मुख्य मजकुराकडे जा
WhatsUp मराठी कोश
—
तुकाराम गाथा

साहित्य

तुकाराम गाथा

अभंग २७८२–२८८८

Tukaram Gatha, part 28

रचना — संत तुकाराम · १६०८–१६५०

सारांश

तुकाराम गाथेचा भाग २८ — अभंग २७८२ ते २८८८.

परपीडक तो आह्मां दावेदार । विश्वीं विश्वंभर ह्मणऊनि॥१॥दंडूं त्यागूं बळें नावलोकुं डोळा । राखूं तो चांडाळा ऐसा दुरि ॥ध्रु.॥अनाचार कांहीं न साहे अवगुणें । बहु होय मन कासावीस ॥२॥तुका ह्मणे माझी एकविध सेवा । विमुख ते देवा वाळी चित्तें ॥३॥
कांहीं न मागे कोणांसी । तो चि आवडे देवासी॥१॥देव तयासी ह्मणावें । त्याचे चरणीं लीन व्हावें ॥ध्रु.॥भूतदया ज्याचे मनीं । त्याचे घरीं चक्रपाणी ॥२॥नाहीं नाहीं त्यासमान । तुका ह्मणे मी जमान ॥३॥
नाम उच्चारितां कंटीं । पुढें उभा जगजेठी ॥१॥ऐसें धरोनियां ध्यान । मनें करावें चिंतन ॥ध्रु.॥ब्रह्मादिकांच्या ध्याना नये । तो हा कीर्तनाचे सोये ॥२॥तुका ह्मणे सार घ्यावें । मनें हरिरूप पाहावें ॥३॥
आडलिया जना होसी सहाकारी । अंधिळयाकरीं काठी तूं चि ॥१॥आडिले गांजिले पीडिले संसारीं । त्यांचा तूं कैवारी नारायणा ॥ध्रु.॥प्रल्हाद महासंकटीं रिक्षला । तुह्मी अपंगिला नानापरी ॥२॥आपुलें चि अंग तुह्मी वोडविलें । त्याचें निवारलें महा दुःख ॥३॥तुका ह्मणे तुझे कृपे पार नाहीं । माझे विठाबाई जननीये ॥४॥
तपासी तें मन करूं पाहे घात । धरोनि सांगात इंिद्रयांचा ॥१॥ह्मणोनि कीर्तन आवडलें मज । सांडोनियां लाज हें चि करी ॥ध्रु.॥पाहातां आगमनिगमाचे ठाव । तेथें नाहीं भाव एकविध ॥२॥तुका ह्मणे येथें नाहीं वो विकार । नाम एक सार विठोबाचें ॥३॥
गुरुशिष्यपण । हें तों अधमलक्षण ॥१॥भूतीं नारायण खरा । आप तैसा चि दुसरा ॥ध्रु.॥न कळतां दोरी साप। राहूं नेंदावा तो कांप ॥२॥तुका ह्मणे गुणदोषी । ऐसें न पडावें सोसीं ॥३॥
अंगीकार ज्याचा केला नारायणें । निंद्य तें हि तेणें वंद्य केलें ॥१॥अजामेळ भिल्ली तारीली कुंटणी । प्रत्यक्ष पुराणीं वंद्य केली ॥ध्रु.॥ब्रह्महत्याराशी पातकें अपार । वाल्मीक किंकर वंद्य केला ॥२॥तुका ह्मणे येथें भजन प्रमाण । काय थोरपण जाळावें तें ॥३॥
धनवंता घरीं । करी धन चि चाकरी ॥१॥होय बैसल्या व्यापार । न लगे सांडावें चि घर ॥ध्रु.॥रानीं वनीं दीपीं । असतीं तीं होतीं सोपीं ॥२॥तुका ह्मणे मोल । देतां कांहीं नव्हे खोल ॥३॥
हा गे माझा अनुभव । भिक्तभाव भाग्याचा ॥१॥केला ॠणी नारायण । नव्हे क्षण वेगळा ॥ध्रु.॥घालोनियां भार माथा। अवघी चिंता वारली ॥२॥तुका ह्मणे वचन साटीं । नाम कंठीं धरोनि ॥३॥
देव आहे सुकाळ देशीं । अभाग्यासी दुर्भिक्षा ॥१॥नेणती हा करूं सांटा । भरले फांटा आडरानें ॥ध्रु.॥वसवूनि असे घर । माग दूर घातला ॥२॥तुका ह्मणे मन मुरे । मग जें उरे तें चि तूं ॥३॥
शाहाणपणें वेद मुका । गोपिका त्या ताकटी ॥१॥कैसें येथें कैसें तेथें । शहाणे ते जाणती ॥ध्रु.॥यज्ञमुखें खोडी काढी । कोण गोडी बोरांची ॥२॥तुका ह्मणे भावाविण । अवघा सीण केला होय ॥३॥
मजुराचें पोट भरे । दाता उरे संचला ॥१॥या रे या रे हातोहातीं । काय माती सारावी ॥ध्रु.॥रोजकीदव होतां झाडा । रोकडा चि पर्वत ॥२॥तुका ह्मणे खोल पाया । वेचों काया क्लेशेसीं ॥३॥
स्मशानीं आह्मां न्याहालीचें सुख । या नांवें कौतुक तुमची कृपा ॥१॥नाहीं तरीं वांयां अवघें निर्फळ । शब्द ते पोकळ बडबड ॥ध्रु.॥झाडें झुडें जीव सोइरे पाषाण । होती तइप दान तुह्मीं केलें ॥२॥तुका ह्मणे आतां पाहे अनुभव । घेऊनि हातीं जीव पांडुरंगा ॥३॥
आमची जोडी ते देवाचे चरण । करावें चिंतन विठोबाचें ॥१॥लागेल तरीं कोणी घ्यावें धणीवरी । आमुपचि परी आवडीच्या ॥ध्रु.॥उभारिला कर प्रसिद्ध या जग । करूं केला त्याग मागें पुढें ॥२॥तुका ह्मणे होय दरिद्र विच्छिन्न । ऐसे देऊं दान एकवेळे ॥३॥
