काळावरी सत्ता । ऐशा करितो वारता ॥१॥तो मी हीणाहूनि सांडें । देवे दुहें काळतोंडें ॥ध्रु.॥मानूनी भर्वसा । होतों दासा मी ऐसा ॥२॥तुका ह्मणे मान । गेलों वाढवूं थोरपण ॥३॥
समर्थाचे सेवे कोठें नाहीं घात । पाहों नये अंत पांडुरंगा ॥१॥आहे तैसी नीत विचारावी बरी । येऊनी भीतरी वास करा ॥ध्रु.॥निढळ राखिलें तरी भयाभीत । हर्षामर्ष चित्त पावतसे॥२॥तुका ह्मणे तरी कळेल निवाड । दर्शनाची चाड शुभकीर्ति ॥३॥
बहु धीर केला । जाण न होसी विठ्ठला ॥१॥आतां धरीन पदरीं । करीन तुज मज सरी ॥ध्रु.॥जालों जीवासी उदार । उभा राहिलों समोर ॥२॥तुका विनवी संतां । ऐसें सांगा पंढरिनाथा॥३॥
नेदावी सलगी न करावा संग । करी चित्ता भंग वेळोवेळा ॥१॥सर्प शांतिरूप न ह्मणावा भला । झोंबे खवळीला तात्काळ तो ॥२॥तुका ह्मणे दुरी राखावा दुर्जन । करावें वचन न घडे तें ॥३॥
मज अभयदान देई दातारा । कृपेच्या सागरा मायबापा॥१॥देहभाव तुझ्या ठेवियेला पायीं । आणीक मी कांहीं दुजें नेणें ॥ध्रु.॥सेवाभिक्तहीन नेणता पतित । आतां माझे हित तुझ्या पायीं ॥२॥तुका ह्मणे माझें सर्व ही साधन । नाम संकीर्तन विठोबाचें ॥३॥
करावा वर्षाव । तृषाक्रांत जाला जीव ॥१॥पाहें आकाशाची वास । जाणता तूं जगनिवास ॥ध्रु.॥संयोगें विस्तार । वाढी लागे तो अंकूर ॥२॥तुका ह्मणे फळें । चरणांबुजें तीं सकळें॥३॥
करीं ऐसी धांवाधांवी । चित्त लावीं चरणापें ॥१॥मग तो माझा मायबाप । घेइल ताप हरूनी ॥ध्रु.॥बहुतांच्या मतें गोवा । होऊं जीवा नेदावा ॥२॥तुका ह्मणे करुणाबोलें । धीर विठ्ठलें निघेना ॥३॥
एकविध नारायण । तेथें विषमाचा सीण । पालटों चि भिन्न । नये अणुप्रमाण ॥१॥अवघें सारावें गाबाळ । चुकवूनियां कोल्हाळ । आनंदाचें स्थळ । एकाएकीं एकांत ॥ध्रु.॥कायावाचामन। स्वरूपीं च अनुसंधान । लक्ष भेदी बाण । येणे पाडें लवलाहो॥२॥तुका ह्मणे आळस निद्रा । येथें देउनियां चिरा । देउनियां धीरा । मिठी जाणा जागृतीं ॥३॥
हारपोनि गेली निशी । निद्रा कैसी न देखों ॥१॥नारायणीं वसलें घर । निरंतर आनंद ॥ध्रु.॥अवघा रुधविला ठाव। नेला वाव मी माझें ॥२॥तुका ह्मणे एके ठावीं । असूं नाहीं सीनाभिन्न ॥३॥
पाहा कैसेकैसे । देवें उद्धरिले आनयासें ॥१॥ऐका नवल्याची ठेव । नेणतां भिक्तभाव ॥ध्रु.॥कैलासासी नेला । भिल्ल पानेडी बैसला ॥२॥पांखांच्या फडत्कारीं । उद्धरुनी नेली घारी ॥३॥खेचरें पिंडी दिला पाव । त्या पूजनें धाये देव ॥४॥तुका ह्मणे भोळा । स्वामी माझा हो कोंवळा ॥५॥
अनुभव ऐसा । मज लागला सरिसा ॥१॥पाठी बैसली सेजारीं । नव्हे शांत कोणे परी ॥ध्रु.॥कोठें न लगे जावें । कांहीं घालावया ठावें ॥२॥तुका ह्मणे कोटि । दुःखाच्या च तये पोटीं ॥३॥
पाठीवरी भार । जातो वाहूनियां खर ॥१॥संत नेतील त्या ठाया । माझी आधीन त्यां काया ॥ध्रु.॥मोटचौफळ । अंतीं उिच्छष्टाचें बळ ॥२॥न संडीं मारग । येथें न चोरूनि अंग॥३॥आपुलिया सत्ता । चालविती नाहीं चिंता ॥४॥कळविळला तुका । घराचार येथें नका ॥५॥
मागें पुढें जालों लाटा । अवघा मोटा सरळ ॥१॥नाहीं कोठें रितें अंग । नित्य रंग नवा चि ॥ध्रु.॥पोसिंद्याचे पडिलों हातीं । वोझें माती चुकली ॥२॥जोगावलों पोटीं खर । पाठी भार वरि नाहीं ॥३॥अवघिया मोकळ्या दिशा । नाहीं वोळसा कामाचा॥४॥संताचिये लोळें द्वारीं । पळती दुरी गोमाशा ॥५॥कांहीं न साहेसा जाला । तुका नेला समर्थ ॥६॥पातोगें महाद्वारीं। वरि झुली वाकळा ॥७॥
