥तुका ह्मणे कइप भाग्याची उजरी। होईल पंढरी देखावया ॥३॥
कां माझा विसर पडिला मायबाप । सांडियेली कृपा कोण्या गुणें ॥१॥कैसा कंठूनियां राहों संवसार । काय एक धीर देऊं मना ॥ध्रु.॥नाहीं निरोपाची पावली वारता । करावी ते चिंता ऐसी कांहीं ॥२॥तुका ह्मणे एक वेचूनि वचन । नाहीं समाधान केलें माझें ॥३॥
कांहीं माझे कळों आले गुणदोष । ह्मणऊनि उदास धरिलें ऐसें ॥१॥नाहीं तरी येथें न घडे अनुचित । नाहीं ऐसी रीत तया घरीं ॥ध्रु.॥कळावें तें मना आपुलिया सवें । ठायींचे हें घ्यावें विचारूनि ॥२॥मज अव्हेरिलें देवें । माझिया कर्तव्यें बुद्धीचिया॥३॥
नव्हे धीर कांहीं पाठवूं निरोप । आला तरीं कोप येऊ सुखें ॥१॥कोपोनियां तरी देईल उत्तर । जैसें तैसें पर फिरावूनि ॥ध्रु.॥नाहीं तया तरी काय एक पोर । मज तों माहेर आणीक नाहीं ॥२॥तुका ह्मणे असे तयामध्यें हित । आपण निवांत असों नये ॥३॥
आतां पाहों पंथ माहेराची वाट । कामाचा बोभाट पडो सुखें ॥१॥काय करूं आतां न गमेसें जालें । बहुत सोसिलें बहु दिस ॥ध्रु.॥घर लागे पाठी चित्ता उभे वारे । आपुलें तें झुरे पाहावया ॥२॥तुका ह्मणे जीव गेला तरी जाव । धरिला तो देव भाव सिद्धी ॥३॥
विनवीजे ऐसें भाग्य नाहीं देवा । पायांशीं केशवा सलगी केली ॥१॥धीटपणें पत्र लिहिलें आवडी । पार नेणे थोडी मति माझी ॥ध्रु.॥जेथें देवा तुझा न कळे चि पार । तेथें मी पामर काय वाणूं ॥२॥जैसे तैसे माझे बोल अंगीकारीं । बोबडएा उत्तरीं गौरवितों ॥३॥तुका ह्मणे विटेवरि जी पाउलें । तेथें म्यां ठेविलें मस्तक हें ॥४॥
देवांच्या ही देवा गोपिकांच्या पती । उदार हे ख्याती त्रिभुवनीं ॥१॥पातकांच्या रासी नासितोसी नामें । जळतील कर्में महा दोष ॥ध्रु.॥सर्व सुखें तुझ्या वोळगती पायीं । रिद्धि सिद्धि ठायीं मुक्तिचारी ॥२॥इंद्रासी दुर्लभ पाविजे तें पद । गीत गातां छंद वातां टाळी ॥३॥तुका ह्मणे जड जीव शिक्तहीन । त्यांचें तूं जीवन पांडुरंगा ॥४॥
काय जालें नेणों माझिया कपाळा । न देखीजे डोळां मूळ येतां ॥१॥बहु दिस पाहें वचनासी वास । धरिलें उदास पांडुरंगा ॥ध्रु.॥नाहीं निरोपाचें पावलें उत्तर । ऐसें तों निष्ठ न पाहिजे ॥२॥पडिला विसर किंवा कांहीं धंदा । त्याहूनि गोविंदा जरूरसा ॥३॥तुका ह्मणे आलें वेचाचें सांकडें । देणें घेणें पुढें तो ही धाक ॥४॥
देइप डोळे भेटी न धरीं संकोच । न घलीं कांहीं वेच तुजवरी ॥१॥तुज बुडवावें ऐसा कोण धर्म । अहर्निशीं नाम घेतां थोडें ॥ध्रु.॥फार थोडें काहीं करूनि पातळ । त्याजमध्यें काळ कडे लावूं ॥२॥आहे माझी ते चि सारीन सिदोरी । भार तुजवरी नेदीं माझा ॥३॥तुका ह्मणे आह्मां लेंकराची जाती । भेटावया खंती वाटतसे ॥४॥
सीण भाग हरे तेथींच्या निरोपें । देखिलिया रूप उरी नुरे ॥१॥इंिद्रयांची धांव होईल कुंटित । पावेल हें चित्त समाधान॥ध्रु.॥माहेर आहेसें लौकिकीं कळावें । निढळ बरवें शोभा नेदी ॥२॥आस नाहीं परी उरी बरी वाटे । आपलें तें भेटे आपणासी ॥३॥तुका ह्मणे माझी अविट आवडी । खंडण तांतडी होऊं नेदीं ॥४॥