दधिमाझी लोणी जाणती सकळ । तें काढी निराळें जाणे मथन ॥१॥अिग्न काष्ठामाजी ऐसें जाणे जन । मथिलियाविण कैसा जाळी ॥ध्रु.॥तुका ह्मणे मुख मळीण दर्पणीं । उजिळल्यावांचूनि कैसें भासे ॥२॥
नको नको मना गुंतूं मायाजाळीं । काळ आला जवळी ग्रासावया ॥१॥काळाची हे उडी पडेल बा जेव्हां । सोडविना तेव्हां मायबाप ॥ध्रु.॥सोडवीना राजा देशींचा चौधरी । आणीक सोइरीं भलीं भलीं ॥२॥तुका ह्मणे तुला सोडवीना कोणी । एका चक्रपाणी वांचूनियां ॥३॥
पुढें जेणें लाभ घडे । तें चि वेडे नाशिती ॥१॥येवढी कोठें नागवण । अंधारुण विष घ्यावें ॥ध्रु.॥होणारासी मिळे बुद्धि । नेदी शुद्धी धरूं तें ॥२॥तुका ह्मणे जना सोंग । दावी रंग आणीक ॥३॥
ऐका गा ए अवघे जन । शुद्ध मन तें हित ॥१॥अवघा काळ नव्हे जरी । समयावरी जाणावें ॥ध्रु.॥नाहीं कोणी सवें येता । संचिता या वेगळा ॥२॥बरवा अवकाश आहे । करा साहे इंिद्रयें ॥३॥कर्मभूमीऐसा ठाव । वेवसाव जाणावा ॥४॥तुका ह्मणे उत्तम जोडी । जाती घडी नरदेह ॥५॥
संतसेवेसि अंग चोरी । दृष्टी न पडो तयावरी ॥१॥ऐसियासी व्याली रांड । जळो जळो तिचें तोंड ॥ध्रु.॥संतचरणीं ठेवितां भाव । आपेंआप भेटे देव ॥२॥तुका ह्मणे संतसेवा । माझ्या पूर्वजांचा ठेवा ॥३॥
गेले पळाले दिवस रोज । काय ह्मणतोसि माझें माझें ॥१॥सळे धरोनि बैसला काळ । फाकों नेदी घटिका पळ॥ध्रु.॥कां रे अद्यापि न कळे । केश फिरले कान डोळे ॥२॥हित कळोनि असतां हातीं । तोंडीं पाडोनि घेसी माती ॥३॥तुज ठाउकें मी जाणार । पाया शोधोनि बांधिसी घर ॥४॥तुका ह्मणे वेगें । पंढरिराया शरण रिघें ॥५॥
आतां माझ्या मायबापा । तूं या पापा प्रायिश्चत्त॥१॥फजित हे केले खळ । तो विटाळ निवारीं ॥ध्रु.॥प्रेम आतां पाजीं रस । करीं वास अंतरीं ॥२॥तुका ह्मणे पांडुरंगा । जिवलगा माझिया ॥३॥
कां रे न पवसी धांवण्या । अंगराख्या नारायणा॥१॥अंगीं असोनियां बळ । होसी खटएाळ नाठएाळ ॥ध्रु.॥आह्मां नरकासी जातां । काय येइल तुझ्या हातां ॥२॥तुका ह्मणे कान्हा। क्रियानष्टा नारायणा ॥३॥
माझे पाय तुझी डोई । ऐसें करिं गा भाक देइप ॥१॥पाहतां तंव उफराटें । घडे तई भाग्य मोठें ॥ध्रु.॥बहु साधन मोलाच। यासी जोडा दुजें कैचें ॥२॥नका अनमानूं विठ्ठला । तुका ह्मणे धडा जाला ॥३॥
पवित्र तें अन्न । हरिचिंतनीं भोजन ॥१॥येर वेठएा पोट भरी । चाम मसकाचे परी ॥ध्रु.॥जेऊनि तो धाला । हरिचिंतनीं केला काला ॥२॥तुका ह्मणे चवी आलें । जें कां मिश्रित विठ्ठलें॥३॥
चरणाचा महिमा । हा तो तुझ्या पुरुषोत्तमा ॥१॥अंध पारखी माणिकें । बोलविशी स्पष्ट मुकें ॥ध्रु.॥काय नाहीं सत्ता। हातीं तुझ्या पंढरीनाथा ॥२॥तुका ह्मणे मूढा । मज चेष्टविलें जडा ॥३॥
बिळवंत कर्म । करी आपुला तो धर्म ॥१॥पुढें घालुनियां सत्ता । न्यावें पतना पतिता ॥ध्रु.॥आचरणें खोटीं । केलीं सलताती पोटीं ॥२॥तुका ह्मणे देवा । नाहीं भजन केली सेवा ॥३॥
कैं वाहावें जीवन । कैं पलंगीं शयन ॥१॥जैसी जैसी वेळ पडे । तैसें तैसें होणें घडे ॥ध्रु.॥कैं भौज्य नानापरी । कैं कोरडएा भाकरी ॥२॥कैं बसावें वहनीं । कैं पायीं अन्हवाणी ॥३॥कैं उत्तम प्रावणॉ । कैं वसनें तीं जीणॉ ॥४॥कैं सकळ संपत्ती । कैं भोगणें विपत्ती ॥५॥कैं सज्जनाशीं संग । कैं दुर्जनाशीं योग ॥६॥तुका ह्मणे जाण । सुख दुःख तें समान ॥७॥
भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रीं दिवस वाट तुझी ॥१॥पूर्णिमेचा चंद्र चकोराचें जीवन । तैसें माझें मन वाट पाहे ॥ध्रु.॥दिवाळीच्या मुळा लेंकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची ॥२॥भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माउलीची ॥३॥तुका ह्मणे मज लागलीसे भूक । धांवूनि श्रीमुख दावीं देवा ॥४॥
आले संत पाय ठेविती मस्तकीं । येहीं उभयलोकीं सरता केलों ॥१॥वंदीन पाउलें लोळेन चरणीं । आजि इच्छाधणी फिटईल ॥ध्रु.॥अवघीं पूर्व पुण्यें जालीं सानुकूळ । अवघें चि मंगळ संतभेटी ॥२॥तुका ह्मणे कृतकृत्य जालों देवा । नेणें परि सेवा डोळां देखें ॥३॥
करीं धंदा परि आवडती पाय । प्रीती सांगों काय नेणां देवा ॥१॥रूप डोळां देखें सदा सर्वकाळ । संपादितों आळ प्रपंचाचा ॥ध्रु.॥नेमून ठेविली कारया कारणीं । आमुचिये वाणी गुण वदे ॥२॥मनासीं उत्कंठा दर्शनाचा हेवा । नाहीं लोभ जीवा धन धान्य ॥३॥उसंतितों पंथ वेठीचिया परी । जीवनसूत्र दोरीपाशीं ओढ ॥४॥तुका ह्मणे ऐसें करितों निर्वाण । जीव तुह्मां भिन्न नाहीं माझा ॥५॥
कां रे माझीं पोरें ह्मणसील ढोरें । मायबाप खरें काय एक ॥१॥कां रे गेलें ह्मणोनि करिसी तळमळ । मिथ्याचि कोल्हाळ मेलियाचा ॥ध्रु.॥कां रे माझें माझें ह्मणसील गोत । नो संडविती दूत यमा हातीं ॥२॥कां रे मी बिळया ह्मणविसी ऐसा । सरणापाशीं कैसा उचलविसी ॥३॥तुका ह्मणे न धरीं भरवसा कांहीं । वेगीं शरण जाइप पांडुरंगा ॥४ ॥
अगा करुणाकरा करितसें धांवा । या मज सोडवा लवकरि ॥१॥ऐकोनियां माझीं करुणेचीं वचनें । व्हावें नारायणें उतावीळ ॥ध्रु.॥मागें पुढें अवघा दिसे रिता ठाव । ठेवूनि पायीं भाव वाट पाहें ॥२॥उशीर तो आतां न पाहिजे केला । अहो जी विठ्ठला मायबापा ॥३॥उरलें तें एक हें चि मज आतां । अवघें विचारितां शून्य जालें ॥४॥तुका ह्मणे आतां करीं कृपादान । पाउलें समान दावीं डोळां ॥५॥
न मनीं ते ज्ञानी न मनीं ते पंडित । ऐसे परीचे एकएका भावें ॥१॥धातू पोसोनियां आणिकां उपदेश । अंतरीं तो लेश प्रेम नाहीं ॥ध्रु.॥न मनीं ते योगी न मनीं ते हरिदास । दर्शनें बहुवस बहुतां परीचीं ॥२॥तुका ह्मणे तयां नमन बाहएात्कारी । आवडती परी चित्तशुद्धीचे ॥३॥
कासिया पाषाण पूजिती पितळ । अष्ट धातु खळ भावें विण ॥१॥भाव चि कारण भाव चि कारण । मोक्षाचें साधन बोलियेलें ॥ध्रु.॥काय करिल जपमाळा कंठमाळा । करिशी वेळोवेळां विषयजप ॥२॥काय करिशील पंडित हे वाणी । अक्षराभिमानी थोर होय ॥३॥काय करिशील कुशल गायन । अंतरीं मळीण कुबुद्धि ते ॥४॥तुका ह्मणे भाव नाहीं करी सेवा । तेणें काय देवा योग्य होशी ॥५॥
अंतरींचें गोड । राहें आवडीचें कोड ॥१॥संघष्टणें येती अंगा । गुणदोष मनभंगा ॥ध्रु.॥उचिताच्या कळा । नाहीं कळती सकळा ॥२॥तुका ह्मणे अभावना । भावीं मूळ तें पतना॥३॥
शिळा जया देव । तैसा फळे त्याचा भाव ॥१॥होय जतन तें गोड । अंतरा येती नाड ॥ध्रु.॥देव जोडे भावें । इच्छेचें तें प्रेम घ्यावें ॥२॥तुका ह्मणे मोड दावी । तैशीं फळें आलीं व्हावीं ॥३॥
कासया जी ऐसा माझे माथां ठेवा । भार तुह्मी देवा संतजन ॥१॥विचित्र विंदानी नानाकळा खेळ । नाचवी पुतळे नारायण ॥ध्रु.॥काय वानरांची अंगींची ते शिक्त । उदका तरती वरी शिळा ॥२॥तुका ह्मणे करी निमित्य चि आड । चेष्टवूनि जड दावी पुढें ॥३॥
पायां पडावें हें माझें भांडवल । सरती हे बोल कोठें पायीं ॥१॥तरि हे सलगी कवतुक केलें । लडिवाळ धाकुलें असें बाळ ॥ध्रु.॥काय उणें तुह्मां संताचिये घरीं । विदित या परी सकळ ही ॥२॥तुका ह्मणे माझें उचित हे सेवा । नये करूं ठेवाठेवी कांहीं॥३॥
वदवावी वाणी माझी कृपावंता । वागपुष्प संतां समर्पीशी ॥१॥सर्वसंकटाचा तुह्मां परिहार । घालावा म्यां भार पांडुरंगा ॥ध्रु.॥एकसरें चिंता ठेवूनियां पायीं । जालों उतराई होतों तेणें ॥२॥तुका ह्मणे येथें जालें अवसान । काया वाचा मन वेचूनियां ॥३॥
नमावे पाय हें माझें उचित । आशीर्वादें हित तुमचिया॥१॥कृपेचा वोरस न समाये पोटीं । ह्मणोनि उफराटीं वचनें हीं ॥ध्रु.॥तुमची उष्टावळी हें माझें भोजन । झाडावें अंगण केरपुंजे ॥२॥परि ऐसें पुण्य नाहीं माझें गांठीं । जेणें पडे मिठी पायांसवें ॥३॥तुका ह्मणे राहे आठवण चित्तीं । ऐशी कृपा संतीं केली तुह्मीं ॥४॥
माझिया मीपणावर पडों पाषाण । जळो हें भूषण नाम माझें ।पापा नाहीं पार दुःखाचे डोंगर । जालों ये भूमीसी ओझें ॥१॥काय विटंबना सांगों किती । पाषाण फुटती ऐसें दुःख ।नर नारी सकळ उत्तम चांडाळ । न पाहाती माझें मुख ॥ध्रु.॥काया वाचा मनें अघटित करणें चर्मचक्षु हात पाय ।निंदा द्वेष घात विश्वासीं व्यभिचार । आणीक सांगों किती काय ॥२॥लक्ष्मीमदें मातें घडले महा दोष । पत्नी दोनी भेदभेद ।पितृवचन घडली अवज्ञा अविचार। कुटिल कचर वादी निंद्य ॥३॥आणीक किती सांगों ते अवगुण । न वळे जिव्हा कांपे मन ।भुतदया उपकार नाहीं शब्दा धीर । विषयीं लंपट हीन ॥४॥संत महानुभाव ऐका हें उत्तरें। अवगुण अविचारें वृद्धि पापा ।तुका ह्मणे सरतें करा पांडुरंगीं । शरण आलों मायबापा ॥५॥
फिराविलीं दोनी । कन्या आणि चक्रपाणी ॥१॥जाला आनंदें आनंद । अवतरले गोविंद ॥ध्रु.॥तुटलीं बंधनें । वसुदेवदेवकीचीं दर्शनें ॥२॥गोकुळासी आलें । ब्रह्म अव्यक्त चांगलें ॥३॥नंद दसवंती । धन्य देखिले श्रीपती ॥४॥निशीं जन्मकाळ । आले अष्टमी गोपाळ ॥५॥आनंदली मही । भार गेला सकळ ही ॥६॥तुका ह्मणे कंसा । आट भोविला वळसा ॥७॥
सोडियेल्या गांठी । दरुषणें कृष्णभेटी ॥१॥करिती नारी अक्षवाणें । जीवभाव देती दानें ॥ध्रु.॥उपजल्या काळें । रूपें मोहीलीं सकळें ॥२॥तुका तेथें वारी ॥एकी आडोनि दुसरी ॥३॥
मुख डोळां पाहे । तैशी च ते उभी राहे ॥१॥केल्याविण नव्हे हातीं । धरोनि आरती परती ॥ध्रु.॥न धरिती मनीं। कांहीं संकोच दाटणी ॥२॥तुका ह्मणें देवें । ओस केल्या देहभावें ॥३॥
गोकुळीच्या सुखा । अंतपार नाहीं लेखा ॥१॥बाळकृष्ण नंदा घरीं । आनंदल्या नरनारी ॥ध्रु.॥गुढिया तोरणें । करिती कथा गाती गाणें ॥२॥तुका ह्मणे छंदें । येणें वेधिलीं गोविंदें ॥३॥
विटंबिलें भट । दिला पाठीवरी पाट ॥१॥खोटें जाणोनि अंतर । न साहे चि विश्वंभर ॥ध्रु.॥तें चि करी दान । जैसें आइके वचन ॥२॥तुका ह्मणे देवें । पूतना शोषियेली जीवें॥३॥ ॥५॥
प्रेम देवाचें देणें । देहभाव जाय जेणें । न धरावी मनें। शुद्धी देशकाळाची ॥१॥मुक्त लज्जाविरहित । भाग्यवंत हरिभक्त। जाले वोसंडत । नामकीर्तिपवाडे ॥ध्रु.॥जोडी जाली अविनाश । जन्मोनि जाले हरिसे दास । त्यांस नव्हे गर्भवास । परब्रह्मीं सौरस ॥२॥हे चि वाहाती संकल्प । पुण्यप्रसंगाचे जप । तुका ह्मणे पाप । गांवीं नाहीं हरिजना ॥३॥
तो चि लटिक्यामाजी भला । ह्मणे देव म्यां देखिला॥१॥ऐशियाच्या उपदेशें । भवबंधन कैसें नासे ।बुडवी आपणासरिसे । अभिमानें आणिकांस ॥ध्रु.॥आणिक नाहीं जोडा । देव ह्मणवितां या मूढा ॥२॥आणिकांचे न मनी साचें । तुका ह्मणे या श्रेष्ठांचें ॥३॥
होईल जाला अंगें देव जो आपण । तयासी हे जन अवघे देव ॥१॥येरांनीं सांगावी रेमट काहाणी । चित्ता रंजवणी करावया ॥ध्रु.॥धाला आणिकांची नेणे तान भूक । सुखें पाहें सुख आपुलिया ॥२॥तुका ह्मणे येथें पाहिजे अनुभव । शब्दाचें गौरव कामा नये ॥३॥
कां न वजावें बैसोनि कथे । ऐसें ऐका हो श्रोते । पांडुरंग तेथें । उभा असे तिष्ठत ॥१॥ह्मणऊनि करी धीर । लक्ष लावूनि सादर । भवसिंधुपार । असेल ज्या तरणें ॥ध्रु.॥कथे कांहीं अणुमात्र। नो बोलावें हा वृत्तांत । देवभक्तां चित्त । समरसीं खंडणा ॥२॥कां वैष्णवा पूजावें । ऐका घेईल जो भावें । चरणरजा शिवें । वोडविला मस्तक ॥३॥ऐसें जाणा हे निभ्रांत । देव वैष्णवांचा अंकित । अलिप्त अतीत । परमित त्यासाठीं ॥४॥घालोनि लोळणा। तुका आला लोटांगणीं । वंदी पायवणीं । संतचरणींचें माथां ॥५॥
अनुभवें आलें अंगा । तें या जगा देतसें ॥१॥नव्हती हाततुके बोल । मूळ ओल अंतरिंची ॥ध्रु.॥उतरूनि दिलें कशीं । शुद्धरसीं सरे तें ॥२॥तुका ह्मणे दुसरें नाहीं । ऐसी ग्वाही गुजरली ॥३॥
अंतरींची ज्योती प्रकाशली दीप्ति । मुळींची जे होती आच्छादिली ॥१॥तेथींचा आनंद ब्रह्मांडीं न माये । उपमेशीं काये देऊं सुखा ॥ध्रु.॥भावाचे मथिलें निर्गुण संचलें । तें हें उभें केलें विटेवरी ॥२॥तुरा ह्मणे आह्मां ब्रह्मांड पंढरी । प्रेमाची जे थोरी सांठवण ॥३॥
कासया गा मज घातलें संसारीं । चित्त पायांवरी नाहीं तुझ्या ॥१॥कासया गा मज घातलें या जन्मा । नाहीं तुझा प्रेमा नित्य नवा ॥ध्रु.॥नामाविण माझी वाचा अमंगळ । ऐसा कां चांडाळ निर्मियेलें ॥२॥तुका ह्मणे माझी जळो जळो काया । विठ्ठला सखया वांचूनियां ॥३॥
प्रारब्धें चि जोडे धन । प्रारब्धें चि वाडे मान ॥१॥सोस करिसी वांयां । भज मना पंढरीराया ॥ध्रु.॥प्रारब्धें चि होय सुख। प्रारब्धें चि पावे दुःख ॥२॥प्रारब्धें चि भरे पोट । तुका करीना बोभाट ॥३॥
हीन माझी याति । वरी स्तुती केली संतीं ॥१॥अंगीं वसूं पाहे गर्व । माझें हरावया सर्व ॥ध्रु.॥मी एक जाणता । ऐसें वाटतसे चित्ता ॥२॥राख राख गेलों वांयां । तुका ह्मणे पंढरीराया ॥३॥
तपाचे सायास । न लगे घेणें वनवास ॥१॥ऐसें कळलें आह्मां एक । जालों नामाचे धारक ॥ध्रु.॥जाळीं महाकर्में । दावीं निजसुख धर्में ॥२॥तुका ह्मणे येणें । किळकाळ तें ठेंगणें॥३॥
माता कापी गळा । तेथें कोण राखी बाळा ॥१॥हें कां नेणां नारायणा । मज चाळवितां दिना ॥ध्रु.॥नागवी धावणें । तेथें साहए व्हावें कोणें ॥२॥राजा सर्व हरी । तेथें दुजा कोण वारी ॥३॥तुझ्या केल्याविण । नव्हे िस्थर वश जन ॥४॥तुका ह्मणे हरी। सूत्र तुह्मां हातीं दोरी॥५॥
गाऊं नेणें परी मी कांहीं गाईन । शरण जाईन पांडुरंगा ॥१॥ब्रह्मांडनायक मी त्याचा अंकित । काय यमदूत करिती काळ ॥ध्रु.॥वश्या ज्याच्या नामें तारिली गणिका । अजामेळासारिखा पापरासीं ॥२॥चरणींच्या रजें अहिल्या तारिली। रूपवंत केली कुबजा क्षणें ॥३॥पृथिवी तारिली पाताळासी जातां। तुका ह्मणे आतां आह्मी किती ॥४॥
गाजराची पुंगी । तैसे नवे जाले जोगी ॥१॥काय करोनि पठन । केली अहंता जतन ॥ध्रु.॥अल्प असे ज्ञान । अंगीं ताठा अभिमान ॥२॥तुका ह्मणे लंड । त्याचें हाणोनि फोडा तोंड॥३॥
परद्रव्य परनारी । अभिळासूनि नाक धरी ॥१॥जळो तयाचा आचार । व्यर्थ भार वाहे खर ॥ध्रु.॥सोहोळ्याची िस्थती । क्रोधें विटाळला चित्तीं ॥२॥तुका ह्मणे सोंग । दावी बाहेरील रंग ॥३॥
टिळा टोपी उंच दावी । जगीं मी एक गोसावी ॥१॥अवघा वरपंग सारा । पोटीं विषयांचा थारा ॥ध्रु.॥मुद्रा लावितां कोरोनि । मान व्हावयासी जनीं ॥२॥तुका ह्मणे ऐसे किती । नरका गेले पुढें जाती ॥३॥
ऐसे संत जाले कळीं । तोंडीं तमाखूची नळी ॥१॥स्नानसंध्या बुडविली । पुढें भांग वोडवली ॥ध्रु.॥भांगभुर्का हें साधन। पची पडे मद्यपान ॥२॥तुका ह्मणे अवघें सोंग । तेथें कैचा पांडुरंग ॥३॥
जातीची शिंदळी । तिला कोण वंशावळी ॥१॥आपघर ना बापघर । चित्तीं मनीं व्यभिचार ॥ध्रु.॥सेजे असोनियां धणी । परद्वार मना आणी ॥२॥तुका ह्मणे असील जाती । जातीसाठीं खाती माती ॥३॥
अंधळ्याची काठी । हिरोनियां कडा लोटी ॥१॥हें कां देखण्या उचित । लाभ किंवा कांहीं हित ॥ध्रु.॥साकर ह्मणोनि माती । चाळवूनि द्यावी हातीं ॥२॥तुका ह्मणे वाटे । देवा पसरावे सराटे ॥३॥
प्रीतिचिया बोला नाहीं पेसपाड । भलतसें गोड करूनि घेई ॥१॥तैसें विठ्ठलराया तुज मज आहे । आवडीनें गायें नाम तुझें ॥ध्रु.॥वेडे वांकडे बाळकाचे बोल । करिती नवल मायबाप ॥२॥तुका ह्मणे तुज येवो माझी दया । जीवींच्या सखया जिवलगा ॥३॥
माझे मज कळों येती अवगुण । काय करूं मन अनावर ॥१॥आतां आड उभा राहें नारायणा । दयासिंधुपणा साच करीं ॥ध्रु.॥वाचा वदे परी करणें कठीण । इंिद्रयां अधीन जालों देवा ॥२॥तुका ह्मणे तुझा जैसा तैसा दास । न धरीं उदास मायबापा ॥३॥
वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची । कीर्ती मानवाची सांगों नये ॥१॥उदंड चि जाले जन्मोनियां मेले । होऊनियां गेले राव रंक ॥ध्रु.॥त्यांचें नाम कोणी नेघे चराचरीं । साही वेद चारी वर्णिताती ॥२॥अक्षय अढळ चळेना ढळेना । तया नारायणा ध्यात जावें ॥३॥तुका ह्मणे तुझी विठ्ठल चित्तीं ध्यातां । जन्ममरण व्यथा दूर होती ॥४॥
