निष्ठ मी जालों अतिवादागुणें । हें कां नारायणें नेणिजेल ॥१॥सांडियेली तुह्मी गोत परिसोय । फोडविली डोय कर्मा हातीं ॥ध्रु.॥सांपडूनि संदी केली जीवेंसाटीं । घ्यावयासि तुटी कारण हें ॥२॥तुका ह्मणे तुज काय ह्मणों उणें । नाहीं अभिमानें चाड देवा ॥३॥
माझें माझ्या हाता आलें । आतां भलें सकळ ॥१॥काशासाटीं विषम थारा । तो अंतरा विटाळ ॥ध्रु.॥जालीं तया दुःखें तुटी । मागिल पोटीं नसावें ॥२॥तुका ह्मणे शुद्धकुळ । तेथें मळ काशाचा ॥३॥
समर्थपणें हे करा संपादणी । नसतें चि मनीं धरिल्याची॥१॥दुसयाचें येथें नाहीं चालों येत । तरि मी निवांत पाय पाहें ॥ध्रु.॥खोटियाचें खरें खरियाचें खोटें । मानलें गोमटें तुह्मांसी तें ॥२॥तुका ह्मणे तुह्मां सवें करितां वाद । होईजेतें निंद जनीं देवा ॥३॥
तुह्मां आह्मांसवें न पडावी गांठी । आलेति जगजेठी कळों आतां ॥१॥किती ह्मणों आतां वाइटा वाइट । शिवों नये वीट आल्यावरी ॥ध्रु.॥बोलिल्याची आतां हे चि परचित । भीड भार थीत बुडवील ॥२॥तुका ह्मणे आली रोकडी प्रचिती । झांकणें तें किती कोठें देवा ॥३॥
कोणापाशीं द्यावें माप । आपीं आप राहिलें ॥१॥कासयाची भरोवरी । काय दुरी जवळी ॥ध्रु.॥एकें दाखविले दाहा। फांटा पाहा पुसून ॥२॥तुका ह्मणे सरलें वोझें । आतां माझें सकळ॥३॥
नभोमय जालें जळ । एकीं सकळ हरपलें ॥१॥आतां काय सारासारी । त्याच्या लहरी तयांत ॥ध्रु.॥कैचा तेथ यावा सांडी । आप कोंडी आपण्यां ॥२॥तुका ह्मणे कल्प जाला। अस्त गेला उदय ॥३॥
राजा करी तैसे दाम । ते ही चाम चालती ॥१॥कारण ते सत्ता शिरीं । कोण करी अव्हेर ॥ध्रु.॥वाइले तें सुनें खांदीं । चाले पदीं बैसविलें ॥२॥तुका ह्मणे विश्वंभरें । करुणाकरें रिक्षलें ॥३॥
आह्मी देव तुह्मी देव । मध्यें भेव अधीक ॥१॥कैवाडाच्या धांवा लागें । मागें मागें विठ्ठले ॥ध्रु.॥भेडसाविलें हाके नादें । वोळखी भेदें मोडिली ॥२॥तुका ह्मणे उभा राहे । मागें पाहे परतोनि ॥३॥
काय बोलों सांगा । याउपरी पांडुरंगा ॥१॥कांहीं आधारावांचून । पुढें न चले वचन ॥ध्रु.॥वाढे ऐसा रस । कांहीं करावा सौरस ॥२॥भिक्तभाग्यसीमा । द्यावा जोडोनियां प्रेमा॥३॥कोरडएा उत्तरीं । नका गौरवूं वैखरी ॥४॥करी विज्ञापना । तुका प्रसादाची दाना ॥५॥
आहाच तो मोड वाळलियामधीं । अधीराची बुद्धि तेणें न्यायें ॥१॥ह्मणऊनि संग न करीं दुसरें । चित्त मळीन द्वारें दोड पडे ॥ध्रु.॥विषासाटीं सर्पां भयाभीत लोक । हें तों सकळीक जाणतसां ॥२॥तुका ह्मणे काचें राहे कुळांकुड । अवगुण तो नाड ज्याचा तया ॥३॥
क्षणक्षणां जीवा वाटतसे खंती । आठवती चित्तीं पाय देवा ॥१॥येइप वो येइप वो येइप लवलाहीं । आिंळगूनि बाहीं क्षेम देइप ॥ध्रु.॥उताविळ मन पंथ अवलोकी । आठवा ते चुकी काय जाली ॥२॥तुका ह्मणे माझ्या जीवींच्या जीवना । घाला नारायणा उडी वेगीं ॥३॥
आळी करावी ते कळतें बाळका । बुझवावें हें कां नेणां तुह्मी ॥१॥निवाड तो तेथें असे पायांपाशीं । तुह्मांआह्मांविशीं एकेठायीं ॥ध्रु.॥आणीक तों आह्मी न देखोंसें जालें । जाणावें शिणलें भागलेंसें ॥२॥तुका ह्मणे तुह्मां लागतें सांगावें । अंतरींचें ठावें काय नाहीं ॥३॥
तांतडीनें आह्मां धीर चि न कळे । पाळावे हे लळे लवलाहीं ॥१॥नका कांहीं पाहों सावकाशीं देवा । करा एक हेवा तुमचा माझा ॥ध्रु.॥वोरसाचा हेवा सांभाळावी प्रीत । नाहीं राहों येत अंगीं सदा ॥२॥तुका ह्मणे मज नका गोवूं खेळा । भोजनाची वेळा राखियेली ॥३॥