धरितों वासना परी नये फळ । प्राप्तीचा तो काळ नाहीं आला ॥१॥तळमळी चित्त घातलें खापरीं । फुटतसे परी लाहीचिया ॥ध्रु.॥प्रकार ते कांहीं नावडती जीवा । नाहीं पुढें ठावा काळ हातीं ॥२॥जातों तळा येतों मागुता लौकरी । वोळशाचे फेरी सांपडलों ॥३॥तुका ह्मणे बहु करितों विचार । उतरें डोंगर एक चढें ॥४॥
कां माझे पंढरी न देखती डोळे । काय हें न कळे पाप यांचें ॥१॥पाय पंथें कां हे न चलती वाट । कोण हें अदृष्ट कर्म बळी ॥ध्रु.॥कां हें पायांवरी न पडे मस्तक । क्षेम कां हस्तक न पवती ॥२॥कां या इंिद्रयांची न पुरे वासना । पवित्र होईना जिव्हा कीर्ती ॥३॥तुका ह्मणे कइप जाऊनि मोटळें । पडेन हा लोळें महाद्वारीं ॥४॥
काय पोरें जालीं फार । किंवा न साहे करकर ॥१॥ह्मणऊनि केली सांडी । घांस घेऊं न ल्हां तोंडीं ॥ध्रु.॥करूं कलागती। तुज भांडणें भोंवतीं ॥२॥तुका ह्मणे टांचें । घरीं जालेंसे वरोचें ॥३॥
कांहीं चिंतेविण । नाहीं उपजत सीण ॥१॥तरी हा पडिला विसर । माझा तुह्मां जाला भार ॥ध्रु.॥आली कांहीं तुटी । गेली सुटोनियां गांठी ॥२॥तुका ह्मणे घरीं । बहु बैसले रिणकरी॥३॥
निरोपासी वेचे । काय बोलतां फुकाचें ॥१॥परी हें नेघेवे चि यश । भेओं नको सुखी आस ॥ध्रु.॥सुख समाधानें । कोण पाहे देणें घेणें ॥२॥न लगे निरोपासी मोल । तुका ह्मणे वेचे बोल ॥३॥
जोडीच्या हव्यासें । लागे धनांचें चि पिसें ॥१॥मग आणीक दुसरें । लोभ्या नावडती पोरें ॥ध्रु.॥पाहे रुक्याकडे । मग अवघें ओस पडे ॥२॥तुका ह्मणे देवा । तुला बहुत चि हेवा ॥३॥
मविलें मविती । नेणों रासी पडिल्या किती ॥१॥परि तूं धाला चि न धासी । आलें उभाउभीं घेसी ॥ध्रु.॥अवघ्यां अवघा काळ । वाटा पाहाती सकळ ॥२॥तुका ह्मणे नाहीं । अराणूक तुज कांहीं ॥३॥
न बैससी खालीं । सम उभा च पाउलीं ॥१॥ऐसे जाले बहुत दिस । जालीं युगें अठ्ठाविस ॥ध्रु.॥नाहीं भाग सीण । अराणूक एक क्षण ॥२॥तुका ह्मणे किती । मापें केलीं देती घेती॥३॥
जोडी कोणांसाटीं । एवढी करितोसी आटी ॥१॥जरी हें आह्मां नाहीं सुख । रडों पोरें पोटीं भूक ॥ध्रु.॥करूनि जतन। कोणा देसील हें धन ॥२॥आमचे तळमळे । तुझें होईल वाटोळें ॥३॥घेसील हा श्राप । माझा होऊनियां बाप ॥४॥तुका ह्मणे उरी । आतां न ठेवीं यावरी ॥५॥
करूनि चाहाडी । अवघी बुडवीन जोडी ॥१॥जरि तूं होऊनि उदास । माझी बुडविसी आस ॥ध्रु.॥येथें न करी काम। मुखें नेघें तुझें नाम ॥२॥तुका ह्मणे कुळ । तुझें बुडवीन समूळ॥३॥
समर्थाचे पोटीं । आह्मी जन्मलों करंटीं ॥१॥ऐसी जाली जगीं कीर्ति । तुझ्या नामाची फजिती ॥ध्रु.॥येथें नाहीं खाया। न ये कोणी मूळ न्याया ॥२॥तुका ह्मणे जिणें । आतां खोटें जीवपणें ॥३॥