नको देऊं देवा पोटीं हें संतान । मायाजाळें जाण नाठवसी ॥१॥नको देऊं देवा द्रव्य आणि भाग्य । तो एक उद्वेग होय जीवा ॥२॥तुका ह्मणे करीं फकिराचे परी । रात्रदिवस हरि येइल घरा ॥३॥
जोडोनियां धन उत्तम वेव्हारें । उदास विचारें वेच करी ॥१॥उत्तम चि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ॥ध्रु.॥परउपकारी नेणें परनिंदा । परस्त्रिया सदा बहिणी माया ॥२॥भूतदया गाईपशूचें पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी॥३॥शांतिरूपें नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्व वडिलांचें ॥४॥तुका ह्मणे हें चि आश्रमाचें फळ । परमपद बळ वैराग्याचें ॥५॥
हरि ह्मणतां गति पातकें नासती । किळकाळ कांपती हरि ह्मणतां ॥१॥हरि ह्मणतां भुक्ति हरि ह्मणतां मुक्ति । चुके यातायाती हरि ह्मणतां ॥ध्रु.॥तपें अनुष्ठानें न लगती साधनें । तुटती बंधनें हरि ह्मणतां ॥२॥तुका ह्मणे भावें जपा हरिचें नाम । मग काळयम शरण तुह्मा ॥३॥
नये वांटूं मन । कांहीं न देखावें भिन्न ॥१॥पाय विठोबाचे चित्तीं । असों द्यावे दिवसराती ॥ध्रु.॥नये काकुळती । कोणा यावें हरिभिक्त ॥२॥तुका ह्मणे साई । करील कृपेची विठाई॥३॥
सकळ देवांचें दैवत । उभें असे रंगा आंत ॥१॥रंगा लुटा माझे बाप । शुद्ध भाव खरें माप ॥ध्रु.॥रंग लुटिला बहुतीं । शुक नारदादि संतीं ॥२॥तुका लुटितां हे रंग । साहए जाला पांडुरंग ॥३॥
तुका वेडा अविचार । करी बडबड फार ॥१॥नित्य वाचे हा चि छंद । राम कृष्ण हरि गोविंद ॥ध्रु.॥धरी पांडुरंगीं भाव। आणीक नेणें दुजा देव ॥२॥गुरुज्ञान सर्वा ठायीं । दुजें न विचारी कांहीं ॥३॥बोल नाईके कोणाचे । कथे नागवा चि नाचे॥४॥संगउपचारें कांटाळे । सुखें भलते ठायीं लोळे ॥५॥कांहीं उपदेशिलें नेणे । वाचे विठ्ठल विठ्ठल ह्मणे ॥६॥केला बहुतीं फजित । तरी हें चि करी नित्य ॥७॥अहो पंडितजन । तुका टाकावा थुंकोन ॥८॥
आली सिंहस्थपर्वणी । न्हाव्या भटा जाली धणी॥१॥अंतरीं पापाच्या कोडी । वरिवरि बोडी डोई दाढी ॥ध्रु.॥बोडिलें तें निघालें । काय पालटलें सांग वहिलें ॥२॥पाप गेल्याची काय खुण । नाहीं पालटले अवगुण ॥३॥भिक्तभावें विण । तुका ह्मणे अवघा सीण ॥४॥
तुज घालोनियां पूजितों संपुष्टीं । परि तुझ्या पोटीं चवदा भुवनें ॥१॥तुज नाचऊनि दाखवूं कौतुका । परी रूपरेखा नाहीं तुज ॥ध्रु.॥तुजलागीं आह्मी गात असों गीत । परी तूं अतीत शब्दाहूनि ॥२॥तुजलागीं आह्मीं घातियेल्या माळा । परि तूं वेगळा कर्तृत्वासी ॥३॥तुका ह्मणे आतां होऊनि परमित । माझें कांहीं हित विचारावें ॥४॥
पापाची मी राशी । सेवाचोर पायांपाशीं ॥१॥करा दंड नारायणा । माझ्या मनाची खंडणा ॥ध्रु.॥जना हातीं सेवा । घेतों लंडपणें देवा ॥२॥तुझा ना संसार । तुका दोहींकडे चोर ॥३॥
दुडीवरी दुडी । चाले मोकळी गुजरी ॥१॥ध्यान लागो ऐसें हरी । तुझे चरणीं तैशापरी ॥ध्रु.॥आवंतण्याची आस । जैसी लागे दुर्बळासी ॥२॥लोभ्या कळांतराची आस । बोटें मोजी दिवस मास ॥३॥तुका ह्मणे पंढरीनाथा । मजला आणिक नको व्यथा ॥४॥
लागोनियां पायां विनवितों तुम्हाला । करें टाळी बोला मुखें नाम ॥१॥विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळां । हा सुखसोहळा स्वगाअ नाहीं ॥ध्रु.॥कृष्ण विष्णु हरि गोविंद गोपाळ । मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा ॥२॥सकळांसीं येथें आहे अधिकार । कलयुगीं उद्धार हरिनामें ॥३॥तुका ह्मणे नामापाशीं चारी मुक्ति । ऐसें बहुग्रंथीं बोलियेलें ॥४॥
लटिकें हासें लटिकें रडें । लटिकें उडें लटिक्यापें॥१॥लटिकें माझें लटिकें तुझें । लटिकें ओझें लटिक्याचें ॥ध्रु.॥लटिकें गायें लटिकें ध्यायें । लटिकें जायें लटिक्यापें ॥३॥लटिका भोगी लटिका त्यागी । लटिका जोगी जग माया ॥३॥लटिका तुका लटिक्या भावें । लटिकें बोले लटिक्यासवें ॥४॥२८६६. जालों म्हणती त्याचें मज वाटे आश्चर्य । ऐका नव्हे धीर वचन माझें ॥१॥शिजलिया अन्ना ग्वाही दांत हात । जिव्हेसी चाखत न कळे कैसें ॥ध्रु.॥तापलिया तेली बावन चंदन । बुंद एक क्षण शीतळ करी ॥२॥पारखी तो जाणे अंतरींचा भेद । मूढजना छंद लावण्यांचा ॥३॥तुका ह्मणे कसीं निवडे आपण । शुद्ध मंद हीन जैसें तैसें ॥४॥
हे चि थोर भिक्त आवडती देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥ठेविलें अनंतें तैसें चि राह वें । चित्तीं असों द्यावें समाधान ॥ध्रु.॥वाहिल्या उद्वेग दुःख चि केवळ । भोगणें तें फळ संचिताचें ॥२॥तुका ह्मणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवा पायीं ॥३॥
जन्मा येणें घडे पातकाचे मूळें । संचिताचें फळ आपुलिया ॥१॥मग वांयांविण दुःख वाहों नये । रुसोनियां काय देवावरी ॥ध्रु.॥ठाउका चि आहे संसार दुःखाचा । चित्तीं सीण याचा वाहों नये ॥२॥तुका ह्मणे नाम त्याचें आठवावें । तेणें विसरावें जन्मदुःख ॥३॥
आतां माझे नका वाणूं गुण दोष । करितों उपदेश याचा कांहीं ॥१॥मानदंभासाठीं छळीतसें कोणा । आण या चरणां विठोबाची ॥२॥तुका ह्मणे हें तों ठावें पांडुरंगा । काय कळे जगा अंतरींचें ॥३॥
काय माझें नेती वाईट ह्मणोन । करूं समाधान कशासाटीं ॥१॥काय मज लोक नेती परलोका । जातां कोणा एका निवारेल ॥ध्रु.॥न ह्मणें कोणासी उत्तम वाईट । सुखें माझी कूट खावो मागें ॥२॥सर्व माझा भार असे पांडुरंगा । काय माझें जगासवें काज ॥३॥तुका ह्मणे माझें सर्व ही साधन । नामसंकीर्त्तन विठोबाचें ॥४॥देवांनीं स्वामींस चिंचवडास नेलें होतें ते अभंग, आरत्या ॥ १३ ॥
वांजा गाई दुभती । देवा ऐसी तुझी ख्याति ॥१॥ऐसें मागत नाहीं तुज । चरण दाखवावे मज ॥ध्रु.॥चातक पाखरूं। त्यासी वर्षे मेघधारु ॥ ॥पक्षी राजहंस । अमोलिक मोतीं त्यास॥३॥तुका ह्मणे देवा । कां गा खोचलासी जीवा ॥४॥२८७२. परतें मी आहें सहज चि दुरी । वेगळें भिकारी नामरूपा ॥१॥न लगे रुसावें धरावा संकोच । सहज तें नीच आलें भागा ॥ध्रु.॥पडिलिये ठायीं उिच्छष्ट सेवावें । आरते तें चि देवें केलें ऐसें ॥२॥तुका ह्मणे तुह्मी आह्मां जी वेगळे । केलेती निराळे द्विज देवें ॥३॥
चिंतामणिदेवा गणपतीसी आणा । करवावें भोजना दुजे पात्रीं ॥१॥देव ह्मणती तुक्या एवढी कैची थोरी । अभिमानाभीतरी नागवलों ॥ध्रु.॥वाडवेळ जाला सिळें जालें अन्न । तटस्थ ब्राह्मण बैसलेती ॥२॥तुका ह्मणे देवा तुमच्या सुकृतें । आणीन त्वरित मोरयासी ॥३॥
भोक्ता नारायण लक्षुमीचा पति । ह्मणोनि प्राणाहुती घेतलिया ॥१॥भर्ता आणि भोक्ता कर्त्ता आणि करविता । आपण सहजता पूर्णकाम ॥ध्रु.॥विश्वंभर कृपादृष्टी सांभाळीत । प्रार्थना करीत ब्राह्मणांची ॥२॥कवळोकवळीं नाम घ्या गोविंदाचें । भोजन भक्तांचें तुका ह्मणे ॥३॥
माझा स्वामी तुझी वागवितो लात । तेथें मी पतित काय आलों ॥१॥तीथॉ तुमच्या चरणीं जाहालीं निर्मळ । तेथें मी दुर्बळ काय वाणूं ॥२॥तुका ह्मणे तुह्मी देवा द्विजवंद्य । मी तों काय निंद्य हीन याति ॥३॥
वंदिलें वंदावें जीवाचिये साटीं । किंवा बरी तुटी आरंभीं च ॥१॥स्वहिताची चाड ते ऐका हे बोल । अवघें चि मोल धीरा अंगीं ॥ध्रु.॥सिंपिलें तें रोंप वरीवरी बरें । वाळलिया वरी कोंभ नये ॥२॥तुका ह्मणे टाकीघायें देवपण । फुटलिया जन कुला पुसी ॥३॥
आह्मां विष्णुदासां हें चि भांडवल । अवघा विठ्ठल धन वित्त ॥१॥वाणी नाहीं घ्यावें आपुलिया हातें । करोनियां चित्तें समाधान ॥२॥तुका ह्मणे द्रव्य मेळविलें मागें । हें तों कोणासंगें आलें नाहीं ॥३॥