करणें न करणें वारलें जेथें । जातों तेणें पंथें संतसंगें॥१॥संतीं हें पहिलें लाविलें निशाण । ते खुणा पाहोन गर्जें नाम ॥२॥तुका ह्मणे तुह्मीं चला या चि वाटे । भरवशानें भेटे पांडुरंग ॥३॥
कइंचें कारण । तृष्णा वाढविते सीण ॥१॥काय करूनि ऐसा संग । सोसें चि तूं पांडुरंग ॥ध्रु.॥रूपीं नाहीं गोडी । हांवे हांवे उर फोडी ॥२॥तुका न पडे भरी । ऐशा वरदळाचे थोरी॥३॥
धन्य तो ग्राम जेथें हरिदास । धन्य तो चि वास भाग्य तया ॥१॥ब्रह्मज्ञान तेथें असे घरोघरीं । धन्य त्या नरनारी चतुर्भुज ॥ध्रु.॥नाहीं पापा रिघ काळाचें जीवन । हरिनामकीर्त्तन घरोघरीं ॥२॥तुका ह्मणे तिहीं तारिलें सकळां । आपल्या कोटिकुळासहित जीव ॥३॥
मारूं नये सर्प संतांचिये दृष्टी । होतील ते कष्टी व्यापकपणें ॥१॥एक सूत्र जीवशिवीं आइक्यता । रोम उपडितां अंग कांपे ॥ध्रु.॥नाहीं साहों येत दुखाची ते जाती । परपीडा भूतीं साम्य जालें ॥२॥तुका ह्मणे दिला नीतीचा संकेत । पुजा नांवें चित्त सुखी तेणें ॥३॥
भय होतें आह्मीपणें । पाठी येणें घातलें ॥१॥अवघा आपुला चि देश । काळा लेश उरे चि ना ॥ध्रु.॥समर्थाचें नाम घेतां । मग चिंता काशाची ॥२॥तुका ह्मणें नारायणें । जालें जिणें सुखाचें ॥३॥
विषम वाटे दुरवरी । चालूनि परती घरी । मागील ते उरी । नाहीं उरली भयाची ॥१॥मुख्य न व्हावा तो नाड । सेवटाचे हातीं गोड । सरलिया चाड । मग कैचे उद्वेग ॥ध्रु.॥होता पहिला अभ्यास । समयीं घालावया कास । तेव्हां लटिके दोष । योगें अनुतापाच्या ॥२॥तुका ह्मणे आहे । बुद्धी केलियानें साहे । जवळी च पाहें । देव वाट स्मरणाची ॥३॥
आतां कोठें धांवे मन । तुझे चरण देखिलिया ॥१॥भाग गेला सीण गेला । अवघा जाला आनंदु ॥ध्रु.॥प्रेमरसें बैसली मिठी । आवडी लाठी मुखासी ॥२॥तुका ह्मणे आह्मां जोगें । विठ्ठल घोगें खरें माप ॥३॥
विश्वीं विश्वंभर । बोले वेदांतींचा सार ॥१॥जगीं जगदीश । शास्त्रें वदती सावकास ॥ध्रु.॥व्यापिलें हें नारायणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥२॥जनीं जनार्दन । संत बोलती वचनें ॥३॥सूर्याचिया परी । तुका लोकीं क्रीडा करी ॥४॥
निरोधती परि न मोडे विकार । बहु हीं दुस्तर विषयद्वारें ॥१॥राहातेति तुह्मी भरोनि अंतरीं । होतों तदाकारी निर्विषचि ॥ध्रु.॥कृपेचिया साक्षी असती जवळी । वचनें मोकळीं सरत नाहीं ॥२॥तुका ह्मणे ताळा मेळवणीपाशीं । विनंती पायापाशीं हे चि करीं ॥३॥
अद्वय चि द्वय जालें चि कारण । धरिलें नारायणें भिक्तसुख ॥१॥अपरोक्ष आकार जाला चतुर्भुज । एकतत्त्व बीज भिन्न नाहीं ॥ध्रु.॥शून्य निरशुन्यी राहिलें निर्मळ । तें दिसे केवळ इटेवरी ॥२॥सुखें घ्यावें नाम वदना ही चाड । सरिता वापी आड एक पाणी ॥३॥तुका ह्मणे मी च आहें तेणें सुखें । भेद नाहीं मुखें नाम गातों ॥४॥
उदार चक्रवर्ती । वैकुंठीचा भूपति । पुंडलिकाचिया प्रीती । विटेवरी राहिला ॥१॥सर्वसिद्धीचा दातार । सवें आणिला परिवार । भक्त अभयंकर । घ्याघ्या ऐसें ह्मणतसे ॥ध्रु.॥जेणें हें विश्व निर्मिलें । महर्षीदेवा संस्थापिलें । एकवीस स्वर्गांतें धरिलें । सत्तामात्रें आपुलिया ॥२॥तुका ह्मणे कृपावंत । इिच्छले पुरवी अर्थ। रिद्धिसिद्धिमुक्ती देतसे । शेखीं संग आपुला ॥३॥
सकलगुणें संपन्न । एक देवाचें लक्षण ॥१॥वरकड कोठें कांहीं । एक आहे एक नाहीं ॥ध्रु.॥षड्गुण ऐश्वर्य संपन्न । एक भगवंतीं जाण ॥२॥तुका ह्मणे जेंजें बोला । तेंतें साजे या विठ्ठला ॥३॥
वैकुंठींचें सुख पंढरिये आलें । अवघें पुंडलिकें सांटविलें ॥१॥घ्या रे घ्या रे माझे बाप । जिव्हा घेउनि खरें माप। करा एक खेप । मग करणें न लगे ॥ध्रु.॥विषय गुंडोनी ठेवीं पसारा । मग धांव घ्या पंढरपुरा ॥२॥जंव आहे आयुष्याचा लेश। तंव करीं पंढरीचा वास ॥३॥अळस न करीं लाभाचा । तुका विनवी कुणबियाचा ॥४॥
देवाचें चरित्र नाठवे सर्वथा । विनोदार्थ कथा गोड वाटे ॥१॥हातावरि हात हासोनि आफळी । वाजवितां टाळी लाज वाटे ॥२॥तुका ह्मणे थुंका त्याच्या तोंडावरि । जातो यमपुरी भोगावया ॥३॥
अद्वैतीं तों माझें नाहीं समाधान । गोड हे चरण सेवा तुझी ॥१॥करूनी उचित देइप हें चि दान । आवडे कीर्तन नाम तुझें॥ध्रु.॥देवभक्तपण सुखाचा सोहळा । ठेवुनी निराळा दावी मज ॥२॥तुका ह्मणे आहे तुझें हें सकळ । कोणी एके काळें देइप मज ॥३॥
हें चि माझें तप हें चि माझें दान । हें चि अनुष्ठान नाम तुझें ॥१॥हें चि माझें तीर्थ हें चि माझें व्रत । सत्य हें सुकृत नाम तुझें ॥ध्रु.॥हा चि माझा धर्म हें चि माझें कर्म । हा चि नित्यनेम नाम तुझें ॥२॥हा चि माझा योग हा चि माझा यज्ञ । हें चि जपध्यान नाम तुझें ॥३॥हें चि माझें ज्ञान श्रवण मनन । हें चि निजध्यासन नाम तुझे ॥४॥हा चि कुळाचार हा चि कुळधर्म । हा चि नित्यनेम नाम तुझें ॥५॥हा माझा आचार हा माझा विचार । हा माझा निर्धार नाम तुझें ॥६॥तुका ह्मणे दुजें सांगायासि नाहीं । नामेंविण कांहीं धनवित्त ॥७॥
कोण साक्षीविण । केलें उद्धारा भजन ॥१॥ऐसें सांगा जी दातारा । माझी भिक्त परंपरा ॥ध्रु.॥कोणें नाहीं केली आळी । ब्रह्मज्ञानाहुनि वेगळी ॥२॥कोणाचें तों कोड । नाहीं पुरविला लाड ॥३॥कोणाच्या उद्धारा । केला विलंब माघारा॥४॥तुका ह्मणे भिन्न । कांहो बोले साक्षीविण ॥५॥
सुखरूप चाली । हळूहळू उसंतिली ॥१॥बाळगोपाळाची वाट । सेवे सेवकता नीट ॥ध्रु.॥जरी झाला श्रम । तरी पडों नये भ्रम ॥२॥तुका ह्मणे दासां । देव सरिसासरिसा॥३॥
चुकली ते वाट । पुढें सांपडवी नीट ॥१॥ह्मणउनी गर्भवास । नेणती ते हरिचे दास ॥ध्रु.॥संचिताचा संग । काय जाणों पावें भंग ॥२॥तुका ह्मणे दृष्टी उघडितों नव्हे कष्टी ॥३॥
कइं तो दिवस देखेन डोळां । कल्याण मंगळामंगळाचें॥१॥आयुष्याच्या शेवटीं पायांसवे भेटी । किळवरें तुटी जाल्या त्वरे ॥ध्रु.॥सरो हें संचित पदरींचा गोवा । उताविळें देवा मन जालें ॥२॥पाउलापाउलीं करितां विचार । अनंतविकार चित्ता अंगीं ॥३॥ह्मणउनि भयाभीत होतो जीव । भाकितसें कींव अटाहासें ॥४॥तुका ह्मणे होइल आइकिलें कानीं । तरि चक्रपाणी धांव घाला ॥५॥दुःखाच्या उत्तरीं आळविले पाय । पाहणें तों काय अजून अंत ॥६॥
कळों येतें वर्म । तरी न पवतों श्रम ॥१॥तुह्मां शिरीं होता भार । आह्मां कैचा संचार ॥ध्रु.॥होतें अभयदान । तरी िस्थर होतें मन ॥२॥तुका ह्मणे पाहें । ऐसी वाट उभा आहे ॥३॥
वारंवार हा चि न पडावा विसर । वसावें अंतर तुमच्या गुणीं ॥१॥इच्छेचा ये दाता तूं एक समर्था । अगा कृपावंता मायबापा ॥ध्रु.॥लाभाचिये वोढी उताविळें मन । त्यापरि चिंतन चरणाचें ॥२॥तुका ह्मणे जीवी जीवन ओलावा । पांडुरंगे दावा शीघ्र आतां ॥३॥
जन्मा आलियाचा लाभ । पद्मनाभदरुषणें ॥१॥पाठीलागा येतो काळ । तूं कृपाळु माउली ॥ध्रु.॥कोण्या उपायें हें घडे । भव आंगडें सुटकेचें ॥२॥बहु उसंतीत आलों । तया भ्यालों स्थळासी ॥३॥तुका ह्मणे तूं जननी । ये निर्वाणी विठ्ठले ॥४॥
नाहीं गुणदोष लिंपों देत अंगीं । झाडितां प्रसंगीं वरावरी ॥१॥निकटवासिया आळवितों धांवा । तेथूनियां देवा सोडवूनी ॥ध्रु.॥उमटे अंतरीं तें करूं प्रगट । कळोनी बोभाट धांव घालीं ॥२॥तुका ह्मणे तरि वांचलों या काळें । समर्थाचे बळें सुखी असों ॥३॥
आतां येणें पडिपाडें । रस सेवूं हा निवाडें । मुंगी नेली गोडें । ठेविलिये अडचणी ॥१॥तैसें होय माझ्या जीवा । चरण न सोडीं केशवा । विषयबुद्धि हेवा । वोस पडो सकळ ॥ध्रु.॥भुकेलिया श्वाना । गांठ पडे सवें अन्ना । भुकों पाहे प्राणा । परि तोंडिंची न सोडी ॥२॥काय जिंकियेलें मन । जीवित्व कामातुरा तृण । मागे विभिचारिण । भक्ती तुका ये जाती ॥३॥
न पवीजे तया ठाया । आलों कायाक्लेशेसीं ॥१॥आतां माझें आणीं मना । नारायणा ओजेचें ॥ध्रु.॥बहु रिणें पिडिलों फार । परिहार करावा ॥२॥तुका ह्मणे निर्बळशिक्त । काकुलती म्हुण येतों ॥३॥
बहु फिरलों ठायाठाव । कोठें भाव पुरे चि ना ॥१॥समाधान तों पावलों । उरलों बोलों यावरि ॥ध्रु.॥घे गा देवा आशीर्वाद । आमुच्या नांद भाग्यानें ॥२॥तुका ह्मणे जेवूं आधी । खवखव मधीं सारावी ॥३॥
कोण येथें रिता गेला । जो जो आला या ठाया॥१॥तातडी ते काय आतां । ज्याची चिंता तयासी ॥ध्रु.॥नांवासाटीं नेघें भार । न लगे फार वित्पित्त ॥२॥तुका ह्मणे न लगे जावें । कोठें देवें सुचनें ॥३॥
इंिद्रयाचें पुरे कोड । तें चि गोड पुढती ही ॥१॥जावें म्हणती पंढरपुरा । हा चि बरा संसार ॥ध्रु.॥बैसलें तें मनामुळीं । सुख डोळीं देखिलें ॥२॥तुका ह्मणे देती कान । वाणावाण निवडूनी ॥३॥
आतां देवा मोकिळलें । तुह्मी भलें दिसेना ॥१॥आतां नाहीं जीवभाव । उरला ठाव वेगळा ॥ध्रु.॥सांभाळुन घ्यावें देवा । आपणासवा यावरि ॥२॥तुका ह्मणे नग्न भाज । तरि ते लाज स्वामीसी ॥३॥
आशाबद्ध आह्मी भाकितसों कींव । तत्पर हा जीव कार्यापाशीं ॥१॥प्रतिउत्तराची पाहातसें वाट । करूनि बोभाट महाद्वारीं ॥ध्रु.॥आपुल्या उचितें करूनियां ठेवीं । संबंध गोसावी तोडोनियां ॥२॥तुका ह्मणे एक जालिया निवाड । कोण बडबड करी मग ॥३॥
खद्योतें फुलविलें रविपुढें ढुंग । साक्षी तंव जग उभयतां ॥१॥आपल्या आपण नाहीं शोभों येत । चार करी स्फीत दाखवूनि ॥ध्रु.॥खाणार ताकाचें आसातें माजीरें । आपणें चि अधीर कळों येतें ॥२॥तुका ह्मणे जळो मैंदाची मवाळी । दावूनियां नळी कापी सुखें ॥३॥
नाहीं सरों येत कोरडएा उत्तरीं । जिव्हाळ्याची बरी ओल ठायीं ॥१॥आपुलिया हिता मानिसी कारण । सत्या नारायण साहे असो ॥ध्रु.॥निर्वाणीं निवाड होतो आगीमुखें । तप्त लोह सुखें धरितां हातीं ॥२॥तुका ह्मणे नेम न टळतां बरें । खयासी चि खरें ऐसें नांव ॥३॥
आलों उल्लंघुनि दुःखाचे पर्वत । पायांपाशीं हित तुमच्या तरी ॥१॥न देखेल लासा दुःखी होतें मन । कठिणें कठिण वाटतसे ॥ध्रु.॥नव्हे सांडी परि वाटतें निरास । न ये माझा दिस संकल्पाचा ॥२॥तुका ह्मणे तुह्मीं सदैव जी देवा । माझ्या हा चि जीवा एक ठाव ॥३॥
किती सोसिती करंटीं । नेणों संसाराची आटी । सर्वकाळ पोटीं । चिंतेची हळहळ ॥१॥रिकामिया तोंडें राम । काय उच्चारितां श्रम । उफराटा भ्रम । गोवी विषय माजिरा ॥ध्रु.॥कळतां न कळे । उघडे झाकियेले डोळे । भरलें त्याचे चाळे । अंगीं वारें मायेचें ॥२॥तुका ह्मणे जन । ऐसें नांवबुद्धिहीन । बहुरंगें भिन्न । एकीं एक निमलें ॥३॥
मंगळाचा मंगळ सांटा । विट तोटा नेणे तें ॥१॥हें भरा सातें आलें । भलें भलें ह्मणवावें ॥ध्रु.॥जनीं जनार्दन वसे । येथें दिसे तें शुद्ध ॥२॥तुका ह्मणे बहुतां मुखें । खरें सुखें ठेवावें॥३॥
नामाचा महिमा बोलिलों उत्कर्ष । अंगा कांहीं रस न ये चि तो ॥१॥कैसें समाधान राहे पांडुरंगा । न लगे चि अंगा आणी कांहीं ॥ध्रु.॥लाभाचिये अंगीं सोस कवतुकें । फिक्याचें तें फिकें वेवसाव ॥२॥तुका ह्मणे करा आपुला महिमा । नका जाऊं धर्मावरि माझ्या ॥३॥
हें चि वारंवार । पडताळुनी उत्तर ॥१॥करितों पायांसी विनंती । नुपेक्षावें कमळापती ॥ध्रु.॥गंगोदकें गंगे । अर्घ्य द्यावें पांडुरंगे ॥२॥जोडोनियां हात । करी तुका प्रणिपात ॥३॥
अवचित या तुमच्या पायां । देवराया पावलों ॥१॥बरवें जालें देशाउर । आल्या दुर सारिखें ॥ध्रु.॥राहोनियां जातों ठाया । आलियाची निशानी ॥२॥तुका ह्मणे चरणसेवा । जोडी हेवा लाधली ॥३॥
आतां पाविजेल घरा । या दातारा संगती ॥१॥पायावरि ठेवूं माथा । सर्वथा हा नुपेक्षी ॥ध्रु.॥येथून तेथवरि आतां। नाहीं सत्ता आणिकांची ॥२॥तुका ह्मणे चक्रपाणी । शिरोमणी बिळयांचा ॥३॥
बरवें माझ्या केलें मनें । पंथें येणें निघालें ॥१॥अभयें च जावें ठाया । देवराया प्रतापें ॥ध्रु.॥साधनाचा न लगे पांग । अवघें सांग कीर्तन ॥२॥तुका ह्मणे सत्ता थोरी । कोण करी खोळंबा ॥३॥
मागें पुढें नाहीं । दुजें यावेगळें कांहीं ॥१॥नाहीं उरलें आणीक । केला झाडा सकिळक ॥ध्रु.॥विश्वासावांचून । नांवें दुजियाचे शून्य ॥२॥देवाविण कांहीं । तुका ह्मणे उरी नाहीं॥३॥
वैराग्याचा अंगीं जालासे संचार । इच्छी वनांतर सेवावया ॥१॥कां जी याचें करूं नये समाधान । वियोगानें मन सिणतसे ॥ध्रु.॥नये चि यावया पंढरीचें मूळ । न देवे चि माळ कंठींची ही ॥२॥तुका ह्मणे जालें अप्रीतीचें जिणें । लाजिर हें वाणें सेवा करी ॥३॥
आिळकरा कोठें साहातें कठिण । आपुला तें प्राण देऊं पाहे ॥१॥सांभाळावें मायबापें कृपादृष्टी । पीडितां तो दृष्टी देखों नये ॥ध्रु.॥अंतरलों मागें संवसारा हातीं । पायांपें सरतीं जालों नाहीं ॥२॥तुका ह्मणे तुह्मी विचारा जी देवा । ठेवाल तें ठेवा कोणे परी ॥३॥
स्वप्नींचें हें धन हातीं ना पदरीं । प्रत्यक्ष कां हरि होऊं नये ॥१॥आजुनि कां करा चाळवाचाळवी । सावकाशें द्यावी सत्य भेटी ॥ध्रु.॥बोलोनियां फेडा जीवींची काजळी । पाहेन कोमळीं चरणांबुजें ॥२॥तुका ह्मणे माझ्या जीवींचिया जीवा । सारूनियां ठेवा पडदा आतां ॥३॥
येतील अंतरा शिष्टाचे अनुभव । तळमळी जीव तया सुखा ॥१॥आतां माझा जीव घेउनियां बळी । बैसवावें वोळी संतांचिये ॥ध्रु.॥विस्तारिली वाचा फळेंविण वेल । कोरडे चि बोल फोस वांझे ॥२॥तुका ह्मणे आलों निर्वाणा च वरी । राहों नेदीं उरी नारायणा ॥३॥
ह्मणउनि काय जीऊं भक्तपण । जायाचीं भूषणें अळंकार ॥१॥आपुल्या कष्टाची करूनियां जोडी । मिरवीन उघडी इच्छावसें ॥ध्रु.॥तुके तरि तुकीं खयाचे उत्तम । मुलाम्याच्या भ्रम कोठवरि ॥२॥तुका ह्मणे पुढें आणि मागें फांस । पावें ऐसा नास न करीं देवा ॥३॥
आपण चि व्हाल साहे । कसियाला हे धांवणी॥१॥भाकिली ते उरली कींव । आहे जीव जीवपणें ॥ध्रु.॥आहाच कैंचा बीजा मोड । प्रीति कोड वांचूनि ॥२॥तुका ह्मणे दंडिन काया । याल तया धांवणिया ॥३॥
निश्चितीनें होतों करुनियां सेवा । कां जी मन देवा उद्वेगिलें ॥१॥अनंत उठती चित्ताचे तरंग । करावा हा त्याग वाटतसे ॥ध्रु.॥कोण तुह्मांविण मनाचा चाळक । दुजें सांगा एक नारायणा ॥२॥तुका ह्मणे माझा मांडिला विनोद । करऊं नेणें छंद कराल काइ ॥३॥
आश्वासावें दास । तरी घडे तो विश्वास ॥१॥नाहीं चुकत चाकरी । पुट लाडे शोचे थोरी ॥ध्रु.॥स्वामीच्या उत्तरें । सुख वाटे अभयें करें ॥२॥न मगें परि भातें । तुका ह्मणे निढिळ रितें ॥३॥
जेणें होय हित । तें तूं जाणसी उचित ॥१॥मज नको लावूं तैसें । वांयां जायें ऐसें पिसें ॥ध्रु.॥धरितोसी सत्ता । होसी सकळ जाणता ॥२॥चतुराच्या राया । अंगीकारावें तुकया॥३॥
राहे उभा वादावादीं । तरी फंदीं सांपडे ॥१॥लव्हाळ्यासी कोठें बळ । करिल जळ आपुलें ॥ध्रु.॥कठिणासी बळजोडा । नम्र पीडा देखेना ॥२॥तुका ह्मणे सर्वरसीं । मिळे त्यासी गोत तें ॥३॥
म्हणउनि जाली तुटी । नाहीं भेटी अहंकारें ॥१॥दाखविलें देवें वर्म । अवघा भ्रम नासला ॥ध्रु.॥हातें मुरगाळितां कान। नाहीं भिन्न वेदना ॥२॥तुका ह्मणे एकांतसुखें । अवघें गोतें गुंतलें॥३॥
न पडो आतां हाडीं घाव । मध्यें कींव नासक ॥१॥करविली आत्महत्या । जीवा कां द्वंदाचा ॥ध्रु.॥आशापाशीं गुंतला गळा । तेणें कळाहीन जालों ॥२॥तुका ह्मणे लावूं मुळी । जीवकुळी थोरेसी ॥३॥
सामावे कारण । नाहीं सोसत धरणें ॥१॥लादी थींके लाजिरवाणी । हीनकमाईची घाणी ॥ध्रु.॥पुष्प जवळी नाका। दुगपधीच्या नांवें थुंका ॥२॥तुका ह्मणे किती । उपदेशहीन जाती॥३॥
असाल ते तुह्मी असा । आह्मी सहसा निवडों ना॥१॥अनुसरलों एका चित्तें । हातोंहातें गींवसित ॥ध्रु.॥गुणदोष काशासाटीं । तुमचे पोटीं वागवूं ॥२॥तुका ह्मणे दुजें आतां । कोठें चित्ता आतळों ॥३॥
सोंवळा होऊं तों वोंवळें जडलें । सांडीमांडी बोलतोंडीं बीजीं ॥१॥एकसरीं केलीं किळवरें साटी । आतां नका तुटी पायांसवें ॥ध्रु.॥संकल्पीं विकल्प पापाचा सुकाळ । रज्जुसर्प मूळ मरणाचें ॥२॥तुका ह्मणे हें तूं ब्रह्मांड चाळिता । मी कां करूं चिंता पांडुरंगा ॥३॥
आहे तैसा आतां आहे ठायीं बरा । ठेविलों दातारा उचितें त्या ॥१॥वचनाचा भार पडिलिया शिरीं । जालें मग भारी उतरेना ॥ध्रु.॥अबोल्याची सवे लावुनियां मना । फाकों नेदीं गुणा ऐसें करूं ॥२॥तुका ह्मणे आह्मां गोंवळ्याचा संग । राखतें तें अंग जाणतसों ॥३॥
तूं माझा कोंवसा । परी न कळे या धसां ॥१॥कूट खाती मागें पुढें । जाती नरयेगांवा पुढें ॥ध्रु.॥माझी ह्मणती कवी। निषेधुनि पापी जीवीं ॥२॥तुका ह्मणे पांडुरंगा । आतां कोण लेखी जगा ॥३॥
दर्पणासी बुजे । नखटें तोंड पळवी लाजे ॥१॥गुण ज्याचे जो अंतरीं । तो चि त्यासी पीडा करी ॥ध्रु.॥चोरा रुचे निशी। देखोनियां विटे शशी ॥२॥तुका ह्मणे जन । देवा असे भाग्यहीन ॥३॥
ह्मणउनि शरण जावें । सर्वभावें देवासी ॥१॥तो हा उतरील पार । भवदुस्तरनदीचा ॥ध्रु.॥बहु आहे करुणावंत । अनंत हें नाम ज्या ॥२॥तुका ह्मणे साक्षी आलें । तरी केलें प्रगट॥३॥
ऐसीं वर्में आह्मां असोनियां हातीं । कां होऊं नेणतीं दिशाभुली ॥१॥पोटाळुनी पाय कवळीन उभा । कृपे पद्मनाभा हालों नेदीं ॥ध्रु.॥आपुले इच्छेसी घालीन संपुष्टीं । श्रीमुख तें दृष्टी न्याहाळीन ॥२॥तुका ह्मणे बहु सांडियेलीं मतें । आपुल्या पुरतें धरुनी ठेलों ॥३॥
रत्नाच्या वोवणी कांचे ऐशा घरी । आव्हेरुनी दुरी अधिकारें ॥१॥जातिस्वभाव आला डोळ्यां आड । तया घडे नाड न कळतां ॥ध्रु.॥कामधेनु देखे जैशा गाईह्मैसी । आणिकांतें ऐसी करोनियां ॥२॥तुका ह्मणे काय बोलोनियां फार । जयाचा वेव्हार तया साजे ॥३॥
तरी च हीं केलीं । दानें वाईट चांगलीं ॥१॥येक येक शोभवावें । केलें कवतुक देवें ॥ध्रु.॥काय त्याची सत्ता । सूत्र आणीक चाळिता ॥२॥तुका ह्मणे धुरें । डोळे भरिले परि खरें॥३॥
अंधळें तें सांगे सांगितल्या खुणा । अनुभव देखणा प्रगट त्या ॥१॥नांदणुक सांगे वडिलाचें बळ । कैसा तो दुर्बळ सुख पावे ॥२॥तुका ह्मणे नांदों आपल्या प्रतापें । तयासी लोकांपें स्तुती सांगों ॥३॥
करी आणिकांचा अपमान । खळ छळवादी ब्राह्मण। तया देतां दान । नरका जाती उभयतां ॥१॥तैसें जालें दोघांजणां। मागतिया यजमाना । जाळियेलें वनां । आपणासहित कांचणी॥ध्रु.॥घडितां दगडाची नाव । मोल क्लेश गेले वाव । तरता नाहीं ठाव। बुडवी तारूं तरतीया ॥२॥चोरा दिधला सांटा । तेणें मारियेल्या वाटा । तुका ह्मणे ताठा । हें तंव दोघे नाडती ॥३॥