पुढें तरी चित्ता । काय येईल तें आतां ॥१॥मज सांगोनिया धाडीं । वाट पाहातों वराडी ॥ध्रु.॥कंठीं धरिला प्राण । पायांपाशीं आलें मन ॥२॥तुका ह्मणे चिंता । बहु वाटतसे आतां॥३॥
कैंचा मज धीर । कोठें बुद्धि माझी िस्थर ॥१॥जें या मनासी आवरूं । आंत पोटीं वाव धरूं ॥ध्रु.॥कैंची शुद्ध मति। भांडवल ऐसें हातीं ॥२॥तुका ह्मणे कोण दशा आली सांगा ॥३॥
समर्पक वाणी । नाहीं ऐकिजेसी कानीं ॥१॥आतां भावें करूनि साचा । पायां पडिलों विठोबाच्या ॥ध्रु.॥न कळे उचित। करूं समाधान चित्त ॥२॥तुका ह्मणे विनंती । विनविली धरा चित्तीं ॥३॥
येती वारकरी । वाट पाहातों तोंवरी ॥१॥घालूनियां दंडवत । पुसेन निरोपाची मात ॥ध्रु.॥पत्र हातीं दिलें । जया जेथें पाठविलें ॥२॥तुका ह्मणे येती । जाइन सामोरा पुढती ॥३॥
रुळें महाद्वारीं । पायांखालील पायरी ॥१॥तैसें माझें दंडवत । सांगा निरोप हा संत ॥ध्रु.॥पडे दंडकाठी । देह भलतीसवा लोटी ॥२॥तुका ह्मणे बाळ । लोळे न धरितां सांभाळ॥३॥
तुह्मी संतजनीं । माझी करावी विनवणी ॥१॥काय तुक्याचा अन्याय । त्यासी अंतरले पाय ॥ध्रु.॥भाका बहुतां रीती। माझी कीव काकुलती ॥२॥न देखे पंढरी । तुका चरण विटेवरी॥३॥
होइल कृपादान । तरी मी येईन धांवोन ॥१॥होती संतांचिया भेटी । आनंदें नाचों वाळवंटीं ॥ध्रु.॥रिघेन मातेपुढें । स्तनपान करीन कोडें ॥२॥तुका ह्मणे ताप । हरती देखोनियां बाप॥३॥
परिसोनि उत्तर । जाब देईजे सत्वर ॥१॥जरी तूं होसी कृपावंत । तरि हा बोलावीं पतित ॥ध्रु.॥नाणीं कांहीं मना । करूनि पापाचा उगाणा ॥२॥तुका ह्मणे नाहीं । काय शिक्त तुझे पायीं ॥३॥
ऐकोनियां कीर्ती । ऐसी वाटती विश्रांती ॥१॥माते सुख डोळां पडे । तेथें कोण लाभ जोडे ॥ध्रु.॥बोलतां ये वाचे । वीट नये जिव्हा नाचे ॥२॥तुका ह्मणे धांवे । वासना ते रस घ्यावे॥३॥
किती करूं शोक । पुढें वाढे दुःखें दुःख ॥१॥आतां जाणसी तें करीं । माझें कोण मनीं धरी ॥ध्रु.॥पुण्य होतें गांठी । तरि कां लागती हे आटी ॥२॥तुका ह्मणे बळ । माझी राहिली तळमळ ॥३॥
करील आबाळी । माझ्या दांताची कसाळी ॥१॥जासी एखादा मरोन । पाठी लागेल हें जन ॥ध्रु.॥घरीं लागे कळहे। नाहीं जात तो शीतळ ॥२॥तुका ह्मणे पोरवडे । मज येतील रोकडे ॥३॥
आतां आशीर्वाद । माझा असो सुखें नांद ॥१॥ह्मणसी कोणा तरी काळें । आहेतसी माझीं बाळें ॥ध्रु.॥दुरी दूरांतर। तरी घेसी समाचार ॥२॥नेसी कधीं तरी । तुका ह्मणे लाज हरी ॥३॥
आतां हे सेवटीं । माझी आइकावी गोष्टी ॥१॥आतां द्यावा वचनाचा । जाब कळे तैसा याचा ॥ध्रु.॥आतां करकर। पुढें न करीं उत्तर ॥२॥तुका ह्मणे ठसा । तुझा आहे राखें तैसा ॥३॥
बोलिलों ते आतां । कांहीं जाणतां नेणतां ॥१॥क्षमा करावे अन्याय । पांडुरंगे माझे माय ॥ध्रु.॥स्तुती निंदा केली। लागे पाहिजे साहिली ॥२॥तुका ह्मणे लाड । दिला तैसें पुरवा कोड ॥३॥ ॥३६॥या पत्राच्या उत्तराच्या मार्गप्रतीक्षेचे अभंग १९