सुखाचे व्यवहारीं सुखलाभ जाला । आनंदें कोंदला मागें पुढें ॥१॥संगती पंगती देवासवें घडे । नित्यानित्य पडे तें चि सांचा ॥ध्रु.॥समर्थचे घरीं सकळ संपदा । नाहीं तुटी कदा कासयाची॥२॥तुका ह्मणे येथें लाभाचिया कोटी । बहु वाव पोटीं समर्थाचे ॥३॥
काय देवें खातां घेतलें हातींचें । आलें हें तयाचें थोर भय ॥१॥ह्मणतां गजरें राम एकसरें । जळती पापें थोरें भयधाकें॥ध्रु.॥काय खोळंबले हात पाय अंग । नाशिलें हें सांग रूप काय ॥२॥कोण लोकीं सांगा घातला बाहेरी । ह्मणतां हरि हरि तुका ह्मणे॥३॥
उत्तम त्या याति । देवा शरण अनन्यगति ॥१॥नाहीं दुजा ठाव । कांहीं उत्तम मध्यम भाव ॥ध्रु.॥उमटती ठसे । ब्रह्मप्राप्ति अंगीं दिसे ॥२॥भाविक विश्वासी।तुका ह्मणे नमन त्यांसी॥३॥ ॥१०॥
ज्यासी नावडे एकादशी । तो जिता चि नरकवासी॥१॥ज्यासी नावडे हें व्रत । त्यासी नरक तो ही भीत ॥ध्रु.॥ज्यासी मान्य एकादशी । तो जिता चि मुक्तवासी ॥२॥ज्यासी घडे एकादशी । जाणें लागे विष्णुपाशीं ॥३॥तुका ह्मणे पुण्यराशी । तो चि करी एकादशी ॥४॥
मुंगी होउनि साकर खावी । निजवस्तूची भेटी घ्यावी॥१॥वाळवंटी साकर पडे । गज येउनि काय रडे ॥ध्रु.॥जाला हरिदास गोसांवी । अवघी मायिक क्रिया दावी ॥२॥पाठ पाठांतरिक विद्या । जनरंजवणी संध्या ॥३॥प्रेम नसतां अंगा आणी । दृढ भाव नाहीं मनीं ॥४॥ब्रह्मज्ञान वाचे बोले । करणी पाहातां न निवती डोळे ॥५॥मिथ्या भगल वाढविती । आपुली आपण पूजा घेती ॥६॥तुका ह्मणे धाकुटें व्हावें । निजवस्तूसी मागुनि घ्यावें ॥७॥
भय हरिजनीं । कांहीं न धरावें मनीं ॥१॥नारायण ऐसा सखा । काय जगाचा हा लेखा ॥ध्रु.॥चित्त वित्त हेवा । समर्पून राहा देवा ॥२॥तुका ह्मणे मन । असों द्यावें समाधान॥३॥
आयुष्य मोजावया बैसला मापारी । तूं कां रे वेव्हारी संसाराचा ॥१॥नेईल ओढोनि ठाउकें नसतां । न राहे दुश्चिता हरिविण ॥ध्रु.॥कठीण हें दुःख यम जाचतील । कोण सोडवील तया ठायीं ॥२॥राहतील दुरी सज्जन सोयरीं । आठवीं श्रीहरी लवलाहीं ॥३॥तुका ह्मणे किती करिसी लंडायी । होईल भंडाई पुढें थोर ॥४॥
होऊं नको कांहीं या मना आधीन । नाइकें वचन याचें कांहीं ॥१॥हटियाची गोष्टी मोडून टाकावी । सोई ही धरावी विठोबाची ॥ध्रु.॥आपुले आधीन करूनियां ठेवा । नाहीं तरि जीवा घातक हें ॥२॥तुका ह्मणे जाले जे मना आधीन । तयांसी बंधन यम करी ॥३॥
नामाविण काय वाउगी चावट । वांयां वटवट हरीविण॥१॥फुकट चि सांगे लोकाचिया गोष्टी । राम जगजेठी वाचे नये ॥ध्रु.॥मेळवूनि चाट करी सुरापान । विषयांच्या गुणें माततसे ॥२॥बैसोनि टवाळी करी दुजयाची । नाहीं गोविंदाची आठवण ॥३॥बळें यम दांत खाय तयावरी । जंव भरे दोरी आयुष्याची ॥४॥तुका ह्मणे तुला सोडवील कोण । नाहीं नारायण आठविला ॥५॥
संत गाती हरिकीर्त्तनीं । त्यांचें घेइन पायवणी ॥१॥हें चि तप तीर्थ माझें । आणीक मी नेणें दुजें ॥ध्रु.॥काया कुरवंडी करीन । संत महंत ओंवाळीन ॥२॥संत महंत माझी पूजा । अनुभाव नाहीं दुजा ॥३॥तुका ह्मणे नेणें कांहीं । अवघें आहे संतापायीं ॥४॥
जालें भांडवल । अवघा पिकला विठ्ठल ॥१॥आतां वाणी काशासाटीं । धीर धरावा च पोटीं ॥ध्रु.॥आपुल्या संकोचें । ह्मणऊनि तेथें टांचे ॥२॥घेतों ख†या मापें । तुका देखोनियां सोपें ॥३॥

शब्दार्थ

या भागात येणारे जुने मराठी शब्द.

ऐसें
— असे
सकळ
— सर्व
तुज
— तुला
घडे
— घडते, शक्य होते
तैसें
— तसे
तेणें
— त्यामुळे, त्याच्या योगाने
ठायीं
— ठिकाणी
जेणें
— ज्यामुळे, ज्याच्या योगाने
वरी
— वर; शिवाय
माया
— भासमान करणारी शक्ती
जैसें
— जसे
तया
— त्याला, त्या
तंव
— तोपर्यंत; तेवढ्यात
येर
— दुसरा, इतर
अगा
— अरे (संबोधन)
मातें
— मला
ब्रह्म
— सर्वव्यापी अंतिम तत्त्व
जंव
— जोपर्यंत

ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.

चित्र: Rakhumai, Pandharpur Vitthal temple.jpg — Pointn, CC0, via Wikimedia Commons.

WhatsUp मराठी वर — प्रत्यक्ष भेट

हेही वाचा