नाहीं लोपों येत गुण । वेधी आणीकें चंदन ॥१॥न संगतां पडे ताळा । रूप दर्पणीं सकळां ॥ध्रु.॥सारविलें वरी । आहाच तें क्षणभरी ॥२॥तुका ह्मणे वोहळें । सागराच्या ऐसें व्हावें॥३॥
वचनें चि व्हावें आपण उदार । होइल विश्वंभर संपुष्ट चि ॥१॥सत्यसंकल्पाचीं फळें बीजाऐसीं । शुद्ध नाहीं नासी पावों येत ॥ध्रु.॥वंचिलिया काया येतसे उपेगा । शरीर हें नरकाचें चि आळें ॥२॥तुका ह्मणे जीव जितां थारे लावा । पडिलिया गोवा देशधडी ॥३॥
उखतें आयुष्य जायांचें किळवर । अवघें वोडंबर विषयांचें ॥१॥कोणासी हा लागे पुसणें विचार । मनें चि सादर करूं आतां ॥ध्रु.॥उत्पित्त प्रळय पडिलें दळण । पाकाचें भोजन बीज वाढे ॥२॥तुका ह्मणे जाऊं अभयाच्या ठायां । रिघों देवराया शरण वेगीं ॥३॥
बोलावे ह्मुण हे बोलतों उपाय । प्रवाहें हें जाय गंगाजळ ॥१॥भाग्ययोगें कोणां घडेल सेवन । कैंचे येथें जन अधिकारी ॥ध्रु.॥मुखीं देतां घांस पळवितीं तोंडें । अंगींचिया भांडे असुकानें ॥२॥तुका ह्मणे पूजा करितों देवाची । आपुलिया रुची मनाचिये ॥३॥
लटिक्याचे वाणी चवी ना संवाद । नांहीं कोणां वाद रुचों येत ॥१॥अन्याय तो त्याचा नव्हे वायचाळा । मायबापीं वेळा न साधिली ॥ध्रु.॥अनावर अंगीं प्रबळ अवगुण । तांतडीनें मन लाहो साधी ॥२॥तुका ह्मणे दोष आणि अवकळा । न पडतां ताळा घडे तसे ॥३॥
कोण्या काळें येईल मना । नारायणा तुमचिया॥१॥माझा करणें अंगीकार । सर्व भार फेडूनि ॥ध्रु.॥लागली हे तळमळ चित्ता । तरी दुश्चिता संसारी ॥२॥सुखाची च पाहें वास । मागें दोष सांभाळीं ॥३॥इच्छा पूर्ण जाल्याविण । कैसा सीण वारेल ॥४॥लाहो काया मनें वाचा । देवा साच्या भेटीचा ॥५॥कांटाळा तो न धरावा । तुह्मी देवा दासांचा ॥६॥तुका ह्मणे माझे वेळे । न कळे कां हें उफराटें ॥७॥
घ्यावी तरी घ्यावी उदंड चि सेवा । द्यावें तरी देवा उदंड चि ॥१॥ऐसीं कैंचीं आह्मी पुरतीं भांडवलें । आल्या करीं बोलें समाधान ॥ध्रु.॥व्हावें तरीं व्हावें बहुत चि दुरी । आलिया अंतरीं वसवावें ॥२॥तुका ह्मणे तुझें सख्यत्व आपणीं । अससील ॠणी आवडीचा ॥३॥
काय करूं जीव होतो कासावीस । कोंडलिये दिस गमे चि ना ॥१॥पडिलें हें दिसे ब्रह्मांड चि वोस । दाटोनि उच्छ्वास राहातसे ॥२॥तुका ह्मणे आगा सर्वजाणतिया । विश्वंभरें काया निववावी ॥३॥
सुकलियां कोमां अत्यंत जळधर । तेणें च प्रकार न्याय असे ॥१॥न चलें पाउलीं सांडीं गरुडासन । मनाचें हो मन त्वरेलागीं ॥२॥तुका ह्मणे भूक न साहावे बाळा । जीवनांची कळा ओढलीसे ॥३॥
शृंगारिक माझीं नव्हती उत्तरें । आळवितों खरे अवस्थेच्या ॥१॥न घलावा मधीं कामाचा विलंब । तुह्मी तों स्वयंभ करुणामूर्ति ॥२॥तुका ह्मणे केलें सन्मुख वदन । देखतां चरण पोटाळीन ॥३॥
तूं माझी माउली तूं माझी साउली । पाहातों वाटुली पांडुरंगे ॥१॥तूं मज येकुला वडील धाकुला । तूं मज आपुला सोयरा जीव ॥२॥तुका ह्मणे जीव तुजपाशीं असे । तुझियानें ओस सर्व दिशा ॥३॥
कराल तें करा । हातें आपुल्या दातारा ॥१॥बिळयाचीं आह्मी बाळें । असों निर्भर या सळे ॥ध्रु.॥आतां कोठें काळ । करील देवापाशीं बळ ॥२॥तुका ह्मणे पंढरीराया । थापटितों ठोक बाहएा ॥३॥
डोळां भरिलें रूप । चित्ता पायांपें संकल्प ॥१॥अवघी घातली वांटणी । प्रेम राहिलें कीर्तनी ॥ध्रु.॥वाचा केली माप । रासीं हरिनाम अमुप ॥२॥भरूनियां भाग । तुका बैसला पांडुरंग ॥३॥
आतां आहे नाहीं । न कळे आळी करा कांहीं ॥१॥देसी पुरवुनी इच्छा । आतां पंढरीनिवासा ॥ध्रु.॥नेणे भाग सीण । दुजें कोणी तुह्मांविण ॥२॥आतां नव्हे दुरी । तुका पायीं मिठी मारी॥३॥
संकल्पासी अधिष्ठान । नारायण गोमटें ॥१॥अवघियांचें पुरे कोड । फिडे जड देहत्व ॥ध्रु.॥उभय लोकीं उत्तम कीर्ति । देव चित्तीं राहिलिया ॥२॥तुका ह्मणे जीव धाय । नये हाय जवळी ॥३॥
भाग्यवंता ऐशी जोडी । परवडी संतांची ॥१॥धन घरीं पांडुरंग । अभंग जें सरेना ॥ध्रु.॥जनाविरहित हा लाभ । टांचें नभ सांटवणें ॥२॥तुका ह्मणे विष्णुदासां । नाहीं आशा दुसरी॥३॥
जरी आलें राज्य मोळविक्या हातां । तरी तो मागुता व्यवसायी ॥१॥तृष्णेचीं मंजुरें नेणती विसांवा । वाढें हांव हांवां काम कामीं ॥ध्रु.॥वैभवाचीं सुखें नातळतां अंगा । चिंता करी भोगा विघ्न जाळी ॥२॥तुका ह्मणे वाहे मरणाचें भय । रक्षणउपाय करूनि असे ॥३॥
कोण होईल आतां संसारपांगिलें । आहे उगवलें सहजें चि ॥१॥केला तो चालवीं आपुला प्रपंच । काय कोणां वेच आदा घे दे ॥ध्रु.॥सहजें चि घडे आतां मोळ्याविण । येथें काय सीण आणि लाभ ॥२॥तुका ह्मणे जालों सहज देखणा । ज्याच्या तेणें खुणा दाखविल्या ॥३॥
आह्मां शरणागतां । एवढी काय करणें चिंता ॥१॥परि हे कौतुकाचे खेळ । अवघे पाहातों सकळ ॥ध्रु.॥अभयदानवृंदें। आह्मां कैंचीं द्वंदें ॥२॥तुका ह्मणे आह्मी । हरिजन साधनाचे स्वामी॥३॥
देवाचिये चाडे प्रमाण उचित । नये वांटूं चित्त निषेधासीं ॥१॥नये राहों उभें कसमळापाशीं । भुंकतील तैसीं सांडावीं तीं ॥२॥तुका ह्मणे क्षमा सुखाची हे रासी । सांडूनि कां ऐसी दुःखी व्हावें ॥३॥॥१॥
खळा सदा क्षुद्रीं दृष्टी । करी कष्टी सज्जना ॥१॥करितां आपुलाले परी । धणीवरी व्यापार ॥ध्रु.॥दया संतां भांडवल। वेची बोल उपकार ॥२॥तुका ह्मणे आपुलालें । उसंतिलें ज्यांणीं तें ॥३॥
जग ऐसें बहुनांवें । बहुनावें भावना ॥१॥पाहों बोलों बहु नये । सत्य काय सांभाळा ॥ध्रु.॥कारियासी जें कारण। तें जतन करावें ॥२॥तुका ह्मणे संतजनीं । हें चि मनीं धरावें ॥३॥
निघालें तें अगीहूनि । आतां झणी आतळे ॥१॥पळवा परपरतें दुरी । आतां हरी येथूनि ॥ध्रु.॥धरिलें तैसें श्रुत करा हो । येथें आहो प्रपंचीं ॥२॥अबोल्यानें ठेला तुका । भेउनि लोकां निराळा ॥३॥
आतां दुसरें नाहीं वनीं । निरांजनी पडिलों ॥१॥तुमची च पाहें वास । अवघी आस निरसली ॥ध्रु.॥मागिलांचा मोडला माग । घडला त्याग अरुची ॥२॥तुका ह्मणे करुणाकरा । तूं सोयरा जीवींचा ॥३॥
धरूनियां सोई परतलें मन । अनुलक्षीं चरण करूनियां॥१॥येइप पांडुरंगे नेइप सांभाळूनि । करुणावचनीं आळवितों॥ध्रु.॥बुद्धि जाली साहए परि नाहीं बळ । अवलोकितों जळ वाहे नेत्रीं ॥२॥न चलती पाय गिळत जाली काया । ह्मणऊनि दया येऊं द्यावी ॥३॥दिशच्या करितों वारियासीं मात । जोडुनियां हात वास पाहें ॥४॥तुका ह्मणे वेग करावा सत्वर । पावावया तीर भवनदीचें ॥५॥
कौलें भरियेली पेंठ । निग्रहाचे खोटे तंट ॥१॥ऐसें माता जाणे वर्म । बाळ वाढवितां धर्म ॥ध्रु.॥कामवितां लोहो कसे। तांतडीनें काम नासे ॥२॥तुका ह्मणे खडे । देतां अक्षरें तें जोडे ॥३॥
चालिलें न वाटे । गाऊनियां जातां वाटे ॥१॥बरवा वैष्णवांचा संग । येतो सामोरा श्रीरंग ॥ध्रु.॥नाहीं भय आड । कांहीं विषमांचें जड ॥२॥तुका ह्मणे भिक्त । सुखरूप आदीं अंतीं ॥३॥
करितां विचार तो हा दृढ संसार । ब्रह्मांदिकां पार नुलंघवे सामथ्यॉ ॥१॥शरण शरण नारायणा मज अंगीकारीं दीना। आलें तें वचनांपासीं माझ्या सामर्थ्य ॥ध्रु.॥पाठीवरी मोळी तो चि कळवा पायीं तळीं । सांपडला जाळीं मत्स्य जाला तो न्याय ॥२॥आतां करीन तांतडी लाभाची ते याच जोडी । तुका ह्मणे ओढी पायां सोई मनाची ॥३॥
पोट धालें आतां जीवनीं आवडी । पुरवावे परवडी बहुतांचे ॥१॥काय आंचवणा तांतडीचें काम । मागील तीं श्रम न पवावीं ॥ध्रु.॥वाढितिया पोटीं बहु असे वाव । सांभाळितां ठाव काय वांचे ॥२॥दाविल्यावांचूनि नाहीं कळों येत । तेथें ही दुश्चित एकपणें ॥३॥नावेचा भार तो उदकाचे शिरीं । काय हळू भारी तये ठायीं ॥४॥तुका ह्मणे गीतीं गाऊनि गोविंद । करूं ब्रह्मानंद एकसरें॥५॥
एका हातीं टाळ एका हातीं चिपिळया । घालिती हुंमरी एक वाताती टाळिया ॥१॥मातले वैष्णव नटती नाना छंदें। नाहीं चाड मोक्षपदें भजनीं आवडी ॥ध्रु.॥हाका अरोळिया गीतवादें सुखसोहळे । जाय तें न कळे केव्हां रजनी दिवस ॥२॥तीथाअ नाहीं चाड न लगे जावें वनांतरा । तुका ह्मणे हरिहरात्मक चि पृथुवी॥३॥
देव सखा आतां केलें नव्हे काई । येणें सकळई सोइरीं च ॥१॥भाग्यवंत जालों गोतें सपुरतीं । आतां पुण्या नीती पार नाहीं ॥ध्रु.॥पाहातां दिसती भरलिया दिशा । ठसावला ठसा लोकत्रयीं ॥२॥अविनाश जोडी आह्मां भाग्यवंतां । जाली होती सत्ता संचिताची ॥३॥पायांवरी डोई ठेवाया अरोथा । जाली द्यावी सत्ता क्षेम ऐसी ॥४॥तुका ह्मणे जीव पावला विसावा । ह्मणवितां देवा तुमचींसीं ॥५॥
कोण आतां किळकाळा । येऊं बळा देईल ॥१॥सत्ता झाली त्रिभुवनीं । चक्रपाणी कोंवसा ॥ध्रु.॥लडिवाळांचा भार वाहे । उभा आहे कुढावया ॥२॥तुका ह्मणे घटिका दिस । निमिश ही न विसंभे ॥३॥
आह्मां आवडे नाम घेतां । तो ही पिता संतोषे ॥१॥उभयतां एकचित्त । तरी प्रीत वाढली ॥ध्रु.॥आह्मी शोभों निकटवासें। अनारिसें न दिसे ॥२॥तुका ह्मणे पांडुरंगे । अवघीं अंगें निवालीं॥३॥
देह तंव असे भोगाचे अधीन । याचें सुख सीण क्षीणभंगर ॥१॥अविनाश जोडी देवापायीं भाव । कल्याणाचा ठाव सकळही ॥ध्रु.॥क्षणभंगुर हा तेथील पसारा । आलिया हाकारा अवघें राहे ॥२॥तुका ह्मणे येथें सकळ विश्रांति । आठवावा चित्तीं नारायण ॥३॥
आतां आवश्यक करणें समाधान । पाहिलें निर्वाण न पाहिजे ॥१॥केलें तरीं आतां शुशोभें करावें । दिसतें बरवें संतांमधीं ॥ध्रु.॥नाहीं भक्तराजीं ठेविला उधार । नामाचा आकार त्यांचियानें ॥२॥तुका ह्मणे माझ्या वडिलांचें ठेवणें । गोप्य नारायणें न करावें ॥३॥
काया वाचा मनें श्रीमुखाची वास । आणीक उदास विचारासी ॥१॥काय आतां मोक्ष करावा जी देवा । तुमचिया गोवा दर्शनासी ॥ध्रु.॥केलिया नेमासी उभें ठाडें व्हावें । नेमलें तें भावें पालटेना ॥१२॥तुका ह्मणे जों जों कराल उशीर । तों तों मज फार रडवील ॥३॥
पुढीलांचे सोयी माझ्या मना चाली । मताची आणिली नाहीं बुद्धी ॥१॥केलासी तो उभा आजवरी संतीं । धरविलें हातीं कट देवा ॥ध्रु.॥आहे तें ची मागों नाहीं खोटा चाळा । नये येऊं बळा लेंकराशीं ॥२॥तुका ह्मणे माझा साक्षीचा वेव्हार । कृपण जी थोर परी तुह्मी ॥३॥
बहुत करूनि चाळवाचाळवी । किती तुह्मी गोवी करीतसां ॥१॥लागटपणें मी आलों येथवरी । चाड ते दुसरी न धरूनि ॥ध्रु.॥दुजियाचा तंव तुह्मांसी कांटाळा । राहासी निराळा एकाएकीं ॥२॥तुका ह्मणे आतां यावरी गोविंदा । मजशीं विनोदा येऊं नये ॥३॥
तीर्थ जळ देखे पाषाण प्रतिमा । संत ते अधमा माणसाऐसे ॥१॥वांजेच्या मैथुनापरी गेलें वांयां । बांडेल्याचें जायां जालें पीक ॥ध्रु.॥अभाविक सदा सुतकी चांडाळ । सदा तळमळ चुके चि ना ॥२॥तुका ह्मणे वरदळी ज्याची दृष्टी । देहबुद्धि कष्टी सदा दुःखी ॥३॥
नव्हे मतोळ्याचा वाण । नीच नवा नारायण ॥१॥सुख उपजे श्रवणें । खरें टांकसाळी नाणें ॥ध्रु.॥लाभ हातोहातीं । अधिक पुढतोंपुढती ॥२॥तुका ह्मणे नेणों किती । पुरोनि उरलें पुढती ॥३॥
घातला दुकान । देती आलियासी दान ॥१॥संत उदार उदार । भरलें अनंत भांडार ॥ध्रु.॥मागत्याची पुरे । धणी आणिकांसी उरे ॥२॥तुका ह्मणे पोतें । देवें भरिलें नव्हे रितें ॥३॥
नरस्तुति आणि कथेचा विकरा । हें नको दातारा घडों देऊं ॥१॥ऐसिये कृपेचि भाकितों करुणा । आहेसि तूं राणा उदाराचा ॥ध्रु.॥पराविया नारी आणि परधना । नको देऊं मनावरी येऊं ॥२॥भूतांचा मत्सर आणि संतनिंदा । हें नको गोविंदा घडों देऊं ॥३॥देहअभिमान नको देऊं शरीरीं । चढों कांहीं परी एक देऊं ॥४॥तुका ह्मणे तुझ्या पायांचा विसर । नको वारंवार पडों देऊं ॥५॥
लौकिकापुरती नव्हे माझी सेवा । अनन्य केशवा दास तुझा ॥१॥ह्मणऊनि करीं पायांसवें आळी । आणीक वेगळी नेणें परी ॥ध्रु.॥एकविध आह्मी स्वामिसेवेसाटीं । वरी तो चि पोटीं एकभाव ॥२॥तुका ह्मणे करीं सांगितलें काम । तुह्मां धर्माधर्म ठावे देवा ॥३॥
ज्यांच्या संगें होतों पडिलों भोवनीं । ते केली धोवनी झाडूनियां ॥१॥आतां एकाएकीं मनासीं विचार । करूं नाहीं भार दुजा याचा ॥ध्रु.॥प्रसादसेवनें आली उष्टावळी । उचित ते काळीं अवचित ॥२॥तुका ह्मणे वर्म सांपडलें हातीं । सांडिली ते खंती चिंता देवा ॥३॥
आवडीभोजन प्रकार परवडी । भिन्नाभिन्न गोडी एक रसा ॥१॥भोगित्या पंगती लाधलों प्रसाद । तिंहीं नाहीं भेद राखियेला ॥ध्रु.॥पाकसिद्धि स्वहस्तकें विनियोग। आवडीचे भाग सिद्ध केले ॥२॥तुका ह्मणे आला उिच्छष्ट प्रसाद । तेणें हा आनंद माझ्या जीवा ॥३॥
समर्थाचा ठाव संचलाचि असे । दुर्बळाची आस पुढें करी ॥१॥पावलें घेईन पदरीं हें दान । एकांतीं भोजन करूं दाऊं॥ध्रु.॥न लगे पाहावी उचिताची वेळ । अयाचित काळ साधला तो ॥२॥तुका ह्मणे पोट धालिया उपरी । गौरवा उत्तरीं पूजूं देवा ॥३॥
आपुल्यांचा करीन मोळा । माझ्या कुळाचारांचा॥१॥अवघियांचे वंदिन पाय । ठायाठाय न देखें ॥ध्रु.॥नेदीं तुटों समाधान । थांबों जन सकळ ॥२॥तुका ह्मणे झाडा होय । तों हे सोय न संडीं ॥३॥
जन्ममरणांची विसरलों चिंता । तूं माझा अनंता मायबाप ॥१॥होतील ते डोळां पाहेन प्रकार । भय आणि भार निरसलीं ॥ध्रु.॥लिगाडाचें मूळ होतीं पंच भूतें । त्यांचें यां पुरतें विभागिलें ॥२॥तुका ह्मणे जाला प्रपंच पारिखा । जिवासी तूं सखा पांडुरंगा ॥३॥
उदार तूं हरी ऐसी कीर्ति चराचरीं । अनंत हे थोरी गर्जतील पवाडे ॥१॥तुझे लागों पायीं माझा भाव पुसी जन्ममरणां ठाव। देवाचा तूं देव स्वामी सकळा ब्रह्मांडा ॥ध्रु.॥मागणें तें तुज मागों जीवभाव तुज सांगों । लागों तरी लागों पायां तुमच्या दातारा ॥२॥दिसों देसी कीविलवाणें तरी तुज चि हें उणें । तुका ह्मणे जिणें माझें तुज अधीन ॥३॥
पाहा किती आले शरण समान चि केले । नाहीं विचारिले गुण दोष कोणांचे ॥१॥मज सेवटींसा द्यावा ठाव तयांचिये देवा । नाहीं करीत हेवा कांहीं थोरपणाचा ॥ध्रु.॥नाहीं पाहिला आचार कुळगोत्रांचा विचार । फेडूं आला भार मग न ह्मणे दगड ॥२॥तुका ह्मणे सर्वजाणा तुझ्या आल्यावरि मना । केला तो उगाणा घडल्या दोषांच्या ॥३॥
आतां चुकलें बंधन गेलें विसरोनि दान । आपुले ते वाण सावकाश विकावे ॥१॥लाभ जोडला अनंत घरीं सांपडलें वित्त । हातोहातीं थीत उरों तळ नल्हाचि ॥ध्रु.॥होतें गोविलें विसारें माप जालें एकसरें । होतें होरें वारें तों चि लाहो साधिला॥२॥कराया जतन तुका ह्मणे निजधन । केला नारायण साहए नेदी विसंबों ॥३॥
तुझ्या रूपें माझी काया भरों द्यावी पंढरीराया । दर्पणींची छाया एका रूपें भिन्नत्व ॥१॥सुख पडिलें साटवण सत्ता वेचे शनें शनें । अडचणीचे कोन चारी मार्ग उगवले ॥ध्रु.॥वसो डोळ्यांची बाहुली कवळे भिन्न छाया आली । कृष्णांजन चाली नव्हे प्रति माघारी ॥२॥जीव ठसावला शिवें मना आलें तेथें जावें । फांटा पडिला नांवें तुका ह्मणे खंडलें ॥३॥
सोसें सोसें मारूं हाका । होइल चुका ह्मणऊनि॥१॥मागें पुढें क्षणभरी । नव्हे दुरी अंतर ॥ध्रु.॥नाम मुखीं बैसला चाळा। वेळोवेळां पडताळीं ॥२॥तुका ह्मणे सुखी केलें । या विठ्ठलें बहुतांसी ॥३॥
धरूनियां चाली हांवा । येइन गांवां धांवत ॥१॥पाठविसी मूळ तरी । लवकरी विठ्ठले ॥ध्रु.॥नाचेन त्या प्रेमसुखें । कीर्ती मुखें गाईन ॥२॥तुका ह्मणे संतमेळीं । पायधुळी वंदीन॥३॥
मायबापाचिये भेटी । अवघ्या तुटी संकोचा ॥१॥भोगिलें तें आहे सुख । खातां मुख मोकळें ॥ध्रु.॥उत्तम तें बाळासाटीं । लावी ओठीं माउली ॥२॥तुका ह्मणे जाली धणी । आनंद मनीं न समाये ॥३॥
उदासीनाचा देह ब्रह्मरूप । नाहीं पुण्य पाप लागत त्या ॥१॥अनुताप अंगीं अिग्नचिया ज्वाळा । नाहीं मृगजळा विझों येत ॥ध्रु.॥दोष ऐशा नावें देहाचा आदर । विटलें अंतर अहंभावें॥२॥तुका ह्मणे जाय नासोनियां खंती । तंव चि हे चित्तीं बद्धता ते ॥३॥
बंधनाचा तोडूं फांसा । देऊं आशा टाकोनि ॥१॥नाहीं तें च घेतां शिरीं । होइल दुरी निजपंथ ॥ध्रु.॥नाथिलें चि माझें तुझें । कोण वोझें वागवी ॥२॥तुका ह्मणे अंतराय । देवीं काय जिणें तें ॥३॥
तें च किती वारंवार । बोलों फार बोलिलें ॥१॥आतां माझें दंडवत । तुमच्या संत चरणांसी ॥ध्रु.॥आवडी ते नीच नवी । जाली जीवीं वसती ॥२॥तुका ह्मणे बरवें जालें । घरा आलें बंदरीचें ॥३॥
उपासा सेवटीं अन्नासवें भेटी । तैसी माझी मिठी पडो पायीं ॥१॥पुरवीं वासना साच सर्वजाणा । आह्मां नारायणा अंकिताची ॥ध्रु.॥बहुदिसां पुत्रामातेमध्यें भेटीं । तैसा दाटो पोटीं प्रीतिउभोड ॥२॥तुका ह्मणे धन कृपणा सोयरें । यापरि दुसरें नहो आतां ॥३॥
रणीं निघतां शूर न पाहे माघारें । ऐशा मज धीरें राख आतां ॥१॥संसारा हातीं अंतरलों दुरी । आतां कृपा करीं नारायणा ॥ध्रु.॥वागवितों तुझिया नामाचें हत्यार । हा चि बडिवार मिरवितों ॥२॥तुका ह्मणे मज फिरतां माघारें । तेथें उणें पुरें तुह्मी जाणां ॥३॥
सकळ पूजा स्तुति । करावी ते व्होवें याती ॥१॥ह्मणऊनि वारा जन । संतपूजा नारायण ॥ध्रु.॥सेवावें तें वरी । दावी उमटूनि ढेंकरीं ॥२॥तुका ह्मणे सुरा । दुधा ह्मणतां केवीं बरा॥३॥
धीर नव्हे मनें । काय तयापाशीं उणें ॥१॥भार घातलियावरी । दासां नुपेक्षील हरी ॥ध्रु.॥याऐसी आटी । द्यावी द्रव्याचिये साटी ॥२॥तुका ह्मणे पोटें । देवा बहु केलें खोटें ॥३॥
द्रव्याचिया कोटी । नये गांडीची लंगोटी ॥१॥अंती बोळवणेसाटीं । पांडुरंग धरा कंठीं ॥ध्रु.॥लोभाची लोभिकें । यांचें सन्निधान फिकें ॥२॥तुका ह्मणे हितें । जग नव्हो पडो रितें॥३॥
कोणापाशीं आतां सांगों मी बोभाट । कधीं खटखट सरेल हे ॥१॥कोणां आराणूक होईल कोणे काळीं । आपुलालीं जाळीं उगवूनि ॥ध्रु.॥माझा येणें दुःखें फुटतसे प्राण । न कळतां जन सुखी असे ॥२॥भोगा आधीं मनें मानिलासे त्रास । पाहें लपायास ठाव कोठें ॥३॥तुका ह्मणे देतों देवाचें गाहाणें । माझें रिण येणें सोसियेलें ॥४॥
राहिलों निराळा । पाहों कवतुक डोळां ॥१॥करूं जगाचा विनोद । डोळां पाहोनियां छंद ॥ध्रु.॥भुललिया संसारें । आलें डोळ्यासी माजिरें ॥२॥तुका ह्मणे माथा । कोणी नुचली सर्वथा ॥३॥
आह्मां एकविधा पुण्य सर्वकाळ । चरणसकळ स्वामीचे ते ॥१॥चित्ताचे संकल्प राहिलें चळण । आज्ञा ते प्रमाण करुनी असों ॥ध्रु.॥दुजियापासून परतलें मन । केलें द्यावें दान होईल तें॥२॥तुका ह्मणे आतां पुरला नवस । एकाविण ओस सकळ ही॥३॥
राहाणें तें पायांपाशी । आणिकां रसीं विटोनि ॥१॥ऐसा धीर देइप मना । नारायणा विनवितों ॥ध्रु.॥अंतरीं तों तुझा वास । आणिकां नास कारण ॥२॥तुका ह्मणे शेवटींचें । वाटे साचें राखावें ॥३॥
चंदन तो चंदनपणें । सहज गुणसंपन्न ॥१॥वेधलिया धन्य जाती । भाग्यें होती सन्मुख ॥ध्रु.॥परिसा अंगीं परिसपण । बाणोनि तें राहिलें ॥२॥तुका ह्मणे कैंची खंती । सुजाती ते ठाकणी ॥३॥
लय लक्षी मन न राहे निश्चळ । मुख्य तेथें बळ आसनाचें ॥१॥हें तों असाध्य जी सर्वत्र या जना । भलें नारायणां आळवितां ॥ध्रु.॥कामनेचा त्याग वैराग्य या नांव । कुटुंब ते सर्वविषयजात ॥२॥कर्म उसंतावें चालत पाउलीं । होय जों राहिली देहबुद्धि ॥३॥भिक्त तें नमावें जीवजंतुभूत । शांतवूनि ऊत कामक्रोध ॥४॥तुका ह्मणे साध्य साधन अवघडें । देतां हें सांकडें देह बळी ॥५॥
ऐसें कां हो न करा कांहीं । पुढें नाहीं नास ज्या ॥१॥विश्वंभरा शरणागत । भूतजात वंदूनि ॥ध्रु.॥श्रुतीचें कां नेघा फळ। सारमूळ जाणोनि ॥२॥तुका ह्मणे पुढें कांहीं । वाट नाहीं यावरी॥३॥
जाला प्रेतरूप शरीराचा भाव । लिक्षयेला ठाव श्मशानींचा ॥१॥रडती रात्रदिवस कामक्रोधमाया । ह्मणती हायहाया यमधर्म ॥ध्रु.॥वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा । ज्ञानाग्नि भरभरां जीवित्वेसी ॥२॥फिरविला घट फोडिला चरणीं । महावाक्य जनीं बोंब जाली ॥३॥दिली तिळांजुळी कुळनामरूपांसी । शरीर ज्याचें त्यासी समर्पिलें ॥४॥तुका ह्मणे रक्षा जाली आपींआप । उजळला दीप गुरुकृपा ॥५॥
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां । तो जाला सोहळा अनुपम्य ॥१॥आनंदे दाटलीं तिन्ही त्रिभुवनें । सर्वात्मकपणें भोग जाला ॥ध्रु.॥एकदेशीं होतों अहंकारें आथिला । त्याच्या त्यागें जाला सुकाळ हा ॥२॥फिटलें सुतक जन्ममरणाचें । मी माझ्या संकोचें दुरी जालों ॥३॥नारायणें दिला वस्तीस ठाव । ठेवूनियां भाव ठेलों पायीं ॥४॥तुका ह्मणे दिलें उमटूनि जगीं । घेतलें तें अंगीं लावूनियां ॥५॥
बोळविला देह आपुलेनि हातें । हुताशिलीं भूतें ब्रह्माग्नीसीं ॥१॥एकवेळे जालें सकळ कारण । आतां नारायण नारायण ॥ध्रु.॥अमृतसंजीवनी निवविली खाई । अंगें तये ठायीं हारपलीं ॥२॥एकादशीविध जागरण उपवास । बारावा दिवस भोजनाचा ।३॥अवघीं कर्में जालीं घटस्पोटापाशीं । संबंध एकेसी उरला नामीं ॥४॥तुका ह्मणे आतां आनंदीं आनंदु । गोविंदीं गोविंदु विस्तारला ॥५॥
पिंडदान पिंडें ठेविलें करून । तिळीं तिळवण मूळत्रयीं॥१॥सारिले संकल्प एका चि वचनें । ब्रह्मीं ब्रह्मार्पण सेवटींच्या ॥ध्रु.॥सव्य अपसव्य बुडालें हें कर्म । एका एक वर्म एकोविष्णु ॥२॥पित्यापुत्रत्वाचें जालें अवसान । जनीं जनार्दन अभेदेंसी ॥३॥आहे तैसी पूजा पावली सकळ । सहज तो काळ साधियेला ॥४॥तुका ह्मणे केला अवघियांचा उद्धार । आतां नमस्कार सेवटींचा ॥५॥
सरलें आतां नाहीं । न ह्मणे वेळकाळ कांहीं ॥१॥विठ्ठल कृपाळु माउली । सदा प्रेमें पान्हायेली ॥ध्रु.॥सीण न विचारी भाग । नव्हे निष्ठ नाहीं राग ॥२॥भेदाभेद नाहीं । तुका ह्मणे तिच्याठायीं ॥३॥