माहेरिंचा काय येईल निरोप । ह्मणऊनि झोंप नाहीं डोळां ॥१॥वाट पाहें आस धरूनियां जीवीं । निडळा हे ठेवीं वरी बाहे ॥ध्रु.॥बोटवरी माप लेखितों दिवस । होतों कासावीस धीर नाहीं ॥२॥काय नेणों संतां पडेल विसर । कीं नव्हे सादर मायबाप॥३॥तुका ह्मणे तेथें होईल दाटणी । कोण माझें आणी मना तेथें ॥४॥
परि तो आहे कृपेचा सागर । तोंवरी अंतर पडों नेदी॥१॥बहुकानदृष्टी आइके देखणा । पुरोनियां जना उरलासे॥ध्रु.॥सांगितल्याविणें जाणे अंतरिंचें । पुरवावें ज्याचें तैसें कोड ॥२॥बहुमुखें कीर्ती आइकिली कानीं । विश्वास ही मनीं आहे माझा ॥३॥तुका ह्मणे नाहीं जात वांयांविण । पाळितो वचन बोलिलों तें ॥४॥
यावरि न कळे संचित आपुलें । कैसें वोडवलें होइल पुढें ॥१॥करील विक्षेप धाडितां मुळासी । किंवा धाडा ऐसी तांतडी हे ॥ध्रु.॥जोंवरी हे डोळां देखें वारकरी । तों हें भरोवरी करी चित्त ॥२॥आस वाढविते बुद्धीचे तरंग । मनाचे ही वेग वावडती॥३॥तुका ह्मणे तेव्हां होतील निश्चळ । इंिद्रयें सकळ निरोपानें ॥४॥
होईल निरोप घेतला यावरी । राउळाभीतरीं जाऊनियां॥१॥करूनियां दधिमंगळभोजन । प्रयाण शकुनसुमुहूर्तें॥ध्रु.॥होतील दाटले सद्गदित कंठीं । भरतें या पोटीं वियोगाचें ॥२॥येरयेरां भेटी क्षेम आलिंगनें । केलीं समाधान होतीं संतीं ॥३॥तुका ह्मणे चाली न साहे मनास । पाहाती कळस परपरतों ॥४॥
ऐसी ते सांडिली होईल पंढरी । येते वारकरी होत वाटे ॥१॥देखिले सोहळे होती आठवत । चालती ते मात करूनियां ॥ध्रु.॥केली आइकिली होईल जे कथा । राहिलें तें चित्ता होइल प्रेम ॥२॥गरुडटके टाळ मृदांग पताका । सांगती ते एकां एक सुख ॥३॥तुका ह्मणे आतां येती लवलाहीं । आलिंगूनि बाहीं देइन क्षेम ॥४॥
क्षेम मायबाप पुसेन हें आधीं । न घलीं हें मधीं सुख दुःख ॥१॥न करीं तांतडी आपणांपासूनि । आइकेन कानीं सांगतीं तें ॥ध्रु.॥अंतरींचें संत जाणतील गूज । निरोप तो मज सांगतील॥२॥पायांवरी डोई ठेवीन आदरें । प्रीतिपडिभरें आिंळगून ॥३॥तुका ह्मणे काया करीन कुरवंडी । ओवाळून सांडीं त्यांवरून ॥४॥
होइल माझी संतीं भाकिली करुणा । जे त्या नारायणा मनीं बैसे ॥१॥शृंगारूनि माझीं बोबडीं उत्तरें । होतील विस्तारें सांगितलीं ॥ध्रु.॥क्षेम आहे ऐसें होइल सांगितलें । पाहिजे धाडिलें शीघ्र मूळ ॥२॥अवस्था जे माझी ठावी आहे संतां । होइल कृपावंता निरोपिली ॥३॥तुका ह्मणे सवें येईल मु†हाळी । किंवा कांहीं उरी राखतील ॥४॥
दोहींमध्यें एक घडेल विश्वासें । भातुकें सरिसें मूळ तरी ॥१॥करिती निरास निःशेष न घडे । कांहीं तरी ओढे चित्त माये ॥ध्रु.॥लौकिकाची तरी धरितील लाज । काय माझ्या काज आचरणें ॥२॥अथवा कोणाचें घेणें लागे रीण । नाहीं तरी हीनकर्मी कांहीं ॥३॥व्यालीचिये अंगीं असती वेधना । तुका ह्मणे मना मन साक्ष ॥४॥