जळो ते जाणींव जळो ते शाहाणींव । राहो माझा भाव विठ्ठलपायीं ॥१॥जळो तो आचार जळो तो विचार । राहो मन स्थीर विठ्ठलपायीं ॥ध्रु.॥जळो हा लौकिक जळो दंभमान । लागो जीव ध्यान विठ्ठलाचें ॥२॥जळो हें शरीर जळो हा संबंध । राहो परमानंद माझा कंठीं ॥३॥तुका ह्मणे येथे अवघें चि होय । धरीं मना सोय विठोबाची ॥४॥
विश्वास धरूनि राहिलों निवांत । ठेवूनियां चित्त तुझे पायीं ॥१॥तरावें बुडावें तुझिया वचनें । निर्धार हा मनें केला माझा॥ध्रु.॥न कळे हें मज साच चाळविलें । देसी तें उगलें घेइन देवा ॥२॥मागणें तें सरे ऐसें करीं देवा । नाहीं तरी सेवा सांगा पुढें॥३॥करावें कांहीं कीं पाहावें उगलें । तुका ह्मणे बोलें पांडुरंगा॥४॥
देवाचिये पायीं देइप मना बुडी । नको धांवों वोढी इंिद्रयांचे ॥१॥सर्व सुखें तेथें होती एकवेळे । न सरती काळें कल्पांतीं ही ॥ध्रु.॥जाणें येणें खुंटे धांवे वेरजार । न लगे डोंगर उसंतावे ॥२॥सांगन तें तुज इतुलें चि आतां । मानी धन कांता विषतुल्य ॥३॥तुका ह्मणे तुझे होती उपकार । उतरों हा पार भवसिंधु ॥४॥
आह्मी विठ्ठलाचे दास जालों आतां । न चले हे सत्ता आणिकांची ॥१॥नावरे तयासी ऐसें नाहीं दुजें । करितां पंढरिराजें काय नव्हे ॥ध्रु.॥कोठें तुज ठाव घ्यावयासी धांवा । मना तूं विसावा घेई आतां ॥२॥इंिद्रयांची वोढी मोडिला व्यापार । ज्या अंगें संचार चाळी तुज ॥३॥तुका ह्मणे आह्मी जिंकोनियां काळ । बैसलों निश्चळ होऊनियां ॥४॥
सांगतों तरि तुह्मी भजा रे विठ्ठला । नाहीं तरि गेला जन्म वांयां ॥१॥करितां भरोवरी दुरावसी दुरी । भवाचिये पुरीं वाहावसी ॥२॥कांहीं न लगे एक भाव चि कारण । तुका ह्मणे आण विठ्ठलाची ॥३॥
शब्दज्ञानी येऊं नेदीं दृष्टीपुढें । छळवादी कुडे अभक्त ते ॥१॥जळो ते जाणींव जळो त्याचे दंभ । जळो त्याचें तोंड दुर्जनाचें ॥२॥तुका ह्मणे येती दाटूनि छळाया । त्यांच्या बोडूं डोया न धरूं भीड ॥३॥
अन्यायासी राजा जरि न करितां दंड । बहुचक ते लंड पीडिती जना ॥१॥ने करी निगा कुणबी न काढितां तण । कैंचे येती कण हातासी ते ॥२॥तुका ह्मणे संतां करूं नये अनुचित। पाप नाहीं नीत विचारिता ॥३॥
भले लोक नाहीं सांडीत ओळखी । हे तों झाली देखी दुसयाची ॥१॥असो आतां यासी काय चाले बळ । आपुलें कपाळ वोडवलें ॥ध्रु.॥समर्थासी काय कोणें हें ह्मणावें । आपुलिया जावें भोगावरि ॥२॥तुका ह्मणे तुह्मां बोल नाहीं देवा । नाहीं केली सेवा मनोभावें ॥३॥
मुकें होतां तुझ्या पदरीचें जातें । मूर्ख तें भोगितें मीमीपण ॥१॥आपुलिये घरीं मैंद होऊनी बसे । कवण कवणासी बोलों नका ॥२॥तुका ह्मणे तुह्मां सांगतों मी खुण । देवासी तें ध्यान लावुनि बसा ॥३॥
आषाढी निकट । आणी कार्तिकीचा हाट ॥१॥पुरे दोन्ही च बाजार । न लगे आणीक व्यापार ॥ध्रु.॥तें चि घ्यावें तें चि घ्यावें । कैवल्याच्या रासी भावें ॥२॥कांहीं कोणा नेणे । विठो वांचूनि तुका ह्मणे ॥३॥
देऊनियां प्रेम मागितलें चित्त । जाली फिटाफिट तुह्मां आह्मां ॥१॥काशानें उदार तुह्मांसी ह्मणावें । एक नेसी भावें एक देसी ॥ध्रु.॥देऊनियां थोडें नेसील हें फार । कुंटिसी विचार अवघियांचा ॥२॥तुका ह्मणे आह्मां भांडवल चित्त । देउनी दुश्चित पाडियेलें ॥३॥
तातडीची धांव अंगा आणि भाव । खोळंबा तो मग निश्चयाचा ॥१॥ह्मणउनि बरी विचारावी चाली । उरीचि ते बोली कामा येते ॥ध्रु.॥कोरडें वैराग्य माजिरा बडिवार । उतरे तो शूर अंगींचें तें ॥२॥तुका ह्मणे बरी झयाची ते चाली । सांचवण्या खोली कैसीयांची ॥३॥
मी तों बहु सुखी आनंदभरिता । आहें साधुसंतां मेळीं सदा ॥१॥देवा कांहीं व्हावें ऐसें नाहीं माझ्या जीवा । आणीक केशवा तुजविण ॥ध्रु.॥न लगे वैकुंठ मोक्ष सायुज्यता । सुख वाटे घेतां जन्म ऐसें ॥२॥मृत्युलोकीं कोण धरिलें वासना । पावावया जनासवें दुःख ॥३॥तुका ह्मणे तुझा दास ऐसें लोकां । कांहीं सकिळकां कळों यावें ॥४॥
घ्या रे लुटी प्रेम सुख । फेडा आजि धणी । चुकला तो मुकला । जाली वेरझार हाणी ॥१॥घाला घातला वैकुंठीं । करूनियां जीवें साटी । पुरविली पाठी । वैष्णवीं काळाची ॥ध्रु.॥अवघें आणिलें अंबर । विठोसहित तेथें धुर । भेदूनि जिव्हार । नामबाणीं धरियेला ॥२॥संचित प्रारब्ध क्रियमाण । अवघीं जालीं गहन । केलीं पापपुण्यें । देशधडी बापुडीं ॥३॥आनंदें गर्जती निर्भर । घोष करिती निरंतर । कांपती असुर । वीर कवणा नांगवती॥४॥जें दुर्लभ ब्रह्मादिकां । आजि सांपडलें फुका । घ्या रे ह्मणे तुका । सावचित्त होउनी ॥५॥
ते चि करीं मात । जेणें होइल तुझें हित ॥१॥काय बडबड अमित । सुख जिव्हारीं सिणविसी ॥ध्रु.॥जो मुळव्याधी पीडिला । त्यासी देखोन हांसे खरजुला ॥२॥आराथकरी सोसी । त्यासि हांसे तो आळसी ॥३॥क्षयरोगी ह्मणे परता । सर रोगिया तूं आतां ॥४॥वडस दोहीं डोळां वाढले । आणिकां कानें कोंचें ह्मणे ॥५॥तुका ह्मणे लागों पायां । शुद्ध करा आपणियां ॥६॥
कळों आला भाव माझा मज देवा । वांयांविण जीवा आठविलें ॥१॥जोडूनि अक्षरें केलीं तोंडपिटी । न लगे सेवटीं हातीं कांहीं ॥२॥तुका ह्मणे माझे गेले दोन्ही ठाय । सवसार ना पाय तुझे मज ॥३॥
आतां तरी मज सांगा साच भाव । काय म्यां करावें ऐसें देवा ॥१॥चुकावया कर्म नव्हतें कारण । केला होय सीण अवघा चि ॥२॥तुका ह्मणे नको पाहूं निरवाण । देइप कृपादान याचकासी ॥३॥
बोल नाहीं तुझ्या दातृत्वपणासी । आह्मी अविश्वासी सर्वभावें ॥१॥दंभें करी भक्ती सोंग दावी जना । अंतरीं भावना वेगिळया ॥२॥तुका ह्मणे देवा तूं काय करिसी । कर्मा दुस्तरासी आमुचिया ॥३॥
नामधारकासी नाहीं वर्णावर्ण । लोखंड प्रमाण नाना जात ॥१॥शस्त्र अथवा गोळे भलता प्रकार । परिसीं संस्कार सकळ ही हेम ॥ध्रु.॥प्रजन्य वर्षतां जीवना वाहावट । तें समसकट गंगे मिळे ॥२॥सर्व तें हें जाय गंगा चि होऊन । तैसा वर्णावर्ण नाहीं नामीं ॥३॥महांपुरीं जैसें जातसे उदक । मध्यें तें तारक नाव जैसी ॥४॥तये नावेसंगें ब्राह्मण तरती । केवीं ते बुडती अनामिक॥५॥नाना काष्ठजात पडतां हुताशनीं । ते जात होउनी एकरूप ॥६॥तेथें निवडेना घुरे कीं चंदन । तैसा वर्णावर्ण नामीं नाहीं ॥७॥पूर्वानुवोळख तें चि पैं मरण । जरि पावे जीवन नामामृत ॥८॥नामामृतें जालें मुळीचें स्मरण । सहज साधन तुका ह्मणे ॥९॥
कां हो पांडुरंगा न करा धांवणें । तरि मज कोणें सोडवावें ॥१॥तुझा ह्मणऊनि आणिकापें उभा । राहों हें तों शोभा नेदी आतां ॥ध्रु.॥काळें पुरविली पाठी दुरवरी । पुढें पायां धीरी राहों नेदी ॥२॥नको आणूं माझें संचित मनासी । पावन आहेसी पतितां तूं ॥३॥तुका ह्मणे चाले आणिकांची सत्ता । तुज आळवितां नवल हें ॥४॥
कावळ्याच्या गळां मुक्ताफळमाळा । तरी काय त्याला भूषण शोभे ॥१॥गजालागीं केला कस्तुरीचा लेप । तिचें तो स्वरूप काय जाणे ॥ध्रु.॥बकापुढें सांगे भावार्थे वचन । वाउगा चि सीण होय त्यासी ॥२॥तुका ह्मणे तैसे अभाविक जन । त्यांसी वांयां सीण करूं नये ॥३॥
ओळीवर टॅप केल्यास ती ठळक होते — कुठे आहात ते सापडावे म्हणून.