तुज पाहावें हे धरितों वासना । परि आचरणा नाहीं ठाव ॥१॥करिसी कैवार आपुलिया सत्ता । तरि च देखता होइन पाय ॥ध्रु.॥बाहिरल्या वेषें उत्तम दंडलें । भीतरी मुंडलें नाहीं तैसें॥२॥तुका ह्मणे वांयां गेलों च मी आहे । जरि तुह्मी साहे न व्हा देवा ॥३॥
दुष्ट आचरण ग्वाही माझें मन । मज ठावे गुण दोष माझे ॥१॥आतां तुह्मी सर्वजाण पांडुरंगा । पाहिजे प्रसंगाऐसें केलें॥ध्रु.॥व्याहएाजांवायांचे पंगती दुर्बळ । वंचिजे तो काळ नव्हे कांहीं ॥२॥तुका ह्मणे आतां जालों शरणागत । पुढिल उचित तुह्मां हातीं ॥३॥
आतां भय नाहीं ऐसें वाटे जीवा । घडलिया सेवा समर्थाची ॥१॥आतां माझ्या मनें धरावा निर्धार । चिंतनीं अंतर न पडावें ॥ध्रु.॥येथें नाहीं जाली कोणांची निरास । आल्या याचकास कृपेविशीं ॥२॥तुका ह्मणे येथें नाहीं दुजी परी । राया रंका सरी देवा पायीं ॥३॥
वैष्णवें चोरटीं । आलीं घरासी करंटीं ॥१॥आजि आपुलें जतन । करा भांडें पांघुरण ॥ध्रु.॥ज्याचे घरीं खावें ।त्याचें सर्वस्वें ही न्यावें ॥२॥तुका ह्मणे माग । नाहीं लागों देत लाग॥३॥
ऐकतों दाट । आले एकांचें बोभाट ॥१॥नका विश्वासों यावरी । चोर देहाचे खाणोरी ॥ध्रु.॥हे चि यांची जोडी। सदा बोडकीं उघडीं ॥२॥तुका ह्मणे न्यावें । ज्याचे त्यासी नाहीं ठावें ॥३॥
आणिकांची सेवा करावी शरीरें । तीं येथें उत्तरे कोरडीं च ॥१॥ऐसा पांडुरंग सुलभ सोपारा । नेघे येरझारा सेवकाच्या ॥ध्रु.॥आणिकांचे भेटी आडकाठी पडे । येथें तें न घडे वचन ही ॥२॥आणिकांचे देणें काळीं पोट भरे । येथील न सरे कल्पांतीं ही ॥३॥आणिकें दंडिती चुकलिया सेवा । येथें सोस हेवा नाहीं दोन्ही ॥४॥तुका ह्मणे करी आपण्यासारिखें । उद्धरी पारिखें उंच निंच ॥५॥
दुर्जनाची जाती । त्याचे तोंडीं पडे माती ॥१॥त्याची बुद्धि त्यासी नाडी । वाचे अनुचित बडबडी ॥ध्रु.॥पाहें संतांकडे । दोषदृष्टी सांडी भडे ॥२॥उंच निंच नाहीं । तुका ह्मणे खळा कांहीं ॥३॥
न करीं उदास । माझी पुरवावी आस ॥१॥ऐका ऐका नारायणा । माझी परिसा विज्ञापना ॥ध्रु.॥मायबाप बंधुजन। तूं चि सोयरा सज्जन ॥२॥तुका ह्मणे तुजविरहित । माझें कोण करी हित ॥३॥
जीवन उपाय । वैदेवाणी तुझे पाय ॥१॥ते मी नाठवीं घडिघडी । ह्मणोनियां चरफडीं ॥ध्रु.॥तुटे भवरोग । जेथें सर्व सुखें भोग ॥२॥तुका ह्मणे विटे । धरियेले जें गोमटें ॥३॥
ऐका हें वचन माझें संतजन । विनवितों जोडुन कर तुह्मां ॥१॥तर्क करूनियां आपुल्या भावना । बोलतिया जना कोण वारी ॥ध्रु.॥आमुच्या जीवींचा तो चि जाणे भावो । रकुमाईचा नाहो पांडुरंग ॥२॥चित्त माझें त्याचे गुंतलेंसे पायीं । ह्मणऊनि कांहीं नावडे त्या ॥३॥तुका ह्मणे मज न साहे मीनती । खेद होय चित्तीं भंग मना ॥४॥
ऐसा कोणी नाहीं हें जया नावडे । कन्या पुत्र घोडे दारा धन ॥१॥निंब घेतें रोगी कवणिया सुखें । हरावया दुःखें व्याधि पीडा ॥ध्रु.॥काय पळे सुखें चोरा लागे पाठी । न घलावी काठी आड तया ॥२॥जयाचें कारण तो चि जाणे करूं । नये कोणां वारूं आणिकासी ॥३॥तुका ह्मणे तरी सांपडे निधान । द्यावा ओंवाळून जीव बळी ॥४॥
काय मी अन्यायी तें घाला पालवीं । आणीक वाट दावीं चालावया ॥१॥माग पाहोनियां जातों ते च सोयी । न वजावें कायी कोण सांगा ॥ध्रु.॥धोपट मारग लागलासे गाढा । मज काय पीडा करा तुह्मी ॥२॥वारितां ही भय कोण धरी धाक । परी तुह्मां एक सांगतों मी ॥३॥तुका ह्मणे शूर दोहीं पक्षीं भला । मरतां मुक्त जाला मान पावे ॥४॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.