बैसतां कोणापें नाहीं समाधान । विवरे हें मन ते चि सोई ॥१॥घडी घडी मज आठवे माहेर । न पडे विसर क्षणभरी॥ध्रु.॥नो बोलावें ऐसा करितों विचार । प्रसंगीं तों फार आठवतें ॥२॥इंिद्रयांसी वाहो पडिली ते चाली । होती विसांवली ये चि ठायीं॥३॥एकसरें सोस माहेरासी जावें । तुका ह्मणे जीवें घेतलासे ॥४॥
नाहीं हानि परी न राहावे निसुर । न पडे विसर काय करूं ॥१॥पुसाविसी वाटे मात कापडियां । पाठविती न्याया मूळ मज ॥ध्रु.॥आणीक या मना नावडे सोहळा । करितें टकळा माहेरींचा ॥२॥बहु कामें केलें बहु कासावीस । बहु जाले दिस भेटी नाहीं ॥३॥तुका ह्मणे त्याचें न कळे अंतर । अवस्था तों फार होते मज ॥४॥
तोंवरी म्यां त्यास कैसें निषेधावें । जों नाहीं बरवें कळों आलें ॥१॥कोणाचिया मुखें तट नाहीं मागें । वचन वाउगें बोलों नये ॥ध्रु.॥दिसे हानि परी निरास न घडे । हे तंव रोकडे अनुभव॥२॥आपुलिया भोगें होईल उशीर । तोंवरी कां धीर केला नाहीं ॥३॥तुका ह्मणे गोड करील सेवट । पाहिली ते वाट ठायीं आहे ॥४॥
माहेरींचें आलें तें मज माहेर । सुखाचें उत्तर करिन त्यासी ॥१॥पायांवरी माथा आिंळगीन बाहीं । घेईन लवलाहीं पायवणी ॥ध्रु.॥सुख समाचार पुसेन सकळ । कैसा पर्वकाळ आहे त्यास ॥२॥आपुले जीवींचें सुखदुःख भावें । सांगेन अघवें आहे तैसें ॥३॥तुका ह्मणे वीट नेघें आवडीचा । बोलिली च वाचा बोलवीन ॥४॥
वियोग न घडे सन्निध वसलें । अखंड राहिलें होय चित्तीं ॥१॥विसरु न पडे विकल्प न घडे । आलें तें आवडे तया पंथें ॥ध्रु.॥कामाचा विसर नाठवे शरीर । रसना मधुर नेणे फिकें॥२॥निरोपासी काज असो अनामिक । निवडितां एक नये मज ॥३॥तुका ह्मणे हित चित्तें ओढियेलें । जेथें तें उगलें जावें येणें ॥४॥
आतां माझे सखे येती वारकरी । जीवा आस थोरी लागली ते ॥१॥सांगतील माझ्या निरोपाची मात । सकळ वृत्तांत माहेरींचा ॥ध्रु.॥काय लाभ जाला काय होतें केणें । काय काय कोणे सांटविलें ॥२॥मागणें तें काय धाडिलें भातुकें । पुसेन तें सुखें आहेतसीं ॥३॥तुका ह्मणे काय सांगती ते कानीं । ऐकोनियां मनीं धरुनि राहें ॥४॥
काय करावें म्यां केले ते विचार । घडेल साचार काय पाहों ॥१॥काय मन नाहीं धरीत आवडी । प्रारब्धीं जोडी ते चि खरी ॥ध्रु.॥काय म्यां तेथींचें रांधिलें चाखोनि । तें हें करीं मनीं विवंचना ॥२॥आणीक ही त्यासी बहुत कारण । बहु असे जिणें ओढीचें ही ॥३॥तुका ह्मणे आह्मां बोळविल्यावरी । परती माघारी केली नाहीं ॥४॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

ऐसें
— असे
सकळ
— सर्व
तैसें
— तसे
तया
— त्याला, त्या
तुज
— तुला
ठायीं
— ठिकाणी
घडे
— घडते, शक्य होते
काई
— काय
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
माया
— भासमान करणारी शक्ती
येर
— दुसरा, इतर
जैसें
— जसे
पुढती
— पुन्हा, पुढे
देखे
— पाहतो
वरी
— वर; शिवाय
कीं
— किंवा; तसेच ‘की’ या अर्थी
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा